

शिक्षणनामा
रमेश बिजेकर
पाओलो फ्रेरे यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव असला तरी त्यांच्या चिंतनशील लिखाणात त्यांची प्रज्ञा ठळकपणे दिसून येते. वर्गवादी प्रभुत्वशाली राजकीय भूमिका शोषक-शोषित नाते निर्माण करते, वृद्धिंगत करते. ही महत्त्वाची मांडणी त्यांनी केली.
शाळा मुक्त करत नाही, तर ती जास्तीत जास्त पाळीव बनवते,’ हे विधान पाओलो फ्रेरे यांचे आहे. यात त्यांनी प्रभुत्वशाली वर्गाच्या शिक्षण व्यवस्थेचे अंतरंग उघड केले आहे. ‘उत्पीडीतों का शिक्षाशास्त्र’ हे त्यांचे पुस्तक जगभर गाजले. या पुस्तकात फ्रेरे यांनी शोषक आणि शोषितांमधील अंतर्विरोध ताकदीने मांडला आहे. शिक्षण व्यवस्था ही प्रभुत्वशाली वर्गाचे हितसंबंध संरक्षित करण्यासाठी तयार केली जाते. त्यासाठी ती शोषित विद्यार्थ्यांना शोषक बनण्याचे स्वप्न दाखवत असते. मुळात ती ‘अमानवीय’ बनवत असते. परंतु मनुष्याचे ऐतिहासिक प्रयोजन आणि अस्तित्व टिकवण्याचे कर्तव्य हे पूर्ण ‘मनुष्य’ बनण्यात आहे. ‘मनुष्य’ बनण्याची प्रक्रिया ही समांतरपणे घडत असते. हे अंतर्विरोध त्यांनी माणूस-अमानुष, बँकिंग पद्धती, संवादात्मकता आणि संस्कृती या घटकांच्या चर्चेतून मांडली.
पाओलो फ्रेरे यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव असला तरी त्यांच्या चिंतनशील लिखाणात त्यांची प्रज्ञा ठळकपणे दिसून येते. शिक्षण ही संपूर्ण राजकीय कृती आहे आणि ती वर्गीय प्रभावात आहे. वर्गवादी प्रभूत्वशाली राजकीय भूमिका शोषक-शोषित नाते निर्माण करते, वृद्धिंगत करते, ही महत्त्वाची मांडणी त्यांनी केली. त्याच्या वर्गीय आकलनातून शिक्षण व्यवस्थेतील अंतर्विरोध भारतातील शिक्षण व्यवस्थेला लागू पडतो. फरक फक्त वर्गीय व जातवर्गीय राजकीय भूमिकेचाच आहे. भारतातील एकजिनसी बहुस्तरीय शोषण व्यवस्थेत शोषक-शोषित, शासक-शासित हे संबंध कायम आहेत. शिक्षणातील जातवर्गीय संबंध समजून घेण्यासाठी पाओलो फ्रेरे यांचा शोषक-शाेषित सिद्धांत मदतकारक ठरतो. फ्रेरे यांचा हा सिद्धांत आपण समजून घेऊया.
अल्पसंख्य प्रभुत्वशाली अभिजन वर्ग बहुसंख्य जनतेवर शासन करतो. तो आपले प्रभूत्व कायम ठेवण्यासाठी मानसाचे वस्तुकरण करतो. वस्तुकरणातून अमानुष बनण्याची प्रक्रिया घडते. शोषक आणि शोषित संबंधामध्ये निर्देश हे आधारभूत तत्त्व असते. शोषितांमध्ये अपरिहार्यता आणि शोषक बनण्याच्या मिथ्या अभिलाषेतून शोषित वर्ग प्रभुत्वशाली वर्गाच्या निर्देशाचे पालन करतो. ‘स्व’ चेतना हरवून बसतो. यातून व्यक्तिकेंद्री विचारसरणी, वर्तन अस्तित्वात येऊन एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर आपली इच्छा लादण्याची प्रक्रिया घडते, असे फ्रेरे म्हणतात. अमानुषीकरणाचा हा राजकीय सिद्धांत उलथवून टाकून संपूर्ण ‘मनुष्य’ निर्मितीकडे जाण्याचा आशावाद त्यांच्या लिखाणात वारंवार डोकावतो. शोषितांची मुक्ती ही सामाजिक परिवर्तनातून घडेल. सामाजिक परिवर्तनात शिक्षणाची क्रांतिकारी भूमिका महत्त्वाची असते. शिक्षण हे व्यवस्थेत स्थान प्राप्त करण्यासाठी नसून ‘मनुष्य’ बनण्यासाठी आहे. ‘अमानुष’ बनवणारी व्यवस्था बदलल्याशिवाय ‘मनुष्य’ बनता येत नाही. शिक्षण ही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व नैतिक कृती आहे. ती वर्गांताची कृती आहे, असा निर्वाळा फ्रेरे देतात.
व्यवस्था बदलाचे आव्हान त्यांनी अधोरेखित केले आहे. सत्ताधारी वर्ग व्यवस्थेचे गौरविकरण करतात. या व्यवस्थेतच तुमचे कल्याण आहे. ही आदर्श व्यवस्था आहे. त्यामुळे प्रचलित शिक्षणव्यवस्था तुमच्या उत्थानासाठीच तयार केली आहे, असे सांगून शिक्षणातील सार्वत्रिकीकरण, स्तरीकरण व कालबाह्यता दडवली जाते. याला बळी पडून शोषित वर्ग त्याचा भाग बनतात. हे पहिले आव्हान त्यांनी अधोरेखित केले. दुसरे आव्हान शोषित वर्गातील द्वंदात्मक विचारसरणीचे असते. एका बाजूला शासक वर्गाचा प्रतिनिधी बनण्याची अभिलाषा व दुसऱ्या बाजूला तो शोषतातून मुक्ती अपेक्षित करतो. रोजच्या जगण्याची अपरिहार्यता म्हणून शोषक वर्गाचा भाग बनण्याचा किंवा लाभार्थी होण्याचा तो प्रयत्न करतो. हे वास्तव लक्षात घेऊन फ्रेरे यांनी सूक्ष्म निरीक्षण नोंदवले, शोषितांना मनुष्य बनण्याची (वर्गातांची) आस कायम असते. शोषितांची मुक्ती ते स्वत:च करू शकतात. शोषक वर्ग त्यांची मुक्ती करू शकत नाही. म्हणून शोषितांमधील अंतर्विरोध संपवणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी ठामपणे मांडले.
शिक्षणातील बँकिंग पद्धती विद्यार्थ्याचे वस्तुकरण करते. विद्यार्थी एक वस्तू म्हणून शिक्षण व्यवस्था त्याला घडवत असते. विद्यार्थ्याची प्रतिभा, स्वातंत्र्य, सृजन, रचनात्मकता कमी करते किंवा संपवते. डब्यात लाडू भरावा तसा विद्यार्थ्याच्या मेंदूत माहिती भरली जाते. या पद्धतीची १० लक्षणे फ्रेरे यांनी मांडली आहेत. (ती भारताच्या शिक्षण पद्धतीला लागू होतात.)
१) शिक्षक शिकवतो, विद्यार्थी शिकवला जातो. २) शिक्षक संपूर्ण ज्ञानी आहे आणि विद्यार्थी पूर्ण अज्ञानी आहे. ३) शिक्षक विचार करतो आणि तो विद्यार्थ्याबाबतही विचार करतो. ४) शिक्षक बोलतो, विद्यार्थी ऐकतात. ५) शिक्षक शिस्त लावतात, विद्यार्थी पालन करतात. ६) शिक्षक आपल्या मर्जीचा मालक आहे. तो आपली मर्जी चालवतो आणि विद्यार्थ्यांना त्याच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. ७) शिक्षक कार्य करतो आणि विद्यार्थी शिक्षकाच्या कार्यातून सक्रिय झाल्याच्या भ्रमात राहतो. ८) शिक्षक पाठ्यक्रम बनवतो आणि विद्यार्थ्यांला तेच शिकावे लागते. ९) शिक्षक आपल्या व्यावसायिक अधिकाराला (अध्यापन कौशल्य) ज्ञान समजतो व त्या अधिकाराचा विद्यार्थ्याच्या स्वातंत्र्याविरुद्ध वापरतो. १०) शिक्षक अध्ययन प्रक्रियेचा कर्ता असतो आणि विद्यार्थी ही फक्त वस्तू.
या दहाही लक्षणात विद्यार्थ्याचे अस्तित्व कुठेच सापडत नाही. तो केवळ शिक्षण व्यवस्थेचा साधन बनतो. विद्यार्थी-शिक्षक नाते दाता-आश्रित, ज्ञानी-अज्ञानी तयार होतात. त्यांच्यातील सृजनशीलता, मैत्रीपूर्ण नाते संपुष्टात येते. विद्यार्थ्याचे नैसर्गिक व्यक्तित्व मारले जाते. तो सृजनशील, रचनात्मक होऊ शकत नाही, तर तो यांत्रिकपणे पाठांतर करून परीक्षाकेंद्री बनतो. अशी शिक्षण व्यवस्था माणूस घडवू शकत नाही. फ्रेरे यांनी सांगितलेले हे वास्तव आपण वर्गखोल्यांमध्ये अनुभवत असतो. असे शिक्षणधोरण वर्गीय सत्ता टिकवण्यासाठी प्रभुत्वशाली वर्ग तयार करतो, अशी कारणमीमांसा फ्रेरे यांनी केली. ही शिक्षण व्यवस्था शोषितांची नसते, ती निर्माण करावी, असे ते सुचवितात. विद्यार्थी-शिक्षक नाते संज्ञानात्मक, (वर्णनात्मक नसावे) संवादात्मक, सह संशोधक, टीकात्मक, सृजनात्मक असावे. विश्व व विद्यार्थी यांचे जैविक नाते निर्माण करावे, ज्यामुळे विद्यार्थ्याला चेतन, अचेतन व त्यातील घडामोडी, सिद्धांत, आव्हाने समजून घेता येईल. विद्यार्थ्याचे स्वातंत्र्य ठेवणारी व्यवस्था - अशा शिक्षण व्यवस्थेचा पुरस्कार पाओलो फ्रेरे यांनी केला.
शोषितांच्या मुक्तीसाठी ज्ञान व्यवहार संवादात्मक असावा याचा पुरस्कार महामानवांनी केला. फ्रेरे यांनी संवादाशिवाय ज्ञान व्यवहार होऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली. संवाद कुणाशी व केव्हा घडतो याची विस्ताराने चर्चा त्यांनी केली. त्यांनी संवादाची व्याख्या अशी केली -
‘संवाद उन मनुष्यों के बीच होने वाली मुठभेड है, जिनकी मध्यस्थता विश्व करता है और जो विश्व को नाम देने के लिए एक-दुसरे से सामना करते है…’
विश्वाला समजून घेण्याच्या समान उद्दिष्टांमध्ये संवाद घडू शकतो. परंतु समान उद्दिष्ट नसणारे व बोलण्याचा समान अधिकार नसणाऱ्यांमध्ये संवाद घडू शकत नाही. हे महत्त्वाचे सूत्र बँकिंग शिक्षणपद्धती आणि शोषितांच्या शिक्षण शास्त्राला लागू पडते. बँकिंग शिक्षणपद्धतीत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे समान उद्दिष्ट नसते व बोलण्याचे अधिकार शिक्षकाला असतात. त्यामुळे त्यांच्यात संवाद घडत नाही.
ज्ञानात्मक वैश्विक नाते, स्वातंत्र्य, लोकशाही व संवादाचे समान उद्दिष्टांवर आधारित शोषितांची शिक्षण व्यवस्था उभी होऊ शकते, याचा प्रचंड आशावाद पाओलो फ्रेरे यांच्या चिंतनात दिसून येतो. जगात स्वत:चे स्थान शोधणारी चेतना विकसित करणारी नव्हे तर जग बदलणारी चेतना विकसित करणारी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचे आवाहन फ्रेरे यांनी आपल्याला केले आहे.
rameshbijekar2@gmail.com