तत्त्वचिंतक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

राजा राममोहन रॉय यांच्यापासून भारतामध्ये धर्मसुधारणा आणि समाज सुधारणेबाबत एक नवा विचारप्रवाह सुरू झाला.
तत्त्वचिंतक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
Published on

-प्रसाद कुलकर्णी

दृष्टिक्षेप

मंगळवार, ता. २ जानेवारी २०२४ रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा ८० वा स्मृतिदिन आहे. महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेमध्ये महर्षी वि. रा. शिंदे यांची भागीदारी अतिशय मोठी आहे. ते कर्ते सुधारक होते, कर्मवीर होते, तत्त्वचिंतक होते आणि धर्मसुधारकही होते. धर्माच्या नावे केल्या जाणाऱ्या अनिष्ट रूढी-परंपरेविरुद्ध त्यांनी आवाज उठविला होता. प्रभावी वक्ते, मार्मिक व मर्मग्राही लेखक, इतिहास संशोधक म्हणूनही त्यांचा लौकिक मोठा आहे.

महर्षी शिंदे हे तुलनात्मक आणि समन्वयक पद्धतीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे ते स्वतंत्र व स्वावलंबी विचाराने कार्यरत राहिले. डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया (१९०६), कौटुंबिक उपासना मंडळ (१९२४), ब्राह्मोसमाज (१९३३) या संस्थांची स्थापना त्यांनी केली. भारतीय अस्पृश्यांचा प्रश्न, माझ्या आठवणी, शिंदे लेख संग्रह आदी महत्त्वाचे ग्रंथ त्यांनी लिहिले. गेल्या काही वर्षांत महर्षी शिंदे यांच्यावर चरित्रपर, संशोधनपर लेखन अनेक मान्यवरांनी केलेले आहे. २३ एप्रिल १८७३ रोजी कर्नाटकातील जमखंडी येथे जन्मलेले महर्षी शिंदे २ जानेवारी १९४४ रोजी पुणे येथे कालवश झाले.

महर्षी विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे हे एक झाकलेले माणिक! अण्णासाहेबांचे जीवन म्हणजे सातत्याने धगधगत राहिलेले यज्ञकुंडच. अण्णासाहेबांनी संपूर्ण जीवनभर कणाकणाने जळत राहून आपल्या आयुष्याच्या यज्ञकुंडातला वन्ही सतत प्रज्वलित ठेवला. विसाव्या शतकातील समाज परिवर्तनाच्या चळवळीचा मागोवा घेतल्यास महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जीवनावर जबरदस्त प्रभाव टाकणाऱ्या अण्णासाहेबांच्या वाट्याला जेवढी उपेक्षा आली तेवढी ती अन्य कोणत्याही समाजपुरुषाच्या वाट्याला आलेली नाही. महाराष्ट्रातले पुरोगामी व्यासंगी व साक्षेपी विचारवंत प्रा. गं. बा. सरदार यांच्या 'महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी' या पुस्तकातील उपेक्षितांच्या यादीतही अण्णासाहेबांचे नाव अंतर्भूत होऊ शकले नाही. या उपेक्षित मानकऱ्यांच्या यादीतही आपले अण्णासाहेब पुन्हा उपेक्षित ते उपेक्षितच. समाजकारण हे असे क्षेत्र आहे की, तेथे समाजाला न आवडणाऱ्या गोष्टी समाजसुधारकांना बोलाव्या लागतात, कराव्या लागतात. समाजमनाला त्या पटत नसतात, पचत नसतात. तथापि केवळ समाजमनाचा अनुनय करून समाज सुधारता येत नसतो. समाजसुधारकांना समाजाचा रोष पत्करून हे सतीचे वाण घ्यावे लागते. सहाजिकच, समाज अशा नेत्यांचा छळ करतो. अर्थातच या छळाचे प्रकार कालानुरूप आणि व्यक्तीनुरूप भिन्नभिन्न असतात. 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक उपेक्षित महात्मा' हे पुस्तक ज्येष्ठ विचारवंत व समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य कालवश प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी लिहिले आहे. १९९९ साली ते समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने प्रकाशित झाले. त्या पुस्तकाची सुरुवात एन. डी. सरांनी वरीलप्रमाणे केली आहे.

आधुनिक प्रबोधन चळवळीचे अध्वर्यू म्हणून ज्यांचा उल्लेख करावा लागेल त्या राजा राममोहन रॉय यांच्यापासून भारतामध्ये धर्मसुधारणा आणि समाज सुधारणेबाबत एक नवा विचारप्रवाह सुरू झाला. त्याबाबतची सैद्धांतिक मांडणी सुरू झाली. त्या अध्यात्मप्रवण विचार परंपरेत महर्षी शिंदे यांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. खास करून त्यांनी दलित उद्धाराचे केलेले कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांना प्रचंड टीकेला नेहमीच तोंड द्यावे लागले. ते म्हणतात, "निंदानालस्तीच्या नियमित रतीबावरच समाजसुधारकांची गुजराण होत असते." विठ्ठल रामजी यांचे वडील रामजी हे वारकरी होते आणि आई यमुनाबाई अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या घरी जातीपातीबाबतचा भेदभाव नव्हता. हे समतेचे बाळकडू विठ्ठल रामजींना घरातच मिळू लागले. ते लिहितात, 'माझ्या पुढील आयुष्याचे तारू अनेक तुफानातून सुरक्षितपणे चालले त्याला आधार काय? तर ती माझ्या आई-बाबांची आत्मसंतुष्ट वृत्ती. माझी आई तर आत्मसंतोषाचे दिव्य आगरच. या दाम्पत्याने आपल्या मुलांची नावेही कृष्णा, विठू, जनाबाई, मुक्ताबाई, एकनाथ अशीच वारकरी संप्रदायात ठेवली होती. विठ्ठल रामजी हे हुशार, चुणचुणीत होते. सामाजिक कार्यात ते हिरिरीने सहभागी होत. १८९१ मध्ये ते मॅट्रिक झाले. पुढे ते पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकू लागले. १९९८ मध्ये बी.ए. झाले. सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकरांच्या 'सुधारक' पत्रातील विचाराने ते प्रभावित झाले. तसेच मिल, स्पेन्सर मॅक्सम्युलर आदी अनेकांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला.

त्यांना मराठी, कानडी, संस्कृत, इंग्रजी भाषा येत होतीच. पाली भाषाही त्यांनी अवगत केली. तेथे त्यांनी सर्व धर्माचे तौलानिक अध्ययन केले. भरपूर प्रवास केला आणि भरपूर लेखन केले. माणसाच्या उद्धारासाठी सत‌्धर्म हाच उपाय आहे, असे त्यांचे मत बनले. त्यांना राजा राममोहन रॉय यांचा विभूतीपूजा व व्यक्तिपूजा नाकारणारा ब्राह्मो समाज महत्त्वाचा वाटला. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी स्थापन केलेला ब्राह्मो समाज व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, समता व स्वावलंबन हे मूल्य मानून व एक ईश्वर, एक धर्म, एकच मानवता हे सूत्र मांडून कार्य करू लागला. त्यांनी प्रार्थना समाजाच्या प्रसारासाठी भारतभर प्रवास केला. त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया आणि इंडियन सोशल रिफॉर्मर या वृत्तपत्रात याबाबत लेखन केले. महर्षी शिंदे राजकारण, समाजकारण, धर्मकारण या विषयात जहाल मताचे होते. टिळक आणि गांधी यांच्याविषयी त्यांना प्रचंड आदर होता. पण धर्म व समाज सुधारणेच्या क्षेत्रात जेव्हा या मंडळींनी मवाळ मते मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा महर्षींनी त्यांना विरोध केला. विश्वधर्माच्या पायावर राष्ट्रीय एकात्मता साकारली जावी म्हणून कुटुंबीयांसह त्यांनी स्वतःला वाहून घेतले. त्यांनी देवदासी व मुरळ्या वाहण्याच्या चालीला विरोध केला. मुलांप्रमाणेच मुलींनाही सक्तीचे शिक्षण मिळावे म्हणून चळवळ केली. अनिष्ट परंपरा नष्ट कराव्यात आणि दारूबंदी व्हावी म्हणून प्रयत्न केले. चूल व मूल यातून स्त्रियांनी बाहेर पडावे म्हणून पुण्यात कौटुंबिक उपासना मंडळ स्थापन केले. महर्षी शिंदे यांनी ब्राह्मणेतरात व दलितात राष्ट्रीय वृत्ती निर्माण व्हावी म्हणून 'राष्ट्रीय मराठा संघ' व 'अस्पृश्यताविरोधी समिती' स्थापन केली.

महात्मा गांधी यांच्या भारतातील कार्याला सुरुवात होण्यापूर्वी चौदा वर्षे विठ्ठल रामजी दलितांच्या उद्धारासाठी कार्यरत होते. गांधीजींनीही त्यांचे या कामातील श्रेष्ठत्व मान्य केले होते. वर्गीय दृष्टिकोनातून शेतकरी, मजूर, अस्पृश्य या दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी 'बहुजन पक्ष' स्थापन केला. १९२० मधील कौन्सिलच्या निवडणूक मराठा जातीसाठी असलेल्या राखीव जागेवर शिंदे यांनी उभे राहावे, अशी सूचना राजर्षी शाहू महाराजांनी केली. पण शिंदे यांनी ती नम्रपणे नाकारली. ते सर्वसाधारण जागेवर उभे राहिले आणि पराभूत झाले. महर्षी शिंदे यांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घालण्याचा सल्ला ब्राह्मणेतरांना दिला. अनेक सत्यशोधक ब्राह्मणेतर पुढारी काँग्रेस व महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ्यात उतरले. काँग्रेसमध्ये बहुजन समाज दिसू लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. पण दलित आणि दलितेतर यात नवी राजकीय दरी निर्माण होईल, असे मत व्यक्त करून महर्षी शिंदे यांनी स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीला विरोध केला.

भाई माधवराव बागल यांनी महर्षी शिंदे यांचे वर्णन करताना म्हटले की, 'त्यांना पाहताच त्यांचे पाय मला धरावेसे वाटत असे. मी जात्याच चित्रकार. माझ्या दृष्टीसमोर जणू पुरातन काळ उभा होता. चित्रात पाहिलेले आणि कल्पनेने तरंगत असलेले वशिष्ठ, वाल्मिकी ऋषी यांची ही चालती बोलती मूर्ती होती. अहिंसा आणि क्षात्रधर्म यांचा संयोग होता तो. जणू सात्विक संताप व भूतदया यांचा समन्वय, विषमतेची चीड होती तशीच समतेची भूक होती. शिवछत्रपतींबद्दलचा अभिमान आणि गांधीजींविषयी भक्ती यामुळे महर्षी शिंदे हे सर्वार्थाने असामान्य सुधारक होते.'

शिंदे धर्मशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विविध भाषा व्युत्पत्ती तज्ज्ञ होते. ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व व परमेश्वरावर निष्ठा लोकांच्या प्रचितीस आल्यामुळे लोक त्यांना महर्षी म्हणू लागले. प्रभावी वक्ते, मार्मिक लेखक, इतिहास संशोधक वगैरे अनेक दृष्टींनी शिंदे अष्टपैलू होते. कोणत्याही समकालीन प्रवाहाला सर्वथा प्रमाण न मानता शिंदे स्वतंत्र आणि स्वावलंबी आचाराचे राहिले. तुलनात्मक व समन्वयक पद्धतीचे कर्ते पुरस्कर्ते असल्यामुळे कुशल संघटकही होते. धर्मचिंतक, तत्त्वचिंतक असा हा कर्ता समाजसुधारक एकमेव वाटतो. यांच्या समकाळात ते आगळेवेगळे वाटतात, पण नंतरही त्यांचे असामान्यत्व अढळ राहणारे आहे. प्रारंभी नमूद केलेल्या पुस्तकाचा समारोप करताना प्रा. एन. डी. लिहितात, 'अण्णासाहेब आयुष्यभर त्यांच्याच चालीत चालत राहिले. त्यांनी जगाचा निरोप घेतला तेव्हा स्मशानात त्यांना निरोप देण्यासाठी देखील मोजकीच माणसे जमलेली होती. आमच्या या थिट्या समाजाला अण्णासाहेबांचा महत्त्व समजणे शक्य नव्हतं इतकी त्यांची उंची होती. अण्णासाहेबांनी जाणीवपूर्वक न मळलेली वाट पत्करली होती. रॉबर्ट फ्रॉस्ट या कवीच्या काव्यपंक्तींप्रमाणे ती न मळलेली वा चोखाळल्यामुळे त्यांना काटेकुटे बोचले असतील. त्यांचे पाय रक्तबंबाळ झाले असतील. वेदना सहन कराव्या लागल्या असतील. मळलेल्या वाटेनेही त्यांना जाता आले असते. त्या मळलेल्या वाटेने जाणारेच अधिक लोक होते. त्या वाटेने ते गेले असते तर त्यांना काट्याकुट्याचा त्रास झाला नसता. त्यांचे पाय रक्तबंबाळ झाले नसते. प्रवासाचा कसलाच शीण जाणवला नसता. हे सारे खरे आहे; परंतु या मळलेल्या वाटेने जाणाऱ्यांना ती वाट नेईल तिकडेच जावे लागते. त्यांना जिकडे जायचे असेल तिकडे ती वाट जात नसते. त्यांना प्रवाहपतिताप्रमाणे ती वाट नेईल तिकडे जावे लागते. अण्णासाहेबांनी त्यांना जिकडे जायचे होते तिकडे जाण्यासाठी नवीन वाट मळवली. काटेकुटे सहन केले. पाय रक्तबंबाळ झाले तरी त्याची कसलीही पर्वा केली नाही. हीच माणसं नवं जग शोधून काढतात. नवा माणूस, नवा समाज घडवतात. रात्रीच्या नीरव शांततेत सारे जग झोपेच्या अधीन होत असताना आपल्याच नादात आपल्याच एकतारीवर शांतपणे भजन गात रस्त्याने जाणाऱ्या या अवलिया मुसाफिराला मानाचा मुजरा.

(लेखक समाजवादी प्रबोधिनीचे 'सरचिटणीस' आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in