- मंजिरी ढेरे
लक्षवेधी
सध्याच्या साजरीकरणाच्या जमान्यात पावसाच्या दोन-चार सरी बरसल्या की गावकुसाबाहेरच्या मोकळ्या जागेत वृक्ष लागवडीचे कार्यक्रम आयोजित करण्यांची भाऊगर्दी पहायला मिळते. मात्र असे प्रयोग निसर्गासाठी, परिसरातील जीवसृष्टीसाठी खरेच लाभकारक ठरतात का, याचाही अभ्यास व्हायला हवा. चांगले परिणाम मिळवण्यासाठी अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होणे अधिक चांगले.
खरे पाहता निसर्ग स्वत:ची काळजी घेण्यास पुरेसा सक्षम आहे. माणसाने फार लुडबुड केली नाही तर आजच्या प्रतिकूल स्थितीतही तो ऋतूनुसार रूप धारण करू शकतो. रुजवण, बहर, फुलोरा, पानझड आणि पुन्हा अंकुरणे हे कोणत्याही प्रकारच्या वनस्पतीच्या जीवनचक्रातील महत्त्वाचे टप्पे आहेत. मात्र माणसाने हव्यासाने त्याच्या या चक्राची गतीच फिरवली आणि बुमरँग होत असल्यामुळे पुढील धोके समोर दिसत असताना आता तो आपणच विस्कटलेली ही घडी नव्याने घालण्याच्या जोरदार प्रयत्नात आहे. मात्र जाणकार प्रत्येक पोताच्या वस्त्राची घडी वेगळ्या पद्धतीने घालण्याचा नियम पाळत असतील तर निसर्गही आपल्या नियमांप्रमाणेच स्वत:ची घडी सावरेल, हे स्वत:ला सजग आणि शहाणे समजणाऱ्या माणसाला समजण्यास काहीच हरकत नव्हती. मात्र हे शहाणपण नसणारी मंडळी पावसाच्या दोन-चार सरी बरसल्या की वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला बाहेर पडतात. अशा सध्याच्या उत्सवीकरणाच्या काळात बडेजाव मिरवण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्यांच्या मांदियाळीत लहानथोरांसह कार्पोरेट जगत, स्वयंसेवी संघटना, नानाविध क्लब अशा घटकांचा भरणा असतो. ‘निसर्गाकडे चला...’ असा घोष करत हातात विविध प्रकारच्या वनस्पतींच्या बिया, रोपे, सीडबॉल्स आदी साहित्य घेऊन हे जत्थे आपल्याला सोयीस्कर वाटणाऱ्या ठिकाणी पोहोचतात आणि निसर्गपूजक तसेच निसर्गरक्षक असल्याच्या आविर्भावात वृक्षारोपणाचे कार्यक्रम साजरे करतात. हे करत असतानाचे अनेकांचे रिल्स, सेल्फी, ग्रुप फोटो लवकरच समाजमाध्यमांवरील जागा व्यापून टाकतीलच. पण मुळात वृक्ष लागवड हे काही दाखवण्यासाठी केले जावे असे कामच नाही, हे जाणून घेणे गरजेचे आहे.
वनस्पतीचे जीवनचक्र समजून घेणे, आपल्या आजूबाजूची भौगोलिक स्थिती जाणून घेणे, परिसरातील निसर्गसंपदेचा अभ्यास करणे आणि त्यानंतर आवश्यक असणाऱ्या वृक्षांची केवळ लागवडच नव्हे तर संगोपन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारणे या पायऱ्यांवरून हा प्रवास झाला तरच कदाचित तो निसर्गचक्र योग्य गतीने आणि स्थितीने चालण्यास होणारी एक मदत ठरू शकतो. अतिउत्साहात येऊन करण्याचे हे काम नाही, हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे. वनस्पती हे शाकाहारी प्राण्यांचे मुख्य अन्न आहे. मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांवर जगतात. म्हणजेच पृथ्वीवर वनस्पतींमुळेच अन्नसाखळी आणि जैवविविधता निर्माण झाली आणि टिकून राहिली. वनस्पती जमिनीची धूप थांबवतात आणि जमिनीतील पाणीही धरून ठेवतात. भारतातील जंगले आणि देवरायांमुळे अनेक ओढे आणि नद्यांना बारमाही पाणी मिळते. यावर लाखो लोकांची पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची गरज भागते.
हे लक्षात घेता आधी उल्लेख केल्याप्रमाणे गेल्या २०-२५ वर्षांपासून वन खाते आणि काही संस्था वनीकरणाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेताना दिसत आहेत. पावसाळ्याच्या या काळात भारतात प्रामुख्याने सुबाभूळ, निलगिरी आणि ग्लिरीफिडीया ऊर्फ उंदीरमारी या तीन वनस्पतींची लागवड केली गेली. सुरुवातीच्या काळामध्ये जमिनी उजाड झाल्या होत्या आणि त्यावरील माती धुपून चालली होती. त्यामुळे तिथे लवकर वाढणाऱ्या वनस्पतींची लागवड होण्याची गरज होती. ही गरज भागवण्यासाठी प्रामुख्याने या विदेशी वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर लागवड केली गेली. तेव्हा हा साधारणपणे पुढील दहा वर्षांसाठीचा आराखडा तयार केला गेला होता. ही झाडे थोडी वाढल्यानंतर त्याखाली आपली देशी झाडे लावायची आणि दहा वर्षांनंतर विदेशी झाडे काढून टाकायची असे मूळ आराखड्यात ठरले होते. पण ठरल्याप्रमाणे ही विदेशी झाडे काढली गेली नाहीत आणि देशी झाडांची लागवडही केली गेली नाही. त्यामुळे आज आपल्याकडील बहुतेक सगळे डोंगर विदेशी झाडांनी आच्छादलेले दिसतात.
देशी झाडे न लावण्याचे कारण म्हणजे त्यांची वाढ अत्यंत मंद गतीने होते. त्याचबरोबर अशा झाडांवर गुजराण करणारी असंख्य गुरे आपल्याकडे आहेत. त्यामुळे एखाद्या भागात देशी वनस्पतींचे आच्छादन तयार होण्यास बराच कालावधी जातो. पर्यावरणाचा अभ्यास होत गेला तसा देशी-विदेशी वनस्पतींविषयीचा वादही वाढला. काहींच्या मते, वनस्पती ही वनस्पती असते. देशी वनस्पतींच्या पुरस्कर्त्यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या भागातील जैवविविधता वाढवण्यासाठी तिथे देशी वनस्पती असणेच गरजेचे आहे. आपल्याकडील कोणतेही प्राणी-पक्षी विदेशी वनस्पतींची फळे अथवा बिया खात नाहीत. विदेशी झाडांवरील फुलातील मधुरसावर कोणतीही फुलपाखरे अथवा मधमाश्या येत नाहीत. मात्र बिया जवळपास १०० टक्के रुजत असल्यामुळे त्यांची संख्या बेसुमार वाढते. या सर्वांचा स्थानिक जैवविविधतेवर वाईट परिणाम होतो.
हे लक्षात घेता वनीकरणाचे उपक्रम हाती घेताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वप्रथम आपण वनीकरण करणार असलेल्या ठिकाणी किमान शंभर वर्षांपूर्वी काय होते याची माहिती मिळवायला हवी. यातून आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची झाडे लावायला हवीत याचा अंदाज येईल. यासाठी मुख्य आधार आहे तो ब्रिटिशांनी तयार केलेल्या गॅझेटियरचा. १९०० मध्ये इंग्रजांनी भारताचे पूर्ण सर्वेक्षण करून ही गॅझेटियर्स बनवली आहेत. आज त्याच्याइतका अधिकृत दुसरा दस्तावेज नाही. याचबरोबर वृक्ष लागवडीचे कार्यक्रम ठरवताना त्या भागातील पर्जन्यमान किती आहे याचीही माहिती घ्यावी. यासंबंधीची गेल्या किमान शंभर वर्षांची आकडेवारी सध्या उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे इतक्या वर्षांमध्ये पर्जन्यमानात फारसा फरक पडलेला नाही. साधारण २००० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस असेल तर त्या ठिकाणी सदाहरित कवा निम्नसदाहरित प्रकारच्या वनस्पती असायला हव्यात.
कोकण, सह्याद्री, घाटमाथा आणि बारा मावळ या ठिकाणी इतके पर्जन्यमान असते. म्हणूनच या परिसरात फणस, कदंब, उंडी, सीताअशोक, आंबा, अर्जुन यांसारखी झाडे उत्तम प्रकारे येतात. सह्याद्री ओलांडून थोडे पुढे आलो की पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण १००० ते २००० मिमी.च्या दरम्यान आढळते. अशा ठिकाणी पानझडीचे वृक्ष चांगल्या प्रकारे रुजतात आणि वाढतात. त्यामुळेच या भागात साग, पळस, पांगारा, काटेसावर, मोह यांसारख्या वनस्पतींची लागवड व्हायला हवी. अहमदनगर, दौंड आदी भागांमध्ये पर्जन्यमान आणखी कमी होते. या ठिकाणी काटेरी प्रकारची झाडे लावायला हवी. खैर, काटेसावर, हिवर, बाभूळ यांसारखे वृक्ष या भागात लावावेत. फलटण, सोलापूर हा भाग पर्जन्यछायेचा मानला जातो. या ठिकाणी मुख्यत: गवताळ राने असणे गरजेचे आहे. गवताळ रानांमध्ये काळवीट, चकारा, लांडगे, खोकड यांसारखे प्राणी आणि माळढोकसारखे पक्षी आढळतात. मेंढ्यांसाठी ही उत्तम चराऊ कुरणे असतात. संपूर्ण गोवा, कोकणपट्टीमध्ये मुख्यत: फणस, रानआंबा, उंडी, देवसावर आणि प्रामुख्याने खारफुटीची वने यांची लागवड आणि संवर्धनाचे काम होणे गरजेचे आहे. देशी झाडांच्या लागवडीपूर्वी त्याच्या रोपवाटिका तयार होण्याची गरज आहे. यातून स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि झाडांचा योग्य पुरवठाही होईल.
वृक्ष लागवड करताना मुख्यत: वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या वयाची झाडे लावायला हवीत. खेरीज केवळ वृक्ष न लावता झुडपे, वेली आणि गवत यांची लागवड करण्याची गरज आहे. या सगळ्यातून तेथील जैवविविधता वाढण्यास सुरुवात होईल. झाडे लावणे सोपे आहे, पण त्यांची काळजी घेणे अत्यंत अवघड आहे. लागवड केल्यानंतर त्यांना दोन-तीन वर्षे पाणी देण्याची गरज असते. म्हणूनच पडेल ती कामे करणाऱ्या कार्यकर्त्यांची भक्कम फळी तयार केल्याशिवाय या कामाला हात घालू नये. अन्यथा, दरवर्षी एकाच खड्ड्यात नवीन रोप लावायचे, अशी परिस्थिती बघायला मिळते. अलीकडच्या काळात निसर्गसेवक, ग्रीन हिल्स, वसुंधरा अभियान आणि सावरकर मंडळ यांसारख्या अनेक संस्थांनी वनीकरणाची उत्तम कामे केली आहेत. वनीकरणाच्या उपक्रमांमध्ये छोट्या रोपांना पाणी घालणे, पाळीव गुरांपासून त्यांचे संरक्षण करणे, झाडांभोवती आळी नीट करणे यांसारख्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गरज असते. आपल्यातील प्रत्येकजण यासारख्या कामांसाठी दिवसातील काही वेळ देऊ शकतो. हे योगदानही अत्यंत महत्त्वाचे ठरते. या अंगाने विचार केला तर आपल्यातील प्रत्येकजण वनीकरणाच्या मोहिमेचा भाग बनू शकतो.