ग्राहक मंच
मोक्षदा नूलकर
प्लास्टिकचा वापर औद्योगिक क्रांतीनंतर प्रचंड वाढला आहे, मात्र त्याचे दुष्परिणाम गंभीर आहेत. विघटन न होणाऱ्या प्लास्टिकमुळे समुद्र, नद्या आणि जमीन प्रदूषित होत आहेत. अनेक सागरी जीव, पक्षी आणि प्राणी प्लास्टिक खाऊन मृत्युमुखी पडतात. सूक्ष्म प्लास्टिक अन्न व पाण्यात मिसळून मानवाच्या आरोग्यावर परिणाम करते. त्यामुळे पर्यावरण व आरोग्य वाचवण्यासाठी शाश्वत पर्याय स्वीकारणे आणि प्लास्टिक वापर बंद करणे आवश्यक आहे.
फार प्राचीन काळापासून नैसर्गिक रेझिन आणि इतर वनस्पतिजन्य पदार्थ वापरले जात होते. १८६२मध्ये अलेक्झँडर पार्क्सने सेल्युलोज नायट्रेट आणि कापूर मिसळून पहिले कृत्रिम प्लास्टिक विकसित केले. १८९७मध्ये डब्लू क्रीश यांनी दुधाच्या प्रथिनांपासून प्लास्टिक तयार केले. १९०७मध्ये सेल्युलोज नायट्रेट वापरून टेबल टेनिस बॉल तयार करण्यात आला, तेव्हापासून हळूहळू प्लास्टिकचा वापर वाढू लागला. इतका की चीनची ग्रेट भिंत किंवा पिरॅमिड्स यांच्याबरोबरीने स्पेनच्या किनाऱ्यावर साठलेल्या पांढऱ्या प्लास्टिकचा मोठा भाग अवकाशातून दिसतो.
एकविसाव्या शतकात आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. त्याचे जेवढे फायदे आहेत, त्यापेक्षा तोटे मोठे आहेत. त्याचा एक मोठा तोटा हा की निसर्गामध्ये या प्लास्टिकचे विघटन होत नाही. पृथ्वीवरील सर्व स्तरांवर प्लास्टिकचे साठे वाढत चालले आहेत. एकूण प्लास्टिक चक्क ८३० कोटी टन - म्हणजे प्रतिमाणशी दीड कोटी टन इतके! प्लास्टिकच्या प्रदूषणाने समुद्र, नद्या, जमिनी प्रभावित झाल्या आहेत. या परिणामांबाबत लोकांना म्हणजे एकूणच ग्राहकांना सजग करण्यासाठी ५ जून हा दिवस दर वर्षी पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. २०२५ च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत’ आहे. ही थीम प्लास्टिक कचऱ्याच्या पर्यावरणावर होणाऱ्या व्यापक परिणाम दर्शवते. नागरिकांना ते परिणाम कमी करण्यासाठी करण्यास प्रेरणा देते. केवळ नागरिकच नाही तर सरकार आणि संस्थांनाही शाश्वत पद्धती स्वीकारण्यास प्रेरणा देते. ही मोहीम प्लास्टिक कचऱ्याच्या व्यापक परिणामांवर प्रकाश टाकते, ज्यामध्ये महासागर आणि जलमार्ग प्रदूषित होण्यापासून ते सूक्ष्म प्लास्टिकच्या स्वरूपात आपल्या अन्न प्रणालींमध्ये प्रवेश होण्यापर्यंतचा समावेश आहे.
प्लास्टिकमुळे काही प्रजाती नष्ट होतात आणि समुद्रातील जीवविविधता कमी होते. अन्नसाखळीत बदल झाले आहेत. पर्यावरणावर परिणाम - प्लास्टिकमुळे समुद्रातील पाण्याची आणि जमिनीची गुणवत्ता बिघडते.
प्लास्टिक खाऊन किंवा त्यात अडकून दर वर्षी लाखो समुद्री पक्षी आणि कासवे मरतात.
काही सागरी प्रजातींच्या पोटांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा आढळतो, ज्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते. जमिनीवरील प्राणी गाई म्हशी यांच्याही पोटात कितीतरी टन प्लँस्टिक आढळले अशा मधून मधून बातम्या येतात.
प्लास्टिकमुळे समुद्रातील परिसंस्थेचे संतुलन बिघडते, ज्यामुळे काही प्रजाती नष्ट होऊ शकतात.
प्लास्टिक प्रदूषणामुळे पक्षी अनेक प्रकारे त्रस्त होतात. प्लास्टिक खाल्ल्याने किंवा त्यात अडकल्याने अनेक समस्या येतात. उदा. उपासमार, आजार आणि मृत्यू. एका अभ्यासानुसार दर वर्षी अंदाजे १० लाख पक्षी प्लास्टिकमुळे मरतात.
काही पक्षी प्लास्टिकला अन्न समजून खातात, ज्यामुळे त्यांना पोट भरल्यासारखे वाटते आणि ते योग्य अन्न खाणे बंद करतात, त्यामुळे उपासमार होते.
प्लास्टिकच्या रिंग्स, पिशव्या किंवा इतर वस्तू पक्ष्यांच्या पायांमध्ये किंवा घशात अडकल्यास त्यांना हालचाल करणे किंवा श्वास घेणे कठीण होते.
प्लास्टिकच्या सेवनामुळे पक्षी त्यांच्या पिलांना योग्य पोषण देऊ शकत नाहीत, ज्यामुळे पिल्लांचा विकास थांबतो.
सूक्ष्म प्लास्टिकचे कण पाण्यामध्ये मिसळून पक्ष्यांना आणि इतर सागरी जिवांना हानिकारक ठरतात. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि ते आजारी पडतात.
प्लास्टिक मानवालाही घातक आहे. बिस्फेनॉल फॅथलेट्स (BPA) यासारखी रसायने आतड्यांवर परिणाम करतात. मायक्रोप्लास्टिक कचरा लहान लहान कणांमध्ये रूपांतरित असल्याने अन्न, पाणी, हवेतून तो शरीरात जातो. प्लास्टिकच्या डब्यातून अन्न व पाणी दूषित होते. याचा परिणाम फुप्फुसांवर होतो कर्करोगाचा धोका वाढतो.
पर्यावरणावर व मानवाला धोका पोहोचत असल्याने खऱ्या अर्थाने प्लास्टिक बंद करणे गरजेचे आहे. प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करणे शक्य नाही. प्लास्टिक हे अनेक उद्योगांमध्ये आवश्यक आहे. प्लास्टिकचा वापर कमी करणे शक्य आहे, पण पूर्णपणे बंद करणे अनेक आर्थिक आणि सामाजिक समस्या निर्माण करू शकते. प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यामुळे प्लास्टिक कचरा कमी होतो आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी होतो.
प्लास्टिकचे विघटन करणारे जिवाणू निर्माण झाले, तरच ते शक्य होईल. २००१ साली जपानमध्ये असे जिवाणू सापडले होते, पण त्यांचा प्लास्टिक खाण्याचा वेग फारच कमी होता. २०१६मध्ये जगाला कळले की, इडिओनेला सकाइनसिस नावाचे जिवाणू चक्क प्लास्टिक खातात. हा जिवाणू ऊर्जास्रोत म्हणून प्लास्टिकमधील कार्बन वापरतो. याचा प्लास्टिक खाण्याचा वेग कमी असल्याने त्याचे म्युटेशन करून तो वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. सूक्ष्मजीवांचे हे रहस्य उलगडले, तर शाश्वत भविष्य निर्माण होऊ शकते.
काही देशांत पुनर्निर्माण करता येणारे डबे परत घेतात व त्याबदल्यात पैसे परत करतात. बेल्जियमसारख्या देशात उत्पादन करताना पर्यावरणाला जितका धोका जास्त, तितकी उत्पादकला जास्त किंमत द्यावी लागते. त्यामुळे बेल्जियममधील पीव्हीसी (PVC) वापरात घट झाली आहे. हा झाला तात्पुरता उपाय. तरी ग्राहकांनी ‘तीन आर’च्या सवयी अंगी बाणवल्या तर खूप फरक पडू शकेल.
१) Refuse - नाकारणे - कॅरी बॅग, पॉलिथीन (७५ मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या), फुग्यांसाठी वापरली जाणारी प्लास्टिक स्टिक, कँडी स्टिक, थर्माकोल (पॉलिस्टायरीन), प्लास्टिकच्या प्लेट, कप, ग्लास, चमचे, चाकू, स्ट्रॉ, ट्रे, मिठाईच्या डब्ब्यांना लावण्यात येणारा प्लास्टिकचा कागद, इन्व्हिटेशन कार्ड, सिगरेटचे पाकीट, १०० मायक्रॉनहून कमी प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर इतर यांना नकार देणे.
२) Reduce - कमी करणे - प्लॅस्टिक वापर शक्य तितका कमी करणे
३) Reuse - पुनर्वापर करणे - एकल प्लास्टिकचा पुन्हा वापर करता येत नाही. तर झाडे लावण्यासाठी, सजवटीसाठी जाड प्लास्टिक डबे वापरता येतात.
mgpshikshan@gmail.com
मुंबई ग्राहक पंचायत