दिवस शंभर, दौरे तीन, उरले काय?
मत आमचेही
ॲड. हर्षल प्रधान
मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्याला आता शंभर दिवस पूर्ण झाले. या शंभर दिवसांत मोदींनी देशाच्या कारभारात कोणत्या महत्त्वाच्या भूमिका घेतल्या? कोणते महत्त्वाचे धोरण ठरवले? गरीबांना काय दिले? शंभर दिवसांत केले काय? तर महाराष्ट्रात तीन वाऱ्या आणि परदेशवाऱ्या या व्यतिरिक्त काही नाही. महाराष्ट्रात तीन-तीन वाऱ्या का? महाराष्ट्राने लोकसभेत दाखवलेला हिसका चांगलाच जिव्हारी बसलाय. हाच महाराष्ट्र भाजपची शंभरी भरली हे सांगायला विधानसभेच्या निमित्ताने सज्ज झाला आहे, हे जाणवले आहे बहुधा वरिष्ठ शेटजींना.
सत्तेच्या पहिल्या शंभर दिवसांत केले काय? महाराष्ट्राचे दौरे तीन दुसरे काय? असा प्रश्न पडावा, अशी सध्या स्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महिन्याभरात तिसऱ्यांदा महाराष्ट्रात आले. विदर्भातील वर्धा येथून त्यांनी अनेक योजनांचा शुभारंभ केला. महाराष्ट्र निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनही पंतप्रधानांचा हा विदर्भ दौरा महत्त्वाचा ठरला. गेल्या निवडणुकीत भाजप आघाडीने विरोधी महाविकास आघाडीच्या हातून धोबीपछाड खाल्ला होता. ‘एक अकेला सबपे भारी’ म्हणत भाजप ‘मोदी’, ‘मोदी’चा जप करत राहिली, पण महाराष्ट्रात त्यांना ‘एक अकेला उद्धव ठाकरे सबपे भारी’ ठरला. उद्धव ठाकरेंच्या हातून त्यांनी पक्ष, चिन्ह, पक्षांची सर्व खाती वगैरे सगळे काढून घेतले, तरीही उद्धव ठाकरे डागमगले नाहीत. त्यांनी भाजपच्या डाव्या-उजव्यांना आणि स्वपक्षातील बंडखोरांना चांगलाच धोबीपछाड दिला आणि भाजपचे वरिष्ठ शेठजी गांगरले. भाजपला तेवीस खासदार देणारा महाराष्ट्र भाजपला आता फक्त नऊ खासदार देता झाला आणि भाजपला आपल्या चुकांची जाणीव झाली. उद्धव ठाकरे यांच्या तोडीस तोड ना एकनाथ शिंदे उतरू शकले ना अजित पवार ना देवेंद्र फडणवीस ना राज ठाकरे. सगळे उताणे पडले. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या निष्ठावान शिवसैनिकांनी भाजपची ही घरफोडी करणारी निलाजरी रणनीती तोडून मोडून टाकली. सोबत शरद पवार यांची अनुभवी ज्येष्ठता आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व यांची उद्धव ठाकरे यांना पूर्ण साथ होतीच. विधानसभेत देखील हीच कार्यपद्धती राहिली तर भाजपला महाराष्ट्रात तोंड लपवायलाही जागा मिळणार नाही. थेट विदर्भापासून खान्देशपर्यंत ते तळ कोकणापासून पश्चिम महाराष्ट्र-मुंबई-मराठवाड्यापर्यंत सगळीकडे महाविकास आघाडीला जनता मोठ्या प्रमाणात निवडून देईल असे चित्र आहे. याबाबतची सर्वेक्षण आधारित माहिती आधीच भाजपला मिळाली आहे. त्यामुळेच भाजपच्या वरिष्ठ शेठजींनी पुन्हा ‘महाराष्ट्र आलाप’ आळवायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्रातले दौरे ठरले आहेत. निवडणुकीपर्यंत सर्वाधिक वेळा ते महाराष्ट्रात येणार आहेत आणि भरघोस घोषणांचा पाऊस पाडून जाणार आहेत. त्याचीच सुरुवात त्यांनी विदर्भातून केली आहे.
राज्यातील वाढते राजकीय तापमान
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी राज्यातील राजकीय तापमान वाढू लागले आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या पक्षांमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आधारित आकडेमोड करण्यासाठी चढाओढ सुरू आहे. विदर्भ हा राज्याच्या राजकारणाचा नेहमीच मुख्य आखाडा बनत आला आहे. महाविकास आघाडी विदर्भातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कल पुढे नेण्याचा प्रयत्न करत असताना, महायुतीनेही आता या भागातील आपला सर्वात मोठा चेहरा उघड केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय त्यांना दुसरा कोणी पर्याय देखील नाही म्हणा! महिनाभरात तिसऱ्यांदा मोदी महाराष्ट्रात आले. वर्धा आणि अमरावती येथे आयोजित कार्यक्रमांसाठी पंतप्रधान आले. पंतप्रधानांनी वर्धा येथून ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना’ आणि ‘अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना’ सुरू केली. मोदींनंतर गृहमंत्री अमित शहा हेही विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. एकापाठोपाठ एक अशा दोन भाजप नेत्यांच्या भेटी आणि विदर्भातील पक्षाची सक्रियता यामुळे खरेच मतदारांवर काही परिणाम होणार आहे का, हा खरा प्रश्न आहे? निवडणूक वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच भाजप आपल्या बड्या नेत्यांना विदर्भात का उतरवत आहे?
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या वारंवार होणाऱ्या दौऱ्यांमागे लोकसभा निवडणुकीने दाखवलेला कल हेही प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. विदर्भात विधानसभेच्या ६२ जागा आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने ४२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर १५ जागांवर विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर विधानसभेच्या दृष्टिकोनातून नजर टाकली तर भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीची विधानसभेच्या २२ जागांवर आघाडी होती. विधानसभेच्या ३५ जागांवर विरोधी महाविकास आघाडीने आघाडी मिळवली होती. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच भाजपची विदर्भातील सक्रियता वाढण्यामागील आणखी एक कारण म्हणजे युतीचे बदललेले गणित. पक्षाने २०१९ च्या निवडणुका शिवसेनेसोबत युती करून लढल्या होत्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपची शिवसेनेशी युती होती, पण ती शिवसेना एकनाथ शिंदे यांची होती. उद्धव ठाकरे सोबत नसल्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्याची शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाची योजना लोकसभा निवडणुकीत जवळपास फोल ठरली.
अशा स्थितीत या धक्क्यातून सावरल्यानंतर विधानसभा निवडणुकीत पक्षाला कोणत्याही आघाडीवर कोणतीही कसर सोडायची नाही असे ठरवून जनतेत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधान मोदींना मैदानात उतरवणे आणि दुसरीकडे अमित शहा यांच्यासारख्या कुशल संघटक आणि रणनीतीकाराला समोर आणून संघटनेतील पेच सोडविण्यासाठी आटापिटा सुरू आहे. पण ‘जो बुंद से गयी वह हौद से नही आती’ हे यांना कोण सांगणार?
विदर्भातच भाजपचा बाजार उठणार
विदर्भात पूर्वी एकहाती काँग्रेसची सत्ता असे. काँग्रेसच्या या बहुमतामुळेच विदर्भातील नेत्यांना मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळे. वसंतराव नाईक सलग ११ वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मारोतराव कन्नमवार, सुधाकरराव नाईक, देवेंद्र फडणवीस असे मुख्यमंत्री विदर्भाने राज्याला दिले. काँग्रेसप्रमाणे विदर्भाच्या आधारे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रादेशिक पक्षांनीही महाराष्ट्राच्या राजकारणात आपले स्थान बनवले. महाराष्ट्राच्या राजकारणातील हेही वास्तव आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची मक्तेदारी पूर्ण महाराष्ट्रावर नाही. विदर्भ-मराठवाड्यात जशी काँग्रेसची मक्तेदारी उलथवून भाजपने मजबूत पकड घेतली तशी आता भाजपची जागा पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी घेत आहेत. विदर्भात तर एक सूर हाही ऐकायला मिळतो आहे की, देवेंद्रभाऊ यांचे राजकारण आता सरले आहे. जशी अवस्था नितीन गडकरींची झाली तशी, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक कष्टप्रद वाट देवेंद्र फडणवीस यांची असणार आहे. देवेंद्रभाऊ यांच्याकडे तर लाडकी बहीणही नाही आणि त्यांना वाचवायला नाथाभाऊ-नितीनभाऊ-विनोदभाऊ-चंदुभाऊ देखील नाहीत. कारण यांना त्यांनी आधीच “लांब” केले आहे. त्यामुळे यावेळी देवेंद्रभाऊ पडणार आणि देशमुखी दाखवत अनिलभाऊ त्यांना पाडणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मोदीजींचे दौरे, राज्याच्या हाती काय आले?
गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी असंख्य वेळा महाराष्ट्रात येऊन गेले. मात्र एवढे करूनही महाराष्ट्रात त्यांना अपेक्षित असणारे निकाल आले नाहीत. याला कारणीभूत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे हापापलेपणाचे राजकारण हेच कारण होते. अगदी गेल्या दहा वर्षांतील त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यांची उजळणी केली तर सहज लक्षात येते की त्यांचे हे दौरे राजकीय स्वार्थापोटीच होते. त्यांनी उद्घाटन केलेले बहुतांश प्रकल्प अद्यापही रखडलेले आहेत. आताही त्यांनी पुन्हा विदर्भात येऊन तशीच आश्वासने दिली आणि आता निवडणुकीपर्यंत ते असेच येत राहतील. महाराष्ट्राला आता त्यांच्या दौऱ्यांबद्दल फारसे कौतुक राहिलेले नाही. भाजपचे वरिष्ठ शेठजी जेवढे दौरे करतील तेवढी त्यांची उलटी गिनती अधिक वेगाने होईल एवढे मात्र निश्चित.
(लेखक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख आहेत.)