संधी आहे, सुज्ञता हवी!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकारातून आणि आग्रहातून जागतिक संघटनेने या वर्षाला ‘मिलेट’ म्हणजेच भरडधान्य वर्ष म्हणून संबोधले आहे.
संधी आहे, सुज्ञता हवी!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकारातून आणि आग्रहातून जागतिक संघटनेने या वर्षाला ‘मिलेट’ म्हणजेच भरडधान्य वर्ष म्हणून संबोधले आहे. भरडधान्य म्हणजे नेमके काय, त्यात नेमक्या कोणत्या धान्यांचा समावेश होतो आणि अन्य धान्यांना त्यात स्थान का नसते हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. या सहज आणि अत्यंत कमी पैशात उपलब्ध असणार्‍या धान्यांविषयी महिती असायला हवी.

(लेख - प्रा.डॉ. मुकुंद गायकवाड, कृषितज्ज्ञ)

सर्वसाधारणपणे शेतीला दहा हजार वर्षांचा इतिहास असल्याचे समजले जाते. सुमोरियन किंवा बॅबोलियन संस्कृती, इजिप्शियन संस्कृती, ग्रीक संस्कृती, मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृती, जॅपनीज आणि चीनी संस्कृती या क्रमामध्ये कोणत्या प्रकारची अन्नधान्य त्या त्या काळात खाल्ली जात होती याचाही अभ्यास झाला आहे. त्यामध्ये भरडधान्याला स्थान नव्हते. आजमितीचा वा जागतिक परिस्थितीचा विचार करता भरडधान्य गरीब लोकांचे खाद्य असल्याचे समजले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या आग्रहामुळे आता भरडधान्यालादेखील महत्त्व आले आहे. मोदींच्या पुढाकारातून आणि आग्रहातून जागतिक संघटनेने हे वर्ष ‘मिलेट’ म्हणजेच भरडधान्य वर्ष म्हणून संबोधले आहे. भरडधान्य म्हणजे नेमके काय, त्यात नेमक्या कोणत्या धान्यांचा समावेश होतो आणि अन्य धान्यांना त्यात स्थान का नसते हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. जगामध्ये गहू आणि तांदूळ ही दोनच धान्ये मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी वापरली जातात. त्याला विशिष्ट प्रकारची जमीन, हवामान आणि मशागतीची पद्धत वापरावी लागते. पण या कशाचीही गरज नसताना, पाणी दिले तर चांगले पण, नसली तरी अगदी टाकावू जमिनीतही उगवणारी आणि टिकून राहणारी अशी ही पिके आहेत. आफ्रिका आणि भारत येथील एरिड आणि सेमी एरिड भागातच भरडधान्ये मोठ्या प्रमाणात घेतली जातात. भरडधान्यांची सर्वसाधारण व्याख्या अशी की ही गवत पिके असून त्यांच्या धान्याचा आकार अत्यंत लहान असतो. यामध्ये भारतात घेतल्या जाणार्‍या धान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, राजगिरा, कोद्रो, कुटकी, सावा, राळा, वरई, नाचणी आदी पिकांचा समावेश होतो. जागतिक भरडधान्याचे ४१ टक्के उत्पादन एकट्या भारतात होते. ही पिके अत्यंत उपेक्षित, टाकावू आणि दुर्लक्षित जमिनीत येतात. भरडधान्ये पिकांचे वैशिष्ट्य म्हणजे ही अल्प पावसाच्या परिस्थितीत शुष्क आणि अर्थशुष्क भागात वाढतात. संशोधनानुसार काही लोकांना गहू-तांदळापासून अ‍ॅलर्जीचा धोका संभवतो. मधुमेहींना तर भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. काहींना गव्हातील ग्लुटेनचा त्रास होतो. पण भरडधान्यांपासून अद्याप कोणालाही कसलाही त्रास झाल्याचे दिसून आलेले नाही.

या पिकांसाठी कोणत्याही रासायनिक कीटकनाशकांचा वा खतांचा वापर केला जात नाही. भारत सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात नैसर्गिक आणि सेंद्रीय शेतीला महत्त्व देण्यात आले आहे. या पिकांचे गुणधर्म लक्षात घेऊनच ही योजना आखली गेली आहे. या पिकांसाठी अत्यंत कमी खर्च येतो. काही वेळा तर अजिबात खर्च येत नाही. या पिकांमध्ये उच्च पौष्टिक मूल्ये असून ती तृणधान्ये (न्युट्रीसिरिअल्स) म्हणून ओळखली जातात. ती पचनाला अत्यंत हलकी असतात. या पिकांमुळे जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढून पोत सुधारतो. ही धान्ये पक्ष्यांचे आवडते धान्य असल्यामुळे जैवविविधता वाढते. यातील काही धान्यांचे गुणधर्म अवश्य जाणून घ्यायला हवे. बाजरीमध्ये फॉस्फरस उच्च प्रमाणात असून ते पेशीतील ऊर्जा आणि अन्य खनिज पदार्थ साठवण्यास सहाय्य करते. यात लोहाचेही प्रमाण अधिक असल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबीन वाढते. नाचणीत नैसर्गिक कॅल्शियम सर्वाधिक असल्यामुळे दररोज खाल्ल्यास हाडाचे आरोग्य चांगले राहते तसेच हाडांचे रोग होत नाहीत. राळे पाचक असून त्यात लोह आणि खनिज पदार्थ मुबलक प्रमाणात असतात. वरईमध्ये उच्च लोहधातू आहे. कोडो आणि कोद्रो मज्जासंस्था मजबूत करण्यासाठी उत्तम धान्ये आहेत. परंतु भारतीय वा जगातील लोकांना याचे महत्त्व ठाऊक नसल्यामुळे ते फक्त गरिबांचेच खाद्य असल्याचा समज पसरला आहे. भारत सरकारने भरडधान्य तसेच त्याच्या मूल्यवर्धित उत्पादनाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी कृती योजना तयार केली आहे.

निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पंचवार्षिक कार्यक्रम ठरवला आहे. त्यानुसार २०२०, २०२१, २०२२ मध्ये भारतातील ३४.३२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतक्या किमतीच्या भरडधान्याची निर्यात झाली. भारतीय भरडधान्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने १६ आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शने भरवण्याची योजना तयार केली आहे. त्याचप्रमाणे पाश्चिमात्य देशांमध्ये ‘रेडी टू ईट’ प्रकारची खाद्यान्ने तयार करण्यासाठी संशोधन सुरू केले आहे. त्याचबरोबर देशातील शेतकर्‍यांनी अधिक प्रमाणात भरडधान्यांचे पीक घेण्यासाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे २०२१-२२ मध्ये आधीच्या वर्षापेक्षा २७ टक्के अधिक भरडधान्य उत्पादन झाले आहे. भारतात राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये भरडधान्याचे सर्वाधिक उत्पादन होते. मात्र देशातील एकूण भरडधान्य उत्पादनापैकी केवळ एक टक्के भरडधान्याची निर्यात होते. सध्या देशात नऊ अब्ज डॉलर मूल्याचे भरडधान्य उत्पादन होते, ते २०२५ पर्यंत १२ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य योजना तयार केली गेली आहे. नूडल्स, पास्ता, न्याहारीसाठी सिरियल्स, बिस्कीटे, कुकीज, मधल्या वेळी खाण्यायोग्य तयार पदार्थ, मिठाई यासारख्या रेडी टू ईट आणि रेडी टू सर्व्ह श्रेणीतील पोषण मूल्यावर्धित उत्पादनाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार स्टार्टअप्सनाही एकत्र करत आहे. सरकारने भरडधान्य संशोधन संस्था, हैद्राबाद; भरडधान्य पोषणसंस्था, हैद्राबाद; अन्नतंत्रज्ञान संस्था, मैसूर यांच्या सहयोग आणि सहाय्याने पंचवार्षिक धोरणात्मक योजना सुरू केली आहे.

भारतातून संयुक्त अरब अमिरात, नेपाळ, सौदी अरेबिया, लिबिया, ओमान, इजिप्त, येमेन, ब्रिटन आणि अमेरिका या प्रमुख देशांमध्ये भरडधान्ये निर्यात होतात. यामध्ये आधी उल्लेख केलेल्या पिकांव्यतिरिक्त कुट्टू (बकव्हिट) हादेखील भारतातून निर्यात होणार्‍या भरडधान्याचा एक प्रकार आहे. इंडोनेशिया, बेल्जियम, जपान, जर्मनी, मेक्सिको, इटली, ब्राझिल आणि नेदरलँड हे देशदेखील भरडधान्य आयात करणारे देश आहेत, परंतु या देशांमध्ये अद्याप भारताने निर्यात सुरू केलेली नाही. त्यामुळे प्रसार केला तर भरडधान्य हे मुख्य धान्यापेक्षाही अधिक परकीय चलन मिळवून देणारे धान्य ठरेल, यात शंका नाही. अभ्यास केला असता भरडधान्याचे एकूण १६ प्रकार दिसतात. आपण काही भरडधान्याचे उत्पादन घेत नाही. पण ते उत्पादन सुरू करण्याचीही गरज आहे. उदाहरणार्थ आफ्रिकन देशांमध्ये अशी अनेक प्रकारची पिके खाल्ली जातात, ज्यांचा हंगाम अत्यंत कमी असतो. ती उष्ण आणि कोरड्या हवामानात येणारी पिके असतात. यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे जपान आणि चीनमध्ये पिकणार्‍या भरडधान्याचे उत्पादन भारतात वाढण्यास बरीच संधी आहे. १०३०० वर्षांपूर्वी भरडधान्येच सहारा वाळवंटाच्या भागातील लोकांच्या आहारातील मुख्य नव्हे, तर एकमेव महत्त्वाची पिके होती. तिथूनच ती भारतात आली असावीत. कारण आजही आफ्रिकेमध्ये बाजरी खाण्यास अत्यंत महत्व दिले जाते. तिथे त्याला पर्ल मिलेट असे म्हणतात. पर्ल म्हणजे मोती. यावरुनच त्याचे महत्त्व दिसून येते.

परदेशात मद्य तयार करण्यासाठीही भरडधान्याचा उपयोग केला जातो. विशेषत: बार्ली हे पीक आपल्याकडे घेतले जात नाही. परंतु त्यापासून तयार होणारी बिअर जगभरात मोठ्या प्रमाणात विकली जाते आणि बहुसंख्य लोकांचे, विशेषत: स्त्रियांचे ते आवडते पेय आहे. २०२० मध्ये सर्व जगात ३०.०५ मिलियन टन बार्लीसह भरडधान्याचे उत्पादन झाले. नेपाळ, आणि आपल्याकडील सिक्कीमचा भाग इथे बिअरप्रमाणेच राक्षी नावाचे मद्य तयार केले जाते. ते तिथले लोकप्रिय मद्य आहे. त्याच्या निर्मितीला तिथे कोणतेही बंधन नाही. त्याचप्रमाणे रशिया, जर्मनी आणि चीनमध्येही वेगवेगळ्या नावाखाली भरडधान्यांपासून मद्य तयार केले जाते. तसेच मांसाबरोबर खाण्यासाठीही भरडधान्यापासून बनवलेले पदार्थ उत्तम समजले जातात. चीनमध्ये भरडधान्य दूध वा साखरेव्यतिरिक्त घेवडा आणि रताळे याचे मिश्रण करुन स्कॅश तयार केला जातो. त्याचे सेवन तिथे पसंतीचे ठरले आहे. जर्मनीमध्ये उकळत्या पाण्यात साखर, सफरचंद, मध आणि भरडधान्ये घालून एक चविष्ट पदार्थ शिजवला जातो. व्हिएतनाममधील एक लोकप्रिय पदार्थही भरडधान्यांपासून तयार होतो. त्यात भरडधान्यांबरोबर ओला नारळ आणि इतर काही जिन्नस मिसळले जातात. तेथील राजधानीत परकीय पाहुण्यांना हा पदार्थ आवर्जून दिला जातो. भरडधान्याचे एक वैशिष्ट म्हणजे ऊसाप्रमाणेच ते सी-४ वर्गात मोडतात. म्हणजेच आपल्याकडे ऊस सर्वाधिक उत्पन्न देणारे आणि सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे वापरणारे पीक आहे. त्याचप्रमाणे खते, पाणी, सुधारित जाती आदींकडे लक्ष देऊन निर्मिती केल्यास भरडधान्ये शेतकर्‍यांसाठी वरदान ठरु शकतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in