काळ सोकावतो आहे, राजकीय भान वाढवावे लागेल...

लोकशाहीत विकासासाठी आणि समानतेसाठी तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आवश्यक आहे. समाजातील धर्मांध आणि जातीअंध राजकारण वाढताना दिसते आहे. म्हणूनच, शोषणमुक्त समाज घडवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला राजकीय भान वाढवावे लागेल.
काळ सोकावतो आहे, राजकीय भान वाढवावे लागेल...
Published on

भवताल

ॲड. वर्षा देशपांडे

लोकशाहीत विकासासाठी आणि समानतेसाठी तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आवश्यक आहे. समाजातील धर्मांध आणि जातीअंध राजकारण वाढताना दिसते आहे. म्हणूनच, शोषणमुक्त समाज घडवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला राजकीय भान वाढवावे लागेल.

लोकशाही देशांमध्ये खऱ्या अर्थाने विकास होण्यासाठी आणि समानता प्रस्थापित होण्यासाठी तरुणांमध्ये, शिक्षणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संस्कार होणे गरजेचे आहे. विशिष्ट जातीत आणि धर्मात जन्माला आले म्हणून आर्थिक आणि सामाजिक शोषण हजारो वर्षांपासून सोसणाऱ्या या देशांमध्ये या शोषण व्यवस्थेविरुद्ध उठाव होत नाही. उलट पक्षी धर्मांध, जातीअंध, राजकीय आणि सामाजिक व्यवस्था अधिकाधिक बळकट होताना दिसत आहे. आपल्या आयुष्यामध्ये निर्माण झालेल्या समस्यांची उत्तरे ही देशाच्या विकासाच्या धोरणांची आणि इथली जातीची उतरंड नाकारण्याशी संबंधित आहे आणि म्हणून त्यासाठी या देशातील शोषण व्यवस्था इथल्या तरुणांनी बुद्धिप्रामाण्यवादी होऊन समजून घेणे गरजेचे आहे.

शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले आहे. मोठ्या प्रमाणावर सर्व जाती-धर्मातील मुले शिकत आहेत. शैक्षणिक संस्था वाढल्या आहेत. विज्ञान शिकवले जात आहे. परंतु राजकीय व्यवस्थेमध्ये मात्र राजकारण्यांमध्ये वैज्ञानिक जाणिवांचा अभाव दिसत आहे. त्यामुळे शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होऊन देखील या देशांमध्ये शिक्षणामध्ये आणि वर्तनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संस्कार करायला आपण कमी पडलो आहोत. किंबहुना वैज्ञानिक बुद्धिप्रामाण्यवादी विचारधारेची इथल्या मतलबी, स्वार्थी राजकारण्यांना भीती वाटते. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करण्यासाठी आग्रही असणाऱ्या चळवळींना आणि विचारवंतांना राजकीय षडयंत्र रचून त्यांचे खून करण्यात आले. हजारो लाखोंच्या संख्येने शिक्षक, प्राध्यापक, आध्यात्मिक संत, महंत, वारकरी हेही धर्मांध, जातीअंध राजकारणाच्या कच्छपी लागले आहेत. अशा काळात लहान लेकरं, महिला आणि तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बुद्धिप्रामाण्यवाद शिकविण्याचे, बाणविण्याचे धोरण दिसत नाही. म्हणूनच लाखोंच्या संख्येने भरदुपारच्या उन्हात नव्या मुंबईत देशाच्या गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत तथाकथित धर्मगुरूच्या पुरस्कार कार्यक्रमाला माणसे मृत्युमुखी पडली, तरी कोणाविरुद्धही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही. किंबहुना तिथल्या भक्तगणांना ज्यांच्यावर मृत्यू ओढवला त्यांना मोक्ष मिळाला, असे सांगितले गेले. हजारो लाखोंच्या संख्येने जमलेल्या भक्तगणांनी तिथल्या नियोजनातील ढिसाळपणाविरुद्ध कोणताही उठाव केला नाही.

देशांमध्ये ज्या वेळेला राजकारण्यांना जाती-जातीमध्ये दुही माजविणे, धर्म श्रद्धेच्या नावाखाली तथाकथित महाराज लोकांना लाँच करून त्यांच्यामार्फत तथाकथित बैठका आयोजित करून श्रद्धेचा बाजार मांडला जातो. लोकांना अंधश्रद्ध बनविले जाते. जगण्याच्या प्रश्नांना इथली राजकीय, सामाजिक व्यवस्था आणि अर्थव्यवस्था कारणीभूत आहे असा विचार त्यांनी करू नये यासाठी “गर्वसे कहो” वगैरे घोषणा डोक्यात घुसवून इतिहासाच्या पराक्रमांचे आणि न झालेल्या धर्मयुद्धाचे दाखले देऊन दुसऱ्या जातींना कमी लेखन, दुसऱ्या धर्माच्या लोकांना शत्रू समजून हे पुन्हा पुन्हा ठासवण्यासाठी हे व्हायरस त्यांच्या मेंदूत सतत वाढते राहिले पाहिजे यासाठी दौड काढणे हे चित्र गेल्या २० वर्षांत देशभरामध्ये दिसत आहे. त्याला राजश्रय मिळत आहे. राजकीय पक्षांकडून आर्थिक पाठबळ मिळत आहे. त्यामुळे विज्ञान शिकणारी तुमची-आमची लेकरं वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी इथल्या जातीच्या उतरंडीला आव्हान देणारी, अर्थव्यवस्थेतील शोषणाच्या विरुद्ध उठाव करणारी, राजकारण्यांना प्रश्न विचारणारी बनवत नाहीत.

उलट कॉलेजला जाणारा तरुण मुलगा देवऋषाकडे जाऊन मी आजीचा खून केला, तर मला पोलीस पकडणार नाहीत ना? असे विचारत मार्गदर्शन घेतो आणि विशिष्ट वेळी एकट्याने जाऊन खून केल्यास पोलीस तुला पकडणार नाहीत, असा सल्ला देवऋषाकडून ऐकल्याबरोबर हुकूम घेऊन सख्ख्या आजीचा अंधश्रद्धेच्या अधीन जाऊन खून करतो. देवऋषी आणि नातू पकडले जातात. आजी जीवानिशी मरते आणि इथल्या धर्मांध, जातीअंध व्यवस्था या तरुण लेकराच्या भविष्यावर खदाखदा हसते.

जादूटोणाविरुद्ध कायदा बनवण्यासाठी चळवळीचा बळी डॉ. नरेंद्र दाभोळकर ठरले. खरे शिवाजी सांगणाऱ्या गोविंदराव पानसरे यांना अकाली जीव गमवावा लागला. कलबुर्गींना बुद्धिप्रामाण्यवाद सांगितला, प्रश्न विचारले म्हणून कायमचे गप्प केले गेले आणि इथल्या पर्यावरण आणि आर्थिक शोषणाला पत्रकार म्हणून आवाहन उभारणाऱ्या गौरी लंकेशना मारून टाकण्यात आले. प्रश्न विचारणाऱ्या आणि घडत असलेल्या घटना आणि धोरणांना आव्हान देणाऱ्या विविध समाज माध्यमांवरील पोस्ट लिहिणाऱ्यांना, यूट्युब्सना, अलीकडेच नोटिसा देण्यात आल्या आहेत. राजकीय वरदहस्त असणाऱ्या कार्पोरेटच्या मालकांच्या संदर्भाने पोस्ट लिहिताना आलोचना करताना सबूर.

अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ? महिलांची चळवळ, कामगारांची चळवळ, आरक्षणाची चळवळ या सगळ्या राजकीय चळवळी असून, त्या जाणीवपूर्वक राजकीय पद्धतीने जनसामान्यांचा पाठिंबा मिळवत वैज्ञानिक दृष्टिकोन जनतेमध्ये निर्माण करत आपल्या प्रश्नांना आणि शोषणाला इथली धर्मांध, जातीअंध व्यवस्था जबाबदार आहेत याचे भान देत चालवाव्या लागतील. सुट्या सुट्या राजकीय उठाव आणि आंदोलनांमुळे प्रस्थापितांचे, कार्पोरेटचे, भ्रष्ट राजकारण्यांच्या दुकानांचेच बळ वाढते आहे. जेवून खाऊन, गाडीभाडे देऊन दिवसाचा पाचशे रुपयांचा रोज घेऊन आपण यांच्या दौडीचे धारकरी बनतो. वारीचे वारकरी बनतो. आरक्षणाच्या मोर्चाचे मोर्चेकरी बनतो. आपण फक्त गर्दी होतो. शाळा-कॉलेजमध्ये विज्ञान शिकणारा हा आजीचा नातू अंधश्रद्धेचा बळी ठरतो आणि फासावर लटकतो आणि सहश्रद्ध, देव भोळी आजी अकाली नातवाच्या हाती मरण पत्करते. इथल्या व्यवस्थेचे असेच झाले आहे. काळ सोकवतो आहे, राजकीय भान वाढवावे लागेल.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेक लाडकी अभियानच्या संस्थापक

logo
marathi.freepressjournal.in