- अरविंद भानुशाली
सह्याद्रीचे वारे
महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. राज्यात तिसऱ्या व चौथ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. राजकीय पक्षांच्या त्रांगड्यात महाराष्ट्रातील राजकारण भरकटत असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या नेतृत्वाने ४५ प्लससाठी जोरदार तयारी चालवली आहे. त्यात त्यांना यश येईल काय याचे उत्तर निवडणुकीनंतरच मिळू शकेल.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या, चौथ्या महत्वाच्या टप्प्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कारण भाजप व मित्र पक्षांनी महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ प्लस जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंचा मार्ग अधिक सुकर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात दोन टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आता तिसऱ्या व चौथ्या टप्प्याकडे राजकीय पक्षांचे लक्ष आहे. मुंबई-ठाणे-रायगड मिळून चौथ्या टप्प्यात ११ जागा महत्वाच्या आहेत. सध्याचे राजकारण हे भरकटत चालले आहे. मतदानाची वेळ आली तरी उमेदवारी निश्चित होत नाही, यापूर्वी कधीही महाराष्ट्राच्या राजकारणात झालेले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे महायुतीमध्ये आलेले चार पक्ष. तर महाविकास आघाडीत असलेले पाच पक्ष यांची संयुक्त मोर्चेबांधणी होत नाही. महाविकास आघाडीचा एकाच कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी नको. तर महायुतीचा एकच कार्यक्रम चारसो पार. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकमेकांमध्ये चुरस लागल्याने महाराष्ट्राचे राजकारण आरोप-प्रत्यारोपाने गाजत आहे. सुप्रिया सुळेंसाठी अख्खे पवार घराणे रस्त्यावर उतरले असून पवारांची पत्नी प्रतिभा पवार यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे यांची मुलगीही प्रचारात उतरली आहे. आता बारामतीत सीट ही आव्हानात्मक झाली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी शब्द देऊन हर्षवर्धन पाटील यांची मते सुप्रिया सुळे यांच्याकडे वळवली होती मात्र त्यास अजित पवार यांनी तत्त्वता विरोध दर्शवला होता. कारण इंदापूरमधून राष्ट्रवादीचा आमदार हा मोठ्या मताधिक्क्याने निवडून येत होता तर बापू शिवतारे यांना तर अजित पवारांनी आव्हान देऊन पडले. तेच प्रकरण राहुल कुल यांचे होते. परंतु कोणत्याही परिस्थितीत बारामतीत शरद पवारांचा पराभव करायचा म्हणून आणि या तिन्ही नेत्यांना एकत्र आणण्याचे काम कोणी केले असेल तर ते होते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. या तिन्ही विधानसभा मतदारसंघात अजित पवारांना कडवा विरोध होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसावयाचे म्हणून फडणवीस यांनी ही तडजोड घडवून आणली. आता या तिन्ही नेत्यांची भूमिका प्रामाणिक पानाची राहिली तर महायुतीच्या सुनेत्रा वहिनी निवडून येण्यास अडचण राहणार नाही. परंतु अजित पवारांचे राजकारणावरील तिन्ही नेत्यांना माहित आहे. परंतु लोकसभेत महायुतीची जागा वाढण्यासाठीच बारामती या जागेवर सुरवातीपासून लक्ष देण्यात आले आहे. बारामती म्हटले कि शरद पवार व अजित पवार यांचेच वर्चस्व. परंतु २०२४ मध्ये या वर्चस्वाला आव्हान मिळाले आहे. नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ हा महायुतीकडे आला पाहिजे यासाठी राष्ट्रवादीमधील अंतर्गत राजकारण बदलून दाखवले.
माढा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला होता. ते दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले परंतु २०१९ मध्ये फलटणचे भाजपचे निंबाळकर यांनी बाजी मारली आणि आता माढा मतदार संघ भाजपाकडे आहे. या मतदारसंघात अकलूजकरांचा प्रभाव होता. परंतु त्यांनी दोन ते तीनवेळा पक्षांतर केल्याने त्यांच्याबद्दलची सहानभूती कमी झाली आहे. विजयसिंह मोहिते-पाटील हे भाजपाकडे गेले चार वर्षे होते. त्यांच्या चिरंजीवांनी भाजपकडून आमदारकीही मिळवली होती. परंतु आता गणित बदलले आहे. अकलूजकरांनी आता भाजप सोडून शरद पवारांची राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पुतण्यालाच माढा मतदार संघात नाईक निंबाळकर यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे.
नाईक-निंबाळकर यांचेकडे सहा विधानसभा मतदार संघ आहेत त्या पैकी चार मतदारसंघात भाजपचे प्राबल्य आहे. मात्र प्रतापराव मोहितेंच्या उमेदवारीमुळे एकतर्फी वाटणारी निवडणूक आता चुरशीची होईल,असे दिसते. मुळात प. महाराष्ट्रातच विभागणी वेगवेगळ्या प्रकारात झाली आहे. मतदान कसे होते यावर माढा लोकसभा उमेदवाराचे भवितव्य अवलंबुन आहे.
सातारा हाही लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. ८० टक्के आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत. भाजपने तेथे उदयनराजे भोसले यांना तिकीट दिले आहे. तर राष्ट्रवादीने शरद पवार शशिकांत शिंदे यांना उतरविले आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी ही निवडणूक लढवावी, असे सांगण्यात येत होते परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी १९९५ मधील शरद पवारांचा आलेला अनुभव पाहता त्यांनी उमेदवारी नाकारली. सांगली मतदार संघावर काँग्रेसने दावा केला आहे. डॉ. पतंगराव कदम यांचे चिरंजीव माजी मंत्री विश्वजित कदम यांनी ही जागा काँग्रेसला सोडण्यासाठी अथक प्रयत्न केले. दिल्ली दरबारीही त्यांच्या चार भेटी झाल्या. परंतु येथे उबाठाने एका पहिलवानास उभे केल्याने काँग्रेसमध्ये संघर्ष वाढला आहे. विश्वजित कदम यांच्या बंधूनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे तर सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही, असा चंग उबाठा नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या पहेलवानासाठी राऊतांनी आठ दिवस सांगलीत मुक्काम केला होता. परंतु त्यांचे फारसे चालले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील हे सर्व राजकारण पाहता पूर्वीसारखा एकसंघ असा काँग्रेस पक्ष राहिला नाही.
कोकणात महायुतीतर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे व शिवसेना ‘उबाठा’चे विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे. राऊत हे विद्यमान खासदार आहेत परंतु शिवसेनेमधील फुटीनंतर नेते दुभंगले आहेत तर इकडे भाजप शिवसेना (शिंदे ) व राष्ट्रवादी अजित पवार हे तिन्ही पक्ष कोणत्याही परिस्थितीत कोकणातील ही जागा आपल्याकडे खेचण्यासाठी प्रचारात उतरले आहेत. २०१४ च्या मोदी लाटेत विनायक राऊत यांनी बाजी मारली होती आणि राणे पराभूत झाले होते. पुढील २०१९ मध्ये ही शिवसेना भाजप युती अखंड राहिल्याने त्यावेळी ही विनायक राऊत हे निवडून आले होते. आता मात्र परिस्तिथी वेगळी आहे पूर्वाश्रमीचे शिवसेनेमधील व आताचे मनसेचे राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने त्याचा लाभ कोकणात राणे यांना होऊ शकतो.
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा व इतर भाजप नेत्यांच्या जाहीर सभा या आठवड्यात होत आहेत. मिलिंद देवरा हे आता शिवसेना शिंदे गटात आले आहेत. त्यांना राज्यसभा देण्यात आली आहे आता दक्षिण मुंबईची जबाबदारी महायुतीने मिलिंद देवरा यांच्यावर टाकली आहे. काँग्रेस अंतर्गत खूप बंडाळी आहे. अजूनही शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या ‘उबाठा’बद्दल सहनभुतीची लाट आहे. ती कमी करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी केला असला तरी अजूनही त्यांना फारसं यश मिळालेले नाही. ‘उत्तर-मध्य’ मधून अमोल कीर्तिकर, या आपल्या मुलासाठी गजानन कीर्तिकर यांनी आपली उमेदवारी (शिंदे गट) मागे घेतली आहे. अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स बजावले असून त्यांची दोनवेळा चौकशी झाली. मुंबई महापालिकेतील कोरोना काळात खिचडी घोटाळा त्यांच्या शेकल्याचे दिसते. सध्याचे राजकारण भरकटत चालले असल्याचे दिसते.