पुतळ्यांचे राजकारण, राजकारणाचे पुतळे..

एखाद्या खासगी अथवा स्वयंसेवी संस्थेने उभारलेला पुतळा पडला असता, तर त्यांचे सरकारी यंत्रणांकडून काय हाल झाले असते, याची कल्पनाही करवत नाही.
पुतळ्यांचे राजकारण, राजकारणाचे पुतळे..
Published on

मुलुख मैदान

-रविकिरण देशमुख

मालवणच्या समुद्रकिनारी राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यामुळे मोठी नामुष्की झाली आहे. सरकार आणि नौदल यांनी बसविलेला ३५ फुटांचा पुतळा पडू शकतो ही बाब अनाकलनीय आहे. तो वाऱ्याने पडला, पावसाळी वातावरणामुळे काही गंभीर दोष निर्माण झाल्याने पडला, पुतळा अनेक भागांचे जोडकाम केल्याने नटबोल्ट गंजून पडला, अशा अनेक बाबी पुढे केल्या जात आहेत. एखाद्या खासगी अथवा स्वयंसेवी संस्थेने उभारलेला पुतळा पडला असता, तर त्यांचे सरकारी यंत्रणांकडून काय हाल झाले असते, याची कल्पनाही करवत नाही.

सिंधुदुर्गातील मालवणच्या समुद्रकिनारी राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जबाबदारी नेमकी कोणाची यावर बराच खल सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तर तत्काळ हात झटकले. गेल्या २० तारखेला आम्ही एक पत्र नौदलाला दिले होते आणि त्यात काही गंभीर बाबींकडे लक्ष वेधले होते, असा पवित्रा या विभागाने घेतला. ही बाब विश्वासार्ह वाटावी म्हणून त्या पत्राच्या प्रती जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवल्याचा पुरावा बाहेर आला आहे. त्यावर त्या त्या कार्यालयातील रजिस्ट्री विभागाने २३ ऑगस्ट रोजी पत्र प्राप्त झाले म्हणून मारलेले शिक्के व स्वीकृतीदर्शक सह्याही आहेत. मग हेच पत्र नौदलाच्या ज्या सागरी सीमा सुरक्षा अधिकाऱ्याला पाठवले त्या कार्यालयात ते कधी पोहोचले याचा पुरावा म्हणून त्यांच्या रजिस्ट्री विभागाचे सही, शिक्का असलेले पत्र का बाहेर आले नाही? हा पुरावा सर्वाधिक विश्वासार्ह असतानाही ही बाब समोर का येत नाही?

मुळात पुतळा ही नौदलाची जबाबदारी असती, तर हे काम त्यांच्या गॅरिसन इंजिनिअर विभागाकडून झाले असते. कारण नौदलामध्ये स्थापत्यविषयक कोणतेही काम फक्त त्यांचा गॅरिसन इंजिनिअरिंग विभागच करतो. ही फार मोठी यंत्रणा आहे. त्यांचे लोक अतिशय तज्ज्ञ असतात. कारण नौदलाच्या कोणत्याही कामाचा संबंध थेट देशाच्या सुरक्षेशी, प्रतिष्ठेशी निगडित असतो. अशी बाहेर कामे देण्याची पद्धत असती, तर कुलाब्यातील आयएनएस अश्विनी येथे असलेले त्यांचे सुसज्ज इस्पितळ किंवा त्यांचे क्लब, मेस आदी त्यांच्याच तज्ज्ञ अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत न चालवता खासगी लोकांकडून चालविले गेले नसते? असे हे नौदल महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम बाहेरच्यांवर सोपवून मोकळे राहील?

ज्या वाऱ्याचे आणि पावसाळ्याचे कारण दिले जात आहे, त्याच्याशी नौदल नेहमीच झुंजत असते. त्यांच्याकडे सागरी व्यवस्थापन, हवामान याच्याशी संबंधित प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ आहेत. मग हा पुतळा असा कसा बांधला गेला? विशेष म्हणजे, पंतप्रधान जे कार्यक्रम स्वीकारतात, त्या कार्यक्रमाची आणि तेथील प्रत्येक गोष्टीची सखोल आणि तपशीलवार माहिती घेतली जाते. त्यांच्या चमूकडून प्रत्येक गोष्ट पडताळून पाहिली जाते. त्याशिवाय पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) स्वीकृती कळवतच नाही. तिथे कोणाचे काही चालत नाही. मग या पुतळ्याशी संबंधित प्रत्येक बाबींची पडताळणी पीएमओकडून झाली नाही?

असो. अशा प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी अनेक तज्ज्ञ आणि विद्वान राजकीय क्षेत्रात आहेत. पण प्रश्न खरा पुतळ्यांचा आहे, तो उभारण्याच्या दृष्टिकोनाचा आहे. देशाचे आणि राज्याचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक नेतृत्व ज्यांनी ज्यांनी केले, इतिहासात ज्यांची वैशिष्ट्यपूर्ण नोंद आहे, त्यांचे पुतळे उभारण्याची परंपरा खूप जुनी आहे. त्यातून नवीन पिढीला मार्गदर्शन मिळावे हा उदात्त हेतू असतो. उदयपूर या शहरात तर महाराणा प्रताप यांच्या चेतक या विख्यात अश्वाचाही पुतळा आहे.

स्वातंत्र्यानंतर अनेक मान्यवर व्यक्तिमत्त्वांचे पुतळे उभारले गेले आहेत. मुंबईतही असे अनेक पुतळे आहेत. अलीकडे नेतेमंडळींचे पुतळे समर्थक उभारतात. प्रामुख्याने ते त्यांच्या कार्यभूमीवर असतात, म्हणजे साखर कारखाना, शिक्षण संस्था, फार तर जिल्हा परिषदेचे आवार आदी. पण शहरात, गावात सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारायचा असेल, तर त्याला मंजुरी देण्याचे सर्वाधिकार त्या-त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला दिले आहेत. प्रत्येक प्रस्तावाची छाननी केल्यानंतरच जिल्हाधिकारी पुतळ्यासाठी अनुमती देतात. पण जणू आता त्यांचेही म्हणणे गृहित न धरण्याची टूम निघाली आहे. जराशी चौकशी केली, तर काही पुतळ्यांचे प्रस्ताव मनमानी पद्धतीने, सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या सूचना धुडकावत उभारले गेले आहेत. जणू या पुतळ्यांमुळे सार्वजनिक शिस्त लागेल, अशी त्यांची अपेक्षा असावी. अलीकडे घडणाऱ्या बऱ्याच घटना, वक्तव्ये यातून निर्माण होणारे गंभीर प्रसंग पाहता, अशी शिस्त खरेच लागते का, हा एक गहन प्रश्न आहे.

पण एक मात्र खरे की, पूर्वी नागरिक स्वतःहून पुढे येत आणि आम्हाला अमुक एका व्यक्तिमत्त्वाचा पुतळा उभारायचाय, असा निर्णय सार्वजनिक सभेत करत. मुंबईतील नागरिकांनी उभारलेल्या अशा पुतळ्यांचे उदाहरणच द्यायचे झाले, तर चौपाटी येथील विठ्ठलभाई पटेल, फिरोजशहा मेहता उद्यान (हँगिंग गार्डन) मलबार हिल येथील शेठ आनंदीलाल पोद्दार यांच्या पुतळ्यांचे देता येते. पटेल हे ब्रिटिश काळात मुंबईचे नेतृत्व केलेले व्यक्तिमत्त्व, तर पोद्दार हे दानशूर म्हणून विख्यात होते. धोबीतलाव येथे तर मुंबईचे गाजलेले माजी पोलीस आयुक्त पेटिगारा यांचाही पुतळा आहे. आता एखाद्या पोलीस आयुक्तांचा पुतळा मुंबईत

उभारला जाईल? आता राजकीय पक्ष, त्यांचे नेते, कार्यकर्ते, चेले-चपाटे हेच पुतळे उभारण्यात पुढाकार घेतात. नागरिकांना काय वाटते याच्याशी त्याचे काही देणेघेणे असतेच असे नाही. वर्गणी देताना किती लोकांनी उत्स्फूर्तपणे दिली हाही एक प्रश्नच असतो.

एकदा का पुतळा उभारला की, त्यापासून काही प्रेरणा घेतली जाईल, असेही नाही. काही व्यक्तिमत्त्वांचे पुतळे दुर्लक्षित दिसतात. मंत्रालयाजवळ जमशेदजी टाटा यांचा पुतळा आहे. टाटांचे देशाच्या औद्योगिकीकरणातील योगदान सुविख्यात आहे. मग किती मान्यवर लोक त्यांच्या जयंती अथवा पुण्यतिथीदिनी तिथे जातात? दिवंगत केंद्रीय अन्न मंत्री स. का. पाटील हे काँग्रेसचे मुंबईतले बडे पुढारी. पण संयुक्त महाराष्ट्राला विरोध दर्शविल्यामुळे खलनायक ठरले. मृत्यूनंतर वैर-वाद संपविण्याची परंपरा असलेले आपण. मग महर्षी कर्वे मार्गावरील स. का. पाटील उद्यानातल्या त्यांच्या पुतळ्याकडे कोणी फिरकत असल्याचेही दिसत नाही. इतर नेत्यांच्या पुतळ्यांकडे त्यांच्या समर्थकांचे, कार्यकर्त्यांचे लक्ष त्या त्या नेत्याच्या जयंती अथवा पुण्यतिथीदिनी तरी जाते. हे भाग्य पाटलांच्या नशिबी नाही. त्या मानाने त्यांच्यावर कडाडून हल्ला चढवलेले बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचे आचार्य अत्रे भाग्यवान. त्यांच्या वरळी नाका येथील पुतळ्याची

आठवण पत्रकार आणि चाहते आवर्जून ठेवतात. संयुक्त महाराष्ट्रासाठी केंद्रीय मंत्रिपद फेकून देणारे बाणेदार सी. डी. देशमुख यांच्या नावाचा चौक मंत्रालयाजवळ होता. मेट्रोच्या कामामुळे आता तो चौकही गायब झाला. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आले, तेव्हा त्यांनी आपल्या अजेंड्यावर देशमुख यांचे स्मारक उभारण्याची ग्वाही दिली होती. आता तो चौक आणि पुतळा असलेले स्मारक प्रत्यक्षात येईल ?

(ravikiran 1001@gmail.com)

logo
marathi.freepressjournal.in