सकारात्मक बदल

परिवर्तन घडवून आणण्यासाठी मुळात ते विवेक व विज्ञान याचा आधार घेतात. ज्यांना बदल सुखकर असतो
सकारात्मक बदल

दल हा जगाचा नियम आहे. कुणी प्रयत्न करा अगर न करा. जग बदलत राहते; पण तो बदल समाजहिताचा असेलच असे नाही. समाजाच्या हिताचा बदल व्हायचा असेल तर मात्र त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. असे जे कोणी प्रयत्न करतात ते समाजसुधारक असतात. बदल काही वेळा वैयक्तिक पातळीवर असतो, तर काही वेळा तो सार्वजनिक पातळीवर असतो. तुलनेने सार्वजनिक पातळीवरील बदल हे परिणामकारक असतात. ते सामाजिक प्रश्नांची तड लावणारे असतात. बदल घडवून आणणारे दूरदृष्टीचे समाजसेवक असतात. परिवर्तन घडवून आणण्यासाठी मुळात ते विवेक व विज्ञान याचा आधार घेतात. ज्यांना बदल सुखकर असतो, तो घटक संख्येने जास्त पण विस्कळीत व असंघटित असतो. त्या घटकाला चटकन आपले हित, अहित कळत नाही. घटकाला शोषित घटक असं संबोधलं जातं. शोषित घटकाचे बदलास अनुकूल असे प्रबोधन करावे लागते. समाजाचे अज्ञान, अंधश्रद्धा व विवेक यावरच ज्यांची गुजराण चालते, असा एक घटक संख्येने कमी; पण संघटित असतो. तो शोषक असतो. तो बदलास आणि शोषितांच्या प्रबोधनास मोठ्या ताकदीनिशी विरोध करत राहतो; मात्र अंतिमतः विवेकाचा व विज्ञानाचा विजय होतो. हे सर्व आज आठवायचं कारण म्हणजे आपण नुकताच साजरा केलेला गणेशोत्सव. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीपासून चतुर्दशीपर्यंत हा उत्सव चालतो. मराठी माणूस आपल्या वकुब व संस्काराप्रमाणे उत्सव साजरा करत असतो. स्वतःच्या घरी जसा गणपती असतो, तसा तो सार्वजनिक ठिकाणीही असतोच. काही जण गणपती बसवतात तर काही जण श्रीची प्राणप्रतिष्ठा करतात. पूजा, अर्चा, आरास, रोषणाईसहित या काळात बरेच काही केले जाते. या उत्सवाची सांगता काही जण श्रीचे विसर्जन करून करतात. साधारण २० वर्षांपूर्वी शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर की, जे हयातभर विवेकवादी व विज्ञानवादी होते, त्यांनी पर्यावरण व आरोग्याची कारणे देऊन गणेशमूर्तीचे विसर्जन वाहत्या पाण्यात करू नये, त्याचप्रमाणे निर्माल्य पाण्यात टाकू नये. यासाठी प्रबोधनाची सुरुवात केली. गणेशमूर्ती पाण्याच्या कुंडात विसर्जित करावी अथवा दान करावी. निर्माल्य एकत्र करून त्याचे खत करावे, अशी त्यांची भूमिका होती. त्यास सुरुवातीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. विरोध मात्र जास्त झाला. काही मोजके लोक म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते नदीकाठी, विसर्जनाच्या ठिकाणी हात जोडून वाहत्या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जित करू नका, निर्मूलन नदीत टाकू नका, अशी विनंती गणेशभक्तांना करत होते. ते दखलपात्र नव्हते. त्यांची टिंगलटवाळी, हेटाळणी केली जात होती. त्यांना खुळ्यात काढणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. डॉक्टर दाभोलकरांना त्यांनीच ‘धर्म बुडवे’ हा किताब दिला होता. अत्यल्प प्रतिसादाने दाभोलकर अगर त्यांची चळवळ कुणीच खचले नाहीत. त्यांनी त्यांचे प्रबोधनाचे काम लोकांच्या घरापर्यंत नेले. सरकार दरबारी आणि न्यायव्यवस्थेतही त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. तो धसाला लावला आणि अखेर न्याय मिळवला. त्यांच्या हौतात्म्यानंतर आज जी परिस्थिती दिसते ती त्यांच्या विचारांचा विजय झाल्याचे ओरडून सांगताना दिसते. आता सर्वच गावात आणि शहरात गणेशमूर्तींचे विसर्जन कुंडात केले जाते. गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी प्रशासनामार्फतच ही व्यवस्था केली जाते. निर्माल्य टाकण्यासाठी वेगळे कुंड ठेवले जातात. समाजातील सर्वच घटक कोणतीही कुरकुर न करता त्याचा वापर करतात. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. पर्यावरण आणि आरोग्य रक्षण करणारा हा सकारात्मक बदल आहे. पुरोगामी व परिवर्तनवादी विचारांचा तो विजय आहे. तो गेल्या १५-२० वर्षांत झाला आहे. समाज बदलत नाही तो परंपरांचे कठोरपणे पालन करतो. अशा वल्गना हवेत विरल्या आहेत. समाज विवेकी व विज्ञानवादी झाल्याचा हा चांगला पुरावा आहे. पूर्वी नदीत, विहिरीत, तलावात विसर्जित केली जाणारी गणेशमूर्ती कुंडात बुडवली जाते. त्या बुडविण्याने धर्म बुडाला नाही. तर विवेकाने, विज्ञानाने, नीतीने धर्मपालन केले जात आहे. नीतीने केलेले धर्मपालन समर्थनीय असते. हा संदेश समाजात जातो आहे. ही आशादायक बाब आहे. समाज केवळ गणेशमूर्तीचे कुंडात विसर्जन करण्यावर थांबला नाही, तर आता गणेशमूर्ती दान करण्यावर समाजाचा कल आहे. हळूहळू तीसुद्धा एक चळवळ म्हणून पुढे येत आहे. ही चांगली बाब आहे. डॉक्टर दाभोलकरांनी या गणेशमूर्ती व निर्माल्य वाहत्या पाण्यात विसर्जित न करण्याबरोबरच ‘होळी लहान आणि पोळी दान’ हेसुद्धा अभियान चालवले होते. त्याचप्रमाणे फटाके मुक्त दिवाळी हेही त्यांचे पर्यावरणपूरक असे आंदोलन होते. गणेशोत्सव, होळी आणि दिवाळी या तीन उत्सवांपैकी एकास यश आलेले आहे. दुसऱ्या दोन्हीना लवकर येईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. समाजाने त्याप्रमाणे डोळे झाकून चालत आलेल्या परंपरा टाळाव्यात. विवेकाने व्यवहार करावेत. यासाठी जरूर प्रयत्न केले पाहिजेत. त्या प्रयत्नात सातत्य ठेवल्यास बदल हमखास होतो. हे आता आपण समोरच पाहिले आहे, अनुभवले आहे. त्यात बदल घडवून आणला पाहिजे. सकारात्मक बदलाचे स्वागत केले पाहिजे.

(लेखक सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in