
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना जी भावनिक साद घातली त्याचा बंडाचा झेंडा फडकविलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासमवेत गुवाहाटीस गेलेल्या बंडखोर आमदारांवर काही परिणाम झाल्याचे सध्या तरी दिसून येत नाही. आपली पक्ष नेतृत्वाबद्दल आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्याबद्दल काही नाराजी असल्यास समोर येऊन बोला, तशी नाराजी आपण व्यक्त केल्यास तत्क्षणी आपण मुख्यमंत्रीपदाचा आणि पक्षप्रमुखपदाचा राजीनामा देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. पण त्या आवाहनास बंडखोर शिंदे गटाकडून कसलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी, गेल्या अडीच वर्षांत आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसेनेचे आणि शिवसैनिकांचे पद्धतशीर खच्चीकरण होत आहे, अशा आशयाचे ट्विट करून महाविकास आघाडी सरकारमुळे कसे नुकसान झाले हे पक्षनेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे शिवसेनेने अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी असा निर्णय घेणे गरजेचे आहे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीलाच त्यांचा ठाम विरोध असल्याचे यावरून दिसून येते. त्याचप्रमाणे, एकनाथ शिंदे यांना मविआचे मुख्यमंत्री करावे, अशी चर्चा सुरु झाली होती. पण तो प्रस्ताव बासनात गुंडाळला गेल्याचे दिसून आले. सध्याची स्थिती पाहता बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे ४० आमदार असल्याचे सांगण्यात येते. एकनाथ शिंदे यांच्यासमवेत असलेल्या आमदारांनी आपल्या गटाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केली आहे. पण शिवसेनेचे गटनेते म्हणून शिवसेनेने ज्या अजय चौधरी यांची नियुक्ती केली त्यास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे गटनेते या नात्याने पक्ष प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची जी नियुक्ती करण्यात आली त्यास झिरवळ यांनी आक्षेप घेतला आहे. पक्षाच्या ५५पैकी फक्त १६ आमदारांनी अजय चौधरी यांची जी निवड केली त्यास एकनाथ शिंदे यांनी हरकत घेतली होती. त्यामुळे यावरून कायदेशीर लढाई लढावी लागण्याची चिन्हे आहेत. या घडामोडी घडत असताना, शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे, असे सांगून जे नाराज आमदार आहेत त्यांनी २४ तासांच्या आत मुंबईमध्ये यावे आणि पक्षनेतृत्वासमोर आपले जे काही म्हणणे आहे ते मांडावे, असे आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. घराचे दरवाजे उघडे आहेत. का वणवण करीत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पण एकनाथ शिंदे यांची सध्याची भूमिका लक्षात घेता त्यांच्याकडून या आवाहनाला कितपत प्रतिसाद मिळेल याबद्दल शंकाच आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमवेत असलेले आमदार संजय शिरसाट यांनी पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे पत्र लिहिले ते पत्र एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. त्या पत्रात, पक्षाच्या आमदारांना ‘बडव्यां’कडून कशी वाईट वागणूक मिळत होती, त्याची चर्चा केली आहे. अडीच वर्षांनंतर प्रथमच ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाचे दरवाजे उघडले गेले, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली आहे. तुम्ही आम्हास भेटतच नव्हता. तर आम्ही मतदारांना उत्तर काय द्यायचे या विचाराने जीव कासावीस व्हायचा, असेही शिरसाट यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. त्याच पत्रात, एकनाथ शिंदे यांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील, असे आमदार शिरसाट यांनी म्हटले आहे. त्यामुळेच आम्ही शिंदे यांच्यासोबत आहोत, असे सांगण्यास ते विसरले नाहीत. एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गेलेल्या शिवसेना आमदारांच्या मनातील प्रातिनिधिक खदखद या पत्राच्या निमित्ताने बाहेर पडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मूळ पक्ष म्हणून मान्यता मिळविण्याच्या प्रयत्नात एकनाथ शिंदे असल्याची चर्चा आहे. पण यासाठीची कायदेशीर प्रक्रिया प्रदीर्घ अशी आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर महाविकास आघाडीतील मतभेदही चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांना त्रास देत होते, अशी चर्चा सुरु झाली आहे. एकूण सर्व घटना पाहता गेल्या दोन दिवसांपासून राज्यात जो सत्तासंघर्ष सुरु आहे तो इतक्यात संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. हा संघर्ष लवकर मिटणार की आणखी गुंता वाढत जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.