खासगी बस प्रवाशांच्या सुरक्षेचे काय?

आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे स्लीपर बसला लागलेल्या आगीत २० प्रवाशांचा बळी गेल्यानंतर राज्यातील एसटी महामंडळाने स्लीपर वाहन प्रवासी सुरक्षा मार्गदर्शन अभियान सुरू केले आहे; मात्र खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांच्या सुरक्षेकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष कायम आहे.
खासगी बस प्रवाशांच्या सुरक्षेचे काय?
खासगी बस प्रवाशांच्या सुरक्षेचे काय?
Published on

आपले महानगर

तेजस वाघमारे

आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे स्लीपर बसला लागलेल्या आगीत २० प्रवाशांचा बळी गेल्यानंतर राज्यातील एसटी महामंडळाने स्लीपर वाहन प्रवासी सुरक्षा मार्गदर्शन अभियान सुरू केले आहे; मात्र खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांच्या सुरक्षेकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष कायम आहे.

कोणतीही दुर्घटना झाल्यास प्रशासन झोपेतून खडबडून जागे होते. याचा प्रत्यय अनेक घटनांवेळी येतोच. असेच काहीसे राज्याचे एसटी महामंडळ प्रशासन जागे झाले आहे. आंध्र प्रदेशातील स्लीपर बसला लागलेल्या आगीनंतर महामंडळाने स्लीपर वाहन प्रवासी सुरक्षा मार्गदर्शन अभियान सुरू केले आहे, तर परिवहन विभाग मात्र सुस्त असल्याने खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी स्लीपर बसला लागलेल्या आगीत २० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला. अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रतिसाद देण्यासाठी एसटी महामंडळाने स्लीपर वाहन प्रवासी सुरक्षा मार्गदर्शन अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत स्लीपर बसमधील प्रवाशांनी स्वतःची व इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी काही आवश्यक उपाय करावेत यासाठी हे अभियान सुरू केले आहे; मात्र खासगी ट्रॅव्हर्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष झालेले दिसते.

दिवाळी, उन्हाळी सुट्टी किंवा सण-उत्सवाच्या काळात खासगी ट्रॅव्हल्समधून लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रवास आरामदायी व्हावा, यासाठी अनेक प्रवासी स्लीपर बसला पसंती देतात. परंतु या बस सुरक्षित आहेत का? याची कोणतीही खातरजमा प्रवासी करत नाहीत. तसेच खासगी बस नियमाप्रमाणे चालविण्यात येतात काय? याबाबत परिवहन विभागही सतर्क असलेला पाहण्यास मिळत नाही. मुंबईतील अनेक भागांतून राज्यात आणि परराज्यात खासगी स्लीपर बस चालविण्यात येतात. या बसेस बहुतांश ठिकाणी रस्त्यावरच पार्किंग करण्यात येतात. यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूककोंडीस ट्रॅव्हल्स कारणीभूत असलेले निदर्शनास येते. याबाबत स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते याबाबत तक्रारी करत असतात; मात्र त्यांच्या तक्रारीची कोणीही दखल घेत नाही.

स्लीपर बस चालविण्यासाठी सरकारने काही नियम तयार केले आहेत; मात्र अनेक बसेस नियम धाब्यावर बसवत बसच्या रचनेत बदल करत आहेत. परिवहन विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने राज्यात खासगी बस राजरोसपणे धावत आहेत. काही महामार्गांवर बसची तपासणी होते, तर काही ठिकाणी बस विना अडथळा सुरू आहेत. यामुळे नियम धाब्यावर बसवत तयार करण्यात आलेल्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बसमध्ये माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र बसमध्ये सर्व प्रकारच्या माहितीचा अभाव असतो. यामुळे आग लागल्यास किंवा अपघात झाल्यास बसमधून सुरक्षित बाहेर पडण्याचे प्रवाशाला माहितीच नसते. यामुळे अनेकदा जीवितहानी वाढते.

खासगी ट्रॅव्हल्समध्ये गर्दीच्या कालावधीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेण्यात येतात. केबिन, सीटजवळील खुल्या जागेत लोकांना बसण्यास जागा देण्यात येते, तर काही लोक डिक्कीमध्ये बसून प्रवास करत असल्याचे प्रकार यापूर्वीही उघडकीस आले आहेत. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसलेले असताना देखील अशा बसेस विना अडथळा मार्गस्थ होतात. प्रशासनाला या गोष्टी माहिती असताना देखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे. केवळ एखादी दुर्घटना घडल्यावर जागे होऊन काम करणे प्रशासनाला शोभणारे नाही. नियमांची पायमल्ली करणाऱ्या बसेसवर वेळीच कारवाई केल्यास अथवा पाहणी केल्यास दुर्घटना रोखण्यात नक्कीच यश येईल. पण यासाठी संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती हवी. या घटनेच्या निमित्ताने का होईना राज्यातील खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी होणे गरजेचे आहे.

आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात झालेल्या घटनेनंतर एसटी महामंडळाने स्लीपर वाहन प्रवासी सुरक्षा मार्गदर्शन अभियान सुरू केले आहे. त्यानुसार मुख्य दरवाजा नेहमी खुला आणि अडथळामुक्त ठेवावा. आपत्कालीन दरवाजा बसमध्ये असलेला मुख्य मार्ग कधीही अडथळ्यांनी रोखू नये. बसच्या छतावरील एस्केप हॅचचा आगीच्या प्रसंगी वापर करावा. तसेच प्रत्येक वातानुकूलित बसच्या खिडकीजवळ सुरक्षा हातोडी असते. तिचा उपयोग करून काच फोडून बस बाहेर पडावे, अशा सूचना करण्यात येत आहेत. मात्र खासगी ट्रॅव्हल्सकडून या नियमांचे पालन होते का याची तपासणी करून तशा सूचना चालक-मालकांना देणे गरजेचे आहे. अन्यथा दुर्घटना झाल्यावर केवळ कारवाईची मलमपट्टी सरकारकडून होईल. यामध्ये जीव मात्र सर्वसामान्य नागरिकांचा जाणार आहे.

खासगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध यंत्रणा बसविणे गरजेचे आहे; मात्र खासगी ट्रॅव्हल्स याकडे डोळेझाक करतात. स्लीपर बसमध्ये फायर डिटेक्शन, आपत्कालीन दरवाजे बसविण्याबाबत नियम केले आहेत. मात्र हे नियम पायदळी तुडवत बसची रचना करण्यात येते. यामुळे बस धावण्यात अडथळा येत नाही. मात्र अपघात झाल्यास प्रवाशांच्या सुरक्षेसाठी याचा वापर होऊ शकेल. मात्र प्रवाशांना गाडीत प्रवेश केल्यावर फायर डिटेक्शन, आपत्कालीन दरवाजे याची माहिती उपलब्ध होत नसल्याने दुर्घटनेवेळी मोठी जीवितहानी होते. स्लीपर बसला विविध कारणांनी आगी लागण्याचे प्रकार हे बहुतांश वेळा मध्यरात्रीच्या वेळी घडले आहेत. मध्यरात्री लोक झोपेत असताना दुर्घटना घडल्यास यामध्ये जीवितहानी मोठी होते. त्यामुळे खासगी बसमधील प्रवाशांना धोक्याची सूचना देण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे गरजेचे झाले आहे.

tejaswaghmare25@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in