

महाराष्ट्रनामा
गिरीश चित्रे
झपाट्याने बदलणाऱ्या मुंबईच्या विकासासोबतच शहरातील रस्ते मृत्यूचे सापळे ठरत असून, बेस्ट बस अपघातांच्या वाढत्या घटनांनी ‘विकास’ आणि ‘सुरक्षितता’ यातील दरी भयावहरीत्या उघडी पडली आहे.
सुरक्षित आरामदायी प्रवास म्हणून बेस्ट बसेसना आजही प्रवासी प्राधान्य देतात. बेस्ट उपक्रमातील कायमस्वरूपी कामगार म्हणजे कधीही बिनधास्त प्रवास करा, अशी बेस्ट उपक्रमाची ओळख. आशिया खंडातील सर्वात दर्जेदार सेवा देणारी म्हणून बेस्ट उपक्रमाची जगभरात ओळख निर्माण झाली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून बेस्ट उपक्रमात कंत्राटी पद्धतीचा बोलबाला आहे. कंत्राटी पद्धतीवर बसेस नंतर कंत्राटी चालक व वाहक यामुळे बेस्ट उपक्रमाची खासगीकरणाकडे वाटचाल सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. मात्र विरोधकांचा आरोप फेटाळत खासगीकरण नसल्याने बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले असले तरी प्रत्यक्षात कंत्राटी पद्धतीवर बेस्ट उपक्रमाचा अंकुश नाही, हे वारंवार सिद्ध होत आहे. बेस्ट उपक्रमात २३ ते २४ हजार कायमस्वरूपी कामगार शिल्लक असून बाकी संपूर्ण कारभार कंत्राटी पद्धतीवर अवलंबून आहे. कुठलीही आस्थापना असो कायमस्वरूपी कामगाराची कामाप्रति जबाबदारी असते आणि काही घडले तर त्याला जाब विचारला जातो. मात्र बेस्ट उपक्रमात एखादी घटना घडली की कंत्राटदार हात वर करतो आणि आरोप बेस्ट उपक्रमावर होतो. त्यामुळे कंत्राटी पद्धत बेस्ट उपक्रमासाठी तापदायक ठरू लागली आहे.
आर्थिक डबघाईस आलेल्या बेस्ट उपक्रमास रुळावर आणण्यासाठी बेस्ट उपक्रमातील माजी सत्ताधारी पक्षाने भाडेतत्त्वावरील बसेस आणण्याचा निर्णय घेतला आणि हळुवार कंत्राटी कामगारांचे वर्चस्व प्रस्थापित होत गेले. कंत्राटी कामगारांचा थेट बेस्ट उपक्रमाबरोबर संवाद नसला, तरी कंत्राटी कामगार मुंबईला वेठीस धरू शकतात, हे अनेकदा केलेल्या आंदोलनावरून स्पष्ट झाले आहे. कंत्राटी कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले तर कंपनीवर कारवाई करणार, असा इशारा बेस्ट उपक्रमाकडून दिला जातो. मात्र कंत्राटी कामगारांच्या आंदोलनात भरडला जातो तो प्रवासी. कंत्राटी बसचालकांची मनमानी प्रवाशांना नेहमीच अनुभवयास मिळते. बस थांब्यावर बस न थांबवणे, बस थांब्यावर बस आली तर प्रवाशांना बसमध्ये चढण्यास मज्जाव करणे, प्रवाशांबरोबर नाहक हुज्जत घालणे हे प्रवाशांसाठी सवयीचा भाग होत चालला आहे. मात्र प्रवाशांना न जुमाणणारे कंत्राटी चालक बेस्ट उपक्रमाच्या कायमस्वरूपी कामगारांना जुमानत नसल्याची व्यथा अधिकारी वेळोवेळी मांडत आहेत. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने हक्काच्या कामगारांत वाढ करत स्वत:च्या मालकीच्या बसेस रस्त्यावर उतरवल्या तर ते प्रवासी व उपक्रमास फायद्याचेच ठरेल, याचा विचार उपक्रमाने करणे गरजेचे आहे.
भाडेतत्त्वावरील बसेस घेतेवेळी फक्त चालक कंत्राटदाराचे अशी भूमिका बेस्ट उपक्रमाने घेतली होती. परंतु काळ पुढे सरकत आहे त्याप्रमाणे बेस्ट उपक्रमाच्या भूमिकेतही बदल होत गेला. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याच्या नावाखाली आता कंत्राटदाराचाच वाहक व चालक आहे.
कंत्राटी कामगारांमुळे हक्काच्या कामगारांना दुसऱ्या कामाला जुंपण्याची वेळ बेस्ट उपक्रमावर ओढावली आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमात कंत्राटदारांचा शिरकाव झाला, हे सध्याची परिस्थिती पाहता कोणी नाकारू शकत नाही. कंत्राटी कामगारांना ज्या काही सोयीसुविधा देणे ही संबंधित कंपनीची जबाबदारी, असे बेस्ट उपक्रमाने याधीच स्पष्ट केले आहे. मात्र कंत्राटी कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आणि प्रवाशांना वेठीस धरले तर जास्तीत जास्त कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र कंत्राटी कामगारांवर बेस्ट उपक्रमाचे नियंत्रण ठेवण्याचे अधिकार नसल्याने कंत्राटी कामगार आक्रमक झालाच तर मुंबईची दुसरी लाइफलाइन ठप्प होण्यास वेळ लागत नाही. गेल्या काही वर्षांत नियोजनाअभावी बेस्ट उपक्रम आर्थिक कोंडीत सापडला असून प्रवाशांना सुविधा देणे तर दूर कायमस्वरूपी कामगारच समस्यांनी त्रस्त आहेत. बेस्ट उपक्रमातील कायमस्वरूपी कामगारांमुळे ‘बेस्ट’ जिवंत आहे. कामगार टिकला तर बेस्ट टिकेल याचा विचार बेस्ट उपक्रमाने करणे गरजेचे आहे. अन्यथा बेस्ट उपक्रमाचे अस्तित्व धोक्यात येईल, हेही तितकेच खरे.
बेस्ट उपक्रमात खासगी पद्धतीचा शिरकाव झाला, तो प्रवाशांच्या सोयीसाठी नव्हे तर अर्थपूर्ण राजकारणासाठी. बेस्ट उपक्रमात कायमस्वरूपी कामगार आजही कार्यरत आहेत. बेस्ट बसेसवर कायमस्वरूपी चालक व वाहक तर सुरक्षित प्रवास हा विश्वास प्रवाशांमध्ये. मात्र गेल्या १० वर्षांत खासगीकरण झपाट्याने होत असून खासगी कंत्राटदारांच्या बसेस प्रवासी सेवेत आल्यापासून अपघाताचेही प्रमाण वाढले आहे. कंत्राटी चालकांचे वय अधिक, जबाबदारी शून्य, यामुळे कंत्राटी चालक व वाहक कोणालाच जुमानत नाहीत. कंत्राटी चालकाच्या मनमानी कारभारावर बेस्ट उपक्रमाचा अंकुश नाही. त्यामुळे कुठल्या थांब्यावर बस थांबवली नाही तरी कोण विचारणार, बस थांब्यावर न थांबवता पुढे नेऊन थांबवायची, अशी अरेरावी कंत्राटी चालकांची. चालकांच्या याच मनमानी कारभारामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून खासगी कंत्राटदारांच्या बसेसचे अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे, हेही तितकेच खरे.
बेस्ट परिवहन विभागाच्या ताफ्यात सध्या २,७४४ बसेस आहेत, तर दररोज ३२ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या माध्यमातून बेस्टच्या तिजोरीत रोज कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होतो. परंतु १० वर्षांपूर्वी बेस्टच्या ताफ्यात पाच हजार बसेस होत्या आणि ४५ लाख प्रवाशांच्या माध्यमातून रोज ४ कोटी रुपये महसूल जमा होत असे. मात्र कंत्राटी पद्धतीमुळे परिवहन विभागाला उतरती कळा लागली याचा विचार बेस्ट प्रशासनाने करणे गरजेचे आहे, अन्यथा बेस्ट इतिहासजमा होण्यास वेळ लागणार नाही, हेही तितकेच खरे.
gchitre4@gmail.com