पूजन सावित्रीचे की वटसावित्रीचे ?

वैचारिक पातळीवर बदल घडवून आणणे अपेक्षित आहे.
पूजन सावित्रीचे की वटसावित्रीचे ?

भारतीय समाज हा मुळातच उत्सवप्रिय आहे. आपल्याकडे परंपरेने चालत आलेले झाडून सारे सण, समारंभ, उत्सव आपण थाटामाटाने साजरे करत असतो. त्याची चिकित्सा करण्याची फारशी तसदी आपण घेत नाही. पारंपरिक सण उत्सवाबरोबर राष्ट्रपुरुषांच्या जयंती पुण्यतिथीचे समारंभ आपण धुमधडाक्यात साजरे करत असतो. ते करत असतानाही आपण त्यांच्या विचारांचा फारसा विचार करत नाही. त्यांच्या प्रतिमांचे पूजन करतो. विचारांचे मात्र जतन फारसे करत नाही. त्यांच्या विचारांचे वाचन फारसे केले जात नाही. ते उत्सव वास्तविक वाचून साजरे करायची अपेक्षा असताना ते फक्त नाचून साजरे केले जातात. त्यात वैचारिक पातळीवर बदल घडवून आणणे अपेक्षित आहे.

परवा वटपौर्णिमा झाली. असंख्य स्त्रियांनी ती साजरी केली. त्यात शिकलेल्या स्त्रियांचे प्रमाण जास्त होते. कुणी वडाच्या झाडा जवळ जाऊन त्याची भक्तिभावे पूजा केली तर अनेकांनी वडाची फांदी घरी आणून तिचे पूजन केले. एकदा यमाने सत्यवानाचे घेतलेले प्राण सावित्रीने यमाला अडवून, विंनती-आग्रह-अट्टहास वगैरे सर्व गोष्टी करून परत करायला लावले. त्या सत्यवानाच्या सावित्रीचे गोडवे गायचा हा दिवस. स्त्री शिक्षणाच्या प्रचार प्रसारांअगोदर पासून हा उत्सव साजरा केला जातो. एकोणिसाव्या शतकात भारतात स्त्री शिक्षणाची वात पेटविण्यात आली. स्त्रियांना समान वागणूक नाकारली गेली होती. तिला समाजात दुय्यम स्थान दिले गेले होते. शिक्षण नाकारले होते. अशा कालखंडात स्त्रियांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी अनेक समाज सुधारकांनी प्रयत्न केले. त्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे योगदान भरीव स्वरूपाचे आहे. प्रचलित समाजरचनेला कडवे आव्हान देऊन, प्रस्थापितांचा रोष ओढावून घेऊन फुले दांपत्यानी स्त्री शिक्षणाचा पाया रचून तो मजबूत केला. त्यामुळे महिला मोठ्या प्रमाणात शिकल्या. समाजात पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या. स्त्री पुरुष विषमता कमी होत आली. स्त्रियांचे दुय्यम स्थान नष्ट करून काही प्रमाणात समता प्रस्थापित होऊ लागली. आता खरं म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या मुळे शिकलेल्या महिलांनी त्या सावित्रीचे पूजन करणे अपेक्षित आहे. परंतु पूर्वांपार चालत आलेल्या या उत्सवाची चिकित्सा न करताच, त्यात विज्ञान व विवेक न शोधता तो साजरा करणे योग्य वाटत नाही. त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा व्यवहारात वापर करावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात काहीही गैर नाही. भारतीय राज्य घटनेने त्यांना असे सण उत्सव साजरे करण्याचे हक्क दिलेले आहेत. त्यांनी ते करावेत. हे करत असताना संविधानाने दिलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याच्या कर्तव्याकडे मात्र दुर्लक्ष होता कामा नये, याचीही काळजी/दक्षता घेणे आवश्यक आहे. ते आपल्याकडे घेतले जात नाही.

सावित्री आणि तिने पतीचे प्राण यमाकडून परत आणणे या संकल्पनेला कोणताही शास्त्रीय आधार नाही. त्यात विवेकाचाही कुठे मागमूस नाही. ती साजरी करण्याचे समर्थन कोणत्याही पातळीवर होऊ शकत नाही. असं असताना ती मोठया प्रमाणात साजरी केली जाते. समाजात काही समता खटकत असणारा वर्ग सातत्याने केविलवाणी धडपड करत असतो. अशास्त्रीय, अविवेकी, विषमतावादी प्रथा -परंपरा त्यांना हव्या असतात. तो घटक कायमपणे आशा परंपरांचे समर्थन करत असतो. कारण समाजातील अज्ञान हेच त्यांच्या जगण्याचं एकमेव साधन असतं. म्हणून ते या प्रथा परंपरांचं उदात्तीकरण करत असतात. विज्ञानावर आधारलेली आजची समाजमाध्यमं म्हणजे सोशल मीडिया कशाचीही शहानिशा न करता अशा प्रथा परंपरांचं समर्थन करताना दिसतो आहे. काहींनी वडाच्या पूजेचा संबध थेट पर्यावरण या कल्पनेशी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणत्याही शास्त्रीय पायावर उभी असलेली चिकित्सा न करता अशा प्रथा परंपरांचं अतार्किक उदात्तीकरण खुलेआम सुरू आहे. त्याला आपल्या थोर परंपरा म्हणण्याची स्पर्धा लागली आहे. त्याला शास्त्रीय आधार देण्याचीही धडपड सुरू आहे. अशा प्रथांचे समर्थन आणि उदात्तीकरण हे समाजाला प्रगतीकडून अधोगतीकडे नेणार आहे. वट सावित्रीने स्त्रियांना शिक्षण दिल्याची अगर त्यांना समतेचे हक्क मिळवून दिल्याची ज्ञात इतिहासात कुठेही नोंद झालेले दिसत नाही. या उलट सावित्रीबाई फुले यांनी ते काम अवहेलना सोसून केले आहे. अशी इतिहासात नोंद आहे. आशा अवस्थेत सावित्रीबाई फुले यांचेच पूजन समर्थनीय ठरते. कोणत्याही परिस्थितीत वट सावित्रीचे पूजन समर्थनीय ठरत नाही. याचा विचार फुले दाम्पत्यामुळे अक्षर ओळख झालेल्या महिलांनी जरूर करावा, ही अपेक्षा.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in