‘यांना’ही ‘ईडी’ लावा!

खासगी वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आल्याने साऱ्या शहरभर वाहतुकीचे तीन-तेरा वाजले होते
‘यांना’ही ‘ईडी’ लावा!

भारताचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन मुंबईसह देशभर मोठ्या दणक्यात साजरा झाला. ‘घरोघरी तिरंग्या’ने साऱ्या देशवासीयांचा ऊर अभिमानाने भरून गेला. सर्वत्र देशभक्तीचे नारे घुमले. स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असल्याने लहानथोरांपर्यंत साऱ्यांच्याच आनंदाला एकच उधाण आले. सुट्टी म्हटली की, बच्चेकंपनी घराबाहेर पडण्यासाठी आग्रही असते. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी मुंबईतील सार्वजनिक वाहतूकसेवा विशेषत: रिक्षा, टॅक्सीज‌, बसेस‌, रेल्वेसेवा उत्सवी मंडळींनी अगदी ओसंडून वाहत होत्या. त्यातच खासगी वाहनेही रस्त्यावर उतरली होती. साऱ्या प्रेक्षणीय स्थळांवर मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. मध्य रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत, मुंबई महापालिका मुख्यालय, गिरगाव चौपाटी, मरिन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया, म्युझियम, मंत्रालय परिसर माणसांच्या गर्दीने अगदी फुलून गेला होता. खासगी वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आल्याने साऱ्या शहरभर वाहतुकीचे तीन-तेरा वाजले होते. महाराष्ट्राच्या राज्यकारभाराचे मुख्य केंद्र असलेल्या मंत्रालयाच्या चौकात सायंकाळी सिग्नल यंत्रणा सुरू असूनही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या ठिकाणी बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावायला वाहतूक पोलीस जागेवरच नव्हते. त्यामुळे वाहतूककोंडीचा सामना साऱ्यांनाच करावा लागत होता. मरिन लाईन्स, चर्चगेट परिसरात वाहतूक पोलीस होते; परंतु वाहनांची संख्या अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात असल्याने वाहतूक सुरळीत करताना त्यांच्याही नाकी दम येत होता. महापालिका मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात वाहतूककोंडी होती व पदपथही माणसांनी अक्षरश: ओसंडून वाहत होते. दुसरीकडे शनिवार, रविवार, सोमवार अशा सलग सुट्ट्या आल्याने मुंबईकरांनी शहराबाहेर जाण्याच्या योजना आखल्या होत्या. त्यामुळे मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे, मुंबई-गोवा महामार्गावरही वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत होते. सार्वजनिक गणेशोत्सवाचा सण आता अगदी तोंडावर आला आहे. या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रमाण खूप मोठे असते; मात्र आताच या महामार्गावरील वडखळ ते इंदापूर दरम्यानच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे या महामार्गावरून आपण प्रवास करतोय की, एखाद्या गलबतातून प्रवास करतोय, असा भास प्रवाशांना होत आहे. बाजूने हेलकावे खात जाणारा ट्रक आपल्या अंगावर तर कोसळणार नाही ना, अशी धास्ती मोटारीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाटत आहे. शहरवासीय जागृत असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांची चर्चा सातत्याने घडून येत असते. तथापि, खेड्यापाड्यातील रस्त्यांचीही अवस्था काही वेगळी नसल्याचे आढळून येत आहे. ज्यावेळी पाऊस नसतो, तेव्हा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्याची गरज असते. त्यासाठी राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग असो, अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रस्ते विभागाचे कर्मचारी यांनी लागलीच कामाला लागून खड्डे बुजवावे, अशी अपेक्षा असते. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांनीही आपली कर्तव्ये व जबाबदाऱ्या योग्यरीतीने बजावणे आवश्यक असते. मुंबई-पुणे महामार्गावर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या वाहनाला अपघात होऊन त्यात त्यांचा दुर्दैवाने अंत झाला. त्यांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळू शकले नाहीत. त्यामुळे अपघातानंतर रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर होऊन त्यात त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. मुळात आपल्याकडे वाहतूक व्यवस्था नीट नाही. ज्या वाहतूक पोलिसांना ड्युट्या दिलेल्या असतात, तिथे ते आढळून येत नाहीत. या वाहतूक पोलिसांची सारी शक्ती सावज हेरण्यातच अधिक वाया जात असल्याने ते रस्त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे कसे लक्ष देणार हाही एक प्रश्नच आहे. याशिवाय, वाहतूक पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्तेदुरुस्ती करणारे अधिकारी यांच्यात कोणताही ताळमेळ नसल्याने राज्यभरातील रस्त्यांची दुर्दशा झालेली पाहायला मिळते. मुंबई, ठाणे महापालिकेच्या रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील रस्त्यांकडे नियमित लक्ष दिले, तरी रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या बऱ्याचअंशी निकाली निघेल; पण लक्षात कोण घेतो? वाहतूक पोलीस अथवा रस्ते विभागाचे अधिकारी असे निष्काळजीपणे का वागतात? आपल्या विभागातील रस्ते नादुरुस्त झाल्यावर ते वेळीच व नीट दुरुस्त करण्यात ते वेळकाढूपणा का करतात? खड्डे नीट भरून रस्ता समतल करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची? असे असंख्य प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतात; मात्र त्या प्रश्नांची वर्षानुवर्षे उत्तरे काही मिळत नाहीत. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांना रस्ते विभागातील अधिकारीच प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे रस्ते वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरलेले वाहतूक पोलीस अधिकारी, निकृष्ट व चाळण झालेल्या रस्त्यांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करणारे भ्रष्ट ठेकेदार व संबंधित अधिकारी यांना आता थेट ‘ईडी’च्या कार्यकक्षेत आणण्याची गरज निर्माण झालेली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in