महाराष्ट्राचे रवींद्रनाथ टागोर -कर्मवीर भाऊराव पाटील

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे क्रियाशील कार्यकर्ते, ‘प्रत्येक खेड्यात शाळा असली पाहिजे. विना शाळेचे एकही गाव महाराष्ट्रात असू नये. 'प्रत्येक नांगरापाठीमागे एक पदवीधर मनुष्य उभा राहिला पाहिजे’ असे स्वप्न बाळगणारे आणि रयत शिक्षण संस्थेची उभारणी करून ते स्वप्न प्रत्यक्षात उतरविणारे, शिक्षणाचा संबंध श्रमाशी जोडणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची नुकतीच जयंती पार पडली.
महाराष्ट्राचे रवींद्रनाथ टागोर -कर्मवीर भाऊराव पाटील
Published on

नोंद

- सुरेखा खरे

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे क्रियाशील कार्यकर्ते, ‘प्रत्येक खेड्यात शाळा असली पाहिजे. विना शाळेचे एकही गाव महाराष्ट्रात असू नये. 'प्रत्येक नांगरापाठीमागे एक पदवीधर मनुष्य उभा राहिला पाहिजे’ असे स्वप्न बाळगणारे आणि रयत शिक्षण संस्थेची उभारणी करून ते स्वप्न प्रत्यक्षात उतरविणारे, शिक्षणाचा संबंध श्रमाशी जोडणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची नुकतीच जयंती पार पडली. त्यानिमित्ताने त्यांच्या शैक्षणिक कार्याचा थोडक्यात घेतलेला आढावा.

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कुंभोज, कोल्हापूर येथे झाला. १९०२ ते १९०७ या पाच वर्षांपर्यंत इयत्ता सहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी साताऱ्याला शिकवणी वर्ग सुरू करून 'पाटील मास्तर' म्हणून स्वावलंबी जीवनाची सुरुवात केली. कोल्हापूरमध्ये राजाराम हायस्कूलमध्ये शिकत असताना ते जैन बोर्डिंगमध्ये राहत होते. शाहू महाराजांच्या सहवासात असल्यामुळे त्यांच्या कार्याचा, समाजसुधारणेचा प्रभाव भाऊराव पाटील यांच्यावर पडला. राजर्षी शाहू महाराज यांच्या हयातीतच १९०९ साली सातारा जिल्ह्यात वाळवे तालुक्यात दुधगाव येथे विद्यार्थी आश्रम बंधू त्यांनी त्यांच्या शिक्षण प्रसाराच्या कार्याला सुरुवात केली. खेड्यापाड्यात शिक्षण पोहोचावे म्हणून त्यांनी ५७८ व्होलंटरी शाळा चालविल्या होत्या. त्यांचे स्फूर्तिस्थान छत्रपती शाहू महाराज तसेच महात्मा फुले हे आहेत. महात्मा गांधी यांचा मोठा प्रभाव कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर होता तसेच कर्मवीर महर्षी शिंदे हे त्यांच्या गुरूस्थानी होते. तसेच प्रबोधनकार ठाकरे. ते माझे गुरू तर खरेच, पण मी त्यांना वडिलांप्रमाणे पूज्य माझ्या पूजनीय मानतो, असे ते म्हणत.

‘श्रम करा व शिका’, ‘स्वावलंबी शिक्षण’ हे त्यांच्या शिक्षणकार्यातील तत्त्वज्ञान होते, शिक्षण म्हणजे मन, मेंदू आणि मनगट, म्हणजेच भावना, विचार आणि कृती यांचा मिलाफ असे ते म्हणत. शिक्षणामध्ये शारीरिक श्रमाची प्रतिष्ठा प्रस्थापित करण्याचा यशस्वी प्रयत्न भाऊरावांनी केला. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच काम केलं पाहिजे व त्यातून शिक्षणाचा खर्च भागवला पाहिजे, असे ते म्हणत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. वेळेप्रसंगी वसतिगृह चालवण्यासाठी त्यांना आपल्या पत्नीचे दागिनेही विकावे लागले. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. भाऊरावांनी १९४० मध्ये देशातले 'कमवा आणि शिका' या पद्धतीने चालणारे पहिले फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूल, महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने सातारा येथे सुरू केले. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या समाजसुधारक, प्रजाहितदक्ष व पुरोगामी विचारांच्या राजाची प्रेरणा त्यांना होती. त्यांचे स्मारक म्हणून भाऊराव यांनी आपल्या पहिल्या महाविद्यालयाला सयाजीराव महाराजांचे नाव दिले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्या काही शाळा आणि महाविद्यालये काढली. त्यांना त्यांनी राष्ट्रपुरुष, संत महात्मे आणि समाजसेवकांची नावे दिलेली आपल्याला दिसतात. त्यांच्या कार्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, कोणत्याही धानिकाकडे पैशांसाठी मागणी केली नाही, समुद्रासारखा पसरलेला बहुजन समाज हा माझा उदार अंत:करणाचा राजा आहे, तो माझे कधीही अडू देणार नाही, असे ते म्हणत. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे लोक पुढे येऊन स्वेच्छेने त्यांना मदत करत. मा. पी. जी. पाटील, शंकरराव सुखटणकर यांसारख्या अनेक मुलांना त्यांनी परदेशी शिक्षणासाठी देखील पाठविले. परदेशी शिकून आलेल्या मुलांनी संस्थेशी निष्ठा ठेवत, संस्थेमध्येच कामे केलेली दिसतात.

'कमवा व शिका' या क्रांतिकारक यशस्वी प्रयोगाच्या अंतर्गत आज महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांच्या अंतर्गत, महाविद्यालयांतून अनेक गरजू विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊन शिक्षण पूर्ण करताना दिसत आहेत. त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कराडजवळील काले या गावी एक वसतिगृह ४ ऑक्टोबर १९१९ काढून केली. पुढे १९२४ साली या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. त्याची औपचारिक नोंदणी १९३५ साली करण्यात आली. आज सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई, अहमदनगर, नाशिक, बीड या १४ जिल्ह्यांत संस्थेचा शाखाविस्तार झालेला आहे. चारशेहून अधिक शाळा, ४२ महाविद्यालये, ८० वसतिगृहे आणि अनेक आश्रमशाळा असून, चार लाखांहून अधिक विद्यार्थी आज इथे शिक्षण घेत आहेत. तसेच रयतच्या छायेत जे विद्यार्थी घडले त्यामध्ये शरद पवार, बॅ. पी. जी. पाटील, डॉ. साळुंखे, शंकरराव खरात, शंकर पाटील, एन. डी. पाटील, शिवाजीराव भोसले इ. आहेत. ग्रामीण शेतकरी व कष्टकरी जनतेच्या शिक्षणासाठी जे त्यांनी रोप लावले होते त्या रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष तयार झाला आहे.

१९२४ मध्ये भाऊरावांनी सातारा येथे सर्व धर्माच्या, पंथाच्या व जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मिश्र वसतिगृह काढले. १९२७ साली महात्मा गांधींनी या वसतिगृहाला भेट दिली. सर्व जाती-धर्मातील विद्यार्थी एकत्र राहतात हे पाहून महात्मा गांधीजींना खूप आनंद झाला होता. त्यांच्या हस्ते २५ फेब्रुवारी १९२७ रोजी या वसतिगृहाचे 'श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस' असे नामकरण केले गेले. तसेच महात्मा गांधीजींनी या संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. १९२८ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वसतिगृहाला भेट दिली आणि भाऊराव अण्णांचे कौतुक केले. तसेच वीस रुपये देणगी देखील दिली. १९३२ साली झालेला पुणे करार, या ऐतिहासिक घटनेचे स्मरण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी या दोन मोठ्या नेत्यांमधल्या दिलजमाईची आठवण म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पुण्यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, फर्ग्युसन कॉलेजच्या मागे पांडवनगर, वडार वस्तीजवळ 'युनियन बोर्डिंग हाऊस' या नावाने वसतिगृह, झोपड्या बांधून सुरू केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष शंकरराव खरात हे या वसतिगृहाचे विद्यार्थी होते.

महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून १९३५ मध्ये सिल्व्हर ज्युबली रूरल ट्रेनिंग कॉलेज, म. फुले अध्यापक विद्यालय या नावाने सातारा येथे सुरू केले. प्राथमिक शिक्षण हे ट्रेंड झाले पाहिजे, म्हणून ट्रेनिंग कॉलेज उघडणारे कुठल्याही विद्यापीठाची पदवी न घेतलेले 'कर्मवीर भाऊराव पाटील' हे एकमेव शिक्षणतज्ज्ञ होते. पुढे साताऱ्यातच १९५५ मध्ये मौलाना आझाद यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले आणि १९३६ साली रा.ब.रा.रा. काळे स्मारक म्हणून सराव शाळेची स्थापना केली आणि २४/१०/१९३६ रोजी बोर्डिंगच्या अठरा माजी विद्यार्थ्यांनी संस्था कार्यास आजन्म वाहून घेण्याची जाहीर शपथ येथे घेतली होती. १९४२ साली त्यांनी 'जिजामाता अध्यापिका विद्यालय सातारा' या पहिल्या महिला ट्रेनिंग कॉलेजची स्थापना केली. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात पहिल्या मोफत व वसतिगृहयुक्त छत्रपती शिवाजी कॉलेजची, तर १९५४ साली कऱ्हाड येथे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना केली.

महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. पुणे विद्यापीठाने त्यांचा १९५९ मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. भारत सरकारने २६ जानेवारी १९५९ ला त्यांना 'पद्मभूषण'ने सन्मानित केले. भाऊराव तेव्हा म्हटले होते “मला जनता जनार्दनाने दिलेली कर्मवीर ही पदवी त्याहून श्रेष्ठ आहे”. ते आपल्या नावाखाली ‘रयतसेवक’ अशी पदवी लावत. शिक्षणाला एक नवी दृष्टी भाऊरावांनी दिली. आजही रयत शिक्षण संस्थेचा रथ हे सर्व जाती-धर्माचे लोक आपल्याला ओढताना दिसतात. कर्मवीर भाऊराव म्हणजे, महाराष्ट्राचे रवींद्रनाथ टागोर, रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनमध्ये बिनभिंतींच्या शाळा सुरू केल्या आणि भाऊराव यांनी सुरुवातीला उघड्यावर शाळा सुरू केल्या. जातिभेदातीत व श्रमाधिष्टित शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान व दारिद्र्य नष्ट करण्यासाठी शिक्षणाला साधन मानत अवघा महाराष्ट्र जागा केला आणि शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात गरीब शेतकरी व दलितांच्या झोपडीपर्यंत नेऊन पोहचवली. शिक्षणातून एकात्मता साधणे हा पवित्रा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घेतला होता. भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षण नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन, मागासलेल्या आणि गरीब विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून या मुलांना शिक्षण मोफत दिले. तसेच निरनिराळ्या जातिधर्मातील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे हे उद्दिष्ट कर्मवीर भाऊराव पाटील यांनी डोळ्यासमोर ठेवून तशी कृती केली. परंतु आज कर्मवीरांच्या महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्राचा बाजार मांडल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहचविण्याचे काम त्यांनी केले. प्रामुख्याने खेड्यातील शिक्षणाला त्यांनी प्राधान्य दिले. परंतु आज महाराष्ट्रातील २० पटसंख्येखालील १४७००हून अधिक शाळा बंद करण्याचे धोरण अंमलात येत आहे. तसेच क्लस्टरच्या नावाखाली ३००० विद्यार्थी संख्येची अट घालून ग्रामीण भागातले महाविद्यालयातील उच्च शिक्षण देखील बंद करण्याचा घाट घातला जात आहे. कर्मवीरांनी शिक्षणात विद्यार्थी, शिक्षक आणि लोक यांच्याशी जिव्हाळ्याचे एक नाते निर्माण केले. विद्यार्थ्यांमध्ये निधर्मीपणा, श्रमप्रतिष्ठा, विज्ञाननिष्ठा आणि सहकार्याची, बंधुत्वाची मूल्ये रुजविण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. त्यांनी जोपासलेली ही मूल्ये आणि त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य आज आपल्यापुढे असलेल्या अनेक शैक्षणिक आव्हानांवर मात करण्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. (लेखिका २५ टक्के आरक्षण पालक संघाच्या अध्यक्षा आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in