पराभूतांची केविलवाणी आभासी धडपड

निवडणुकीच्या राजकारणातून आलेल्या अपयशामुळे वैफल्यग्रस्त झालेले राहुल गांधी आणि त्यांच्या इंडी आघाडीतील नेते आपले अस्तित्व टिकवण्याची धडपड सध्या करीत आहेत. अपयशी ठरणार याची खात्री असूनसुद्धा पूर्वीच्याच सोंगट्या टाकत आहेत.
पराभूतांची केविलवाणी आभासी धडपड
पराभूतांची केविलवाणी आभासी धडपड(Photo- X)
Published on

मत आमचेही

केशव उपाध्ये

निवडणुकीच्या राजकारणातून आलेल्या अपयशामुळे वैफल्यग्रस्त झालेले राहुल गांधी आणि त्यांच्या इंडी आघाडीतील नेते आपले अस्तित्व टिकवण्याची धडपड सध्या करीत आहेत. अपयशी ठरणार याची खात्री असूनसुद्धा पूर्वीच्याच सोंगट्या टाकत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नॉर्डिक देशांच्या दौऱ्‍यादरम्यान देशभरातील आणि विदेशातीलही तमाम भाजप विरोधकांनी समाज माध्यमातून मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षाविरोधात मोहीम उघडली होती. सातत्याने पराभूत होणाऱ्‍या या मंडळींची ही धडपड अत्यंत केविलवाणी ठरली. ही मोहीम सुरू होण्याअगोदर अरविंद केजरीवाल यांच्यासारख्यांनी देशातील युवा पिढीने बांगलादेश, नेपाळप्रमाणे रस्त्यावर उतरावे, असे उघड उघड चिथावणीखोर आवाहन केले होते. नेपाळ आणि बांगलादेशप्रमाणे भारतातही प्रचंड हिंसाचार व्हावा, राजकीय अस्थिरता निर्माण व्हावी, असा देशविघातक उद्देश अरविंद केजरीवाल यांच्या आवाहनामागे होता. निवडणुकीच्या मैदानात भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी समोरासमोर दोन हात करून विजय मिळवण्याची पात्रता शिल्लक राहिली नसल्याने केजरीवाल यांच्यासारखे नेते देशात हिंसाचार घडवण्याचे प्रयत्न करीत आहेत. नेपाळ आणि बांगलादेशातील तरुणाच्या उठावामागे वेगवेगळी कारणे होती. विरोधकांना सरकारविरोधात आंदोलन करण्याचा घटनादत्त अधिकार आहे. गेल्या १२ वर्षांत विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात एका तरी मुद्द्यावर देशव्यापी आंदोलन केले आहे का?, असा प्रश्न विरोधकांनी स्वत:लाच विचारावा. असे आंदोलन करण्यासाठी संघटनेत नैतिक आणि सांख्यिक शक्ती असावी लागते. काँग्रेससह एकाही विरोधी पक्षामध्ये अशी नैतिक शक्ती उरलेली नाही. कार्यकर्त्यांच्या अल्पसंख्येेच्या बळावर रस्त्यावर उतरण्याचे धाडस राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव यांपैकी एकाही नेत्याने गेल्या १२ वर्षांत एकदाही दाखवलेले नाही. आंदालेन करण्यासाठी ज्या मुद्द्यांवर आपण सरकारविरोधात उतरणार आहोत ते मुद्दे योग्य आहेत, असा विश्‍वास संघटनेच्या प्रमुखाने आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण करावा लागतो. एकाही विरोधी नेत्याला असा विश्‍वास आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण करता आलेला नाही. नेते आणि कार्यकर्त्यांना आपला सरकारविरोधातील मुद्दा सामान्य माणसाला पटवून देण्याची गरज असते. पूर्वी जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाने सामान्य माणसाच्या अनेक प्रश्‍नांवर देशभर सातत्याने आंदोलने केली. विरोधी पक्षामध्ये असताना काँग्रेस सरकारविरोधात आंदोलन करताना अनेकदा जनसंघ आणि भाजपकडे कार्यकर्त्यांचे मोठे बळ नसायचे. जनसंघ आणि भाजपच्या विधिमंडळ आणि संसदेतील लोकप्रतिनिधींची संख्याही विरोधी पक्षात असताना मर्यादित होती.

तेवढ्या मर्यादित संख्येच्या बळावर जनसंघ, भाजप नेतृत्वाने अनेक मुद्द्यांवर आंदोलने, चळवळी करून सामान्य माणसांचे प्रश्‍न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अशा आंदोलनांमधूनच जनसंघ आणि भाजप नेतृत्वाची विश्‍वासार्हता वाढली. त्या विश्‍वासार्हतेतूनच मतदारांनी भारतीय जनता पक्षाला केंद्रात बहुमत दिले. याखेरीज अनेक राज्यांचे सरकार चालवण्याची संधीही मतदारांनी भारतीय जनता पक्षाला दिली. भारतीय जनता पक्ष अनेक राज्यांमध्ये आणि देशामध्ये एका रात्रीत सत्तेवर आलेला नाही. अनेक वर्षांचे परिश्रम त्यामागे आहेत. असे परिश्रम करण्याची तयारी एकाही विरोधी नेत्याकडे नाही.

अरविंद केजरीवाल यांचे नेतृत्व दिल्लीमध्ये २०११-१२ मध्ये झालेल्या भ्रष्टाचारविरोधी चळवळीतून निर्माण झाले आहे. खुद्द केजरीवाल यांना याचा विसर पडला आहे. दिल्लीमध्ये भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन उभे होण्यामागे अण्णा हजारे यांचा विश्वासार्ह चेहरा होता. पुढे केजरीवालांना अण्णा हजारेंचा विसर पडला, हा भाग वेगळा. ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्याविरोधात रान पेटवून केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री बनले, त्याच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यातून त्यांची जनमानसातील प्रतिमा संपून गेली. केजरीवालांनी मुख्यमंत्री असताना स्वत:साठी बांधलेला 'शिशमहल' हा दिल्लीतील सामान्य माणसाच्या अपेक्षाभंगाचे प्रतिनिधित्व करणारा ठरला. सरकारी बंगला, गाडी वारपणार नाही, सरकारी पैशांची उधळपट्टी करणार नाही, अशा घोषणा करत सत्ता मिळवणारे केजरीवाल एखाद्या राजा-महाराजाला शोभणाऱ्या पण सरकारी खर्चाने बांधलेल्या 'शिशमहल'मध्ये वास्तव्यास होते. त्या शिशमहालाच्या उभारणीवर त्यांनी कोट्यवधी रुपये उधळले. एखाद्या उद्योगपतीच्या बंगल्यात असणार नाहीत अशा सोयीसुविधा, फर्निचर, क्रोकरी केजरीवाल यांच्या बंगल्यात होती. उक्ती व कृतीमधील या कमालीच्या अंतरामुळे सामान्य माणसाच्या मनातून केजरीवाल आणि त्यांचा पक्ष तेव्हाच उतरला. आता हेच केजरीवाल समाज माध्यमातून तरुण पिढीला भडकावण्याचे प्रयत्न करीत आहेत. पश्‍चिम बंगालमधील अभूतपूर्व यशानंतर विरोधी पक्षांचा जळफळाट आणखी वाढला आहे.

पश्‍चिम बंगालमध्ये गेल्या १० वर्षांंत भारतीय जनता पक्षाने तृणमूल काँग्रेस सरकारविरोधात वेगवेगळ्या मुद्द्यांच्या सहाय्याने अनेक आंदोलने केली. हा विरोध सहन न झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या ३०० हून अधिक कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या. तृणमूल काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न अनेक मार्गांनी करून पाहिला. एवढ्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या तरी भाजपचे कार्यकर्ते तृणमूलविरोधात रस्त्यावर उतरताना घाबरले नाहीत. त्यांनी आपला विरोध चालूच ठेवला. सातत्याने तृणमूलला विरोध केल्याची पावती मतदारांनी भाजपला मोठे बहुमत देऊन दिली. बंगालमध्ये अनेक वर्षे सत्ता भोगणारे कम्युनिस्ट पक्ष ममतांविरोधात न लढल्यामुळे संपून गेले. अनेक वर्षे विरोधात राहून जनतेच्या प्रश्‍नासाठी लढे दिल्यानंतर जनतेने भारतीय जनता पक्षाला विश्‍वासार्ह मानले आहे. ही विश्‍वासार्हता मेहनतीने आणि तत्त्वांचे राजकारण करून मिळवता येते. अशी मेहनत आणि मूल्याधारित राजकारण करण्याची सवय काँग्रेससह एकाही भाजपविरोधी पक्षाला नाही. निवडणुकीच्या राजकारणातून आलेल्या अपयशामुळे वैफल्यग्रस्त झालेले राहुल गांधी आणि त्यांच्या इंडी आघाडीतील घटक पक्षांचे नेते आपल्या अस्तित्व टिकवण्याची अखेरची धडपड सध्या करीत आहेत. ही आभासी धडपड अपयशी ठरणार याची खात्री असूनसुद्धा विरोधक पूर्वीच्याच सोंगट्या टाकत आहेत.

विरोधकांच्या या असल्या फुसक्या डावपेचामुळे ते आणखीन मतदारांच्या नजरेतून उतरत आहेत. सरकारला बदनाम करण्याकरिता पातळी सोडून वर्तन करणाऱ्या विरोधकांची ही धडपड केवळ हास्यास्पदच नव्हे तर केविलवाणी म्हणावी, अशीच आहे.

लेखक भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.

logo
marathi.freepressjournal.in