

मत आमचेही
केशव उपाध्ये
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर शस्त्रे आणि विमानांपर्यंत साऱ्यांच्या मदतीने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यासाठी लष्कर सज्ज होते. मात्र तत्कालीन सिंग सरकारच्या बोटचेपे धोरणामुळे आपण संधी गमावली.
माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या प्रकाशित न झालेल्या पुस्तकातील उल्लेखाचा आधार घेऊन युवराज राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नेहमीप्रमाणे आरोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. सरकारच्या चुका दाखवणे हे विरोधी नेत्याचे कर्तव्यच असते. मात्र हे कर्तव्य बजावण्याच्या नावाखाली राहुल गांधी देशात अराजक माजवण्याचे डावपेच खेळू लागले असल्याने त्यांना त्याच भाषेत सुनावणे आवश्यक ठरते. त्या पुस्तकातील तपशिलाबाबत बाकी चर्चा बाजूला ठेवूया. पंतप्रधानांनी त्यावेळच्या लष्कराला चीन सैन्याच्या आगळीकीबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते, एवढी एकच परंतु अत्यंत महत्त्वाची बाब युवराजांच्या सुपीक मेंदूत अजून शिरलेली नाही. आपली आई ज्या सरकारची रिमोट कंट्रोल होती त्या मनमोहन सरकारने पाकिस्तानच्या मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या भारतीय हवाई दलाच्या योजनेला नकार दिला होता, त्या नकाराची कारणे आपल्या मातोश्रींना आधी विचारून घेण्याची आणि त्यानंतर आपली अक्कल पाजळण्याची किमान बुद्धी युवराजाकडे नाहीच हे अनेकदा दिसलेच आहे. २००८ चा तो नकार आणि २०२० मधील कारवाई करण्याचे सर्वाधिकार देणारा होकार यातला फरक समजून घेण्याएवढी बुद्धी युवराजकडे नाही. त्यामुळे आपण मोठी शिकार केल्याच्या नादात हे युवराज बेभान होऊन नाचू लागले आहेत. त्यांना काही घटनांची आठवण करून देण्याची गरज आहे.
२६/११ चा हल्ला झाल्यावर आमच्या सरकारने पाकिस्तानवर हल्ला करण्याची तयारी केली होती. मात्र अमेरिकेने दबाव आणल्यामुळे मनमोहन सरकारने माघार घेतली, असे त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनी अलीकडेच एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगून टाकले आहे. ''त्यावेळी मी केंद्रीय गृहमंत्री होतो. पाकिस्तानला खणखणीत उत्तर दिले पाहिजे असे मला वाटत होते. मात्र अमेरिकेने आणलेल्या दबावामुळे आम्हाला पाकिस्तानवरील हल्ल्याचा निर्णय बदलावा लागला,'' असे चिदंबरम यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. या मुलाखतीत अमेरिकेच्या त्यावेळच्या परराष्ट्र मंत्री कोंडालिसा राईस कशा भारतात आल्या होत्या, त्यांनी भारताने हल्ला करू नये यासाठी कसे प्रयत्न केले, याची माहितीही चिदंबरम यांनी या मुलाखतीत दिली आहे. मनमोहन सिंग न बोलताही किती श्रेष्ठ, कणखर पंतप्रधान होते, याची गाथा अनेकजण वाचत असतात. डॉ. मनमोहन सिंग विद्वत्तेने मोठे होते यात शंकाच नाही. माणूस म्हणूनही ते मोठे होते. मात्र पाकिस्तानकडून एवढा मोठा हल्ला होऊनही ते गप्प राहिले, याची इतिहासात नोंद कोणत्या अक्षराने होईल याचे उत्तर ज्याच्या त्याच्या बौद्धिक मगदुराप्रमाणे मिळेल. आज शूरवीराचा आव आणणाऱ्या युवराज राहुल यांनी मनमोहन सरकारकडे पाकिस्तानवर हल्ला करण्याचा आग्रह का धरला नाही, याचे उत्तर प्रथम द्यावे. हे उत्तर युवराज देणारच नाहीत.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही सरकारला प्रस्ताव दिला होता. पाकिस्तानवर हल्ल्यासाठी हवाई दल पू्र्णपणे सज्ज असल्याचे आम्ही सांगितले होते. पण सरकारने पाकवर हवाई हल्ला करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला, असे माजी हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनीही जाहीरपणे सांगितले आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे छुपे तळ कुठे आहेत याची आमच्याकडे माहिती होती आणि दहशतवाद्यांचे हे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी हवाई दल सज्ज होते. पण हवाई हल्ला करायचा की नाही? हा निर्णय अखेर राजकीय नेतृत्वाने घ्यायचा असतो, असे धनोआ म्हणाले होते.
मुंबई हल्ल्याच्या एक वर्षानंतर, त्यावेळी भारतीय हवाई दलाचे प्रमुख असलेले फली होमी मेजर यांनी रेडिफ डॉटकॉमला सांगितले की, मनमोहन सिंग सरकारने पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी "कधीही आपले मन बनवले नव्हते". त्यानंतर मेजर म्हणाले, सरकारने कधीही युद्ध करण्याचा निर्णय घेतला नव्हता. मला माहिती आहे की, संपूर्ण देशाची भावना राग आणि द्वेषाची होती. भारतीय हवाई दल पाकिस्तानवर हल्ला करण्यास सज्ज होते. आमची आकस्मिक तयारी होती आणि आम्ही चांगली तयारी केली होती. पण मनमोहन सरकार गप्प बसले. भारतीय हवाई दलाने मनमोहन सिंग यांना आश्वासन दिले होते की, मुंबई हल्ल्यानंतर शस्त्रे आणि विमानांपर्यंत सर्व काही, पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यासाठी लष्कर सज्ज आहे. त्यांनी या अनिर्णयतेचे वर्णन गमावलेली मोठी संधी अशा शब्दांत केले होते. धनोआ, फली मेजर, चिदंबरम यांनी मनमोहन सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल केलेल्या खुलाशाबद्दल युवराज काहीच बोलणार नाहीत.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेत काँग्रेसच्या महिला खासदारांकरवी घेराव घालण्याचा प्रयत्न करण्याचे राहुल गांधींचे डावपेच विनाशी मनोवृत्तीचेच होते. लोकसभेत पंतप्रधानांना घेराव घालण्याचा प्रयत्न हा फक्त विरोध नव्हता. त्यामागे अराजकी मेंदू होता. ज्या कोणी महिला खासदार भगिनी हे कृत्य करणार होत्या त्यांना आपण काय करणार आहोत त्याचे गांभीर्य कळाले नव्हते. पक्षाच्या नेतृत्वाचा आदेश पाळण्यासाठी या खासदार लोकसभेत आक्रमक झाल्या होत्या. राहुल गांधींना येनकेन प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिमा हनन करायचे आहे. त्यासाठीच त्यांनी राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार झाल्यासारखे आरोप केले होते. हे आरोप सिद्ध करता न आल्याने युवराजांना सर्वोच्च न्यायालयात चक्क नाक घासून माफी मागावी लागली होती. महिलांची ढाल करून, संसदेत राडा करून त्यातून मोदी सरकारला बदनाम करण्याचे हीन प्रयत्न करण्यापर्यंत युवराजांनी मजल मारली आहे. विरोधालाही मर्यादा असते याचे भान नसलेल्या राहुल गांधींमुळे काँग्रेसची विश्वासार्हता आणखी घसरणीला लागली आहे. बिहार निवडणुकीपूर्वी प्रचंड गाजावाजा करून युवराजांनी मतदार यादीतील चुकांचे निमित्त करून भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. मात्र मतदारांनी युवराजांचा कांगावा खणखणीतपणे नाकारला.
अग्निवीर योजनेत हुतात्मा झालेल्या युवकांना केंद्र सरकारकडून भरपाई मिळतच नसल्याचा आरोप करून युवराजांनी युवक वर्गांत अग्निवीर योजनेबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. युवराज आजवर कितीदा धडधडीतपणे खोटे बोलले याची मोठी यादी तयार करता येईल. आपल्या नेतृत्वाला सामान्य मतदार का नाकारत आहेत यामागची कारणे जाणून न घेता समाजातील विविध वर्गांत तेढ निर्माण करणे, भारतीय लष्कराच्या कामगिरीबद्दल संशय निर्माण करणे यासारखे उद्योग युवराजांकडून चालू असतात. हे विनाशी डावपेच पक्षाच्या मुळावरच उठतील यात काही शंका नाही.
मुख्य प्रवक्ते, प्रदेश भाजप