राहुल गांधी यातून काही शहाणपण शिकतील?

सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणे हे पूर्णपणे घटनाविरोधी कृत्य आहे. आपण असा मोर्चा काढून देशाच्या संविधानाचा अनादर करीत आहोत, लोकशाही परंपरांना काळे फासत आहोत एवढे ज्ञानही राहुल गांधींना नाही. आपण गांधी घराण्यात जन्म घेतल्याने काहीही करू शकतो, असा युवराजांचा समज आहे.
राहुल गांधी यातून काही शहाणपण शिकतील?
राहुल गांधी यातून काही शहाणपण शिकतील?x|संग्रहित छायाचित्र
Published on: 

मत आमचेही

केशव उपाध्ये

सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणे हे पूर्णपणे घटनाविरोधी कृत्य आहे. आपण असा मोर्चा काढून देशाच्या संविधानाचा अनादर करीत आहोत, लोकशाही परंपरांना काळे फासत आहोत एवढे ज्ञानही राहुल गांधींना नाही. आपण गांधी घराण्यात जन्म घेतल्याने काहीही करू शकतो, असा युवराजांचा समज आहे.

आपले विरोधी पक्षनेतेपद किती आक्रमक आहे हे दाखविण्यासाठी युवराज राहुल गांधी यांनी गेल्या दोन-अडीच वर्षांत केलेल्या बाल लीला संपूर्ण देशाने पाहिल्या आहेत. हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर राहुल गांधींनी मतदान यंत्रांवर (ईव्हीएम) आरोप केले. मतदान यंत्रात निवडणूक आयोगाच्या साह्याने गडबड केल्यामुळेच भाजपला बहुमत मिळाले असे आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी त्याचवेळी मतदार यादीतील दुबार नावांचा उल्लेख केला. महाराष्ट्रात लाजीरवाणा पराभव झाल्यावर दुपारी ४ वाजल्यानंतर मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडवले. निवडणूक आयोगाने मतदानाविषयी जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये फरक असल्याचे सांगत आपण फार मोठा गौप्यस्फोट केल्याचा आव राहुल गांधींनी आणला होता. मोठ्या पडद्यावर पॉवर पॉईंट सादरीकरण पाहणाऱ्याला प्रथमदर्शनी आकर्षक वाटते. मात्र त्या सादरीकरणातील माहितीत काहीच दम नसेल तर त्यातून काहीच हाती लागत नाही. कोणत्याही निवडणुकीत दुपारी ३ नंतर मतदानाचा वेग का वाढतो याचे उत्तर कोणत्याही पक्षाच्या खऱ्याखुऱ्या सामान्य कार्यकर्त्याकडून मिळेल. सत्तेचा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या राहुल गांधींना बूथ पातळीवर मतदानाच्या दिवशी कार्यकर्ता कसा काम करतो, मतदार कसे घराबाहेर काढले जातात याची व्यावहारिक बाजू माहिती असणे शक्यच नाही. ते जाणून घेण्याची त्यांची इच्छाही नाही. ईव्हीएममधील गडबडीचा आरोप फुसका ठरल्यानंतर युवराजांनी मतदार याद्यांमधील घोळाचा मुद्दा मोठा गाजावाजा करत हाती घेतला. एकाच मतदाराचे नाव ५ ठिकाणी कसे आहे, एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नावे वगैरे चुका दाखवीत आपण 'गुरुत्वाकर्षण'सारखा क्रांतिकारी शोध लावला आहे, अशा थाटात राहुल गांधी वावरत होते. मतदार यादीतील नावांचे गोंधळ भारतीय मतदारांच्या पाचवीला पुजले आहेत. मतदार यादीत अनेक वर्षे मृत मतदारांची नावे येणे, नावांचे स्पेलिंग चुकणे अशा खंडीभर चुका सामान्य माणूसही शोधून देईल त्याला राहुल गांधी कशाकरिता पाहिजेत? अशा चुका होऊ नयेत यासाठीच मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. असल्या चुकांच्या आधारे राहुल गांधी मतचोरीचे तुणतुणे वाजवत बसले होते. त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. नीट परीक्षा पेपर फुटीनंतर विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरू केल्यावर नेहमीप्रमाणे उशिरा जाणीव झालेल्या राहुल गांधींनी त्यात उडी घेतली. कथित विद्यार्थी नेत्यांपेक्षा मीच कसा आक्रमक आहे हे दाखविण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर धरणे धरण्याचा धोकादायक कार्यक्रमही करून पाहिला. सुरक्षा यंत्रणा आणि सरकारनेही हे धोकादायक आंदोलन अत्यंत शांतपणे हाताळले. या आंदोलनातूनही फारसा फायदा झाला नाही, हे लक्षात आल्याने राहुल गांधी संधीची वाट पाहत होते. निवडणूक आयुक्तांमधील मतभिन्नतेची बातमी हाती लागल्यावर राहुल गांधी अक्षरशः उत्तेजित झाले. त्यांनी थयथयाट सुरू केला. निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकण्याचा प्रयत्न केला. त्याच्यापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी सरन्यायाधीशांची भेट घेण्याचा उपद्व्याप केला. अशी भेट देता येत नाही असे सरन्यायाधीशांनी कळवूनही युवराजांच्या डोक्यात शहाणपण शिरले नाही. त्यांनी देशभरातून आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी यांना या मोर्चासाठी बोलावून घेतले. सात-आठ हजारांच्या या मोर्चात राहुल यांच्या भगिनींनी ट्रकवर प्रख्यात वांगी उत्पादक शेतकरी सुप्रिया पवार-सुळे यांच्यासह नृत्यही केले. खाली राहुल गांधी आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्याला ढकलून देत त्याचा अपमान करीत होते. असा हा मोर्चा काढून राहुल गांधींनी भाजप आणि नरेंद्र मोदींना आपण एकमेव पर्याय आहोत हे दाखविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पी. चिदंबरम, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासारख्या कायद्याचे ज्ञान असणाऱ्या काँग्रेस नेत्यांनीही राहुल गांधींना असा मोर्चा काढण्यापासून रोखले नाही, याचे आश्चर्य वाटते. कदाचित युवराजांना असे सल्ले देऊन उपयोग नाही, असा पूर्वानुभव असल्याने चिदंबरमसारख्यांनी गप्प राहणे पसंत केले. असो.

मोर्चा काढल्यानंतर राहुल गांधींनी मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मोर्चा काढण्याआधी पत्रकार परिषदेत मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार नाहीत हे निवडणूक आयोगाने, केंद्र सरकारने सिद्ध करावे असे सांगत आपल्या अज्ञानाचेच प्रदर्शन घडवले. राहुल गांधींच्या मोर्चाची दखल घेताना सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेली निरीक्षणे या बालीश कृतीला दिलेली सणसणीत चपराक आहे. सर्वोच्च न्यायालयाकडे निघालेल्या मोर्चादरम्यानच्या वर्तनाबाबत आम्ही याचिकाकर्त्यांपैकी एकाला सुनावणीच्या पुढील तारखेला जाब विचारू इच्छितो. नोटीस बजावण्याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणतीही गोष्ट माफ करत आहोत. परंतु याचिकाकर्त्यांपैकी एकाच्या बाबतीत, आम्ही हा मुद्दा निश्चितपणे विचारात घेऊ, असे सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने म्हटले. एका याचिकाकर्त्याच्या वतीने दाखल केलेली नोटीस, त्याने आपल्या वर्तणुकीबद्दल स्पष्टीकरण देण्याच्या अधीन राहून, तात्पुरत्या स्वरूपात स्वीकारली जाईल, असे निरीक्षण सरन्यायाधीश कांत यांनी नोंदवले. न्यायालय राजकीय दबावाला बळी पडू शकत नाही आणि राजकीय नेत्यांनी न्यायालयाच्या आवाराबाहेर केलेल्या वक्तव्यांची तसेच न्यायालयात सादर केलेल्या त्यांच्या युक्तिवादांची न्यायालयाला पूर्ण जाणीव होती, आम्ही काही हस्तिदंती मनोऱ्यात बसलेलो नाही. ते बाहेर काय वक्तव्ये करतात आणि न्यायालयात काय म्हणतात, हे आम्हाला सर्व काही माहीत आहे, असे निरीक्षण सरन्यायाधीश कांत यांनी तोंडी नोंदवले.

सर्वोच्च न्यायालयाकडे निघालेला मोर्चा आणि विरोधी पक्षाचे नेते व समर्थक न्यायालयाच्या आवारात जमल्यामुळे झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणे हे पूर्णपणे घटनाविरोधी कृत्य आहे. आपण असा मोर्चा काढून देशाच्या संविधानाचा अनादर करीत आहोत, लोकशाही परंपरांना काळे फासत आहोत एवढे भानही राहुल गांधींना नाही. आपण गांधी घराण्यात जन्म घेतला म्हणजे काहीही करू शकतो, असा युवराजांचा समज आहे. मतदार यादीतील घोळ वगैरे विषयांपेक्षा सामान्य माणसाशी संबंधित विषय घेऊन लढत राहिले तर राहुल गांधींना जनतेचा विश्वास मिळवता येईल. मात्र तेवढी कष्ट करण्याची तयारी नसल्याने आंदोलने, पोलीस बॅरिकेटवर चढणे यांसारखे स्टंट हा नेता करीत बसला आहे. यातून काँग्रेसची जनमान्यता दिवसेंदिवस घटत चालली आहे. लोकांना या प्रकारांची उबग येत आहे, याचेही भान गांधी यांना नाही हे दुर्दैवी आहे. न्यायालयाच्या थपडेतून राहुल गांधी काही शहाणपण शिकतील अशी आशा काँग्रेसजनांनाही त्यामुळेच वाटत नसावी.

प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

logo
marathi.freepressjournal.in