‘इंडिया’ आघाडीला पुन्हा बळ

कथित ‘कमजोर’ राहुल गांधी यांना कायम ‘पप्पू’ असे संबोधणाऱ्या भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांना राहुल गांधी यांची सतत दखल का घ्यावी लागते? या प्रश्नातच राहुल यांचे वेगळेपण आहे. जंग जंग पछाडूनही अजून ‘ईडी’ला राहुल गांधी यांच्याविरोधात ठोस असे काही सापडलेले नाही.
‘इंडिया’ आघाडीला पुन्हा बळ

- राही भिडे

नोंद

भाजपने राहुल गांधी यांची संभावना कायम अपरिपक्व नेता अशी केली; परंतु ‘भारत जोडो यात्रे’ पाठोपाठ ‘भारत जोडो न्याय यात्रा’ काढून देश समजून घेणाऱ्या राहुल गांधी यांचे मुंबईतील भाषण अनेकार्थांनी दखल घ्यायला लावणारे ठरले. राहुल यांची नंदुरबारपासून मुंबईपर्यंतची यात्रा ‘महाविकास’ आणि ‘इंडिया’ आघाडीला बळ देणारी तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपची कोंडी करण्याच्या द्दष्टिने दिशा देणारी ठरली आहे.

कथित ‘कमजोर’ राहुल गांधी यांना कायम ‘पप्पू’ असे संबोधणाऱ्या भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांना राहुल गांधी यांची सतत दखल का घ्यावी लागते? या प्रश्नातच राहुल यांचे वेगळेपण आहे. जंग जंग पछाडूनही अजून ‘ईडी’ला राहुल गांधी यांच्याविरोधात ठोस असे काही सापडलेले नाही. त्यांच्या मेहुण्याच्या चौकशीतूनही काहीच मिळाले नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला ३५ जागाही मिळणार नाही, असा आत्मविश्वास असेल, तर भाजपने खरे तर राहुल यांना अनुल्लेखाने मारायला हवे होते; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून सर्वांना त्यांची दखल घेत रहावी लागते, यातच सारे आले.

भाजपने राहुल यांचे मनोधैर्य कमी करण्यासाठी ते ज्या ज्या राज्यात गेले, त्या त्या राज्यातील मोठमोठ्या नेत्यांना ‘ईडी’, ‘सीबीआय’सारख्या यंत्रणांचा धाक दाखवून भाजपमध्ये नेले. महाराष्ट्रातही अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, झिशान सिद्दीकी, पद्माकर वळवी अशा नेत्यांनी ‘महायुती’त प्रवेश केला. त्याचा यत्किंचितही परिणाम राहुल यांच्यावर झाला नाही. मुंबईच्या सभेत बोलताना जेलमध्ये जायची तयारी नसल्यानेच अशोक चव्हाण युतीकडे गेल्याचे राहुल यांनी सांगितले. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसनेच्या फुटीमागे गळा धरून नेत्यांना पक्षांतर करायला लावण्याचे राजकारण कारणीभूत असल्याचे राहुल यांनी ठासून सांगितले. ‘इंडिया’ आघाडीची लढत पंतप्रधान नरेंद्र मोदी या एका व्यक्तिविरोधात नाही किंवा भाजप या एका पक्षाविरोधात नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर संबंधित अदृश्य शक्तीशी लढताना काय आयुधे हाती घ्यावी लागतील, याचा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला. त्याचबरोबर ही लढाई फारशी सोपी नाही, याची जाणीवही करून दिली. राहुल यांच्याकडे संभाषणचातुर्य नसेल, वक्तृत्व नसेल, आक्रमकपणा नसेल; परंतु ते ज्या पद्धतीने सामान्यांमध्ये मिसळून सामान्यांचे प्रश्न मांडतात आणि निवडणूक मूलभूत प्रश्नांपासून भरकटणार नाही, याची दक्षता घेतात, हे इतरांनीही लक्षात घेण्यासारखे आहे. आताही देशात मोठ्या शक्तिच्या विरोधात लढण्याची भाषा राहुल यांनी केली असली, तरी मोदी यांनी त्याची सांगड देवी आणि नारीशक्तिशी घालून लढाईचा मुद्दा मांडताना राहुल यांच्या भाषणाची मोडतोड केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

उत्कृष्ट नियोजन, शरद पवार आणि ठाकरे गटाचा सहभाग, महाविकास आघाडीतील काँग्रेस, माकप, वंचित आदी समविचारी संघटना यांच्या संयुक्त प्रयत्नाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वातावरणनिर्मिती करण्यात राहुल गांधी यांची मुंबईची सभा आणि एकूणच न्याय यात्रा यशस्वी ठरली. नंदुरबार जिल्ह्यातून पहिल्या डिजिटल आधार कार्डची नोंदणी झाल्याचा संदर्भ देणे असो वा आजारी असलेल्या रोहिदास पाटील यांची भेट घेऊन त्यांचा सोनिया गांधी यांच्याशी संवाद करून देणे असो; राहुल यांनी जुन्या आणि नव्या नेत्यांना कसे जपले पाहिजे, याचा वस्तुपाठ घालून दिला. कृषीविषयक तीन कायदे, दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन, नाशिक जिल्ह्यातील कांदा आणि द्राक्ष उत्पादकांची सुरू असलेली ससेहोलपट यामुळे शेतकऱ्यांच्या नाराजीला विरोधी पक्षांनी उचलून धरणे अपेक्षित होते. राहुल यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रे’दरम्यान चांदवडच्या सभेत शेतीप्रश्नांविषयी घेतलेली थेट भूमिका शेतकऱ्यांना भावली. त्यांनी सुचवलेले पाच उपाय शेतकऱ्यांच्या दृष्टीने आशेचा किरण ठरू शकतात, अशी वातावरणनिर्मिती करण्यात त्यांना यश आले आहे.

देशात पीकविम्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पण हे पैसे कोणत्या कंपन्यांच्या घशात जातात आणि प्रतिकूल हवामानामुळे नुकसान होऊनही शेतकऱ्यांच्या वाट्याला मनस्ताप कसा येतो, हे राहुल यांनी अतिशय बारकाईने सांगितले. तसेच शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या कंपन्यांमध्ये एकही दलित, आदिवासी आणि ओबीसी नाही, हेही अधोरेखित केले. मोठ्या उद्योजकांना १६ लाख कोटी रुपयांची करमाफी दिली जाते आणि शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफी दिली जात नाही; त्यांच्या पिकांना भाव नाही, या वेगवेगळ्या मुद्द्यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ‘इंडिया’ आघाडी सत्तेवर आल्यास मोठ्या उद्योगपतींप्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान आधारभूत किंमत देण्याची भूमिका, पीकविम्याची पुनर्रचना, आयात-निर्यात धोरण शेतकरीस्नेही करणे, शेतकऱ्यांना जीएसटीतून मुक्त करणे, या राहुल यांनी केलेल्या घोषणा प्रभावी ठरल्या आहेत.

मुंबईत ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या समारोपाच्या सभेमध्ये राहुल गांधी यांच्यावर एरवी टीका करणारे नेते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचे दिसले. काश्मीरपासून चेन्नईपर्यंतचे परस्परांचे विरोधकही या निमित्ताने एका मंचावर आलेले दिसले. राहुल यांचे नेतृत्व अप्रत्यक्षपणे मान्य करताना दिसले. ‘न्याय संकल्प पदयात्रा’ आणि शिवाजी पार्क येथील ‘ग्रँड इंडिया रॅली’मध्ये दोन डझनहून अधिक राजकीय पक्ष आणि गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुंबईत राहुल गांधी यांची स्तुती करणाऱ्या आणि त्यांना मनापासून पाठिंबा देणाऱ्या अनेक नेत्यांमध्ये महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, डॉ. फारूक अब्दुल्ला, बिहारचे तेजस्वी यादव, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना, मेहबूबा मुफ्ती, भाकपचे दीपांकर भट्टाचार्य, ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचा समावेश होता. राहुल गांधी यांनी यात्रेत भारत समजून घेतला.

‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या समारोपाच्या वेळी राहुल गांधी यांनी दोन गोष्टी आवर्जून केल्या. त्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देऊन संविधान अर्पण पत्रिकेचे वाचन केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. ‘शिवशक्ती-भीमशक्तीच्या ऐक्या’वर त्यांचा कसा भर आहे, हे यातून दिसले. देशात जाणीवपूर्वक द्वेष पसरवला जात आहे. द्वेष पसरू देऊ नका, हा संदेश त्यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’तून पुढे आला. शिवाजी पार्क हे आतापर्यंत शिवसेनेचे सभा गाजवण्याचे मैदान होते. प्रथमच या मैदानावर राहुल गांधी यांची टोलेजंग सभा झाली. या शक्तिप्रदर्शनात महाविकास आघाडी यशस्वी झाली. राहुल यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची समारोप रॅली ‘इंडिया’ आघाडीची ताकद दाखवणारी ठरली. मागे ज्या चीनच्या मुद्यावर भाजपने काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता, त्याच मुद्द्यावर राहुल यांनी आता भाजपची कोंडी केली आहे. सरकारच्या चीनधार्जिण्या धोरणामुळे धारावीतील युवकांच्या रोजगारक्षमतेवर कसा परिणाम होतोय, हे त्यांनी आकडेवारीनिशी सांगितले. राहुल यांनी केंद्रावर निशाणा साधला. चीनशी स्पर्धा करणारे लघुउद्योग उद्ध्वस्त केल्याचा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला. जीएसटी आणि नोटाबंदीमुळे देशातील रोजगाराच्या संधी संपत असून सरकारला छोटे उद्योजक, व्यापारी यांना कसे उद्ध्वस्त करायचे आहे आणि म्हणूनच आपण या सगळ्याच्या विरोधात कसे उभे राहिले पाहिजे, हे त्यांनी मांडले. राहुल यांनी तरुणांना आवाहन करत आमच्यावर जबाबदाऱ्या आहेत; पण देशातील तरुणांच्याही काही जबाबदाऱ्या आहेत, असे सांगितले. त्यांच्या या भाषणाचा आणि अकरा लोकसभा मतदारसंघातील यात्रेचा ‘महाविकास आघाडी’ कसा फायदा उठवते, ते आता पहावे लागेल.

(लेखिका ज्येष्ठ राजकीय निरीक्षक आहेत.)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in