रेल्वे प्रशासनाने अंतर्मुख व्हावे!

प्रवासाला सहजसोपी, सुरक्षित आणि तितकीच खिशाला परवडणारी म्हणूच ही लोकल जनमानसाला आजही प्यारी आहे.
रेल्वे प्रशासनाने अंतर्मुख व्हावे!

मुंबईची उपनगरीय लोकल म्हणजे मुंबईकर, ठाणेकर, डोंबिवलीकर, बदलापूरकर, कर्जतकर, कसाराकर, इकडे पनवेलकर यांच्या प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन. लोकल नाही, तर कामावर जाणे नाही, एवढे जगण्याचे महत्त्व सामान्य प्रवाशांच्या दृष्टीने या लोकल प्रवासाला आहे. आपल्या उभ्या आयुष्याचा बराच काळ काही जण मुंबईच्या उपनगरीय लोकलच्या प्रवासातच व्यतीत करतात, एवढी मुंबई लोकल प्रवाशांच्या जीवाभावाची बनली आहे. प्रवासाला सहजसोपी, सुरक्षित आणि तितकीच खिशाला परवडणारी म्हणूच ही लोकल जनमानसाला आजही प्यारी आहे. दररोज जवळपास ७०-७२ लाख प्रवासी या लोकलमधून प्रवास करतात, यावरून मुंबई लोकलचा महिमा लक्षात यावा. दक्षिण मुंबईत कार्यालये असल्याने सकाळच्या वेळेस सारेच प्रवासी उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पश्चिम रेल्वेच्या चर्चगेटच्या दिशेने प्रवास करतात. सायंकाळच्या सुमारास या प्रवाशांचा उलटा प्रवास सुरू होतो. सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळेस जादा लोकल सोडल्या जातात. त्यामुळे मिनिटा-मिनिटाला सुटणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकावर नजर ठेवूनच सारे प्रवासी मार्गस्थ होत असतात. या वेळापत्रकात पाच-दहा मिनिटे इकडे-तिकडे झाली, तरी त्याचा त्या वेळेच्या लोकलवर ताण पडतो. म्हणजे पुढच्या लोकलला प्रचंड गर्दी उसळते. त्यामुळे बऱ्याचदा लोकलमध्ये पाय ठेवणेही प्रवाशांना अवघड होते, मग ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांचे काय हाल होत असतील, याची निव्वळ कल्पनाच केलेली बरी. मुंबईकरांचे धावपळीचे जीवन अक्षरश: घड्याच्या काट्याप्रमाणे चालत असते, ते असे. त्यामुळे लोकलचा थोडासा गोंधळही सामान्य प्रवाशांना नको जीव करणारा ठरतो. कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला, कधी ओव्हरहेड वायर तुटली, कधी पाणी तुंबले की, मुंबईच्या लोकल वाहतुकीचा बोजवारा उडतो. त्यातच आता लोकलचा बोजवारा उडायला आणखी एक निमित्त ठरले आहे, ते म्हणजे एसी लोकलचे. दिवसभरात एसी लोकलच्या मध्य रेल्वेवर साधारणत: ६६ फेऱ्या, तर पश्चिम रेल्वेवर ४८ फेऱ्या होतात. नियमित साध्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तुलनेत एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आकडेवारी अगदीच नगण्य वाटावी अशीच आहे; मात्र सकाळ, संध्याकाळ अल्प प्रवाशांना घेऊन ये-जा करणाऱ्या या एसी लोकलचे भाडे सामान्यांना परवडणारे नाही; तसेच, या एसी लोकलची नियमित रेल्वे वेळापत्रकातील घुसखोरी सामान्यांना झेपणारी नाही. कारण, एसी लोकलनंतर जी साधी लोकल सोडण्यात येते, तिच्यावर दोन लोकलच्या प्रवाशांची प्रचंड गर्दी होऊन साध्या लोकलमध्ये चढणे-उतरणेही अवघड होते. कळवा, मुंब्रा रेल्वेस्थानकांत नेहमीच्या वेळेत येणाऱ्या साध्या लोकलऐवजी एसी लोकल सोडण्यात आल्याने संतप्त प्रवाशांचा उद्रेक पाहायला मिळाला. त्यापाठोपाठ बदलापुरातही एसी लोकलमुळे बदलापूरकरांचा खोळंबा झाला. त्यामुळे सोमवारी बदलापूर रेल्वेस्थानकात संतप्त प्रवाशांनी आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. एक लोकल रद्द झाली तरी प्रवाशांना किती त्रासाला सामोरे जावे लागते, ते त्यांच्या गावी गेल्याशिवाय कळणार नाही. तेव्हा गर्दीच्या वेळच्या वातानुकूलित लोकल रद्द करण्याची मागणी प्रवासीवर्गाकडून करण्यात येत आहे. एसी लोकलमुळे आम्हाला कार्यालयात जायला उशीर होत असल्याची तक्रार प्रवासीवर्गातून करण्यात येत आहे. मुळात वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढविण्यासाठी सर्वसामान्य लोकलच्या वेळापत्रकात बदल होत असून, त्याचाच फटका सामान्य प्रवाशांना बसत आहे. याशिवाय, पाचवी आणि सहावी मार्गिका एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र असूनही त्या गाड्या उपनगरीय रेल्वेमार्गावरून सोडल्या जात आहेत. त्यामुळेही प्रवासी संघटना आक्रमक आहेत. मुळात मुंबईतील मोनो रेल्वे सर्वसामान्यांना परवडणारी असली, तरी तिच्याकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने तो पांढरा हत्ती ठरला आहे. मुंबईतील मेट्रोचे भाडे परवडणारे आहे. त्या तुलनेत एसी लोकलचे भाडे परवडणारे नाही. त्यामुळेच सामान्य मुंबईकर प्रवाशांनी एसी लोकलकडे पाठ फिरवली असून, बहुसंख्य एसी लोकल रिकाम्या धावत आहेत. या एसी लोकल जेव्हा रिकाम्या धावताना बघायला मिळतात, तेव्हा प्रश्न पडतो, या एसी लोकलविषयी ना रेल्वे अधिकाऱ्यांना घेणे-देणे आहे, ना त्या खात्याच्या मंत्र्यांना. एरव्ही फलाटांची उंची मोजण्यासाठी मीडियाला घेऊन धावणारे नेतेही एसी लोकल परवडणाऱ्या दरात सुरू व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. रेल्वे प्रवाशांनी खच्चून भरलेल्या फलाटांवरून जेव्हा तुरळक प्रवाशांना घेऊन एसी लोकल धडधडत जाते, तेव्हा ती प्रवाशांच्या सेवेचा, सोयीचा नव्हे, तर चेष्टेचा विषय होते, यावर आता रेल्वे प्रशासनाने अंतर्मुख होऊन विचार करावा, हे उत्तम.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in