आव्हान प्रकल्पपूर्तीचे

लाखो प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा विचार करून रेल्वे मंत्रालय आणि एमआरव्हीसीने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. मात्र रेल्वेमार्गांलगत झालेली अतिक्रमणे, जमीन उपलब्धता आणि अधिग्रहण यामुळे काही प्रकल्प रखडले आहेत. यामुळे प्रवाशांना गर्दीतून धक्के खात प्रवास करावा लागत आहे.
आव्हान प्रकल्पपूर्तीचे
Published on

आपले महानगर

तेजस वाघमारे

लाखो प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा विचार करून रेल्वे मंत्रालय आणि एमआरव्हीसीने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. मात्र रेल्वेमार्गांलगत झालेली अतिक्रमणे, जमीन उपलब्धता आणि अधिग्रहण यामुळे काही प्रकल्प रखडले आहेत. यामुळे प्रवाशांना गर्दीतून धक्के खात प्रवास करावा लागत आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वेवर विविध पायाभूत सेवासुविधा निर्माण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने १९९९ मध्ये मुंबई रेल्वे विकास महामंडळाची (एमआरव्हीसी) स्थापना केली. नवीन लोकल, रेल्वेमार्ग उभारणे, रेल्वे स्थानकांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी एमआरव्हीसीवर सोपविण्यात आली. प्रकल्पांसाठी केंद्र सरकार ५० टक्के आणि राज्य सरकार ५० टक्के निधी उपलब्ध करून देते. या निधीतून पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय विभागात विविध कामे पूर्ण करण्यात आली आहेत, तर काही कामे प्रगतिपथावर आहेत. एमआरव्हीसीने हाती घेतलेले प्रकल्प राबविण्यात अनेक अडचणी येत असल्या तरी त्यावर मातही केली आहे. परंतु काही प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात अडथळे आहेत.

एमआरव्हीसीच्या स्थापनेनंतर मुंबईकरांचा रेल्वे प्रवास वेगवान करण्यासाठी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पाच्या (एमयूटीपी) विविध योजना तयार केल्या. या योजनेत नवीन लोकल, नवीन मार्गिका, रेल्वे रुळाजवळ बॅरिकेट, मार्गिका वाढविणे, स्थानकांचा कायापालट, नवीन स्थानके निर्माण करणे असे विविध प्रस्ताव तयार केले. एमआरव्हीसीने तयार केलेल्या एमयूटीपी १ टप्प्याला २००३-०४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली. या टप्प्यात कुर्ला-ठाणे पाचवी, सहावी मार्गिका, बोरिवली-विरार तिसरी आणि चौथी मार्गिका, ९ डब्याच्या १०१ नवीन लोकल, प्रकल्पात बाधित होणाऱ्या १५ हजार ८५७ नागरिकांचे पुनर्वसन अशी विविध कामे मार्गी लावली. एमयूटीपीचा पहिला टप्पा मार्च २०१२ मध्ये पूर्ण झाला. यामुळे पश्चिम-मध्य रेल्वेमार्गावर १२ डब्याच्या लोकल सुरू झाल्याने प्रवाशांना गर्दीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला.

एमयूटीपी १ मधील प्रकल्प मार्गी लागत असतानाच एमआरव्हीसीच्या एमयूटीपी २ टप्प्याला २००८-०९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली. या टप्प्यात ठाणे-दिवा पाचवी, सहावी मार्गिका आणि अंधेरी ते गोरेगाव दरम्यान हार्बर मार्ग विस्तार करण्याचे काम पूर्ण झाले आहे, तर मुंबई सेंट्रल-बोरिवली सहावी मार्गिका, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कुर्ला दरम्यानच्या पाचव्या- सहाव्या मार्गिकेचे काम प्रगतिपथावर आहे. सीएसएमटी ते कुर्ला पाचवा व सहावा मार्ग प्रकल्पाचा खर्च अंदाजे ८९१ कोटी रुपये आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. टप्पा १ मध्ये परळ ते कुर्ला हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. मात्र जुने पूल आणि रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्टीतील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात विलंब झाल्याने आणखी काही महिने या प्रकल्पाची प्रतीक्षा प्रवाशांना करावी लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील परळ ते सीएसएमटी प्रकल्प जागेअभावी रखडला आहे. सध्या लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्या जलद मार्गावरून चालविण्यात येत असल्याने जलद लोकल सेवेवर परिणाम होत आहे. यामुळे याचा फटका मध्य रेल्वे प्रवाशांना सोसावा लागत आहे.

एमयूटीपी ३ टप्प्याला २०१६ मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली. या टप्प्यात पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉर, ऐरोली- कळवा उन्नत मार्ग, विरार-डहाणू रोड मार्गिकेचे चौपदरीकरण अशी महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पनवेल-कर्जत नवीन मार्गिकेचे काम २०२२-२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, तर ऐरोली-कळवा उन्नत मार्ग २०२१-२२ मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. विरार-डहाणू रोड मार्गिकेचे चौपदरीकरणाचे काम २०२२-२३ मध्ये पूर्ण होणार होते. मात्र ही कामे सध्या प्रगतिपथावर आहेत, तर लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी स्वयंचलित दरवाजाची लोकल या टप्प्यात सुरू करण्यात येणार होती. ही लोकल नवीन वर्षात सुरू होणार आहे.

एमयूटीपी ३ ए टप्प्यात हार्बर मार्गिकेचा विस्तार गोरेगाव-बोरिवलीपर्यंत करण्यात येणार आहे. बोरिवली-विरार दरम्यान पाचवी, सहावी मार्गिका, कल्याण-आसनगाव दरम्यान चौथी मार्गिका, कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका, तर लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय लोकलसाठी कल्याण यार्डची कामे प्रगतिपथावर आहेत. तसेच वातानुकूलित रेक उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यात येणार आहेत. गोरेगाव-बोरिवली हार्बर मार्गिका विस्तार प्रकल्प ८९८ कोटी खर्चाचा असून सध्या या प्रकल्पासाठी भूमिसंपादनाचे काम प्रगतिपथावर आहे. हा प्रकल्प गोरेगाव ते मालाड दरम्यान मार्च २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, तर मालाड ते बोरिवली विभागात डिसेंबर २०२८ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. विरार-डहाणू तिसरा व चौथा मार्ग प्रकल्प डिसेंबर २०२६ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पनवेल-कर्जत उपनगरीय प्रकल्प, कल्याण-आसनगाव ४ था मार्ग प्रकल्प येत्या काही महिन्यांत पूर्ण होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशचे झपाट्याने नागरीकरण झाले आहे. येथील नागरिक नोकरीधंद्यानिमित्त दक्षिण मुंबईत मोठ्या संख्येने येतात. प्रवासासाठी हे नागरिक लोकल सेवेवर अवलंबून आहेत. यामुळे लोकलवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. गर्दीच्या वेळी लोकलमध्ये पाय ठेवण्यास जागा नसल्याने लोकलमधून पडून आणि रेल्वे रूळ ओलांडताना अनेकांना जीव गमवावा लागत आहे. प्रवाशांच्या वेगवान आणि सुरक्षित प्रवासासाठी हाती घेतलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान एमआरव्हीसी आणि रेल्वे प्रशासनासमोर आहे. परंतु महत्त्वाच्या प्रकल्पांची रखडपट्टी झाल्यास लोकल प्रवाशांना हालअपेष्टा सहन करत लोकलमधून प्रवास करावा लागणार आहे.

tejaswaghmare25@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in