
कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहुतेक सर्व सत्तास्थानांमधून बेदखल झालेल्या कोल्हापूरच्या महाडिक कुटुंबाला धनंजय महाडिक यांच्या खासदारकीच्या निमित्ताने ऊर्जा मिळाली आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीतील महाडिकांच्या एका चुकीच्या खेळीमुळे त्यांचे राजकारणच जवळपास संपुष्टात आले. काँग्रेसचे नेते, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्याचे राजकारण आणि सहकार क्षेत्रातूनही महाडिकांना विस्थापित केले. गोकुळ दूध संघातला पराभव हा महाडिकांच्या वर्चस्वावरचा शेवटचा घाव होता, आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचा विजय हा या सगळ्यावरचा कळसाध्याय होता. परंतु त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात एक प्रकारचा राजकीय असमतोल निर्माण झाला होता. असा असमतोल दूर करण्याचे काम नैसर्गिक न्यायानेच होत असते. त्यानुसार तो झाला आणि धनंजय महाडिक यांना अनपेक्षितरित्या खासदारकीची लॉटरी लागली. राज्यसभेच्या खासदारकीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला आणि महाडिक गटाला ऊर्जा मिळेल, हे खरे आहे. परंतु पक्षाने लढवलेल्या निवडणुकीतील विजयाच्या जोरावर बढाया मारण्यात किंवा शड्डू ठोकण्यात फारसा अर्थ नाही. या ऊर्जेचा वापर करून जनमाणसातले गमावलेले स्थान पुन्हा मिळवण्याचे आव्हान धनंजय महाडिक यांच्यासमोर असेल.
कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात गेली साडेतीन दशके महाडिक ब्रँड चर्चेत आहे. कोल्हापूर जिल्हा हे त्यांचे प्रमुख प्रभावक्षेत्र. ब्रँड चांगला असतो किंवा खराब असतो. महाडिक ब्रँडच्याबाबतीत सुरुवातीपासून अनेक दंतकथा, वदंता जिल्ह्याच्या राजकारणात प्रचलित आहेत. एकट्या दिग्विजय खानविलकर यांचा अपवाद वगळता कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक राजकीय नेत्याने कधी ना कधी कुठे ना कुठे महाडिक गटाशी जुळवून घेतले आहे.
महादेवराव महाडिक हे महाडिक कुटुंबातले राजकारणात प्रवेशकर्ते झालेले आद्यपुरुष ! कोल्हापूरपासून जवळच असलेले सांगली जिल्ह्यातील येलूर हे महाडिक यांचे मूळ गाव. कोल्हापूरलगतच्या कसबा बावडास्थित छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक म्हणून त्यांचा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश झाला. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर महापालिकेमध्ये शिरकाव केला. म्हणजे महापालिका निवडणूक लढवली नाही किंवा आपले पॅनलही उभे केले नाही. निवडून आलेल्या वेगवेगळ्या गटाच्या-पक्षाच्या-बिनगटाच्य ा- बिनाशेंड्याबुडख्याच्या नगरसेवकांना एकत्रित करून महापालिकेत आघाडीची मोट बांधली, जी ताराराणी आघाडी म्हणून ओळखली जाते. महाडिक यांनी मोट बांधायची. बहुमताएवढे नगरसेवक जमवायचे. त्यांना वेगवेगळी पदे द्यायची. पदाच्या लालसेने नगरसेवक ताराराणी आघाडीत यायचे. त्यामुळे महापालिकेवर दीर्घकाळ ताराराणी आघाडीचे वर्चस्व राहिले. महाडिक ठरवतील तो कोल्हापूरचा महापौर अशी स्थिती अनेक वर्षे होती. तुम्ही महापालिकेत काय धंदे करता यात मी लक्ष घालायचे नाही आणि महापालिकेतील सत्तेच्या बळावर मी जे उद्योग करतो त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करायचे अशा परस्पर संगनमताने आघाडीचे नगरसेवक आणि नेते असलेल्या महाडिक यांचा व्यवहार दोनेक दशके सुरू होता. महाडिकांच्या साम्राज्याला पहिल्यांदा सुरूंग लावला, तो हसन मुश्रीफ आणि विनय कोरे यांनी. (विनय कोरे आज भाजपच्या छताखाली महाडिक यांच्यासोबत आहेत.)
सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून महाडिक यांचे जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व असले, तरी ते पुढाऱ्यांच्या पुढारपणापुरते मर्यादित होते. त्यांच्या राजकारणाला सामान्य जनतेने कधीच थारा दिला नाही. महादेवराव महाडिक यांनी एकदा दिग्विजय खानविलकर यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवली, परंतु त्यांचा दारूण पराभव झाला. महाडिक यांनी पुढे शिवसेनेचा रस्ता धरला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेत त्यांनी एकदा जिल्ह्यातील काँग्रेस संपवण्याचा निर्धार केला आणि काही वर्षांनी ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून विधानपरिषदेवर निवडून आले. कोणत्याही पक्षाशी निष्ठा नाही. प्रत्येक मतदारसंघात स्वतःच्या सोयीची भूमिका. त्यामुळे राजकारणात त्यांना विश्वासार्हता नव्हती. महादेवराव महाडिक यांचे पुतणे धनंजय महाडिक यांनी २००४मध्ये शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढवली, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. २००९मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार होती, परंतु ती मंडलिक यांच्या विरोधामुळे हुकली. राष्ट्रवादी काँग्रेसने युवराज संभाजीराजे यांना उमेदवारी दिली. तरीही मंडलिक यांनी बंडखोरी केली तेव्हा महाडिक गटाने राष्ट्रवादीविरोधात मंडलिक यांना मदत केली होती. दरम्यानच्या काळात सतेज पाटील यांच्याशी मतभेद झाल्यानंतर धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून त्यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवली. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत धनंजय महाडिक यांना पराभव पत्करावा लागला. एकूण काय तर ब्रँड महाडिक जनतेमध्ये स्वीकारार्ह नाही, हेच वारंवार सिद्ध होत होते.
आपण ज्या पद्धतीने राजकारण करतोय ते लोकांना आवडत नाही, त्यात बदल केल्याशिवाय गत्यंतर नाही हे धनंजय महाडिक यांनी एव्हाना ओळखले होते. त्यानुसार त्यांनी आपल्या देहबोलीपासून कार्यपद्धतीपर्यंत एकूण वर्तनव्यवहारात बदल केला होता. धनंजय महाडिक यांच्या पत्नी अरुंधती महाडिक यांनी भागीरथी महिला संस्थेमार्फत केलेल्या कामाची त्यांना साथ मिळाली. धनंजय महाडिक लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्यायाने काँग्रेस आघाडीचे उमेदवार निश्चित झाल्यानंतर आधीचे मतभेद पूर्ण बाजूला ठेवून, स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन सतेज पाटील यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला. या मदतीची परतफेड करण्याची जबाबदारी आगामी विधानसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्यावर होती. त्यांनी तसा शब्दही दिला होता. या बदलत्या राजकारणामुळे तीस वर्षांनंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात ब्रँड महाडिकला प्रतिष्ठा मिळाली. परंतु कहानीमध्ये ट्विस्ट आला. काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार असलेल्या महादेवराव महाडिक यांनी आपल्या मुलासाठी अमल महाडिकसाठी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांच्याविरोधात भाजपची उमेदवारी घेतली. म्हणजे महादेवराव महाडिक काँग्रेसचे आमदार, त्यांचे पुत्र भाजपचे उमेदवार, पुतणे धनंजय महाडिक राष्ट्रवादीचे खासदार असे चित्र एकावेळी होते. २०१४ मध्ये अमल महाडिक यांना सतेज पाटील यांच्याविरोधात विजय मिळाला तरी ब्रँड महाडिकच्या विश्वासार्हतेला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सतेज पाटील पराभवातून सावरले. त्यांनी हसन मुश्रीफ यांना सोबत घेऊन कोल्हापूर महापालिकेतली महाडिक यांची सत्ता संपवली. कोल्हापूर स्थानिक स्वराज्य विधानपरिषद मतदारसंघात महादेवराव महाडिक यांचा पराभव केला. नंतर लोकसभेला धनंजय महाडिक यांच्या पराभवात महत्त्वाची भूमिका बजावली. नंतर सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक यांचा पराभव केला आणि महाडिक यांना संसदीय राजकारणात शून्यावर आणले.
या सगळ्यामध्ये महाडिक टिकून होते, ते गोकुळ दूध संघाच्या राजकारणावर. परंतु सतेज पाटील यांनी तिथेही संघर्ष सुरू केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांची त्यांना साथ मिळाली. सतेज पाटील यांनी बेरजेचे राजकारण केले आणि गोकुळ दूध संघातली महाडिक यांची सत्ता संपुष्टात आणली. अलीकडे झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने राज्य पातळीवरील संपूर्ण ताकद लावली होती. परंतु सतेज पाटील यांनी इथेही भाजपचा निभाव लागू दिला नाही. महाविकास आघाडीने इथे एकदिलाने काम केले. भाजपविरोधात निवडणूक कशी लढवायला पाहिजे, याचे प्रात्यक्षिक सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या या निवडणुकीत दाखवले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातला प्रबळ असलेला महाडिक गट सगळ्या सत्तांमधून बाहेर फेकला गेल्यामुळे कधी नव्हे एवढा असमतोल निर्माण झाला. आता राज्यसभा निवडणुकीतील धनंजय महाडिक यांच्या विजयाने नैसर्गिकरित्याच हा समतोल टिकवून ठेवला आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनीही राजकारणात चांगला जम बसवला आहे. महादेवराव महाडिक यांचे राजकारण आता कालबाह्य झाले आहे, हे लक्षात घेऊन नव्या पिढीने पक्षाशी एकनिष्ठ राहून राजकारणातली विश्वासार्हता मिळवायला हवी. गटा-तटांचे राजकारण अल्पजीवी असते, पक्षीय राजकारणातूनच मोठा पल्ला गाठता येतो. धनंजय महाडिक यांच्या राज्यसभेच्या खासदारकीच्या निमित्ताने आता भाजप हाच महाडिकांचा पक्ष असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपसोबत ते किती काळ राहतात हेही पाहावे लागणार आहे.