रामचंद्र कह गये सिया से ऐसा कलयुग आयेगा

रामजन्मभूमी आंदोलनातील अडवाणी यांच्या गळ्यातील ताईत जसे प्रमोद महाजन होते तसेच विनय कटियार देखील होते. आज विनय कटियार कुठेही दिसत नाहीत. त्यांना का नाही ट्रस्टी बनवले? कारण ते मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय होते म्हणूनच ना?
रामचंद्र कह गये सिया से ऐसा कलयुग आयेगा
रामचंद्र कह गये सिया से ऐसा कलयुग आयेगा
Published on

मत आमचेही

ॲड. हर्षल प्रधान

रामजन्मभूमी आंदोलनातील अडवाणी यांच्या गळ्यातील ताईत जसे प्रमोद महाजन होते तसेच विनय कटियार देखील होते. आज विनय कटियार कुठेही दिसत नाहीत. त्यांना का नाही ट्रस्टी बनवले? कारण ते मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय होते म्हणूनच ना?

हे रामचंद्र कह गये सिया से ऐसा कलयुग आयेगा,

हंस चुगेगा दाना दुनका, कव्वा मोती खायेगा!!!

दिलीप कुमारच्या अभिनयाने नटलेला १९७० मध्ये प्रदर्शित झालेल्या गोपी सिनेमातील हे गाजलेलं गाणं. महेंद्र कपूर यांचा भारदस्त आवाज कल्याणजी -आनंदजी या संगीतकारांचं संगीत आणि राजेंद्र कृष्ण यांचे गीत. १९७० मध्येच कदाचित आजच्या कलयुगात काय होणार आहे याचा अंदाज गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी ताडलं होतं. त्यांच्या गीतात त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की, “बेटा बाप को आँख दिखाएगा, धर्म करम को कोई न मानेगा, गुरू शिष्य से जलने लगेगा, मित्र मित्र को ठगने लगेगा, कलियुग में सब उलट जाएगा.” ज्या प्रभू रामाच्या आस्थेला मनामनात जिवंत करून रामजन्मभूमी आंदोलन उभारलं गेलं त्या आंदोलनामुळे देशातला हिंदू एकवटला आणि भाजपला सर्व शक्तिशाली बनवलं त्याच भाजपच्या मोदी-शहा या दोन नेत्यांनी राम मंदिर आंदोलन उभारणाऱ्या अडवाणींना राजकारणातून निवृत्त करून टाकलं. “बेटा बाप को आँख दिखाएगा, गुरू शिष्य से जलने लगेगा” हे सिद्ध झालं. तसंच ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी देशभरातील हिंदूंना एकत्र करून, “गर्व से कहो हम हिंदू है” म्हणायला लावलं. हिंदूंच्या एकत्रित मतदानाची वीट रचली त्याच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला अक्षरशः संपवण्याचा विडा अमित शहा यांनी उचलला. “मित्र मित्र को ठगने लगेगा” हे सिद्ध करून दाखवलं. एवढं करून ते थांबले नाहीत तर शिवसेनेतील कमजोर कडी शोधून त्यांच्यावर ईडी, सीबीआयचा धाक दाखवून उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांच्या हातून हिसकावून घेतली आणि एकनाथ शिंदे यांच्या हातात पक्ष, नाव, चिन्हासकट देऊन टाकले आणि “हंस चुगेगा दाना दुनका, कव्वा मोती खायेगा” हे प्रत्यक्षात घडवून दाखवलं. ज्या रामभक्तांनी आपल्या भावनांचं आणि श्रमाच्या मोलाचं दान राम मंदिरासाठी दिलं त्या राम धनाला थेट हात घालून त्याची चोरी केली आणि “धरम करम को कोई न मानेगा” हे देखील सिद्ध केलं.

राम मंदिर स्थापन झाल्यावर ट्रस्ट बनवला, पण विश्वास गमावला

ट्रस्टमध्ये १५ सदस्य असण्याची तरतूद केली. सध्या सुमारे १४ सदस्य सक्रिय होते. ज्यात मुख्य-स्थायी सदस्य महंत नृत्य गोपाल दास अध्यक्ष, स्वामी गोविंद देव गिरी कोषाध्यक्ष, पद्मश्री के. परासरण संस्थापक ट्रस्टी, स्वामी वासुदेवानंद सरस्वती जगद्गुरू शंकराचार्य, स्वामी विश्वप्रसन्नतीर्थ पीजावर मठ, उडुपी, युगपुरुष परमानंद गिरी हरिद्वार, महंत दिनेंद्र दास निर्मोही अखाडा, कृष्ण मोहन सदस्य (महासचिव पदासाठी अंतरिम), डॉ. अनिल मिश्रा सदस्य (राजीनामा दिला), विमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा अयोध्या राजघराणा (निधन) हे सदस्य होते. तसेच सरकारी-पदे व सदस्य म्हणून नृपेंद्र मिश्रा (आयएएस) जे निर्माण समिती अध्यक्ष होते. प्रशांत लोखंडे (आयएएस) जे केंद्र सरकार प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. संजय प्रसाद (आयएएस) जे उत्तर प्रदेश सरकारचे प्रतिनिधी होते. शशांक त्रिपाठी (आयएएस) जे अयोध्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते आणि मुख्य चंपत राय (माजी महासचिव) यांचा नुकताच राजीनामा स्वीकारला गेला. कारण सगळा कारभार हा चंपत राय पहात होते आणि त्यांच्या देखरेखीखालीच हा दान निधी घोटाळा झाला. ट्रस्टचे काही मुख्य नियम होते ज्यात कार्यकाल ट्रस्टी आजीवन होते. त्यांना हटवणे क्रमप्राप्त झाल्यास २/३ बहुमताने सदस्य हटवता येते असा नियम केला तोही जर ट्रस्टच्या हिताविरुद्ध वर्तन असेल तरच. दान स्वीकारण्याबाबत नियमावली होती तरीही दान चोरले गेले. शेणात नेऊन, गोठ्यात लपवून रामभक्तांच्या श्रद्धेवर डाका टाकून चोरी केली गेली. आता त्याचं सगळं खापर चंपत राय यांच्यावर फोडण्यात आलं आणि त्यांना बाजूला सारलं गेलं. त्यांच्यावर कारवाई कोणती करणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. चंपत राय यांनी सांगितले की, “मला काहीच माहीत नव्हते”, सर्व जबाबदारी कर्मचाऱ्यांवर (जसे टिन्नू यादव) होती. त्यांनी “मी एकटाच नव्हतो, अनेक लोकांचा सहभाग होता” असे म्हटले. ते म्हणाले, “माझी जबाबदारी होती की कोणतीही गैरव्यवस्था होऊ नये, पण अपेक्षित नव्हते”. अनेक चर्चांमध्ये “चंपत राय यांचा अहंकार वाढला होता” असे म्हटले जाते. राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर त्यांचे वर्तन आणि निर्णय प्रक्रिया अधिक ‘अहंकारी’ झाल्याचे आरोप आहेत. काही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, “अहंकारामुळे त्यांना कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त विश्वास होता” आणि देखरेख कमी पडली. राम मंदिर दान चोरी प्रकरणानंतर ट्रस्टने महासचिव चंपत राय यांचा राजीनामा स्वीकारला. कृष्ण मोहन यांना अंतरिम महासचिव म्हणून जबाबदारी दिली आहे. ट्रस्ट पूर्ण पारदर्शकता बाळगेल आणि सर्व प्रक्रिया कायद्यानुसार चालवली जाईल, असे आश्वासन दिले. दान रक्कम (सुमारे ₹५,९०० कोटी) चे ऑडिट झाले असून, बहुतेक रक्कम बांधकाम किंवा एफडीमध्ये आहे, असा दावा केला. प्रकरण अजूनही सक्रिय आहे आणि एसआयटीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

अब पछताय होत क्या जब चिडिया चुभ गई खेत

राम मंदिरासाठी भक्तांनी श्रद्धेने दिलेलं दान लुटलं गेलं. हा केवळ प्रभू रामाचा अपमान नव्हे तर समस्त कार सेवकांचा, शिवसैनिकांचा आणि राम जन्मभूमी आंदोलकांचा अपमान आहे. ज्या पद्धतीने हे आंदोलन यशस्वी करणाऱ्या साधू महंतना, अडवाणी-बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांना आजच्या भाजपचे ऐतखाऊ नेते विसरले तिथे सामान्य रामभक्तांची मोजदाद कोणाला असणार. राम मंदिर दान लुटलं त्याबाबत भाजपच्या कोणत्याच वरिष्ठ नेत्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

कहा गये वो लोग?

राम मंदिर उद्घाटन कार्यक्रम झाला तेव्हा राम मंदिर आंदोलनातील सर्व तत्कालीन नेत्यांचा आणि साधुसंतांचा उचित सन्मान होईल असे वाटले होते. राम मंदिर आंदोलनाला मनामनात प्रज्वलित करणारे अडवाणीजी, त्यांच्या उत्तर प्रदेशमधील गळ्यातला ताईत विनय कटियार, मुरली मनोहर जोशी, प्रवीण तोगडिया, साध्वी ऋतंभरा, साध्वी उमा भारती आदींनी १९८९ च्या शिलान्यासापासून भावनिक भाषणांद्वारे लाखो तरुणांना प्रेरित केले हे सारे कुठे दिसलेच नाहीत. दिसले फक्त मोदी, मोदी आणि मोदी! या सगळ्यांपैकी काही महत्त्वाच्या सदस्यांना जरी ट्रस्टच्या जबाबदाऱ्या दिल्या असत्या तरी दान घोटाळा झाला नसता. विनय कटियार, संजय जोशी यांसारख्या कट्टर संघ कार्यकर्त्यांना मोदींनी त्यांचे स्पर्धक म्हणून बाजूला सारले. साध्वी ऋतंभरा जिच्या वाणीने राम मंदिर आंदोलन खऱ्या अर्थाने पेटले असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये त्यांना पूर्णपणे विजनवासात टाकले. साध्वी ऋतंभरा यांचे १९९० च्या दशकातील भाषण हे राम जन्मभूमी आंदोलनाचे सगळ्यात भावनिक आवाहन होते. त्यांचे भाषण ऐकून अनेक कारसेवक

अयोध्येकडे धावले. “कहो गर्व से हम हिंदू हैं, हिंदुस्तान हमारा है!” त्यांच्या भाषणात भावनिक तीव्रता असे त्यांचे भाषण रामभक्ती, राष्ट्रप्रेम आणि हिंदू जागृती यांचा अद्भुत मेळ होता. त्यामुळे महिलांसह तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आंदोलनात सामील झाली. त्यांच्या काही भाषणांमुळे त्यांना तुरुंगात जावे लागले. विनय कटियार जे उत्तर प्रदेश भाजपचा प्रमुख चेहरा होते. रामजन्मभूमी आंदोलनातील अडवाणी यांच्या गळ्यातील ताईत जसे प्रमोद महाजन होते तसेच विनय कटियार देखील होते. आज विनय कटियार कुठेही दिसत नाहीत. त्यांना का नाही ट्रस्टी बनवले? कारण ते मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय होते म्हणूनच ना? आज कहा गये वो लोग? हा प्रश्न विचारावा लागतो हेच रामभक्तांचं, राम मंदिर आंदोलनाचं आणि तमाम भाजपच्या संघाच्या कार्यकर्त्यांचं दुर्दैव आहे. त्या गाण्यातील बोल खरेच ठरत आहेत. हंस चुगेगा दाना दुनका, कव्वा मोती खायेगा...!!!

प्रवक्ता आणि जनसंपर्कप्रमुख

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

logo
marathi.freepressjournal.in