परवा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे रशियात अनावरण करण्यात आले. आण्णा भाऊ साठे हे मूळचे सांगली जिल्ह्यातील वाटेगावचे. गावकुसाबाहेरच्या दलित समाजात ते जन्मले. कमालीच्या दारिद्र्यात त्यांचा जन्म झाला असल्याने त्यांनी परिस्थितीचे दारुण चटके सोसले. दीड दिवस शाळेत जाऊन त्यांनी शाळेला रामराम केला. कुटुंबासह ते पायी चालत मुंबईला गेले. तिथं अगदी लहानपणापासून त्यांनी अनेक कष्टाची कामे करून आपली वाटचाल सुरू ठेवली. कामगार वस्तीत वास्तव्य केल्यामुळे त्यांना परिवर्तनवादी विचार जवळचे वाटले. ते साम्यवादी विचाराने प्रभावित झाले. परिणामतः ते हाडाचे कम्युनिस्ट बनले. ते साम्यवाद जगले. श्रमिक, दलित, शोषित यांची दुखणी त्यांनी अनुभवली. त्यांच्यातला विचारवंत जागृत झाला. ते हळूहळू लिहायला वाचायला शिकले. अनुभवलेली दुखणी शब्दबद्ध करायला लागले. ते शायऱ्या करायला लागले. पोवाडे लिहायला व म्हणायला लागले. छक्कड लिहून सादर करायला लागले.
त्यांचा प्रवास लोकशाहीर बनण्यापर्यंत पोहोचला. त्यानी कथा लिहिल्या. कादंबऱ्या लिहिल्या. त्यावर अनेक चित्रपट निघाले. त्यांनी अल्पावधीत इतके प्रचंड लिखाण केले की, त्यांना समाजाने साहित्यरत्न किताबाने सन्मानित केले. त्यांच्या लिखाणात कल्पनाविलास कधीच नव्हता. त्यांचं लिखाण वास्तववादी होतं. समाजात असलेलं आणि त्यांनी भोगलेलं दुःख त्यांच्या साहित्यात उमटलं आहे. त्यांच्या लिखाणातील नायक हे दलित आणि शोषित समाजाचं प्रतिनिधित्व करत होते. त्यांनी मराठी साहित्यात श्रमिकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. तसे ते श्रम साहित्यिक होते. त्यांची कैक पुस्तके महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली गेली. अनेक विचारवंतानी त्यांच्या साहित्यावर संशोधन केले. दीड दिवस शाळेत गेलेला हा माणूस साहित्यरत्न बनला. प्रस्थापित मंडळींनी मात्र अण्णाभाऊ साठेंना कधीही स्वीकारले नाही. त्याचे कारणही महत्त्वाचे आहे. अण्णाभाऊंनी कधीही कोणत्याही भाकडकथेवर विश्वास ठेवला नाही. ज्या मंडळींची गुजराणच अज्ञान, अंधश्रद्धा आणि भाकडकथेवर अवलंबून होती व आहे, त्या मंडळींनी अण्णाभाऊंचा कायम दुस्वास केला. ते स्वाभाविक होते व आहे. त्यांच्या रोजगार हमीवर अण्णाभाऊंनी आघात केले आहेत. जग हे शेषनागाच्या फण्यावर म्हणजे डोक्यावर उभे आहे. पृथ्वी शेषनागाच्या डोईवर तरलेली आहे, अशी जी एक भाकडकथा सांगून अभिजनांनी आपले पोट भरले आणि बहुजनांना गंडविले, त्या भाकडकथेवर अण्णाभाऊ साठे यांनी आघात केला. त्यांनी ओरडून सांगितले की, पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर तरलेली नसून ती दलित व श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. हे वास्तव मांडून त्यांनी प्रस्थापित मंडळींना जोराचा झटका दिला. त्यामुळे ते बिथरले. अण्णाभाऊ साठेंना त्यांनी कधीही साहित्यिक म्हणून स्वीकारले नाही. त्यांचा दुस्वास केला. अण्णाभाऊंच्या साहित्यावर पीएचडी करणाऱ्या संशोधकाना पहिल्यांदा ते साहित्यिक होते. हे शाबित करण्यासाठी उठाबशा काढाव्या लागत होत्या. कारण अण्णाभाऊंनी प्रस्थापितांना नाकारले होते. ते केवळ नाकारून थांबले नाहीत, तर त्यांच्या भाकडकथांचे बिंग फोडले. त्यांचा भांडाफोड केला. दलित, श्रमिकांची जबरदस्तपणे बाजू मांडली. म्हणूनच प्रस्थापित साहित्यिकांनी त्यांना नाकारले. अण्णाभाऊ साठे एक तर कम्युनिस्ट, त्यात दलित आणि त्याही पुढं जाऊन प्रस्थापिताविरुद्ध विद्रोह करणारे साहित्यिक. चाकोरी बाहेरील माणूस. म्हणून अभिजनांचा त्यांच्यावर राग. त्यांनी आपल्या गावाकडं राहणाऱ्या मैनेवर लावणी लिहिली. विदारक विषमता दाखवणारी मुबंईची लावणी लिहिली. श्रमिकांची दुःखे वेशीवर टांगणारा हा मुलखावेगळा लेखक. जिथं श्रमाची प्रतिष्ठा जपली जात होती, त्या रशियाला अण्णाभाऊंनी भेट दिली होती. रशिया बघून ते भारावून गेले होते. त्यांनी मग चक्क लेनिनग्राडचा पोवाडा लिहिला.
श्रमिकांची ख्याती सगळ्या जगाला सांगितली. त्यांच्या रशिया भेटीनं त्यांनी अनेक घटकांची मने जिंकली. आता तर रशियात त्यांचा पुतळा उभारला. त्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हजेरी लावली. सहस्रबुद्धे नामक एका भल्या माणसाने आण्णा भाऊंच्यावर व त्यांच्या साहित्यावर संशोधन करणारासाठी शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली. फडणवीस यांनी अण्णाभाऊंचे तोंड भरून कौतुक केले. माध्यमांनी त्यास बऱ्यापैकी प्रसिद्धी दिली. आपल्या केंद्र व राज्य सरकारची हीच तर खरी कसरत आहे. आपले विश्वगुरू नरेंद्र मोदी भारतात असतात, त्यावेळी गांधी-नेहरूंना सतत दोष देत असतात. त्यांची अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिंगलटवाळी करतात. त्यांच्या विषयीचा द्वेष पसरविण्यासाठी त्यांचा आटापिटा चालू असतो. देशात हिंदुत्वाचा डंका पिटला जातो. तेच विश्वगुरू भारताच्या सीमा ओलांडून जगात जातात, तिथं मात्र गांधी-नेहरूंचं गुणगान गातात. त्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. भारताबाहेर ते हिंदुत्वावर चकार शब्द काढत नाहीत. कारण तिथं फक्त गौतम बुद्धच चालतो. गांधी, नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध याना ते जुलमाचा रामराम करतात. तीच परिस्थिती फडणवीस यांची झाली. त्यांनाही अण्णाभाऊ साठे यांचं नाईलाजाने कौतुक करावे लागले. त्यांनीही मग अण्णाभाऊंना जुलमाचा रामराम केला.