राष्ट्र बागेत सर्व फुले फुलोत!

बागेमध्ये एक फूल फुलले तर बाग सुंदर कशी दिसेल? तिला बाग तरी म्हणता येईल काय? सर्व फुले फुलली तर ती खरी मोहक बाग. राष्ट्र बागेची गत तशीच. तीत सर्व फुले फुलली तर सर्वांचा फायदा. म्हणून राष्ट्र बागेत सर्व फुले फुलोत यासाठी राष्ट्र सेवा दल कार्यरत आहे.
राष्ट्र बागेत सर्व फुले फुलोत!
Published on

विशेष

राजा कांदळकर

बागेमध्ये एक फूल फुलले तर बाग सुंदर कशी दिसेल? तिला बाग तरी म्हणता येईल काय? सर्व फुले फुलली तर ती खरी मोहक बाग. राष्ट्र बागेची गत तशीच. तीत सर्व फुले फुलली तर सर्वांचा फायदा. म्हणून राष्ट्र बागेत सर्व फुले फुलोत यासाठी राष्ट्र सेवा दल कार्यरत आहे.

येत्या ४ जून २०२६ रोजी राष्ट्र सेवा दलाचा पुण्यात पुनर्गठन दिन मेळावा होत आहे. त्यात साने गुरुजी समता पुरस्कार आणि साने गुरुजी जीवन गौरव सन्मान प्रदान करण्यात येणार आहेत. डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर, कार्याध्यक्ष, बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया यांना साने गुरुजी समता पुरस्काराने गौरविण्यात येईल. तसेच, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या मार्गदर्शक डॉ. शैलाताई नरेंद्र दाभोलकर, समाजवादी नेत्या साजेदाताई निहाल अहमद, माजी आमदार आणि जयहिंद सामाजिक, सांस्कृतिक चळवळीचे संस्थापक डॉ. सुधीर भास्करराव तांबे, माजी आमदार व शिक्षण-सहकार चळवळीतील नेते शिरीष मधुकरराव चौधरी आणि समाजवादी कामगार नेते ॲड. सुरेश ठाकूर यांना साने गुरुजी जीवन गौरव सन्मान देऊन सन्मानित करण्यात येईल.

राष्ट्र सेवा दलाचे प्रेरणास्थान साने गुरुजींच्या मृत्यूला ७५ वर्षांहून अधिक काळ झाला. महाराष्ट्रात आजही गुरुजी लोकप्रिय आहेत. अनेकांना ते आजही आपल्या घरातला माणूस वाटतात. कोकण ते विदर्भ गुरुजींची लोकप्रियता सतत नव्याने अनुभवता येते. आज महाराष्ट्राच्या कोणत्याही गावात जा. शिक्षण मंत्र्यांचे नाव कुणाला सांगता येत नाही. 'साने गुरुजी' हे नाव मात्र सगळे सांगतील. 'श्यामची आई' हे पुस्तक माहीत नाही असा माणूस महाराष्ट्रात सापडत नाही. गुरुजी शिक्षक होते म्हणून त्या क्षेत्राला स्वातंत्र्यानंतर उंची आली. महाराष्ट्रात एक अख्खी पिढी शिक्षक झाली, ज्यात अनेक प्रतिभावंत होते. गुरुजी फकिरी व्यक्तिमत्त्व होते. साने गुरुजींचे इतके टोकाचे आकर्षण महाराष्ट्राला असण्याचे मुख्य कारण त्यांच्या निरागस आणि लहान मूल असण्यात होते. आपण मोठे होत असताना आपल्यातले लहान मूल मरून जाते. साने गुरुजी वयाच्या ५१ व्या वर्षी, आजोबा होण्याच्या वयातही मनाने लहान राहिले. त्यांच्यातली निरागसता, कोमलता आणि संवेदनशीलता तशीच राहिली. काळाच्या कठोर नृशंस नियमाला त्यांच्या भावविश्वावर ओरखडाही ओढता आला नाही.

साने गुरुजींनी अनेक क्षेत्रात काम केल्याने ते आज प्रत्येक क्षेत्रात जिवंत होतात. ते शिक्षक होते, मुलांना गोष्ट सांगणारे होते, पालकांना 'श्यामची आई' सांगणारे होते, स्वातंत्र्यसैनिक होते, शेतकरी-कामगारांसाठी लढणारे होते, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी मुक्त करणारे सत्याग्रही होते, लेखक, कवी, पत्रकार, संपादक होते आणि 'आन्तर भारती' जिवंत करणारे द्रष्टे होते. त्यामुळे या सर्व क्षेत्रात त्यांचे प्रेरक म्हणून असणे त्यांना अधिकच जिवंत करत राहते. हा गुरुजींचा वारसा राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते पुढे घेऊन जात आहेत.

मासिक 'कर्तव्य'च्या पहिल्या संपादकीयात साने गुरुजींनी लिहिले होते की, आपण सारेच एका अर्थी महात्मा गांधीजींचे मारेकरी आहोत. माझ्यामध्ये जातीयतेचे लेशभरही विष नाही, असे किती जणांना म्हणता येईल? महात्माजींच्या पूज्य स्मृतीस स्मरून हे 'कर्तव्य' दैनिक या विचारांचा अखंड पाऊस पाडील. जातीय वृत्ती नष्ट करणे आणि लोकशाही समाजवाद आणणे, ही दोन ध्येये माझ्या समोर आहेत.

राष्ट्र सेवा दल सैनिकांशी हितगुज करताना गुरुजी म्हणत की, 'लोकशाही समाजवाद' हा विचार सतत तेवत ठेवा. मानवधर्माचे आधुनिक तत्त्वज्ञान महाराष्ट्राला गुरुजींनी शिकविले. हा जीवनमंत्र राष्ट्र सेवा दलाने निष्ठापूर्वक स्वीकारला आहे. साधना साप्ताहिकात गुरुजी जे काही लिहीत असत, ते खास युवकांसाठी म्हणजेच दल सैनिकांसाठीच असे. साधनेचे खास आवाहन गुरुजींच्या आवडत्या सेवा दलाच्या शाळेतील कुमार-कुमारिकांनाच होते. राष्ट्र सेवा दल हे एक विद्यालय आहे, असे गुरुजी मानीत असत. म्हणूनच त्यांचा सेवा दलावर एवढा जीव होता.

पक्षीण अंतराळात कितीही उंच गेली तरी तिला घरट्यातील पिलांचे जसे विस्मरण होत नाही, तसे गुरुजी कोणत्याही क्रांतिकारी कार्यात मग्न असले तरी त्यांना सेवा दलाचे क्षणभरही विस्मरण होत नसे. त्यांनी लिहिलेली सुंदर पत्रे, गोड निबंध, गोड गोष्टी, कादंबऱ्या या सर्वांचा उगम गुरुजींच्या अंतःकरणातील वात्सल्यातून झाला आहे. राष्ट्रातील तरुण पिढी निकोप, बलशाली, बुद्धिवान, ध्येयवादी व चारित्र्यसंपन्न व्हावी अशी त्यांची तळमळ होती, म्हणूनच त्यांच्या लिखाणाचे आवाहन राष्ट्रातील तरुणांना होते. आपण त्यांना गुरुजी म्हणतो तेव्हा ते आमची 'माऊली' होते हीच भावना व्यक्त होते.

राष्ट्र सेवा दलाची घडण घडविण्यात साने गुरुजींचा फार मोठा भाग होता, हे आज सर्वजण कृतज्ञतेने व अभिमानाने मान्य करतात. १९२० सालापासून १९४८ पर्यंत काँग्रेस ही जशी महात्मा गांधींची समजली जाई, तशीच छाप सेवा दलावर साने गुरुजींची होती. राजाश्रय म्हणजे सरकार किंवा अन्य कोणत्यातरी समृद्ध शक्तीचा आसरा राष्ट्र सेवा दलाला कधीच न लाभल्यामुळे ही संघटना नेहमीच स्वावलंबी व ध्येयनिष्ठ राहिली आहे. आजही राष्ट्र सेवा दलातील प्रमुख कार्यकर्ते निष्ठेने हे कार्य चालवीत आले, ती निष्ठा दुर्मिळ आहे. समाजवादी नेते एस्. एम्. जोशी हे सेवा दलाचे मुख्य स्फूर्तिस्थान होते. समाजवादी पक्ष ही आमची राजकीय आघाडी आहे. समाजवाद आणण्यासाठी आम्ही समाजवादी पक्षात जाऊ असे राष्ट्र सेवा दलाने तेव्हा स्पष्टपणे सांगितले होते. सेवा दल हे एक विद्यालय असून सामूहिक शरीरश्रम सेवापथक, कलापथक, भूदानपथक, दलशाखा आणि अभ्यास मंडळ हे सर्व शिक्षणक्रमांतील भिन्न-भिन्न धडे आहेत. भारताच्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळात डॉ. ना. सु. हार्डिकरांनी प्रथम सेवा दलाची कल्पना मांडली. जेव्हा जातीयवादी हिंदू राष्ट्रवादाचे वारे शहरांतील तरुणांना आकर्षित करू लागले, तेव्हा तरुणांना हिंसक जातीयवादाचे हिडीस स्वरूप विशद करून अहिंसक लोकशाही राष्ट्रवादाची दीक्षा देण्यासाठी व आर्थिक, सामाजिक समतेची आवश्यकता प्रतिपादन करण्यासाठी राष्ट्र सेवा दलाचे पुनर्गठन झाले.

अस्पृश्यता निवारण, सर्वधर्मसमभाव, लोकशाही समाजवाद, बंधुता आणि अहिंसा ही सेवा दलाची मुख्य तत्त्वे आहेत. राष्ट्र सेवा दलाने कलापथक स्थापन करून ग्रामीण जनतेचे प्रबोधन केले. स्वातंत्र्योत्तर काळात सेवा दलापुढे अनेक आर्थिक आणि संघटनात्मक प्रश्न उभे असले, तरी 'लोकशाही समाजवाद' ही एक राजकीय घोषणा नसून ती एक जीवनसाधना आहे, हे विसरून चालणार नाही. राष्ट्र सेवा दलाच्या जन्माच्या वेळी जी परिस्थिती देशात होती, तशीच काहीशी स्थिती आज पुन्हा दिसून येत आहे. एका बाजूला माणसांच्या मनांना घोर निराशेने घेरलेले आहे, तर दुसऱ्या बाजूला तरुणांची मने आणि बाहू फुरफुरत आहेत. अशा वेळी, वाया जाणाऱ्या शक्तीचा सुबुद्ध, विधायक विनियोग करणाऱ्या संघटनांची नितांत आवश्यकता आहे. नवी पिढी हाती धरून तिला संस्कारसंपन्न करण्याची वाट लांबची वाटली, तरी तीच सर्वात जवळची ठरणार आहे. देशातील कोट्यवधी मुले आणि तरुण आज योग्य संघटनेअभावी भरकटत असताना सेवा दलाची कधी नव्हे एवढी आज गरज आहे. डॉ. गणेश देवी अध्यक्ष झाल्यानंतर राष्ट्र सेवा दलाचा देशात नव्याने विस्तार झाला. गुजरात, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानसह उत्तर पूर्व भारतात सेवा दल वाढले.

या भागांत सेवा दलाचे लोण पोहोचले असून लोकशाही, समाजवाद आणि विज्ञाननिष्ठा या खांबांवर नवभारताची भव्य इमारत उभी करू पाहणारी ही संघटना सर्वांना हवीहवीशी वाटू लागली आहे. साने गुरुजींनी आंतरभारतीचे जे स्वप्न रंगवले होते, त्याची जोपासना करत राष्ट्र सेवा दलाला भारतीय सीमा गाठायच्या आहेत. साने गुरुजींनी आपल्या अखेरच्या पत्रात सेवा दलाच्या सैनिकांना दिलेला संदेश आणि आश्वासन हाच सेवा दलाचा खरा वारसा आहे. त्या पत्रात गुरुजी म्हणतात, 'लोकशाही समाजवाद हे ध्येय धरा, ते तारील' आणि 'मी मनाने तुमच्यात राहीन.'

हिंदूओं का हिंदुस्थान अशी संकुचित देशाच्या परंपरेस न शोभणारी घोषणा दुसरे करत आहेत. सेवा दल सर्वांना जवळ घेत सब धर्मों का हिंदुस्थान अशी घोषणा करणारे आहे. संघ वाढतो, सेवा दल का वाढत नाही? असे सोलापूरच्या एका मुलाचे गुरुजींना पत्र आले. गुरुजी त्या मुलाला पत्रात म्हणाले, द्वेषावर उभारलेल्या संघटना पटकन वाढतात. जगाला प्रेम अर्पावे हा विचार मोठा. बागेमध्ये एक फूल फुलले तर बाग सुंदर कशी दिसेल? तिला बाग तरी म्हणता येईल काय? सर्व फुले फुलली तर ती खरी मोहक बाग. राष्ट्र बागेची गत तशीच. तीत सर्व फुले फुलली तर सर्वांचा फायदा. म्हणून राष्ट्र बागेत सर्व फुले फुलोत यासाठी राष्ट्र सेवा दल कार्यरत आहे.

राज्य अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र.

rajakandalkar.blogspot.in

logo
marathi.freepressjournal.in