
शिक्षणनामा
सुरेखा खरे
भारताच्या जडणघडणीच्या इतिहासात महात्मा गांधी यांचा मोठा वाटा आहे. महात्मा गांधी यांनी त्यांच्या जीवन काळात असंख्य पुस्तके वाचली. अहिंसेची आणि असहकाराची तत्त्वे त्यांनी वाचलेल्या लेखकांच्या विचारांतून, पुस्तकांतून स्वीकारली. त्यांच्या वैचारिक जडणघडणीवर आणि जीवनशैलीवर प्रभाव टाकणाऱ्या पुस्तकांचा थोडक्यात मागोवा या लेखात घेतला आहे.
महात्मा गांधी यांनी अनेक पुस्तके वाचली. त्यामध्ये सेलचे 'कुराण', एडवर्ड मेटलंड यांचे 'परफेक्ट वे' 'बायबलचा नवा अर्थ' या पुस्तकातून त्यांच्या हिंदू मताला पुष्टी मिळाली, असे ते त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात. तसेच पंचीकरण, मणीरत्नमाला, योगवासिष्टांचे मुमुक्षु प्रकरण, हरीभद्र सुरींचे ‘षड्दर्शनसमुच्चय‘ इत्यादी पुस्तके मी वाचली. त्यामुळे माझ्यामध्ये धर्मजिज्ञासा जागृत झाली. नर्मदाशंकरांचे ‘धर्मविचार’ या पुस्तकाबद्दल मला आदर वाटू लागला, मी ते पुस्तक लक्षपूर्वक वाचले, तर मॅक्समुलरचे ‘हिंदुस्थान काय शिकवतो’ हे पुस्तक मी मोठ्या आवडीने वाचले. थिओसोफिकल सोसायटीने प्रसिद्ध केलेले उपनिषदांचे भाषांतर वाचल्यामुळे माझा हिंदू धर्माबद्दलचा आदर वाढला. पण म्हणून इतर धर्माबद्दल तिरस्कार मात्र वाटला नाही. 'वाशिंग्टन आयविगकृत', महंमदचरित्र आणि कार्लाईलची 'महंमदप्रशिस्ती' मी वाचली आणि पैगंबराबद्दल माझी आदरबुद्धी दुणावली. ‘जरर्तृष्टची वचने’ नावाचे पुस्तकही मी वाचले, असे महात्मा गांधी म्हणतात.
१८८८-८९ साली गीता वाचत असताना, गीता अगर महाभारत ही ऐतिहासिककथा नसून, ते एक रूपक आहे, असे त्यांचे मत झाले. गीतेच्या तत्वज्ञानाने देखील प्रभावित झाले होते. युद्धभूमी म्हणजे माणसाचे मन तिथे उच्च व दुष्ट विचारसरणी, सत-असत प्रवृत्ती झगड्याचे अर्जुनाच्या रूपाने दर्शन घडले, असे प्रतिपादन म. गांधी करतात. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी जुना करार आणि नवा करार वाचला होता. त्यापैकी नवा करार त्यांना आवडला होता, तर येशू ख्रिस्ताची गिरी प्रवचने मात्र थेट त्यांच्या हृदयाला भिडली होती. गीता व नव्या करारात त्यांना खूप साम्य आढळले होते. मादाम एच.पी.ब्लावत्स्की व मिसेस अनी बेझंटनी ब्रह्मविद्येवर लिहिलेल्या वाङ्मयाचा त्यांनी अभ्यास केला. त्यातील सर्वसंग- परीत्यागाचे तत्त्वज्ञान त्यांना खूप भावले होते.
म. गांधी यांचे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड येथे अनेक वर्ष वास्तव्य होते. १८९३ साली एका बोहरी व्यापाऱ्याचा खटला चालविण्यासाठी ते दक्षिण आफ्रिकेत गेले व तेथेच सुमारे वीस वर्ष राहिले. दक्षिण आफ्रिकेत असताना जॉन रस्कीन, हेन्री डेव्हिड थोरो, लिओ टॉल्स्टॉय या तीन पाश्च्यात्य विचारवंतांच्या ग्रंथांचा महात्मा गांधी यांच्या मनावर विलक्षण प्रभाव पडला. जॉन रस्किन यांनी गरिबांचे शोषण करून श्रीमंत होण्यात कसलेही पाप नाही या वृत्तीला छेद दिला आणि नैतिकतेतून सर्व समाजाचे कल्याण होईल. तसेच समाजातील सर्वांचे कल्याण ते आपले कल्याण, समाजातील सर्वच श्रमिकांचा दर्जा सारखा मनाला पाहिजे आणि साधे शेतकऱ्यांचे शरीरश्रमाचे जीवन हेच खरे जीवन हा विचार ‘अनटू धिस लास्ट’ या पुस्तकातून दिला आणि महात्मा गांधी यांना ते विचार विशेष आवडले. रस्किन यांना भांडवलशाही समाज कुरूप वाटला तर म. गांधी यांनाही तो असत्य वाटला.
हेन्री डेव्हिड थोरो, अमेरिकेतील लेखक, तत्वज्ञ आणि कवी अतिशय साध जीवन जगणारा एक निसर्गप्रेमी होता. अमेरिकेतील गुलामगिरीच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला. ज्या राष्ट्रात गुलामांचा व्यापार चालतो, त्या सरकारला कर देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्या भूमिकेमुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला आणि याच अन्यायाविरोधात त्यांनी सविनय कायदेभंगाचा लेख देखील लिहिला होता. थोरोच्या ‘ड्युटी ऑफ सिविल डिसओबीडियन्स’ (१८४९) या ग्रंथामुळे महात्मा गांधी यांची असहकार विषयक मते पक्की झाली. ‘दक्षिण आफ्रिकेत आपण सत्याग्रहाचे जे कार्य सुरू केले. त्याला थोरोच्या निबंधामुळे शास्त्रीय दृढता प्राप्त झाली, असे ऋण गांधी यांनी मान्य केले आहे.
थोरो हे मॅसेच्युसेट्स प्रांतातील कॉनकॉर्ड येथे वॉल्डन नावाच्या तलावाजवळच्या केबिनमध्ये दोन वर्ष आत्मनिर्भरता, साधेपणा आणि निसर्गाचे सौंदर्य शोधत, भौतिकवादापासून एकांतात राहिले, वॉल्डन (१८५४)हे पुस्तक त्यांच्या या जाणूनबुजून जगलेल्या जीवनावर प्रकाश टाकते. या पुस्तकामध्ये त्यांनी निसर्गाशी नाते जोडले आहे. महात्मा गांधी यांनी गावखेड्याच्या सक्षमीकरणासाठी खेड्याकडे चला अशी दिलेली हाक, भारतातील गरीब लोकांसाठी आणित्या लोकांबरोबर काम करताना त्यांच्यापेक्षा वेगळे कपडे घातले, तर त्यांच्याशी आपण एकरूप होणार नाही, म्हणून मदुराईमध्ये सूट- बूट सोडून धोतर घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यामागची प्रेरणा आपल्याला हेन्री डेविड थोरो यांच्या, वॉल्डन, पुस्तकातील 'अर्थव्यवस्था' या लेखात दिसते.
तसेच महात्मा गांधी यांनी ॲडॉल्फ जस्ट यांचे ‘रिटर्न टू नेचर’ हे पुस्तक वाचले आणि हे पुस्तक नैसर्गिक जीवनशैलीकडे परत जाण्याचे महत्त्व समजवून देते, त्या पुस्तकाचा देखील त्यांच्या जीवनशैलीवर परिणाम झालेला महात्मा गांधी यांनी सांगितले आहे. या पुस्तकामुळे महात्मा गांधी यांनी नैसर्गिक जीवन पद्धती स्वीकारली असली पाहिजे असे दिसते. पुढे ते असेही म्हणतात की, 'जे कोणी हे पुस्तक वाचतील, त्याने सर्व काही वेदवाक्य मानू नये. सर्व लेखांमध्ये लेखकाची एकांगी दृष्टी बहुधा असतेच.' यावरून महात्मा गांधी हे निसर्गोपचार पद्धतीकडे वळलेले दिसतात.
टॉल्स्टॉयच्या ‘द किंग्डम ऑफ गॉड इज विदीन यु' (१८९४, रशिया) या पुस्तकाने मला पछाडले. त्या पुस्तकाची माझ्यावर खोल छाप पडली. या पुस्तकाची स्वतंत्र विचारशैली, त्यातील प्रौढ नीती, त्यातील सत्य मला आवडले. त्यामुळे माझे अहिंसेची श्रद्धा अधिक दृढ झाली. तसेच आपल्याला विश्वबंधुत्वाचे दर्शन झाले, श्रमाचे महत्व कळले. त्यांच्या जीवन दर्शनाने मला स्फूर्ती मिळाली, असे म. गांधी यांनी म्हटले आहे.
१२ मार्च १९३० रोजी ७८ निवडक अनुयायीय त्यात सरोजिनी नायडू, इला भट यांना घेऊन त्यांनी साबरमती आश्रम सोडला. दांडी येथे मिठाच्या सत्याग्रहाची घोषणा केली. गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला, तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवातच ठरली. सत्याग्रह आणि संप महात्मा गांधी यांनी केले. त्यामागील अहिंसेची आणि असहकार ही तत्वे त्यांनी थोरो, टॉल्स्टॉय यांच्या विचारातून स्वीकारली आहेत. जॉन रस्किन यांच्या अन टू धिस लास्ट (१८६०) या पुस्तकाने ‘समाजातील सर्वांचे कल्याण ते आपले कल्याण, समाजातील सर्वच श्रमिकांचा दर्जा सारखा मनाला पाहिजे आणि साधे शेतकऱ्यांचे शरीरश्रमाचे जीवन हेच खरे जीवन' या विचाराने ते खूपच प्रभावित झाले आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत साधे जीवन जगले. गांधींचे छोटे धोतर आणि शॉल हे सत्याग्रहाचे प्रतीक बनले. गांधींच्या मते, आपण जसे आत असू तसेच बाहेर दिसावे, आणि त्याप्रमाणे वागावे, ही धर्माचरणाची शेवटची पायरी नसून पहिली पायरी आहे. या पायाखेरीज धर्माची इमारत उभी होणे अशक्य आहे. महात्मा गांधी आणि सर्व धर्माचा अभ्यास केला होता. सर्व धर्मांनी नैतिकतेचा आग्रह धरलेला आहे. गांधीचा विचार हा आपल्याला सर्व धर्मसमभावाकडे गेलेला दिसतो. म्हणूनच गांधी हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी म्हणतात, 'ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान'
लेखिका अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेच्या, २५ टक्के आरक्षण पालक संघाच्या अध्यक्ष आहेत.