अदिन्नादाना वेरमणी

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त खर्च होणाऱ्या निधीमागील हेतू, संविधानविरोधी विचारांचे प्रतीकात्मक उदो-उदो आणि ‘दान स्वीकारू नका’ या बुद्धवचनाच्या पार्श्वभूमीवर या लेखात सखोल चिंतन आहे. अवतीभवती घडणारे राजकारण पाहता न जाणो बुद्ध वंदनेतील ‘अदिन्नादाना वेरमणी’ या ओळीप्रमाणे आपला कार्यानाश होऊ नये समता, बंधुता, स्वातंत्र्य हे लोकशाहीचे तत्त्वज्ञान विस्कटू नये, असे वाटते.
अदिन्नादाना वेरमणी
Published on

भवताल

ॲड. वर्षा देशपांडे

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त खर्च होणाऱ्या निधीमागील हेतू, संविधानविरोधी विचारांचे प्रतीकात्मक उदो-उदो आणि ‘दान स्वीकारू नका’ या बुद्धवचनाच्या पार्श्वभूमीवर या लेखात सखोल चिंतन आहे. अवतीभवती घडणारे राजकारण पाहता न जाणो बुद्ध वंदनेतील ‘अदिन्नादाना वेरमणी’ या ओळीप्रमाणे आपला कार्यानाश होऊ नये समता, बंधुता, स्वातंत्र्य हे लोकशाहीचे तत्त्वज्ञान विस्कटू नये, असे वाटते.

मी सातवीत असताना आम्हाला बेळगाव जिल्ह्यामध्ये, कर्नाटक हद्दीतील मराठी शाळेत ‘पाप के चार हातियार’ नावाचा धडा होता. या धड्यामध्ये पुण्य म्हणजे चांगला विचार आणि पाप म्हणजे दुष्ट विचार, मानवविरोधी विचार. या धड्यामध्ये लेखक म्हणतात, पुण्य म्हणजे सुधारक आणि महात्म्यांचा विजय. त्यांच्या विचारांकडे लक्ष देणे आणि त्यांच्या विचारानुसार कृती करून समाधान शोधणे हे महत्त्वाचे आहे. त्यांची स्मारके आणि मंदिर बनवणे नाही. जगामध्ये सगळीकडे अन्याय अत्याचार, दुष्ट विचार आहेतच. त्या विरोधात संत, महात्मा, पैगंबर, सुधारक हे त्यापासून कशी मुक्ती मिळवता येईल, हे सांगत असतात. ते जिवंत असताना त्यांची अवहेलना केली जाते, त्यांचा प्रचंड मानसिक शारीरिक छळ केला जातो. त्यांचे ऐकणारे, त्यांना पाठबळ देणारे, त्यांच्या चळवळीत सहभागी होणार नाहीत, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. त्याउपरही जेव्हा आपल्या तत्त्वानुसार नैतिक मार्गाने शांतपणे सुधारक व्यक्ती बोलत राहते, सांगत राहते, चळवळ करत राहते. त्यावेळी जिवंतपणे त्यांची निंदा केली जाते. बदनामी केली जाते. चारित्र्यहनन केले जाते. त्याउपरही ती व्यक्ती शांत राहत नाही, माघार घेत नाही अशावेळी या प्रतिगामी, अन्यायी, अत्याचारी लोकांची झुंड त्यांची ‘जान की दुश्मन’ बनतात आणि कित्येकदा त्यांचा अनैसर्गिक मृत्यू झालेला पहायला मिळतो. त्यांच्या मृत्यूपश्चात जेव्हा लोक त्यांच्या विचाराने संघटित राहतात, काम करतात, अधिकाधिक लिहू बोलू लागतात, त्या वेळेला मोठ्या प्रमाणावर त्यांचा उदो-उदो केला जातो. जय-जयकार केला जातो आणि ते कसे एकमेव अद्वितीय होते, देव होते हे सांगितले जाते आणि त्यांची स्मारके आणि मंदिरे उभारली जातात. त्यांचा विचार जिंकणार नाही, लोक त्यांचे विचार पाळणार नाहीत, तुम्ही त्यांचे भक्त व्हा, तुम्ही त्यांच्यासारखे वागू शकत नाही, ती देवमाणसे होती, असे सांगितले जाते.

ही गोष्ट आपण आत्ताच चर्चेला का घेतोय? कारण नुकतीच आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी केली. जे लोक संविधान संपवायला निघाले आहेत. संविधानाने अस्तित्वात आलेल्या संस्था उकडून टाकायला निघाले आहेत. ज्यांनी ग्रामपंचायतीसह लोकशाहीचा पाया खिळखिळा केला आहे. त्याच लोकांनी रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचा उदो केला. तेच लोक आज बाबासाहेबांचे मोठे स्मारक उभारण्याचे आणि त्यांच्या अनुयायांना जयंतीसाठी निधी देत आहेत. बाबासाहेबांनी आम्हाला समता, बंधुता आणि लोकशाहीचा विचार सांगणारी आणि कृतीत उतरवण्याची ताकद देणारे संविधान दिले. त्या बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांना सुरुंग लावणारे जातीधर्मावर आधारित देशातील वातावरण विस्कटून टाकणाऱ्या लोकांनी बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट त्यांच्या अनुयायात का केली असेल? याचे उत्तर कन्हैयालाल मिश्र उर्फ प्रभाकर यांच्या ‘पाप के चार हातियार’ या उद्बोधन कथेत आहे. बाबासाहेब जिवंत असताना, त्यांची संघटन चळवळ बांधणी सुरू असताना हिंदू धर्म सुधारणेस त्यांनी पुरेसा अवधी दिलेला असताना ज्या धर्माने जात, वर्ण व्यवस्थेत बदल करण्यासाठी कोणताही पुढाकार घेतला नाही, संविधानाला त्यांनी नेहमीच विरोध केला, स्वातंत्र्याच्या चळवळीला किंवा बाबासाहेबांच्या चळवळीत ज्यांनी कधी सहभाग दिला नाही किंबहुना महाडच्या चवदार तळ्याचे आंदोलन असो, की गोदातीरी राम मंदिर प्रवेशाचे आंदोलन असो, या दोन्ही महत्त्वाच्या आंदोलनाच्या विरोधात जी मंडळी तेव्हा उभी होती. त्याच विचाराची मंडळी आज बाबासाहेबांची जयंती साजरी करताना, त्यांचा उदो-उदो करताना दिसत आहेत.

जे जातीचे तुष्टीकरण करणारे समरसता मंच चालवितात, ज्यांना समानता मान्य नाही, खालच्या जातीतील समूहांना आपल्यात समरस करून घेण्याचे ते नाटक करत आहेत. आज त्यांची ती राजकीय गरज आहे. जिवंतपणी त्यांनी डॉ. बाबासाहेब यांचा मानसिक छळ केला आहे. त्यामुळे अतिशय संवेदनशील, भावनिक आणि धार्मिक वृत्तीच्या बाबासाहेबांना मधुमेहासारखा गंभीर आजार जडला. ज्यामुळे अकाली मानसिक ताणामुळे, मधुमेहामुळे त्यांचा मृत्यू झाला. बाबासाहेबांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी शिवाजी महाराजांच्या, रायगडाच्या साक्षीने आणि ख्रिस्ताच्या जन्मदिनी मनुस्मृती पेटवून मानव मुक्तीचा एल्गार पुकारला आणि त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे आणि आजही जे मनुस्मृतीचा हवाला देत राजकारण करत आहेत, त्या विचारांची मंडळी बाबासाहेबांच्या जयंतीला का इन्व्हेस्ट करत आहेत? त्यांचे स्मारक का उभारत आहेत? यावर आंबेडकरी जनतेने सखोल विचार करण्याची वेळ आली आहे. महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीचा वारसा आणि अहिंसेचा विचार जपणारे, संविधानाचे शस्त्र करून सनदशीर मार्गाने संघटित होऊ पाहत असलेल्या भारतीयांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्यातच शिरून हे लांडगे आमच्या विचारांचा कळप खाऊन टाकतील. लवकरच बाबासाहेबांचे मोठे मंदिर उभारतील, स्मारक उभारतील. बाबासाहेबांच्या विचारांना जिवंतपणे आणि मृत्यूपश्चात आजतागायत त्यांच्या विचाराला, संविधानाला आणि संविधानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संस्था, संघटनांना सुरुंग लावणाऱ्या विचारांचे विरोधक स्मारक उभारणीस हजर राहतील, स्मारकाच्या उद्घाटनाला हजर राहतील आणि इथल्या जीएसटी भरणाऱ्या जनसामान्यांच्या खिशातील पैसे त्या स्मारकाला खर्च होतील आणि बाबासाहेब देव होते, असे म्हणत बाबासाहेबांचा विचार संपवायला हातभार लावतील.

यावर्षी जिवंतपणे बाबासाहेब, अण्णाभाऊ साठे यांना विरोध करणाऱ्या, आपल्या चळवळीतील छोट्या, मोठ्या संस्था संघटनांना लाखो रुपये देऊन जयंती साजरी करायला लावल्या. या वेळेला मनात आनंद होण्याऐवजी चिंता आणि दुःख दाटून आले. ज्या बुद्धाचा विचार बाबासाहेबांनी स्वीकारला आणि ते म्हणाले की, ‘अदिन्नादाना वेरमणी’ म्हणजे आपल्या विचाराशी सहमती नसणाऱ्या व्यक्तींकडून दान स्वीकारू नका. त्या दानातून आपण काम उभारण्याचा प्रयत्न केला, तर कार्यानाश होईल आणि म्हणूनच ज्यांच्या देणग्यांमधून बाबासाहेबांची जयंती साजरी होते ते पाहता अवतीभवती घडणारे राजकारण पाहता न जाणो बुद्ध वंदनेतील या ओळीप्रमाणे आपला कार्यानाश होऊ नये. समता, बंधुता, स्वातंत्र्य हे लोकशाहीचे तत्त्वज्ञान विस्कटू नये, असे वाटते. त्यासाठी जयंती साध्या पद्धतीने साजरी झाली तरी चालेल. वस्तीवर छोट्या प्रमाणावर साजरी झाली तरी चालेल, पण बाबासाहेबांचा विचार हरता कामा नये. म्हणून या लांडग्यांपासून संविधान, बाबासाहेबांचा विचार वाचविणे हे आवाहन आहे. परंतु आशेला जागा आहे. त्या लेझरच्या प्रखर निळ्या प्रकाशात आणि डीजेच्या कर्णकर्कश जीवघेण्या आवाजात पांढऱ्या साड्या नेसलेल्या महिला जेव्हा हातामध्ये बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेल्या स्वातंत्र्याच्या हक्काचे फलक घेऊन उभ्या राहतात, तेव्हा ऊर्जा मिळते. कुणाल कामरापासून विश्वंभर चौधरी, असीम सरोदे, मुक्ता कदम, आशिष मगर, त्रिशूल पाटील, निरंजन टकले, श्यामसुंदर महाराज (जे संविधानाचे कीर्तन करतात) हुमायून मुरसुल, निखिल वागळे, रवींद्र पोखरकर अशा समाज माध्यमांवर सक्रिय राहून सत्य बोलण्याचे धाडस दाखवणाऱ्या निर्भय लोकशाही वाचवण्याचे कर्तव्यता करणाऱ्या मित्रांकडून ऊर्जा मिळत राहते. डॉ. बाबासाहेब महामानव होते. एम. के. गांधी महात्मा होते.

परंतु ही मातीच्या पायाची माणसे होती. त्यांना देव करून त्यांच्या तत्त्वांना, विचारांना हरवण्याचे राजकारण करणाऱ्या लांडग्यांपासून सावध राहण्याचा हा काळ आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेक लाडकी अभियानच्या संस्थापक

logo
marathi.freepressjournal.in