'रील्स'ची नशा आपला घात करणार

एकेकाळी ज्ञान आणि मनोरंजनाचे उत्तम साधन ठरलेल्या रील्सच्या जागी आलेल्या हल्लीच्या रील्स या समाजाला लागलेली कीड ठरत आहेत. सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर याचे अत्यंत गंभीर परिणाम संभवतात.
'रील्स'ची नशा आपला घात करणार
Published on

दृष्टिक्षेप

उत्तम जोगदंड

एकेकाळी ज्ञान आणि मनोरंजनाचे उत्तम साधन ठरलेल्या रील्सच्या जागी आलेल्या हल्लीच्या रील्स या समाजाला लागलेली कीड ठरत आहेत. सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर याचे अत्यंत गंभीर परिणाम संभवतात.

आम्ही बाग, बसस्टँड, रेल्वे स्टेशन, वरिष्ठ नागरिक कट्टा, अशा सार्वजनिक ठिकाणी असता किंवा प्रवासात असता. त्यावेळी बाजूची व्यक्ती आपला स्मार्टफोन स्पीकर मोडवर मोठ्या आवाजात लावून व्हिडीओ पाहणे सुरू करते. ती काय बघते याच्याशी आपल्याला काही देणेघेणे नसते. परंतु अत्यंत कर्कश आवाजात वाजणारे संगीत किंवा संवाद, मधून मधून ‘आयोडमा...’, आँय... असा विचित्र आवाज, हास्यांचे चित्कार, ‘अभी मजा आयेगा ना भिडू’, ‘रुको जरा, सब्र करो..’ असे काहीबाही संवाद लागोपाठ आपली इच्छा नसताना ऐकावे लागतात. ती व्यक्ती मग्न होऊन एकामागोमाग एक व्हिडीओ लावत असते. सार्वजनिक ठिकाणी स्पीकर मोडवर आपला मोबाईल ठेवू नये या सध्या पण महत्त्वाच्या सिव्हिक सेन्सशी त्याला काहीही देणेघेणे नसते. ही किरकिर सर्वांचेच डोके फिरवणारी असते. परंतु, ‘उगीचच कशाला भानगडीत पडायचे? आपणही हेच करतो की.’ असा विचार करून सगळे चुपचाप सहन करीत असतात. हे असह्य झाल्याने तुम्ही, हिंदीत किंवा मराठीत, आवाज कमी करण्याची विनंती त्या व्यक्तीस करता. ‘कोण हा टिकोजीराव?’ असा भाव चेहऱ्यावर आणून डोळे वटारून ती तुमच्याकडे पाहते. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतोय याचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर नसतो. हे दृश्य थोड्याफार फरकाने देशात सर्वत्र दिसून येते. ती व्यक्ती स्मार्टफोनवर जे काही पाहते त्याला ‘रील्स’ म्हणतात.

स्मार्टफोनमध्ये इंटरनेट आल्यावर विश्वातील ज्ञानाचे, मनोरंजनाचे भांडार मानवाच्या तळहातावर आले. फेसबूक, व्हाॅट्सॲप, इन्स्टाग्राम इत्यादी सामाजिक माध्यमांच्या आगमनाने लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढला, त्यांचे वर्तुळ व्यापक झाले. त्याचबरोबर या दशकाच्या प्रारंभी अस्तित्वात आलेले १५ ते ९० सेकंदांचे, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती देणारे, मनोरंजन करणारे, एडिटिंगमधील कौशल्यास आणि सर्जनशीलतेस वाव देणारे हे रील्स प्रकरण थोड्याच अवधीत आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय झाले. मानवाने केलेली ही अफाट प्रगती अभिमानास्पदच आहे. परंतु, त्यातील ‘रील्स’ प्रकरणाने जो हैदोस घातला आहे तो सामाजिक चिंतेचा विषय ठरत आहे.

जोपर्यंत ज्ञान, मनोरंजन होत होते, कोणालाही त्रास होत नव्हता, तोपर्यंत या रील्सवर आक्षेप घेण्याचे काही कारण नव्हते. परंतु आज हे रील्स ज्ञान, मनोरंजनाच्या पलीकडे गेले आहेत. एवढेच नाही तर त्याचे काही गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. रील्सकर्ते आणि रील्सदर्शक यांना रील्सचे व्यसन जडू लागले आहे, अशी आज परिस्थिती आहे. जेवण करताना, बागेत फिरताना, टीव्ही पाहताना, घरी कोणी आल्यास त्यांच्याशी बोलताना, टॉयलेटमध्ये, प्रवासात, या लोकांचे रील्सदर्शन चालू असते. आई-बाप आपल्या लहान मुलाला गुंतवून ठेवण्यासाठी किंवा गप्प बसवण्यासाठी मोबाईलवर रील्स लावून देतात. एखादा रील दोनचार सेकंदात आवडला नाही तर लगेच तो वर सरकवला जातो. रील्स पाहताना लोक व्यसनी माणसांसारखे तहान-भूक, काम-धाम विसरून जातात. म्हणून, हे असे का होत आहे, याकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. यावर पुढील मुद्दे विचारात घ्यावे लागतील.

पटकन व्हायरल आणि झटपट प्रसिद्धी : प्रसिद्धीचा सोस अनेकांना असतो. आपले रील्स आगळेवेगळे असतील तर ते पटकन व्हायरल होऊन आपल्याला लगेच प्रसिद्धी मिळेल ही अपेक्षा रील्सकर्त्यांना असते. लाइक्स कमी मिळाल्यास कित्येक रील्सकर्ते अस्वस्थ, निराश होतात.

डोपामाइन निर्मित, अजून काही मिळवायची ओढ : जेवढ्या अधिक लाइक्स, कॉमेंट्स, फॉलोअर्स तेवढा डोपामाइन या मेंदूतील प्रक्रियेद्वारा निर्मित आनंद अधिक आणि त्यातून अधिक रील्स निर्माण करण्यासाठी प्रेरणा मिळते. तसेच रील्सदर्शक रील्स पाहता पाहता त्यात गुंतून जातात आणि त्यांनाही असाच आनंद मिळतो. तो न मिळाल्यास अस्वस्थता येते.

झटपट पैसा : रील्स पोस्ट केल्यावर ‘मला फॉलो करा’, ‘रील्सना लाइक आणि शेअर करा’, ‘कॉमेंट करा’ असा तगादा हे रील्सकर्ते त्यांच्या फॉलोअर्सच्या मागे लावतात. कारण, गेल्या काही काळापासून त्यांना लाइक्स, कॉमेंट्स किंवा फॉलोअर्सच्या संख्येच्या प्रमाणात पैसा मिळू लागला आहे. कमी कष्टात अधिकाधिक पैसा मिळवावा यासाठी रील्सकर्त्यांचा आटापिटा चालू असतो.

पॉपकॉर्न ब्रेन सिंड्रोम : मानसशास्त्रज्ञ डेव्हिड लेव्ही आणि मायकेल डी मॉन्टमार्ट्रे यांनी ही संकल्पना मांडली आहे. ही मेंदूची एक अवस्था आहे. गरम तव्यावर पॉपकॉर्न तडतडतात त्याप्रमाणे सततच्या स्क्रीन वापरामुळे मेंदू स्थिर राहत नाही आणि त्याला काहीतरी नवीन, वेगवान आणि आकर्षक सतत हवं असतं. रील्सकर्ते आणि रील्सदर्शक सतत स्क्रीनसमोर असल्याने त्यांच्या मेंदूची अवस्था देखील अशीच होते. त्यातूनच ते पुन्हा पुन्हा रील्स बनवत राहतात/पाहत राहतात.

तीव्र स्पर्धा आणि रील्सकर्त्यांची विपुलता : रील्सकर्ते लाखोंच्या संख्येने आहेत आणि त्यात वरचेवर भर पडत आहे. त्यामुळे रील्सचा धबधबाच कोसळतो आहे. त्यात आपण टिकून राहावे, आपल्या रील्सना अधिकाधिक लाइक्स, व्ह्यूज मिळावेत, अल्गोरिदममध्ये आपण दुर्लक्षिले जाऊ नये याचे दडपण येत असल्याने अगदी विक्षिप्त, अविश्वसनीय, अतिशयोक्त, खोट्या रील्स बनवल्या जातात.

रील्स बनवताना विवेकाचे भान न ठेवल्याने कित्येकांना मृत्यू येतो. गाडी चालवताना स्टंटबाजी करणे, अतिवेगाने गाडी चालवणे, डोंगराच्या अगदी कड्याच्या टोकावर जाणे, धावत्या ट्रेनसमोर उभे राहून रील बनवणे अशा अनेक कारणांमुळे कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कुणाला जीवघेणी मारहाण करताना, कोणाचा छळ करताना चित्रण करून त्याचे रील्स बनवण्याची आणि ते व्हायरल करण्याची विकृती वाढत आहे. त्यातही मार खाणारे बळी पडत आहेतच. शिवाय समाज असंवेदनशील बनू लागला आहे.

सध्या फोफावलेल्या धार्मिक, जातीय, विद्वेषाच्या आगीत रील्स तेल ओतत आहेत. विशिष्ट धर्म, जातींच्या विरोधात खोट्यानाट्या आधारावर विखार, द्वेष व्यक्त करणाऱ्या, अफवा पसरवणाऱ्या रील्स केवळ काही मिनिटांत व्हायरल होतात. देवांबद्दल, महापुरुषांबद्दल निंदनीय रील्स व्हायरल होतात तेव्हा संबंधित समाज घटकांमध्ये तणाव निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्था राबवणाऱ्या यंत्रणेवर ताण पडतो. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या रील्स देखील अधूनमधून डोके काढत असतात. अशा रील्सना मिळणारा उदंड प्रतिसाद (व्ह्यूज, लाइक्स, फॉलोअर्स) खूपच धक्कादायक आहे.

एकेकाळी ज्ञान आणि मनोरंजनाचे उत्तम साधन ठरलेल्या रील्सच्या जागी आलेल्या हल्लीच्या रील्स या समाजाला लागलेली कीड ठरत आहेत. सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर याचे अत्यंत गंभीर परिणाम संभवतात. ते रोखण्यासाठी सरकारी उपायांसोबतच सामाजिक प्रबोधनाची नितांत गरज आहे. निदान तातडीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी स्पीकर मोडवर मोबाईल ऐकणे हा दंडनीय अपराध ठरवून त्याची अंमलबजावणी त्वरेने केली पाहिजे.

uttamjogdand@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in