रील्स रील्स... रील्समुळे होणारे तरुणांवरील परिणाम

रील्समधे अडकलेल्या तरुणानी स्वत:च्या वाईट सवयी जाणून घ्याव्यात. कोणतेही व्यसन वाईटच असते हे लक्षात घ्यावे. कोणत्याही गोष्टीचा मर्यादित वापर हा त्रासदायक नसतो.
रील्स रील्स... रील्समुळे होणारे तरुणांवरील परिणाम

मी दुपारी लवकर उठतो. जसं डोळे उघडतो तसं मोबाईलही उघडतो. पहाटेपासून बंद असणाऱ्या मोबाईलवर कितीतरी मेसेजीस आले असतील. त्यात महत्वाचाही एखादा मेसेज असेल. नवीन रिल्स अपलोड झाले असतील या विचारानेच मोबाईल ऑन करतो. जणू उघडत्या जड पापण्यांबरोबर धडाधड रील्स बघितलं तर मनाला खूप बरं वाटतं. मग मी रील्स बघायला लागतो. एकापाठोपाठ एक रील्स बघत अंथरुणात लोळत पडतो. उठावसं वाटतच नाही. अलीकडे आई हाक मारत नाही. मागच्या पंधरा दिवसात मी बाबांचा चेहराही बघितला नाही. मला बाबांची खूप भीती वाटते त्यापेक्षा मला माझीच लाजही वाटते म्हणून मीच त्यांच्यासमोर जात नाही. मला कळतंय माझं चुकतंय. पण काय करू मला समजतंच नाही. तीन वर्षापूर्वी ऑनलाईन अभ्यासाच्या कारणास्तव माझ्याकडे मोबाईल आला. माझ्या हट्टापोटी, आईच्या सांगण्यावरून तो महागडा सगळे चांगले फिचर्स असणारा आकर्षक असा मोबाईल माझ्याकडे आहे. मोबाईल मिळाल्यावर मी खूप आनंदात होतो. अभ्यास सोडून मोबाईलचा पुरेपूर आनंद घेत होतो. रील्स बघून हसत होतो. मला मजा येत होती. कसा वेळ चाललाय कळत नव्हतं. हळुहळु रील्स बघण्याची सवय लागली. आता तर कंप्लीट अॅडिक्शन झालंय. मोबाईल बाजूला ठेवू शकत नाही. कसाबसा बारावी पास झालोय. इंजिनियरिंग करावं अशी बाबांची इच्छा होती. पण अपेक्षित मार्क्स मिळाले नाहीत. सध्या बी एस्स सीच्या दुसऱ्या वर्षाला आहे. आता थोडा अभ्यास करावा असं वाटू लागलंय. मोबाईलच्या व्यसनातून बाहेर पडायचंय. माझ्यामुळे आईबाबांना त्रास होऊ नये असं मला वाटतंय. खरंच मला आता अभ्यास करायचाय. रील्सच्या जगातून बाहेर यायचंय.

महाविद्यालयात शिकणारा विकी बोलत होता. हा प्रश्न एका विकीचा नाही. भारतातील हजारो तरुण मुलांचा आहे. एकीकडे भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकले. भारत जगात नंबर वन झाला. त्याचबरोबर तो तरुणांचा देश म्हणूनही जगात ओळखला जातो. ही तरुणांची ताकद मात्र रील्ससारख्या आभासी जगात धावत आहे. सोशल मीडियामुळे एक संपूर्ण नवं, अतिप्रचंड, मति गुंग करण्याची क्षमता असणारं आभासी जग आपल्या समोर आहे. त्या जगाची भुरळ सर्वांनाच पडली आहे. याच जगात रील्स नावाची गोष्ट आहे, जी चाकांप्रमाणे धावत असते. या रील्समधे तरुणाईला हवा असणारा वेग आहे. विषयांमधे वैविध्य आहे. प्रत्येकाच्या आवडीचा विचार रील्स हे माध्यम ताकदीने करतं. त्यामुळे मोबाईल उघडला की, हवहवं वाटणाऱ्या गोष्टीच समोर येतात. त्या आभासी जगातला आपला वावर अगदी सहजपणे सुरू होतो. सोशल डिलेमा हा माहितीपट बघितला तर लक्षात येतं की, माध्यमानी माणसांचा बाजार कसा आपल्या ताब्यात घेतला. माणसं कशी त्या मोहजाळात अडकतात आणि त्याचा फायदा या कंपन्या कशा घेतात. आपण माहिती हवी किंवा एखादा व्हीडिओ आवडला म्हणून ते बघतो. पण होतं असं की, आपल्याला त्याच त्याच विषयाचे व्हीडिओसारखे दिसायला लागतात. आपणही मग तेच तेच बघत राहतो. आपल्या आवडीच्या गोष्टीचा बाजार मात्र या कंपन्या बरोबर करतात. ते स्वत:चा फायदा करुन घेतात. आमचा तरुण मात्र यात आपली मानसिकता बिघडवून घेतो. एकदा का तरुण व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर यात गुरफटला तर त्यातून बाहेर येणं कठीणच होतं. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या आभासी जगात फसत राहतात. या सगळ्यात तरुणाई भरकटत राहते. त्याचे दुष्परिणाम सगळ्यानाच भोगायला लागतात. रील्सच्या बाबतीतच बोलायचं झालं तर भारतात दररोज जवळजवळ ५० लाख रील्स प्रसारित होतात. या रील्सचा प्रेक्षक वर्ग कोटींच्या घरात आहे. त्यात तरूणांची संख्या प्रचंड मोठी आहे.

रील्स बघण्याच्या सवयीमुळे निद्रानाश सुरू होतो. तहानभूक विसरली जाते. सतत रील्स बघत राहावं असं वाटतं. त्यातंच आनंद मिळायला लागतो. या रील्समधून अपघात, मृत्यू, मारामाऱ्या, हिंसात्मक दृष्य, भावनांचा अतिरेक अशा गोष्टी प्रसारीत होतात. अर्थात काही चांगले रील्सही असतात. कदाचित मुलं तेही बघत असतील; परंतु ते चांगल्यातून चांगलं घेतीलच असं नाही. वाईट मात्र पटकन घेतात आणि मग त्यांचं नुकसान होतं. या सगळ्यामुळे मुलं आक्रमक होत आहेत. त्यांचा राग वाढलाय. त्यांचं वर्तन बदलतंय. आळशी, उदास, निराश,अबोलपणा, न्युनगंड, एकलकोंडेपणा, निर्णय घेण्यात अक्षमता, शाळा कॉलेजला जावेसे न वाटणे, अभ्यास करावा वाटत नाही, वाचणे - लिहिणे हे तर नकोच वाटतं, आत्मविश्वास कमी होतो. अशा नकारात्मक गोष्टी मुलांमधे वाढत आहेत. मुलं जितकं रील्स बघण्याचा आनंद घेतात तितकाच स्वत:चे रील्स बनवून ते प्रसारित करण्याचाही वेगळाच आनंद मुलं घेतात. त्याच्या लाईक्स आणि प्रसिध्दीमध्ये हरवून जातात.

रील्स तीस सेकंदाच्या असतात. काही तर त्याहून कमी सेकंदाच्या असतात. काही सेकंदात बदल हवा असतो. सतत नवीन दृष्य बघायचं असतं. आजकाल पाच सात मिनिटाचा व्हीडिओ देखील बघितला जात नाही. याचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे मुलं एका विचारावर काही वेळ सुध्दा ठाम राहू शकत नाहीत. धरसोड वृत्ती वाढत जाते. लक्षपूर्वक काम होत नाही. कामाची उत्पादकता खालावते. परिणामी परीक्षेतील गुणवत्ता कमी होते. अतिरेकी विचार येण्याचं प्रमाण वाढतं. ओ सी डी सारखे आजार बळावण्याची शक्यता वाढते. रील्स मधलं नाविण्य कधीच संपत नाही. त्याचा कंटाळा कधीच येत नाही. ते हवंहवंसं वाटतं. परंतु विकीप्रमाणे त्याची सवय सोडवण्याची खरंच इच्छा असेल तर मार्गही सापडतात.

रील्सची सवय सोडवण्यासाठी काय करता येईल बघूया...

मोबाईलपासून दूर राहण्याचा निर्णय घेणे : सुरूवात महत्वाची असते. मुलांनी मोबाईल पासून दूर राहण्याचा ठामपणे निश्चय करावा. रिल्समधून मिळणारा आनंद अचानक बंद झाल्यामुळे अस्वस्थता, चिडचिड होऊ शकते. त्याकडे दुर्लक्ष करता यायला हवं. चांगला मित्रपरिवार, आई वडील यांच्याबरोबर राहिल्यास त्या त्रासाची तीव्रता कमी होईल. मोबाईल जास्तीत जास्त दूर कसा राहील हे पाहावं लागेल. जरी मोबाईल हातात असेल तर रील्स पाहणार नाही हे सतत लक्षात ठेवायला हवं.

स्वत:ला सतत प्रोत्साहित करणे : आपण रील्स बघणार नाही हे ठरवत असताना त्याचे कारणही स्वत:साठी स्पष्ट हवं. रील्स बघणं सोडायचं आहे ध्येय समोर ठेवून आपल्या दैनंदिन कामाचं नियोजन करायला हवं. स्वत: ला प्रोत्साहन देता यायला हवं. मी मोबाईल दूर ठेवूच शकतो याची खात्री असायला हवी. नियोजन करुनच रील्स बघणं सोडू शकतो. रील्स मधून बाहेर येण्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतात. स्वत:शी प्रामाणिक राहावं लागतं.

काय करायचं आहे लिहून काढणे : रील्सचं व्यसन सोडताना दिवसभरात किती वेळ रील्स बघितल्या याची नोंद ठेवावी. ही सवय कमी करण्यासाठी आपण काय काय प्रयत्न केले ते लिहावं. आपल्या प्रयत्नाना कितपत यश येतंय ते लिहावं.

छोट्या छोट्या बदलांच्या नोंदी ठेवणे : रील्सची सवय सोडत असताना आपल्यात होणारे चांगले बदल लिहावेत. चांगल्या बदलांसाठी स्वत:ला शाबासकी द्यावी. स्वत:ला छानसं बक्षिस द्यावं. सवय सोडताना परत मोह जाळात अडकलोच तर स्वत:ला शिक्षाही करावी. हे सगळं जाणीवपूर्वक करावं. जेणेकरून रील्सच्या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी मदतच होईल.

विकी सारख्या रील्समधे अडकलेल्या तरुणानी स्वत:च्या वाईट सवयी जाणून घ्याव्यात. कोणतंही व्यसन वाईटच असतं हे लक्षात घ्यावं. कोणत्याही गोष्टीचा मर्यादित वापर हा त्रासदायक नसतो. त्या गोष्टी वापरण्याचा अतिरेक, त्यामुळे येणारे अति विचार आणि त्यातून आपल्या हातून घडणारी एखादी अतिरेकी कृती निश्चितच घातक ठरू शकते. असं घडू नये यासाठी आपल्या मन मेंदूला चांगले अनुभव द्यावेत. तीव्र नकारात्मक विचारांना स्वीकारून साक्षीभावनेने त्यावर मात करावं.आपलं जगणं सुंदर करण्यासाठी आपल्या जीवनाची सूत्रं मोबाईलकडून काढून स्वत:कडे घ्यावीत. वैयक्तिक विकासाकडे लक्ष द्यावे. शांतपणे जगण्यासाठी रील्सच्या जगातून बाहेर पडावे हेच योग्य. तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की, येणाऱ्या काळात आभासी मनोरंजन हीच मानवी समुहाची सर्वात मोठी समस्या असू शकेल. नैसर्गिकपणे अनुभवता येणाऱ्या मनोरंजनातून स्वप्नरंजनाकडचा रील्सवरुन धावणारा हा आभासी प्रवास कुठे संपेल याचा गांभीर्याने विचार करणे ही काळाची गरज आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in