
कोर्टाच्या आवारातून
ॲड. विवेक ठाकरे
रत्नागिरीतील खेड तालुक्यातील ‘अध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल’ या आश्रमात अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने राज्य हादरले आहे. धर्माच्या नावाखाली सत्तेचा व पैशाचा खेळ करणाऱ्या तथाकथित महाराजांची ही कृत्ये समाजाच्या अधोगतीची चिन्हं आहेत.
दिल्लीतील प्रसिद्ध स्वामी चैतन्यनंद महाराजांनी आश्रमातील १७ मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातील रत्नागिरीस्थित खेडच्या एका अध्यात्मिक आश्रमात लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. देवाच्या नावाने महाराजाचा वेश धारण करून ही कोकरे समाजात फिरत आहेत व धर्माच्या नावावर हिंसा पसरवून गैरकृत्य करत आहेत. धर्माचाच बुरखा पांघरून हे धर्माचे ठेकेदार आता आया-बहिणींची अब्रू लुटत आहेत हे अधिक धोकादायक आहे. धर्माच्या नावाने शोषण ही नवी गोष्ट नाही. या शोषण करणाऱ्यांना ना धर्माचे भय, ना कायद्याचा वचक ना समाजाची आणि संविधानाची चिंता. माणूस म्हणून आपण अधिक अधोगतीला चाललोय याचे हे लक्षण आहे.
काय आहे प्रकरण?
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात लोटे या ठिकाणी दोन वर्षांपासून ‘अध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल’ या नावाने आश्रम सुरू केला आहे. भगवान कोकरे नामक स्वयंघोषित महाराज या आश्रमाचा प्रमुख आहे. या ठिकाणी राज्यातील गोरगरीब मुलांना व मुलींना प्रवेश देऊन त्यांना अध्यात्मिक शिक्षण दिले जाते. येथे शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची व लैंगिक अत्याचाराची घटना घडली असून या प्रकरणी १३ ऑक्टोबर रोजी रात्री खेड पोलीस स्टेशन येथे पीडितेने आश्रमाचा प्रमुख भगवान कोकरे महाराज आणि शिक्षक प्रीतेश कदम या दोघांविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याच्या (पोस्को) कलम १२ व १७ तसेच भारतीय नागरिक संहिता कायद्याच्या कलम ७४, ३५१ (३) आणि ८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. कोकरे महाराजावर प्रचंड मोठा राजकीय वरदहस्त असतानाही पोलिसांनी गुन्हा दाखल करून तत्काळ अटक केल्याने या घटनेचे गांभीर्य लक्षात येते. या घटनेमुळे कोकणात खळबळ उडाली आहे.
कोण आहे कोकरे महाराज?
स्वयंघोषित भगवान कोकरे महाराज यांनी काही वर्षांपूर्वी रत्नागिरीतील लोटे गावात ‘श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान’ नावाने गोशाळा सुरू केली आहे. शेकडो भाकड जनावरे या गोशाळेत असून, या गोशाळेसाठी मोठ्या देणग्या महाराज गोळा करतात; मात्र या गाईंची योग्य ती काळजी घेतली जात नाही, असा आरोप केला जातो. तसेच लोटे एमआयडीसीमध्ये बेकायदेशीररीत्या जागा ताब्यात घेऊन गोशाळा व आश्रम चालवतात, असा स्थानिकांचा आरोप आहे. एप्रिल २०२३ साली गोशाळेच्या अनुदानासाठी व जागेच्या मागणीसाठी या कोकरे महाराजांनी १० दिवस उपोषण केले होते. राजकीय स्टंटबाजीने हे उपोषण माध्यमांमध्ये चमकले होते. सध्याच्या काळात गोशाळा चालविणे हा एक मोठा धनप्राप्तीचा व्यवसाय झाला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या कोकण प्रांताचेही प्रमुख आहेत. अनेक हिंदुत्ववादी संस्थांच्या-पक्षांच्या जवळचे असून, कीर्तनाच्या व वारकरी संप्रदायाच्या आडून हिंदुत्ववादाचा जोरदार पुरस्कार, आरक्षणाला विरोध आणि समान नागरी कायदा लागू व्हावा म्हणून ते प्रचार-प्रसार करत असतात. धर्माच्या आडून राजकीय वरदहस्ताने या महाराजांनी रत्नागिरीसह कोकणात चांगलाच जम बसवला होता. विविध राजकीय पक्षांना, नेत्यांना ललकारण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. यावरून त्यांच्या धार्मिक ताकदीचा अंदाज येतो.
कोकरांच्या आडून हिंस्र श्वापदे
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची दीर्घ परंपरा लाभली आहे. ज्ञानोबा-तुकोबाचा आणि हरीनामाचा गजर करत हा संप्रदाय हजारो वर्षे जनतेच्या मनावर राज्य करत आहे. संतांनी दिलेला शांतीचा संदेश भजन-कीर्तनाच्या माध्यमातून आजपर्यंत पसरवला जात होता; मात्र आता धर्माच्या नावाने, गोरक्षणाच्या नावाने, कीर्तनाच्या माध्यमातून धर्माच्या नावावर द्वेष पसरवून या वारकरी संप्रदायाला आणि वैश्विक हिंदू धर्माला खुजे करण्याचे काम अशा कोकरे महाराजासारख्या संधीसाधूंच्या हातून सुरू आहे. संत ज्ञानेश्वरांनी जगाचे पसायदान सांगितले. पण कोकरेसारखे धर्माचे ठेकेदार माणसांना धर्मा-धर्मात, जातीत विभागून आपला स्वार्थ साधत आहेत. धर्माचा एकांगी प्रचार करताना वारकरी संप्रदायाने सांगितलेला मानव धर्म मात्र ही माणसे विसरून गेली आहेत.
धर्माच्या नावावर सध्या कोणीही उठून भगवा परिधान करून धर्मरक्षक बनतो, नाहीतर कीर्तनकार बनतो. हिंदू-मुस्लिम करणे म्हणजे धर्मरक्षा ही धर्माची नवी व्याख्या बनत चालली आहे. कोणी आक्रमक भाषा वापरून वातावरण गढूळ करतो, कोणी गोरक्षक, कीर्तनकार बनून, संस्था काढून कमाई करत आहे. धर्माच्या आडून धंद्याचे व कमाईचे नवीन साधन उभे राहत आहे. हाच धर्म शोषणाचे साधन होतो तेव्हा परिस्थिती अधिक गांभीर बनते. वर्षानुवर्षे धर्माआडून महिलांचे, बालकांचे, शूद्रांचे, शोषितांचे, वंचितांचे शोषण होत आले आहे. मात्र धर्माच्या गोंडस नावाखाली फार कमी वेळा या बाबी पुढे येत असतात. बऱ्याच वेळा या आर्त हाका बाहेर ऐकूच येत नाहीत. अनेक तथाकथित धर्मगुरू, स्वयंघोषित महाराज आश्रमातील, धार्मिक संस्थेतील महिलांच्या, मुलींच्या शोषणाच्या गुन्ह्यांमध्ये जेलची हवा खात आहेत. यात आणखी काही नावांची भर पडत आहे इतकेच. परिस्थिती मात्र सुधारत नाही. साधूंच्या आडून संधीसाधू दडी मारून बसलेले असतात. वेळ मिळताच संधी साधतात. ना त्यांना शासन व्यवस्था सुधारू शकली, ना कायदा चाप लावू शकला. धार्मिक घुसळणीत समाजाची वीण अधिकच उसवत चाललीय. आपण कोणत्या युगात राहतोय हे कळू नये इतके समाजमन बधिर होत चाललेय. याचे पुढे काय होईल हे सांगता येत नाही. संविधान आणि आदर्श समाजव्यवस्था हीच काय ती शेवटची आशा शिल्लक राहिलीय.
वकील, मुंबई उच्च न्यायालय