स्मरण बाजीप्रभूंचे

देशभक्तीनं ओतप्रोत भरलेल्या सेनानीचं व्यक्तिमत्त्व साकारताना अंगावर येणारा शहारा मी आजही विसरलेलो नाही
स्मरण बाजीप्रभूंचे

पावनखिंड केल्यानंतर बाजीप्रभू देशपांडे हा इतिहासपुरुष नव्यानं समजला, असं मी म्हणू शकतो. त्यामुळेच या योद्ध‌‌्याच्या पुण्यतिथीचा दिवस माझ्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण आहे. वर उल्लेख केलेल्या चित्रपटात बाजींची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली हे मी परमभाग्य समजतो. लहानपणापासून तुमच्यावर ज्या व्यक्तींचं, ज्यांच्या चरित्राचं, ज्यांच्या निष्ठा आणि कर्तृत्वाचं गारुड असतं, त्यांच्या व्यक्तिरेखा साकारण्याच्या निमित्तानं होणारा परकायाप्रवेश अतीव आनंद देणारा ठरतो, यात शंका नाही. बाजीप्रभू देशपांडे साकारताना हा आनंद मी अनुभवला. बाजीप्रभू शूरवीर होते, स्वामीनिष्ठ होते, स्वराज्य राखण्यासाठी जीवाची बाजी लावणारे होते. अशा देशभक्तीनं ओतप्रोत भरलेल्या सेनानीचं व्यक्तिमत्त्व साकारताना अंगावर येणारा शहारा मी आजही विसरलेलो नाही.

आपण देशासाठी काही तरी केलं पाहिजे हे व्यक्तिगतरीत्या माझंही मत आहे. मीदेखील देशभक्त आहे. माझ्यावर तसे संस्कार झाले आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या निमित्तानं बाजीप्रभूंच्या वेशात उभं राहताना मी एक वेगळीच भावना अनुभवली. स्वराज्यरक्षण हेच बाजीप्रभूंपुढील अंतिम ध्येय होतं. त्यापुढे त्यांनी काहीही पाहिलं नाही. मनामध्ये इतकी परमोच्च देशभक्ती असल्याखेरीज पावनखिंडीत पाय रोवून उभं राहणं शक्य नव्हतं. केवळ बाजीप्रभूच नव्हे, तर त्या लढाईत सहभागी झालेले ३०० मावळे याच वेडानं भारलेले होते. बाजींनी त्यांना प्रेरणा दिली. मरणानंतरही कीर्तीरूपानं जिवंत राहण्याचा विचार दिला. खिंडीतल्या घनघोर युद्धात ते कामी आले असले तरी आजही महाराष्ट्राला त्यांच्या बलिदानाचा विसर पडलेला नाही. स्वराज्यरक्षणातलं त्यांचं योगदान आजही प्रत्येक मराठी मन जाणून आहे. प्रत्येकाच्या मनात त्याप्रति कृतज्ञता आहे.

बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारण्याआधी मी अभ्यास केला हे खरं असलं, तरी असा अभ्यास पुस्तकाबरोबरच अभ्यासातूनही होत असतो. त्यासाठी चिंतनही महत्त्वाचं असतं. बाजींची भूमिका साकारताना मीदेखील चिंतनावर भर दिला. मी माझ्यापेक्षा १० वर्षं मोठी असलेली व्यक्तिरेखा साकारत होतो. त्यामुळेच बाजींची देहबोली कशी असेल, आवाजाचा पोत काय असेल, शब्द उच्चारण्याची लय काय असेल, या सगळ्या सूक्ष्म गोष्टी मी अभ्यासल्या. मुख्य म्हणजे आपल्यापैकी कोणीही या व्यक्तींना पाहिलेलं नाही. अर्थात, यालाही दोन बाजू असतात. एका अर्थी ही दुधारी तलवार आहे, असंही म्हणता येईल. कारण आपण न पाहिलेल्या व्यक्तींच्या व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने सादर होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागते आणि त्याच वेळी त्या अतिआवेशी करूनही चालत नाहीत. प्रेक्षकांनी त्या न पाहिलेल्या व्यक्तीला स्वीकारणं हीच कामाला मिळालेली खरी पोचपावती असते. सुदैवानं प्रेक्षकांनी बाजींच्या भूमिकेत स्वीकारलं आणि वैयक्तिकरीत्या मी एक लढाई जिंकलो. कौस्तुभ देशपांडे यांनी, तुम्ही मागच्या जन्मी खरंच आमच्या परिवारातले एक सदस्य असाल; कारण त्याशिवाय तुमच्याकडून असं काही घडणं शक्य नाही, असं म्हटलं तेव्हा त्यांची ही प्रतिक्रिया मला तीच पोचपावती देऊन गेली. बाजीप्रभू साकारताना केलेली आणखी एक तयारी अर्थातच गोळीबंद शरीर तयार करणं ही होती. मी व्यायामप्रेमी आहे आणि दररोज व्यायाम करतो हे खरं असलं तरी लहानपणापासून आपल्या सर्वांच्या मनावर बाजींच्या प्रतिमेचा जबरदस्त पगडा आहे. मलाही मनातल्या त्यांच्या त्या प्रतिमेपर्यंत पोहोचायचं होतं.

लहानपणापासून पन्हाळगडावरील बाजीप्रभूंचा अप्रतिम पुतळा मी पाहत आलो आहे. त्यांच्या मुखावर जाणवणारा त्वेष पाहून प्रत्येक वेळी अंगावर रोमांच उभा राहिला आहे. पुतळ्यात दिसणारी त्यांची शरीरसंपदा मी डोळ्यात साठवली आहे. म्हणूनच तशी संपदा मिळवण्यासाठी मी भरपूर व्यायाम केला. वजन १०४ किलोपर्यंत वाढवलं; मात्र त्याच वेळी शरीर बोजड वाटणार नाही, याची काळजीही घेतली. चित्रपटात मला भरपावसात खङ‌्ग चालवायचं होतं. त्यासाठी हात तेवढे ताकदवान असणं गरजेचं होतं. आम्ही सराव हॉलमध्ये करतो; पण प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी २५ ते ३० रेनशॉवर्स होते. त्याखाली तितक्याच ताकदीने, त्वेषाने युद्ध खेळायचं होतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करून, चिंतन करून मी स्वत:ला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार केलं. आज बाजीप्रभूंच्या भूमिकेमुळे मला ओळख मिळाली असली, तरी साकारलेली पहिली ऐतिहासिक भूमिका प्रतापराव गुजर यांची होती. ‘राजा शिवछत्रपती’ नामक अमोल कोल्हे यांच्या मालिकेत मी ती साकारली होती. त्यात अमोल कोल्हे छत्रपतींच्या भूमिकेत होते. कोणतीही ऐतिहासिक भूमिका साकारताना साधारणत: लाऊड अॅक्टिंगकडे कल असतो; पण भालजींच्या चित्रपटांमध्ये ऐतिहासिक व्यक्तिरेखांचा संयत अभिनय बघायला मिळतो, म्हणूनच ही भूमिका साकारताना मी भालजींचे सगळे चित्रपट पाहिले. अर्थात, लहानपणापासून ते बघतच होतो. त्यानुसार मी प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारली. त्याला प्रेक्षकांची पसंतीही मिळाली. विशेषत: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी घरी आमंत्रित करून माझं कौतुक केलं. त्यामुळे निश्ि‍चतच आपण अशा भूमिका करू शकतो हे समजून मला हुरूप आला.

असं असलं तरी त्यानंतर माझ्याकडे तशाच भूमिका आल्या असं नाही; मात्र आयुष्यात दिग्पाल लांजेकर नावाची व्यक्ती आली आणि चित्र पालटलं. त्याच्याबरोबर सगळे इतिहासवेडे मित्र एकत्र आले. दिग्पालचा इतिहासाचा अभ्यास दांडगा असल्यामुळे आम्हा सगळ्यांनाच ऐतिहासिक सत्य समजत गेलं, घटनाक्रम समजून घेता आला आणि अशाच प्रकारे बाजीप्रभूंचाही नव्याने परिचय झाला. अर्थातच बाजीप्रभूंची व्यक्तिरेखा मनात ठसण्यासाठी आणि वृत्तीत उतरण्यासाठी काही दिवसांच्या अभ्यासाची आणि तयारीची नव्हे तर लहानपणापासून झालेल्या संस्कारांची आवश्यकता असते. सुदैवानं मला ते संस्कार मिळाले. लहानपणापासून पुण्यामध्ये मी ‘जाणता राजा’चे अनेक प्रयोग पाहिले होतेे. त्या संस्कारक्षम वयात मनावर त्याचा जबरदस्त पगडा राहिला. तेव्हापासून मला इतिहासाचं वेड लागलं. मी ऐकलेली पहिली कॅसेट ‘शिवकल्याण राजा’ ही होती. खेरीज आई मला ‘श्रीमान योगी’, ‘राजा शिवछत्रपती’ अशी सगळी पुस्तकं वाचून दाखवायची. मुख्य म्हणजे, ती आपल्या काळातली चांगली अभिनेत्री असल्यामुळे ती अत्यंत प्रभावीरीत्या पुस्तकं वाचायची. त्यामुळेच त्या भावना थेट माझ्यापर्यंत पोहोचल्या आणि रक्तात उतरल्या. बाजीप्रभू साकारताना मला बालपणीच्या या संस्कारांचा खूप फायदा झाला, कारण हे सगळं आत कुठे तरी रुजलं होतं. भूमिकेच्या रूपाने ते बाहेर आलं इतकंच!

तसं पाहायला गेलं तर अनेक ऐतिहासिक व्यक्तिरेखा आपल्याला आवडत असतात. आपल्यावर त्यांचा प्रभाव असतो; पण माझ्या मनात अडकून राहिलेली व्यक्तिरेखा बाजीप्रभूंची होती. म्हणून दिग्पालनं विचारताच मी चित्रपटात त्यांच्याच भूमिकेला पसंती दर्शवली. माझ्या मनात या योद्ध्याबद्दल प्रचंड आदर आहे. सर्वोच्च बलिदान म्हणजे काय असतं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पावनखिंडची लढाई, याचं यापेक्षा मोठं उदाहरण असूच शकत नाही. पुढे काय होणार हे या लढाईत लढलेल्या प्रत्येकाला माहीत होतं. राजे गडावर पोहोचल्यानंतर शत्रूपासून सुटका करून घेत सुखरूप परतण्याची शक्यता अत्यंत कमी आहे हेही ते जाणत होते. शत्रूच्या प्रचंड सैन्याचा सामना करणं अतिशय अवघड होतं; पण तरीही बाजींसह सगळेजण प्राणांची बाजी लावून लढले आणि अमर झाले. खरोखरच बाजीप्रभू देशपांडे हे विलक्षण व्यक्तिमत्त्व होतं. वय पन्नाशीच्या पुढे असल्यामुळे त्यांना जीवनाचा अनुभव होता. राजांपेक्षा वयानं मोठे असल्यामुळेच कदाचित ते राजांना दरडावून खिंडीतून पुढे जाण्यास सांगू शकले. यावेळी राजांच्या जीवाबरोबरच स्वराज्याचं काय होईल ही काळजी त्यांच्या मनात होती. स्वातंत्र्याच्या सूर्याला वाचवायचं असेल तर आज आपल्याला खिंडीत उभं राहावंच लागेल, हे त्यांना समजलं होतं. म्हणूनच ते सर्वोच्च बलिदानास तयार झाले. बाजीप्रभू देशपांडे यांची ही बाब मला विलक्षण भावते. आजच्या जगात नगण्य ठरत असणाऱ्‍या त्याग, बलिदान, निष्ठा या सगळ्या बाबी आपण त्यांच्यामध्ये पाहू शकतो. मला खात्री आहे की, पुढली अनेक वर्षं या गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख होताच बाजीप्रभूंचंच स्मरण होत राहील. प्रत्येक काळात त्यांचं पुण्यस्मरण उद्बोधक ठरेल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in