
चौफेर
प्राजक्ता पोळ
बॉसवरचा किंवा कंपनीवरचा सूड म्हणून राजीनामा देण्याचे प्रमाण कार्पोरेट क्षेत्रात वाढत आहे. त्यासाठी प्रसंगी कमी पगाराची नोकरी स्वीकारली जात आहे. मानसिक स्वास्थ्याला अधिक महत्त्व दिले जात आहे. सोशल मीडियावर ‘रिव्हेंज क्विटिंग’च्या या ट्रेंडची जोरात चर्चा सुरू आहे. अनेकजण आपले अनुभव शेअर करत आहेत.
सोशल मीडियावर सध्या कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या ‘रिव्हेंज क्विटिंग’ या नव्या ट्रेंडची जोरदार चर्चा आहे. या ट्रेंडमध्ये कर्मचारी आपल्या नोकरीतील निराशा व्यक्त करतात आणि कंपनीच्या कार्यपद्धतीमधली नकारात्मक गोष्टींना कंटाळून राजीनामा देतात. दुसरी मोठ्या पगाराची किंवा चांगली संधी असलेली नोकरी नसली तरीही कमी पगार स्वीकारून ‘रिव्हेंज क्विटिंग’ करण्याचे प्रमाण जगभर वाढत आहे. मोठ्या कंपन्यांनी सुरू केलेल्या ‘स्टेल्थ सॅकिंग्स’सारख्या धोरणांना प्रत्युत्तर म्हणून हा ट्रेंड उदयास आला आहे. ‘स्टेल्थ सॅकिंग’ म्हणजे कर्मचाऱ्यांना थेट नोकरीवरून न काढता, त्याला अशा पद्धतीने त्रास देणे की जेणे करून तो स्वतःहून राजीनामा देईल. हे धोरण जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये राबवले जात आहे. त्याला प्रत्युत्तर देणारा हा ‘रिव्हेंज क्विटिंग’चा ट्रेंड चांगलाच चर्चेत आला आहे.
इंदौरमधल्या एका कंपनीतील गुरकरण सिंग या एचआरने Linkedin या बेवसाइटवर ‘रिव्हेंज क्विटिंग’बद्दल एक पोस्ट लिहिली. ती पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. या पोस्टमध्ये गुरकरण सिंग यांनी म्हटले आहे, ‘क्वाएट क्विटिंग’ (शांतपणे नोकरीतून माघार घेणे) हे नोकरी सोडण्यापेक्षा केवळ व्यस्तपणा कमी करण्यासाठी आहे, तर ‘रिव्हेंज क्विटिंग’ याच्या अगदी उलट आहे. म्हणजे ती पूर्णपणे नाराजीतून घेतलेली राजीनाम्याची ठाम भूमिका असते.
जेव्हा एखादा कर्मचारी ठरवतो की, कंपनीला माझ्या जाण्याचा पश्चात्ताप व्हायला हवा, तेव्हा ही रिव्हेंज क्विटिंगची भावना निर्माण होते आणि त्यातून राजीनामा देण्याची प्रक्रिया सुरू होते. हा अत्यंत निराशाजनक, कुठलीही पूर्वकल्पना न देता, अचानक दिलेला राजीनामा असतो. एखादी कठोर कारवाई, जास्त काम करूनही त्याचा योग्य मोबदला न मिळणे किंवा योग्य मूल्यमापन न होणे, कामाच्या ठिकाणी होणारा मानसिक त्रास यातून ही भावना निर्माण होते. सिंग यांनी ही पोस्ट लिहित असतानाच उपाय म्हणून व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांशी सातत्याने बोलले पाहिजे, त्यांना कामाबद्दल प्रोत्साहन दिले पाहिजे, असा सल्लाही दिला आहे.
सिंग यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘रिव्हेंज क्विटिंग’ची असंख्य उदाहरणे आहेत. असेच एक उदाहरण एका परदेशी कंपनीत काम करणाऱ्या एका भारतीय व्यक्तीचे आहे. त्यांनी त्यांचा ‘रिव्हेंज क्विटिंग’चा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. ते लिहितात, “मी तब्बल वर्षभर माझ्या बॉसला सांगत होतो की, मी एकटाच सिस्टीम सेटिंग्जसाठी ॲडमिन अॅक्सेस असलेला कर्मचारी आहे. त्यामुळे अजून कोणीतरी तो अॅक्सेस घेतला पाहिजे. पण त्यांना काहीही चिंता नव्हती. कारण त्यांच्यासाठी सगळे सुरळीत चालू होते. माझ्यावरचा कामाचा ताण मात्र वाढत होता. सतत दुर्लक्षित केल्यामुळे मला राग येत होता. कामाचा मोबदलाही तुलनेने कमी होता. मी कंटाळून नवीन नोकरी शोधायला सुरुवात केली आणि राजीनामा दिला. साधारण महिनाभरानंतर माझ्या जुन्या बॉसचा मेसेज आला की, कॉफीसाठी भेटायचे आहे. मी नकार दिला. नंतर कॉल आला. काही सेटिंग्ज कशा बदलायच्या ते विचारण्यासाठीचा हा कॉल होता. त्यांनी काही शाखा बंद केल्या होत्या, पण तरीही लीड्स त्या बंद शाखांमध्येच जाऊ लागले होते. मी त्यांना सांगितले की, मला आनंदाने प्रशिक्षण द्यायला आवडेल, पण माझ्या ‘कन्सल्टिंग फी’च्या रेटवर. (अर्थात, मी अधिकृत कन्सल्टंट नव्हतो. त्यामुळे माझी फी नव्हती.) बॉस भयंकर संतापले. साधारण आठवडाभरानंतर त्यांचा पुन्हा कॉल आला. ठीक आहे, आम्ही तयार आहोत फी द्यायला. मी लगेच विचारले की, मी कन्सल्टंट म्हणून येऊ का? तर अर्थातच ‘नाही’ असे उत्तर मिळाले. मग त्यांनी मला एक फॉर्म पाठवला. मी तो भरून पाठवला. काही आठवडे गेले, अखेर व्हेंडर मॅनेजमेंट टीमने मला मंजुरी दिली. मी बिड प्रपोजलमध्ये १०,००० डॉलरचा अंदाज मांडला आणि पाठवला. बॉस संतापले. मग मी एक वेबसाइट तयार केली. मी स्वतःला त्यांच्या वापरात असलेल्या सॉफ्टवेअरमध्ये तज्ज्ञ असलेला व्हाइट हॅट हॅकर असल्याचे दाखवले. वेबसाइट खूप प्रोफेशनल दिसत होती. काही दिवसांतच फोन वाजला. तो माझ्या बॉसच्या बॉसचा होता. ते मला सांगू लागले की, त्यांच्या डेटामध्ये खूप अडचणी येत आहेत, सिस्टीमचा अॅक्सेस मिळत नाहीए. मी त्यांना विचारले की, “तुम्हाला वाटते की ही समस्या मी सोडवू शकतो?” तेव्हा त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. मग मी नवीन बिड तयार केले. त्यात १०,००० डॉलर + खर्च अशी नवी रक्कम जोडली. अर्धे पैसे कामाच्या आधी आणि अर्धे पूर्ण झाल्यावर घेण्याचे ठरले. त्यांनी ते ताबडतोब मंजूर केले. त्यानंतर मी त्यांना पासवर्ड आणि ट्रेनिंग डॉक्युमेंट्स कुठे सापडतील ते पाठवले. लगेच फोन वाजला. समोरचा आवाज अत्यंत चिडलेला होता. ‘छे! आम्ही उरलेले पैसे देणार नाही’ असे मला सांगण्यात आले. मी शांतपणे कॉन्ट्रॅक्टचा संदर्भ दिला आणि आता आपण कायदेशीरपणे बोलूया, असे सांगितले. ते गप्प झाले आणि फोन कट केला. काही दिवसांत माझ्या खात्यात उरलेले ५००० डॉलर आले. हे पैसे मला माझ्या नवीन नोकरीत रूजू होईपर्यंत खूप उपयोगी पडले.” या व्यक्तीसारखे असंख्य अनुभव सध्या सोशल मीडियावर वेगाने शेअर होत आहेत. त्याला #RevengeQuitting असा हॅशटॅग मिळत आहे.
‘ग्लासडोअर’ ही सर्वाधिक कॉर्पोरेट क्षेत्रातील युझर्स असलेली बेवसाइट आहे. या वेबसाइटचा जगभरातील नोकऱ्या शोधण्यासाठी, अभिप्राय लिहिण्यासाठी, कॉर्पोरेट क्षेत्रातील नेटवर्क वाढवण्यासाठी वापर केला जातो. या ग्लासडोर कंपनीने ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या एका सर्वेक्षणात ३,३९० कंपन्यांचा समावेश करण्यात आला होता. या सर्वेक्षणात असे आढळले की, तीनपैकी जवळपास दोन कर्मचारी आपल्या सध्याच्या भूमिकेत अडकून पडल्यासारखे वाटत आहेत. विशेषतः तंत्रज्ञान आणि जाहिरात क्षेत्रातील कर्मचारी आपल्या करिअरच्या संधींबाबत असमाधानी आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ग्लासडोरच्या डेटानुसार २०२४ मध्ये नोकरी बदलताना १७% कर्मचाऱ्यांनी पगार कपात स्वीकारली, तर २०२३ मध्ये हा आकडा १५% होता. याचा अर्थ काही कर्मचारी केवळ नोकरीतील निराशेतून बाहेर पडण्यासाठी कमी पगाराची नोकरी स्वीकारायलाही तयार आहेत आणि ते याकडे ‘रिव्हेंज क्विटिंग’- सूड म्हणून राजीनामा देणे या अर्थाने पाहत आहेत. ही कंपन्यांसाठी धोक्याची घंटा मानली जाते. यासाठी कंपन्यांनी आपली कार्यपद्धती सुधारण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
prajakta.p.pol@gmail.com