राईट टू पी

स्टेजवरून उठून लघुशंकेला जरी गेला तरी कार्यकर्ते त्याच्या नावाचा जयघोष करतात! कदाचित तेव्हाही कार्यकर्ते, ‘- - - तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं
राईट टू पी

असं म्हणतात की, निसर्गाचे वेग आणि शरीराचे आवेग कोणालाच आवरता येत नाहीत, मग तो लहान असो की मोठा असो, सामान्य असो की असामान्य असो. आता हेच पाहा ना, लघुशंका कोणाला येत नाही? लहान पोर असो की मोठा झालेला (पण, पोरकट राहिलेला) माणूस असो, ज्याला शेजारीपाजारीसुद्धा ओळखत नाहीत, असा एखादा ऐराखैरा असो की, एखादा प्रचंड लोकप्रिय (म्हणजे इतका लोकप्रिय की, तो स्टेजवरून उठून लघुशंकेला जरी गेला तरी कार्यकर्ते त्याच्या नावाचा जयघोष करतात! कदाचित तेव्हाही कार्यकर्ते, ‘- - - तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।’ म्हणत असावेत!) नेता असो, सत्ताधारी नेता असो की, विरोधी पक्षनेता असो, लघुशंकेपासून कोणाचीच सुटका नाही. एकवेळ ज्याला कधी कोणाची शंकाच आली नाही, असा माणूस शोधला तर सापडेलसुद्धा कदाचित; पण ज्याला कधी लघुशंकाच आली नाही, असा माणूस या भूतलावर शोध शोध शोधला तरी सापडणार नाही.     लहान वयात माणूस पोरकट असतो. त्या वयात पोरकटपणा शोभतोसुद्धा. एखादा कार्यक्रम, एखादं नाटक रंगात आलेलं असतं आणि चिरंजीव आपल्या आईला ‘करंगळी’ दाखवतात. ती बिचारी कार्यक्रम सोडून निमुटपणे उठते आणि त्याला बाहेर घेऊन जाते. एखाद्या कार्यक्रमाला जाताना घरून कोणकोणते ‘विधी’ उरकून जावेत हे लहान मुलाला कसं कळणार? हळूहळू ते पोरवय संपतं आणि माणूस वाढत्या वयासोबत पोक्त होत जातो, असं म्हणतात. सर्वांनाच हे लागू होतं का? तर काहींना हे लागू होतं, काहींना लागू होत नाही. कोणाला लागू होतं असं विचाराल तर ते अस्मादिकांना लागू होतं. (सौ.च मत याबाबतीत अगदीच भिन्न आहे; पण ते असो.) कोणाला लागू होत नाही असं विचाराल तर ते अनेकांना लागू होत नाही. या अनेकांमधला एक म्हणजे आमचा ‘पहाट मित्र’ (आम्ही दोघं अधूनमधून पहाटे एकत्र फिरायला जात असतो, म्हणून ‘पहाट मित्र’) दादा! म्हणजे तसं त्याचं खरं नाव ‘अजिंक्य’ आहे; पण त्याची ‘ताई’ त्याला सारखं ‘आमचा दादा. आमचा दादा.’ म्हणत असते, म्हणून आम्हीही त्याला दादाच म्हणतो. हा आमचा मित्र तसा गावातल्या मुलांमध्ये भलताच लोकप्रिय आहे. सदानकदा दहा-बारा तरी टगे त्याच्या अवतीभवती असतातच. तसा तोसुद्धा ‘स्वयंघोषित’ टग्याच आहे. तसे तर आमच्या या मित्राचे अनेक किस्से सांगण्यासारखे आहेत; पण नुकताच त्याच्या लग्नात घडलेला किस्सा तर एकदमच भन्नाट आहे. त्याचं असं झालं की, आमच्या या ‘पहाट मित्रा’चं म्हणजेच अजिंक्य दादाचं लग्न होतं. मांडव खचाखच भरला होता. अर्थात, त्या दिवशी मांडवात वऱ्हाडी मंडळीसोबत गावातील निदान शे-दीडशे तरी टगे असतील, जे दादावरच्या प्रेमापोटी तिथे आले होते. हल्लीच्या रिवाजाप्रमाणे पाहुण्यांचे स्वागत, त्यांच्या स्तुतीपर भाषणं सुरू झाली. त्या धामधुमीत दादाकडे कोणाचंच लक्ष राहिलं नाही. थोड्या वेळाने कोणाच्या तरी लक्षात आलं की, स्टेजवर स्तुतीपर भाषणं सुरू आहेत; पण आजच्या कार्यक्रमाचा नायक, म्हणजेच दादा स्टेजवरून गायब आहे. त्याची खुर्ची रिकामी दिसतेय. मांडवात एकच हलकल्लोळ माजला. मांडावातले टगे ‘दादा, दादा’चा ओरडा करू लागले. दादाची शोधाशोध सुरू झाली. दादाची ‘ताई’ तर अगदीच सैरभैर झाली. आपल्या दादाला सगळीकडे शोधू लागली. मांडवातला गलका क्षणोक्षणी वाढू लागला. वधूपिता तर अगदीच बेचैन झाला. आपल्याकडून जावईबापूंचा काही अपमान तर झाला नाही ना, या विचाराने बेचैन झाला, धास्तावला. सगळेच चिंतेत पडले. थोड्याच वेळात दादाची ताई धावतच आली आणि स्मितहास्य करत कार्यक्रमाच्या कार्यवाहकांच्या कानात काहीतरी पुटपुटली. कार्यवाहकांनी पुरोहिताच्या हातातून माईक (एखाद्या उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातातून घ्यावा तसा) आपल्या हातात घेतला आणि ते सुहास्य वदनाने वदले, “काही चिंता करू नका. दादा जरा लघुशंकेला गेले आहेत. बोलवू आपण त्यांना.” सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. नंतर मित्रांशी बोलताना दादा आपला संताप व्यक्त करत बोलला, “म्हणजे मी काय ‘वॉश रूम’लापण जायचं नाही का? जाता जाता : - या घटनेनंतर आमच्या मनात काही मूलभूत प्रश्न ‘टगेगिरी’ करू लागले आहेत. एखादा माणूस वयाने मोठा असला, त्यातल्या त्यात तो लोकप्रिय असला तर त्याने लघुशंकेला जाऊ नये का? एखाद्या कार्यक्रमादरम्यान उठून लघुशंकेला जाणे, हा भारतीय दंड विधानाप्रमाणे गुन्हा आहे का? अशा आणीबाणीच्या प्रसंगी स्टेजवरून खरे कारण जाहीर करणे योग्य आहे का? आणि आता हा प्रसंग जमेला धरून पुरुषांनीसुद्धा ‘राईट टू पी’ चळवळ सुरू करावी का? एखाद्या राजकीय पक्षाने अशा चळवळीला पाठिंबा द्यावा का?

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in