रस्ते की मृत्यूचे सापळे?

मर्सिडिज कारचा वेग नियंत्रणाबाहेर गेल्याने हा अपघात झाल्याचे दिसून आले आहे.
रस्ते की मृत्यूचे सापळे?

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण मोटार अपघातात निधन झाले. त्यांच्यासमवेत असलेल्या जहांगीर दिनशा पंडोल यांचाही या अपघातात मृत्यू झाला. तर अपघातग्रस्त मर्सिडिज गाडी चालवत असलेल्या मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ अनाहिता पंडोल आणि त्यांचे यजमान दरियास पंडोल हे दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले. मर्सिडिज कारचा वेग नियंत्रणाबाहेर गेल्याने हा अपघात झाल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्र शासनाने या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले असून त्यानंतर नेमक्या कोणत्या कारणांमुळे हा अपघात घडला ते स्पष्ट होईल; पण या अपघातात देशाने एक प्रसिद्ध उद्योगपती गमावला आणि त्याचा औद्योगिक क्षेत्रास जबर धक्का बसला आहे, हे नाकारता येणार नाही. रस्ते अपघातात आतापर्यंत असंख्य लोकांचे बळी गेले आहेत. काही अपघात रस्त्यांच्या भयानक अवस्थेमुळे होत असल्याचे; तर काही अपघात वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे घडत असल्याचे

लक्षात येते. काही दिवसांपूर्वी माजी आमदार विनायक मेटे यांचे मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर त्यांच्या मोटारीला अपघात होऊन निधन झाले. प्रसिद्ध अभिनेत्री भक्ती बर्वे, अभिनेता आनंद अभ्यंकर, काँग्रेसच्या नेत्या आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विजया पाटील अशा काही व्यक्तींवर रस्ते अपघातात मृत्यूने घाला घातल्याची आणखी काही ठळक उदाहरणे! रस्ते अपघातात देशभरात असंख्य नागरिक मृत्युमुखी पडत असतात आणि जखमी होत असतात. अशा घटना घडत असल्याचे दिसून येत असताना त्यापासून काही बोध घेऊन सुरक्षितपणे वाहने चालविली जात असल्याचे आढळत नाही. राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, २०२१ या एका वर्षामध्ये देशभरात रस्ते अपघातात एक लाख ५५ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. केवळ रस्ते अपघातात एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक मरण पावत असतील, तर याचा अत्यंत गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे, असे म्हणता येईल. २०२१मधील आकडेवारी म्हणजे आतापर्यंतचा उच्चांक आहे. देश एकीकडे प्रगती करीत आहे, नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करीत आहे, भारतीय अर्थव्यवस्था महासत्तांना मागे टाकण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. असे सर्व घडत असताना रस्ते अपघातांचे प्रमाण कमीत कमी ठेवण्यामध्ये आपण मागे कसे? सर्व रस्ते अपघातशून्य असले पाहिजेत, अशी कितीही अपेक्षा ठेवली तरी तसे होणे शक्य नाही, हे आपण जाणतो; पण अपघातांचे प्रमाण कमी कसे राहील, याकडे लक्ष देणे तरी आपल्या हातात आहे ना? पण वाहतुकीचे नियम पाळण्याऐवजी न पाळण्याकडे वाहनचालकांचा ओढा असल्याने असे वाहनचालक आपल्या कृतीतून अपघातांना निमंत्रण देत असतात. महामार्ग किंवा द्रुतगती मार्गांवर किती वेगाने वाहने चालवावीत याचे काही नियम घालून देण्यात आले आहेत; पण अनेक वाहनचालक ते नियम धाब्यावर बसवत असल्याचे दिसून येते. वाहन चालविताना शिस्त पाळली जात नाही, चुकीच्या दिशेने वाहने ओव्हरटेक केली जातात. जे नियम केले आहेत ते आपल्या सुरक्षिततेसाठी केले आहेत हे लक्षात घेऊन ते तोडले जात कामा नयेत, याचे बंधन किती वाहनचालक स्वतःवर लादून घेतात? नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासारख्या मार्गांवर कॅमेरे लावण्यात आले आहेत; पण कॅमेरे जेथे बसविण्यात आले आहेत त्याच्याजवळ आले की, वाहनांचा वेग कमी करायचा आणि त्यानंतर वाहने सुसाट पळवायची, अशी उदाहरणे नित्यनेमाने आढळून येत असतातच! बेदरकारपणे वाहन चालविण्याचे प्रमाण २५.७ टक्के असल्याचे राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. बेदरकारपणे वाहने चालविल्यामुळे वर्षभरात ४२,८५३ मृत्यू झाले आणि ९१,९८३ लोक जखमी झाले. तरीही बेदरकारपणे वाहने चालविण्याचे प्रमाण घटल्याचे दिसून येत नाही. २०२१ या वर्षभरात एकूण रस्ते अपघात चार लाखांहून अधिक झाले. त्या अपघातात १.५५ लाख लोक मृत्युमुखी पडले; तर ३७१ लोक लोक जखमी झाले. चारचाकी वाहनांपेक्षा जास्त अपघात दुचाकींचे होतात; पण अपघात टाळण्यासाठी आपण हेल्मेट वापरायला हवे, असे अनेक महाभागांना पटत नाही. आता तर दुचाकीच्या मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे; पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. रस्ते अपघात टाळण्यासाठी जे नियम केले आहेत, त्यांचे काटेकोर पालन केल्यास अनेक लाखमोलाचे जीव वाचतील; पण याकडे गंभीरपणे कोण लक्ष देणार?

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in