रोहित पवार, मफलरवाले गेले कुठे?

महाराष्ट्रात आता मित्रपक्षांमध्येच चढाओढ लागली आहे. सत्तेत राहायचे, सत्तेचा उपभोग घ्यायचा आणि त्याच सत्तेवर टीका करायची, असा प्रयत्न मित्रपक्षांकडून केला जात असल्याचे दिसते. याचे जनक आमदार रोहित पवार आहेत, असा आरोप केला जातो.
रोहित पवार, मफलरवाले गेले कुठे?
रोहित पवार, मफलरवाले गेले कुठे?
Published on: 

सह्याद्रीचे वारे

अरविंद भानुशाली

महाराष्ट्रात आता मित्रपक्षांमध्येच चढाओढ लागली आहे. सत्तेत राहायचे, सत्तेचा उपभोग घ्यायचा आणि त्याच सत्तेवर टीका करायची, असा प्रयत्न मित्रपक्षांकडून केला जात असल्याचे दिसते. याचे जनक आमदार रोहित पवार आहेत, असा आरोप केला जातो.

राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू होऊन नऊ महिने उलटून गेले. बारामती विमानतळावर विमान कोसळून हा अपघात झाला होता. परंतु, या अपघाताचे अनेकांनी राजकारण केले. हा अपघात नव्हता, तर अजितदादांना मारण्यासाठी कटकारस्थान रचण्यात आले होते, असा आरोप अजित पवार यांचे चुलतभाऊ आणि आमदार रोहित पवार हे सतत करत होते.

आता तर त्यांनी एक मफलरवाला शोधून काढला होता. त्याबाबत ते ११ ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन त्या मफलरवाल्याचे नाव आणि कटकारस्थान जाहीर करणार होते. परंतु, ११ ऑक्टोबर उलटून १५ दिवस झाले, तरी तो मफलरवाला पुढे आला नाही. याबाबत रोहित पवार हे सतत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत होते. या मफलरवाल्याचे आणि विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांचे साटेलोटे होते, असे रोहित पवार म्हणत होते.

हा मफलरवाला केंद्रात नाही, तर दुसऱ्या दिवशी हा मफलरवाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही नाही, असा खुलासा रोहित पवार यांनी केला होता. मात्र, आता या प्रकरणाला पूर्णविराम मिळाल्याचे दिसून येते. रोहित पवार हे प्रसिद्धीच्या माध्यमातून पुढे येत आहेत. कुस्ती, मोर्चा असो, निदर्शने असोत अथवा रास्ता रोको असो, तेथे दुसऱ्याच मिनिटाला रोहित पवार हजर झालेले दिसतात. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा सर्व भार सध्या रोहित पवार यांच्यावर असल्याचे दिसते. ते सर्वसाधारणपणे राहुल गांधी यांची नक्कल करू लागले आहेत.

अजितदादांच्या मृत्यूनंतर रोहित पवार यांनी अनेक वेळा संशय व्यक्त केला. केंद्र सरकारच्या विमान वाहतूक यंत्रणेने या अपघाताची दखल घेऊन चौकशी केली, तर महाराष्ट्र सरकारच्या सीआयडीनेही चौकशी करून हा अपघात असल्याचा अहवाल दिला आहे. परंतु, हे मान्य करण्यास रोहित पवार तयार नाहीत. या विमान अपघाताबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि विद्यार्थ्यांचे मोर्चे या विषयांवरही ते सक्रिय आहेत. विद्यार्थी आंदोलन काँग्रेसने करू द्या अथवा भाजपने करू द्या, तेथे रोहित पवार प्रथम हजर असतात.

एमपीएससीच्या अध्यक्षांना रजेवर पाठवून तेथे तात्पुरता नवीन अध्यक्ष नेमण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाबाबत रोहित पवार यांची हवाच काढून घेतली. सध्या ते राहुल गांधी यांच्याप्रमाणे स्टंट करू लागले आहेत. मी फार मोठा अभ्यासक आहे, हे दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. अजितदादांच्या मृत्यूनंतर ते सतत या प्रकरणावर भाष्य करत आहेत. प्रत्यक्षात एकही पुरावा पुढे आला नव्हता. मफलरवाल्याच्या नावाने पुन्हा एकदा संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, ते प्रयत्न फुस्स झाले.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्या नेत्यांना डावलून रोहित पवार पुढे आले आहेत. ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे तर ते प्रतिस्पर्धी असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याऐवजी धोरणात्मक निर्णय स्वतः जाहीर करत आहेत. राज्यातील अनेक निर्णयांबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार भाष्य करत नसले, तरी त्यांची गादी रोहित पवार चालवतात, यात शंका नाही. खरे पाहता, त्यांच्या विधानसभा मतदारसंघात अनेक जटिल प्रश्न उभे आहेत. त्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा देशाच्या राजकारणातच भाजपविरोधात प्रभावी ठरण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. यासाठी ते प्रसिद्धीच्या झोतात सतत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवार यांच्या अपघाताचा सूत्रधार मफलरवाला होता, असा संशय व्यक्त करण्यात आला; परंतु तो सिद्ध करता आला नाही. मोठमोठी विधाने करायची आणि प्रसिद्धीच्या झोतात राहायचे, एवढेच काम रोहित पवार यांना आहे, असे दिसते.

रोहित पवार यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरेही पुढे आले आहेत. सन २०१४ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेऊन भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे बीडला येत असताना झालेल्या अपघाताबाबत त्यांनी संशय व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांना बारा वर्षांनंतर ही आठवण झाली. स्व. गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू होऊन एवढी वर्षे लोटली असताना आता शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला आहे. गोपीनाथ मुंडे यांना केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून कशी वागणूक दिली जात होती, हे जगजाहीर आहे.

मात्र, त्याबाबत काही सत्य असेल, तर ते पुराव्यानिशी मांडणे आवश्यक आहे. पुरावे सादर न करता निव्वळ हवेत बाण सोडणे योग्य नाही. विरोधी पक्षांकडून अशा प्रकारची विधाने होत असताना त्यांची सत्यता तपासणे आवश्यक आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकारण हिंदोळ्यावर उभे आहे. महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असल्याचा आरोप केला जातो. जेव्हा मतपेटीद्वारे सरकार पाडता येत नाही, तेव्हा अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, असे म्हटले जाते. महाराष्ट्राबरोबरच देशातही असे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते.

महाराष्ट्रात आता मित्रपक्षांमध्येच चढाओढ लागली आहे. विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान होत असल्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंमध्ये मतभेद आणि वाद सुरू आहेत. निवडणुकीचे निकाल काय लागतात, यावर राज्यातील राजकारणाचे चित्र स्पष्ट होईल. सत्तेत राहायचे, सत्तेचा उपभोग घ्यायचा आणि त्याच सत्तेवर टीका करायची, असा प्रयत्न मित्रपक्षांकडून केला जात असल्याचे दिसते. याचे जनक आमदार रोहित पवार आहेत, असा आरोप केला जातो.

उद्धव ठाकरे यांनी हे सरकार पाच महिन्यांत पाडणार, अशी घोषणा केली आहे, तर त्यांचे बंधू राज ठाकरे यांनी सहा महिन्यांचे भाकीत केले आहे. इतर देशांतील घटनांचा दाखला देऊन राजकारण केले जात आहे. नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आणि फ्रान्स येथील उदाहरणे देऊन काही राजकीय नेते एकत्र आले आहेत. त्यात प्रामुख्याने राहुल गांधी, ठाकरे बंधू आणि रोहित पवार हे पुढे दिसत आहेत. सीजेपीला पुढे करून देशभरात अराजकता निर्माण करण्याची चाल खेळली जात आहे. एवढेच कशाला, आता लष्करालाही पाचारण करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.

भारतात संविधानानुसार राज्यकारभार चालतो. परंतु, विरोधकांना हे मान्य नसल्याचा आरोप केला जातो. त्यांच्या लक्षात आले आहे की, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका २०२९ पर्यंत होऊ शकणार नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने सरकार उलथवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे म्हटले जाते. हे लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर आहे. घटनात्मक संस्थांना आव्हान दिले जात आहे. यावरून संविधानाबाबत विरोधकांची भूमिका काय आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संविधानाने निर्माण केलेल्या घटनात्मक पदांवरच टीका करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे.

प्रारंभी राज्यपाल, विधानभवन आणि निवडणूक आयोग यांना लक्ष्य करण्यात आले होते. परंतु, त्यात यश न मिळाल्याने आता हे लोण देशपातळीवर पोहोचले आहे. प्रारंभी मतचोरीचे आरोप करण्यात आले, त्यानंतर ईव्हीएमवर आरोप झाले आणि आता निवडणूक आयोगावरच हल्ला केला जात असल्याचे म्हटले जाते. हे सर्व लोकशाहीविरोधी तंत्र असल्याचा आरोप केला जात आहे. केंद्र सरकारने याबाबत खंबीर पावले उचलण्याची गरज आहे. महाराष्ट्रात या घडामोडींचे सूत्रधार ठाकरे बंधू आणि रोहित पवार असल्याचा आरोप केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in