विशेष
समाधान हेंगडे पाटील
साल्हेर किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समाविष्ट झाला ही अभिमानाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा किल्ला ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. हा गौरव साजरा करतानाच त्याच्या संवर्धनाची जबाबदारी आपली आहे.
सह्याद्रीच्या कुशीत लपलेला, इतिहासाच्या गर्भात झळाळणारा आणि स्वराज्याच्या रणगर्जनांचा साक्षीदार असलेला साल्हेर किल्ला अखेर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये अधिकृतपणे समाविष्ट झाला. ही बातमी महाराष्ट्रासाठी, प्रत्येक शिवप्रेमीसाठी आणि इतिहासप्रेमी जगासाठी एक गौरवाचा दिवस ठरली आहे. या ऐतिहासिक पावलासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे मनापासून अभिनंदन. तसेच महाराष्ट्र शासनाचे, पुरातत्त्व विभागाचे, स्थानिक प्रशासनाचे आणि तमाम शिवभक्तांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. कारण हा सन्मान सहज मिळालेला नाही, तर दशकानुदशकं चाललेल्या जागृती, आंदोलन, संशोधन आणि एकात्म प्रयत्नांचे हे फळ आहे.
यात सर्वात महत्त्वाचे आभार जर कोणाचे मानायचे असतील, तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांचे मानावे लागतील. कारण त्यांनीच युनेस्कोच्या टीमला या गडकिल्ल्यांची ओळख करून दिली आणि या किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत व्हावा, यासाठी काही वर्षांपूर्वी प्रयत्न केला होता.
साल्हेर किल्ल्याचा एकंदरित इतिहास बघितला, तर आपल्या लक्षात येते की, इ.स. १६७१-७२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेर दुर्ग मुघलांकडून जिंकून घेतला. परंतु आपला किल्ला मराठ्यांकडून परत जिंकून घेण्यासाठी मुघल फौजा चाल करून आल्या आणि त्यांनी साल्हेरच्या दुर्गाला वेढा घातला. तो वेढा फोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले बालसवंगडी सरदार सूर्याजी काकडे, स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे आणि सरसेनापती प्रतापराव गुजर यांना पाठवले. इख्लासखान हा मुघल सेनेचा अधिपती होता. युद्धात खासा इख्लासखान याचा पराभव मराठ्यांनी केला. या युद्धात शिवाजीराजांचे बालमित्र सरदार सूर्याजी काकडे हे तोफेचा गोळा लागून मरण पावले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते की, "सूर्याराऊ पडिला, तो जैसा महाभारती कर्ण, तैसाच माझा सूर्यराव."
याच साल्हेरच्या मोकळ्या मैदानात मराठ्यांनी मुघलांना धूळ चारली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जेवढे गनिमी काव्याच्या युद्धात तरबेज होते, तेवढेच ते मोकळ्या मैदानातही लढाई करण्यात तरबेज होते, याचाच प्रत्यय या लढाईत येतो.
हे साल्हेरचे युद्ध म्हणजे मराठा आणि मुघल यांच्यातील पहिलं थेट युद्ध होतं. रणांगणावर मराठे आणि मुघल यांच्यात समोरासमोर हे युद्ध झाले. यात मराठ्यांच्या लढाऊ बळाचा आणि शिवछत्रपतींच्या दूरदृष्टीचा सर्वोत्तम नमुना दिसून आला. आज जेव्हा युनेस्कोने साल्हेरला जागतिक वारसा घोषित केलं, तेव्हा केवळ एक किल्ला जागतिक नकाशावर उभा राहत नाही, तर त्याच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यतत्त्व, मराठी अस्मिता आणि आत्मगौरव यांचाही हा जागतिक सन्मान आहे, ही अभिमानाची बाब आहे.
म्हणूनच माझी महाराष्ट्रातील नव्हे, तर संपूर्ण भारतातील शिवभक्तांना आणि नागरिकांना विनंती असेल की, हा क्षण केवळ साजरा करण्यापेक्षा तो आपल्याला जपायचा आहे. कारण आजचा तरुण सोशल मीडियावर पोस्ट करतो, स्टेटस ठेवतो. पण आता यापुढे फक्त गौरव साजरा न करता, गौरव जपण्याची, समजून घेण्याची आणि पुढे पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे.
शिवरायांचा खरा अभिमान तेव्हा ठरेल, जेव्हा त्यांच्या विचारांची मशाल नव्या पिढीच्या हातात असेल. त्यामुळेच इतिहास वाचू, समजून घेऊ, शाळा-महाविद्यालयांमध्ये त्यावर चर्चा करू आणि शिवछत्रपतींच्या विचारांना, तत्त्वाला आणि ध्येयाला प्रत्येकाच्या अंत:करणात जिवंत करू. सोशल मीडियावर केवळ सेल्फी नाही, तर इतिहासावर आधारित माहिती, लेख, भाषणं आणि व्हिडीओ शेअर करणे ही काळाची गरज आहे. त्यातूनच हा इतिहास सामान्य माणसाच्या मनामनापर्यंत रुजवण्यास मदत होईल.
साल्हेर किल्ल्याची नोंद जागतिक वारसा स्थळ म्हणून झाली, ही केवळ मान्यता नाही, तर ही आहे जबाबदारी. साल्हेरला जागतिक वारसा मिळणं म्हणजे आता त्या गडाची देखभाल, संवर्धन आणि शिस्तबद्ध पर्यटनाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. कोणताही गड ही फक्त ट्रेकिंगची जागा नाही, तो एक जिवंत इतिहास आहे. त्याची शुद्धता आणि पवित्रता टिकवणं हे प्रत्येक शिवभक्ताचं कर्तव्य आहे.
आज साल्हेरने इतिहासाला नव्याने उजाळा दिला आहे आणि महाराष्ट्राच्या शौर्याचा आवाज जगभर ऐकू जाऊ लागला आहे. हीच वेळ आहे जागतिक नकाशावर महाराष्ट्राची छाप पाडण्याची... शिवरायांच्या विचारांनी उभी राहिलेली नवी पिढी निर्माण करण्याची...