साने गुरुजी स्मारक एक बिन भिंतीची शाळा

साने गुरुजींचे हे १२५ वे जयंती वर्ष आहे. लेखक, कवी, अनुवादक, क्रांतिकारक, समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक, पत्रकार, संपादक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे साने गुरुजी म्हणजे मराठी भाषेचा मानबिंदू आहेत.
साने गुरुजी स्मारक एक बिन भिंतीची शाळा
psgvpasc.ac.in

- डॉ. संजय मंगला गोपाळ

लक्षवेधी

साने गुरुजींचे हे १२५ वे जयंती वर्ष आहे. लेखक, कवी, अनुवादक, क्रांतिकारक, समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक, पत्रकार, संपादक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे साने गुरुजी म्हणजे मराठी भाषेचा मानबिंदू आहेत. ‘खरा तो एकची धर्म - जगाला प्रेम अर्पावे’पासून ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान - शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, लावू पणाला प्राण’ अशी भूमिका मांडणाऱ्या व त्यासाठी आयुष्यभर कृतिशील राहिलेल्या साने गुरुजींच्या प्रेरणादायी विचारांना पुढे नेण्याचे काम ‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट’ करत आहे.

साने गुरुजींचा वैचारिक वारसा मानणाऱ्या लोकशाही-समाजवादी विचारांच्या साथींनी २५ वर्षांपूर्वी साने गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षात गुरुजींचे एक वेगळेच स्मारक उभारले आहे. गुरुजींचे जन्मगाव म्हणजे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड. येथून अवघ्या तास-दीड तासाच्या अंतरावरील माणगाव येथे ३६-३७ एकराच्या विस्तीर्ण परिसरात साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या माध्यमातून एक विलक्षण प्रेरणादायी स्मारक उभे राहिले आहे.

स्मारकात प्रवेश करताच आपल्याला दिसते साने गुरुजी जीवनदर्शन प्रदर्शनी. जरा पुढे असलेल्या आंतरभारती संकुलात एका बाजूला पद्मश्री दया पवार संदर्भ ग्रंथालय आहे. यात गुरुजींची अप्रकाशित हस्तलिखिते संग्रहित करण्यात आली आहेत. दुसऱ्या बाजूच्या एका दालनात ज्येष्ठ साहित्यिक व स्मारकाचे पूर्व विश्वस्त व उपाध्यक्ष रत्नाकर मतकरी यांनी नर्मदा आंदोलन सुरू असताना नर्मदा घाटीत जाऊन चितारलेली चित्रं आहेत. तिसरीकडल्या दृक‌्श्राव्य सुविधा असलेल्या सभागृहात व्याख्याने वा चर्चासत्रं भरवण्याची सोय आहे. पुढे आपण जातो स्मारकातील वडाखाली. इथे शिबिरार्थी वडाखालच्या मांडवात बसतात, तन्मयतेने साने गुरुजींबद्दल समजून घेतात, भारतीय संविधानाबद्दल माहिती घेतात, पर्यावरण विषयावर चर्चा करतात. याच मध्यवर्ती ठिकाणाच्या आजुबाजूस मृणाल गोरे संकुल व युवा भवन या निवासी इमारती आहेत. यात स्वयंसज्ज निवासी खोल्या व एकत्रित राहण्याची सोय असणाऱ्या डाॅर्मिटरीज आहेत. खेळाच्या मैदानाच्या एका बाजूला आहे ॲम्फी थिएटर, तर पलीकडे आहे स्मारकाचे जेवण घर. जेवण घरासमोरील कॅम्पिंग ग्राऊंडवर तंबू ठोकून निवासाची सोय आहे. या सर्व निवासी संकुलांच्या पलीकडून वाट जाते ती परिसरातील जंगल पहाडात भटकण्याची, विहारण्याची. परिसरातील बहुसंख्य भाग हा कोणत्याही प्रकारचे बांधकाम न करता नैसर्गिक स्वरूपात जतन केलेला आहे. अनेक स्थानिक वनस्पती, पशू-पक्षी इथे सुरक्षित आहेत.

स्मारकात समविचारी संघटना-संस्था येऊन आपली शिबिरं-बैठका घेतात. महाविद्यालयांची राष्ट्रीय सेवा योजनांची शिबिरे होतात. व्यावसायिक आस्थापना आपल्या बैठका-काॅन्फरन्सेस इथे आयोजित करू शकतात. याशिवाय स्मारकाच्या वतीने वर्षभर वेगवेगळ्या वयोगटांसाठी विशेष शिबिरे व कार्यक्रम होत असतात.

प्रेरणा प्रबोधन शिबिरे

माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच्या सुट्टीनंतर साधारणतः ॲाक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात प्रेरणा प्रबोधन शिबीर मालिकेला सुरुवात होते. तीन दिवसांच्या या शिबिरात राज्याच्या विविध भागांमधून मुली-मुलं इथे येतात. २००२ सालापासून गेली वीस-एकवीस वर्षे अव्याहत सुरू असलेली ही शिबीर मालिका हजारो किशोरवयीन मुलांच्या आयुष्यात परिवर्तनवादी विचारांचे रोपटे रुजवणारी आहे. मुलांना समाजभान देणारी आहे. स्वावलंबनाचा धडा या मुलांना शिबिरात न सांगताच मिळतो आणि समतेच्या वाटेवर आपोआपच त्यांची वाटचाल सुरू होते.

या शिबिरात विषयवार सत्र होतात. पण ती शाळेतील अभ्याससत्र न होता संवादी स्वरूपात आणि उपक्रमांवर आधारित असतात; त्यामुळे ही सत्रं ज्ञानदायी आणि रंजकही होतात. शालेय अभ्यासक्रमातील नागरिकशास्त्रातील धडे संविधानाच्या मूल्यांशी जोडून घेत घेतलेले सत्र असो वा विज्ञानाधारित संकल्पनांशी तसेच पर्यावरणाशी जोडून घेत चालवलेले संवादी सत्र असो, ही किशोरवयीन मुलं नवनवीन विचारांच्या मुशीत आपोआप घडत जातात.

अभिव्यक्ती शिबिरे

२०१७ सालापासून स्मारकातर्फे ९ ते १३ वर्षे वयोगटासाठी पाच दिवसांची अभिव्यक्ती शिबिरे दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीत आयोजित केली जातात. घराच्या चार भिंतीत सुरक्षित आयुष्य जगत आलेली ही मुले स्मारकातील बिनभिंतीच्या शाळेत पूर्वी कधीच न अनुभवलेल्या गोष्टी शिकत असतात, अनुभवत असतात आणि आपापल्या पद्धतीने अभिव्यक्तही होत असतात. मुले मोकळ्या आभाळाखाली मातीत हात घालून मातीचा स्पर्श मनात साठवतात, मातीशी असलेले आपले नाते समजून घेतात, चाकावरचे कुंभारकाम शिकतात आणि मातीपासून स्वतः वस्तू बनवतात.

 सकाळी लवकर उठून संगीताच्या तालावर व्यायाम केला जातो. त्यानंतर पक्षी निरीक्षणासाठी भटकंती सुरू होते. कधी मुले सकाळी नदीवर फिरायला जातात, तर कधी स्मारकातल्याच नेचर ट्रेलला जातात आणि बैलगाडीतील सफरीतील मजा तर औरच! मुलांमध्ये साहसी वृत्ती वाढावी यासाठी झूमरिंगसारखे साहसी खेळही घेतले जातात. दिवसभराच्या सत्रांनंतर एखादी रात्र ही आकाश दर्शनाची असते. त्याआधी अंधारातला थरारही मुलं अनुभवतात आणि अंधार आणि त्याच्याशी संबंधित अंधश्रद्धांबद्दल मोकळेपणाने चर्चाही होते. नाट्यलेखन व अभिनयाच्या अभिव्यक्तीला कोणत्याच सीमा नसतात हे प्रत्यक्ष नाट्याविष्कारातून शिकवले जाते आणि मग पाच दिवसांत तयार होतात छोट्या-छोट्या नाटुकल्या. शिबिरातून परत जाताना मैदानी खेळांची ऊर्जा आणि समतेची शिकवण देणारी नवनवीन गाणी ही शिदोरी मुलांजवळ असते.

युवा छावणी

स्मारकाच्या सुरुवातीपासूनच तरुणांना केंद्रबिंदू ठेवून स्मारकात युवाछावणीचे आयोजन केले जाते. सन २००० पासून अव्याहत सुरू असलेल्या या छावणीच्या मांडवाखालून हजारो युवक-युवती गेल्या आहेत आणि परिवर्तनाच्या चळवळीत काम करत आहेत. १७ ते २५ या वयोगटासाठी असलेले हे छावणी शिबीर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तरुणाईला कायमच साद घालत असते आणि दरवर्षी भर उन्हाळ्यात एक ते आठ मे दरम्यान स्मारक परिसर फुललेला असतो. ‘स्वभान ते समाजभान’ ही संकल्पना या छावणीद्वारे तरुणांच्या हृदयात उतरते. दरवर्षी सत्ता, विज्ञान-तंत्रज्ञान, हवामान बदल, प्रतिरोध अशा स्वरूपाची एकेक थीम घेऊन त्या भोवती सत्रांची गुंफण केलेली असते. या छावणीत विचारांच्या पेरणीबरोबरच श्रमसहयोगाचे महत्त्व तरुणाईला सांगितले जाते. हजारो तरुण-तरुणी श्रमसहयोग आणि मानवतेचे बीज घेऊन इथून बाहेर पडतात ते राष्ट्र उभारणीचं स्वप्न बघतच!!

‘समाजभान’ ही संकल्पना तरुणांच्या हृदयात उतरवत असताना त्याचे भान स्मारकानेही नेहमीच राखले आहे. मग २०२० सालचा चक्रीवादळाचा कोकणाला बसलेला तडाखा असो वा २०२१ला महाड व चिपळूण परिसरात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने घातलेने थैमान असो. ‘साथी हाथ बढाना’ असे म्हणत स्मारक नेहमीच अशा आपत्कालीन मदतकार्यात उतरले आहे. कोविड काळात छावणी भरली नाही, पण छावणीच्या मांडवाखालून गेलेली तरुणाई ‘वेदना जाणावयाला जागवू संवेदना’ म्हणत जीवाची पर्वा न करता बाहेर पडली आणि वस्तीतल्या हातावर पोट असलेल्यांना आणि प्रवासी मजुरांना मदत करत राहिली. छावणीतला मुंबईच्या वस्तीत राहणारा कोणी दीपक सोनावणे ‘भाकर फाऊंडेशन’च्या माध्यमातून वस्तीतील एकल महिला व बालकांबरोबरच हजारो असंघटित वंचितांना जेवण पुरवत होता, तर मुंबईचाच आमिर काझी प्रवासी मजुरांना मदत करत होता. पुण्याचा सुदर्शन चखाले वस्तीपातळीवर मदत करता करता रस्त्यावर उतरून मजुरांना मदत करत होता. सोलापुरातला आतिश तर रस्त्यावर भटकणाऱ्या मनोरुग्णांना ‘संभव फाऊंडेशन’च्या माध्यमातून मनोयात्री बनवून नवसंजीवन देत आहे. चिपळूणमधला अभ्यासू मल्हार इंदुलकर पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा वसा घेऊन अरण्यवाटेवर चालतो आहे. नाशिकची स्नेहल एकबोटे उभरती चित्रकार आहे आणि कलेच्या माध्यमातून समाजभान जपते आहे. महाडचा चिंतन वैष्णव सी स्केपच्या माध्यमातून आपत्कालीन मदतीबरोबरच गिधाड संवर्धनाच्या कामातही आहे. इचलकरंजीच्या पंचविशीतल्या विनायक होगाडेचे ‘डियर तुकोबा’ हे पुस्तक गाजते आहे, तर कोल्हापूरचा राजवैभव हा तरुण संविधान प्रचाराची धुरा वाहतोय. छावणीच्या सुरुवातीच्या वर्षातला विजय दिवाणे आज यशस्वी वकील तर आहेच त्याचबरोबर छावणीतल्या या एकेका शिलेदाराला स्मारकाशी जोडून ठेवण्याचे महत्त्वाचे काम करतो आहे. नुकतीच त्याची स्मारकाच्या विश्वस्तपदावर निवड झाली आहे! ही फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. ही यादी अजून खूपच मोठी आहे.

भात लावणी व मित्र मेळावा

बाल-किशोर-युवा अशा विशिष्ट वयोगटांसाठीच्या या विविध शिबिरांशिवाय सर्व वयोगटाच्या नागरिकांना सामील करून घेणारे दोन महत्त्वाचे व उद्बोधक कार्यक्रम स्मारकात होतात. पहिला, दर हिवाळ्यात साधारणतः जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस होणारा ‘मित्र मेळावा’ ज्यात स्मारकाच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या सहकाऱ्यांच्या मुलाखती, विचारवंतांचे सद्यस्थितीबाबतचे चिंतन व सांस्कृतिक कार्यक्रम असतात; तर दुसरा, पावसाळ्यात जुलै महिन्यातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस होणारा ‘भात लावणी महोत्सव’ अर्थात ‘पावसाळी वर्षारंग’.

‘वर्षारंग’ या पावसाळी धम्माल शिबिरात, स्मारकातील पावसाळा अनुभवणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. त्याचसोबत चिखलातील भातलावणी, पावसातले खेळ, नेचर ट्रेल, वृक्षारोपण, रानभाज्यांची मेजवानी आणि सोबत दिग्गज कलावंतांसह कविता आणि गाणी... अशी सगळी रेलचेल असते. यंदा ‘वर्षारंग’ १३ आणि १४ जुलै २०२४ ला होत आहे. आता या परिसरात जैवविविधता संरक्षण, संवर्धन व संशोधन केंद्रही आकाराला येत आहे.

(लेखक सामाजिक, राजकीय कार्यकर्ते असून देशभरातील न्याय्य विकासवादी जन संघटनांच्या समन्वयाचे राष्ट्रीय समन्वयक आहेत व साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे पूर्व अध्यक्ष आहेत.)

sansahil@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in