साने गुरुजी १२५ अभियान सांगता

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’, ही साने गुरुजींनी लिहिलेली प्रेमधर्माची प्रार्थना आणि आपल्या आईच्या संस्कारांची महती गाणारा ‘श्यामची आई’ हा ग्रंथ माहीत नाही, असा कुणी संवेदनशील माणूस सापडणार नाही. येत्या शनिवार-रविवारी २१-२२ डिसेंबर रोजी, पुण्यात राष्ट्र सेवा दलाच्या मुख्यालयात ‘साने गुरुजी १२५ अभियाना’चा सांगता समारंभ होतो आहे.
साने गुरुजी १२५ अभियान सांगता
psgvpasc.ac.in
Published on

लक्षवेधी

डॉ. संजय मंगला गोपाळ

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’, ही साने गुरुजींनी लिहिलेली प्रेमधर्माची प्रार्थना आणि आपल्या आईच्या संस्कारांची महती गाणारा ‘श्यामची आई’ हा ग्रंथ माहीत नाही, असा कुणी संवेदनशील माणूस सापडणार नाही. येत्या शनिवार-रविवारी २१-२२ डिसेंबर रोजी, पुण्यात राष्ट्र सेवा दलाच्या मुख्यालयात ‘साने गुरुजी १२५ अभियाना’चा सांगता समारंभ होतो आहे. पुणे मेळाव्यात संकल्प घेण्यात येईल की, देशभरात सेनानी साने गुरुजींचे विचार जनमानसात दृढपणे रुजवू!

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’, ही साने गुरुजींनी लिहिलेली प्रेमधर्माची प्रार्थना आणि आपल्या आईच्या संस्कारांची महती गाणारा ‘श्यामची आई’ हा ग्रंथ माहीत नाही असा कुणी संवेदनशील माणूस सापडणार नाही. ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान; शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण’ किंवा ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो’ या सारखी प्रेरणादायी गाणी त्यांनी रचली. स्वातंत्र्य लढ्यात एकूण सुमारे ७ वर्षे तुरुंगवास भोगला. सोन्या मारुती, भारतीय संस्कृती अशी शंभरहून अधिक पुस्तके लिहिली. मातृहृदयी साने गुरुजी सर्वांना माहीत आहेत; मात्र प्रत्यक्षात स्वातंत्र्य संग्रामात हिरीरीने घेतलेला सहभाग, शेतकरी – कामगारांचे उभारलेले लढे, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांना खुले व्हावे यासाठी केलेले यशस्वी आमरण उपोषण यासारख्या त्यांच्या क्रांतिकार्याकडे पहिले तर, संत तुकोबारायांनी लिहून ठेवल्याप्रमाणे साने गुरुजी होते, “मऊ मेण्याहूनही आम्ही विष्णुदास। कठिण वज्रास भेदूं ऐसे”। पुढील आठवड्यात साने गुरुजींची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती आहे.

१९४७ च्या मे महिन्यात पंढरपूरात आपले आमरण उपोषण सुरू करताना गुरुजींनी चंद्रभागेच्या पात्राजवळ जमलेल्या विशाल जन समुदायासमोर साने गुरुजी म्हणाले होते, “अवजानन्ति मांमूढा: मानुषिं तनुमाश्रितम – माणसाच्या शरीरात असलेल्या परमेश्वराची लोक अवहेलना करतात. मी सर्व प्राणिमात्रात आहे हे जाणत नाहीत. तुकाराम म्हणतात, “जे- जे भूत ते ते जाण भगवंत”. केवढी विशाल दृष्टी – परमेश्वर म्हणजे प्रेमसागर. परमेश्वराला पावणे म्हणजे प्रेममय होणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, “ भक्तीचे वाटे लाग, ताई पाविसी अव्यंगधाम”– प्रेममय बना म्हणजेच तुम्हाला सुखशांतीचा ठेवा सापडेल. परंतु हरिजनांना आजपर्यंत तुम्ही दूर ठेवीत आला आहात. अस्पृश्यांना जवळ घेतलेत की परमेश्वर जवळ येईल. खरा स्वधर्म येईल. म्हणून मी म्हणतो, अस्पृश्यता तरी नष्ट होवो, नाही तर माझे प्राण जावोत!” विनोबाजी म्हणतात त्याप्रमाणे, अस्पृश्यांवरील बंधने दूर करण्यासाठी स्पृश्यांनी झटले पाहिजे. अस्पृश्यांनी नव्हे. ज्यांनी अन्याय केला त्यांनीच तो धुवून काढला पाहिजे. म्हणून माझ्या या प्रचाराला स्पृश्योद्धार मोहीम म्हणतो. ... एखादे गंजलेले कुलूप उघडण्यासाठी जसे चार तेलाचे थेंब टाकावेत, त्याप्रमाणे माझ्या सगळ्या स्पृश्य बंधूंची माने जर गंजून गेली असतील तर माझ्या प्राणाचे तेल घालून ती उघडण्याचा मी प्रयत्न करीत आहे.” साने गुरुजींचं हे सेनानी रूप दलित बांधवांना मानवीय समतेचे हक्क प्राप्त होण्यासाठी प्राणांची बाजी लावून लढताना दिसतं!

गुरुजींनी शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढवलेले अनेक लढेही प्रेरणादायी आहेत. गोर-गरीब शेतकर्‍याला आपला शेतमाल बाजारात विकायचा असेल, तर त्याच्यावर अंमळनेर म्युनिसिपालटिने लादलेल्या अन्याय्य टोलच्या विरोधात साने गुरुजींनी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना संघटित करायला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर त्यांचे विद्यार्थीही होते. १६ मे १९३८ रोजी अंमळनेर शहरातील आठ नाक्यांपैकी तीन नाक्यांबाहेर बैलगाड्या अडवण्यात आल्या. २०० – ३०० बैलगाड्या शहराच्या हद्दीबाहेर उभ्या राहिल्या. पुढे प्रांतिक सरकारच्या मध्यस्थीने मधला मार्ग काढण्यात यश मिळाले आणि हा लढा यशस्वीपणे संपला.

११ जून २०२३ रोजी गुरुजींच्या ७४व्या स्मृतिदिनी पंढरपूर येथे जेष्ठ रंगकर्मी आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे प्रथम अध्यक्ष अमोल पालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित राज्यव्यापी युवा मेळाव्यात साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टने गुरुजींच्या १२५ व्या जयंती वर्षात ‘साने गुरुजी १२५ अभियान’ सुरू करण्याची हाक दिली. साने गुरुजींना मानणार्‍या देशभरातील सुमारे १२५ संस्था – संघटनांनी त्याला क्रमाक्रमाने प्रतिसाद दिला. मागच्या डिसेंबरमध्ये मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सहकार्याने अभियान प्रारंभ मेळाव्यात राष्ट्रीय किर्तीचे लेखक व विचारवंत पुरुषोत्तम अगरवाल, भंवर मेघवंशी यांनी मार्गदर्शन केले. राजा अवसक, शरद कदम, वर्षा देशपांडे आदींच्या पुढाकाराने गुरुजींच्या ७५व्या स्मृतिदिनी राज्यभरातील सहकारी गुरुजींच्या जन्मगावी पालगड येथे जमा होऊन, राज्यभर हा विचार पसरवण्याचा संकल्प मेळावा झाला. जिल्हया-जिल्ह्यात समविचारी सहकारी एकत्र आले आणि त्यांनी साने गुरुजींचे विचार पसरवण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले. संगमनेरमध्ये निबंध स्पर्धा झाल्या. इचलकरंजीमध्ये पथनाट्ये झाली. पुण्यात शहरातल्या विविध ठिकाणी पथनाट्य सादर झाली, ठाण्यात साने गुरुजींच्या विचारावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी एक राज्यव्यापी वाहन यात्रा आणि एक सायकल यात्रा काढली. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची प्रबोधन शिबिरे झाली. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिक अशा सर्व भागात साने गुरुजींच्या विचारांचा जागर झाला. संवेदनशील लेखक आणि वक्ता, हेरंब कुलकर्णी यांनी ‘शिक्षकांसाठी साने गुरुजी’ या विषयावर ५०हून अधिक व्याख्याने देत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन वैद्य, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाच्या राज्य समन्वयक सिरत सातपुते, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या विश्वस्त माधुरी पाटील, कोकणातील प्रयोग भूमीचे राजन इंदुलकर आदींनी कोकणात आणि मध्यप्रदेश, केरळ, बिहार, गुजरात, गोवा या राज्यात दौरे करून संस्कृतिक व प्रबोधन यात्रा, संमेलने यात भाग घेतला. या सर्व कार्यक्रमात प्रामुख्याने साने गुरुजींच्या विचार व कार्याचा संक्षिप्त आढावा आणि आजच्या काळातील त्यांची समर्पकता तसेच सर्वांना ज्ञात मातृहृदयी साने गुरुजींबरोबरच, लढवैय्या सेनानी साने गुरुजींचे स्मरण करण्यात आले.

येत्या शनिवार-रविवारी २१-२२ डिसेंबर रोजी, साने गुरुजी विचार मिरवणूक, पत्रकार व संवेदनशील लेखिका हिना कौसर खान यांच्या उपस्थितीत सर्व धर्मीय महिला संवाद मेळावा, आंतरराष्ट्रीय किर्तीचे कलाकार राजू सुतार व सहकाऱ्यांचा वैविध्यपूर्ण कलाविष्कार, सुनिल सुकथनकर व सहकाऱ्यांनी निवडलेल्या शॅार्ट फिल्म्स व ‘जगाला प्रेम अर्पावे’ या थीमवर आलेल्या रिल्सपैकी वैशिष्ठ्यपूर्ण रील्सचे स्क्रीनिंग, राजेंद्र बहाळकर संयोजन करत असलेला पुण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा युवा मेळावा असे कार्यक्रम आयोजित होणार आहेत. साने गुरुजी विचार दर्शन परिसंवादात डॅा. चैत्रा रेडकर, फिजा खातीब, प्रा. डॅा. सुभाष गवई व संजय रेंदाळकर यांचे विचार ऐकण्याची संधी मिळेल. प्रसिद्ध कलाकार अक्षय शिंपी प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रम - दास्तॅांगोईः ‘ईदगाह’ या प्रेमचंद यांच्या कथेचं सादरीकरण होणार आहे. समारोपाला अभियान समारोप समारंभाचे प्रमुख संयोजक प्रा. सुभाष वारे यांच्या अध्यक्षतेखाली मेधा पाटकर व योगेंद्र यादव लोकशाही समाजवादाचे औचित्य या विषयावर संबोधित करणार आहेत. डॅा. बाबा आढाव, मा. पन्नालाल सुराणा, डॅा. कुमार सप्तर्षी, गजानन खातु, राजन अन्वर, सुरेखा दळवी आदी मान्यवरांनी विविध सत्रात विशेष उपस्थित राहावे यासाठी निमंत्रीत केले आहे. पुणे मेळाव्यात संकल्प घेण्यात येईल की, देशभरात सेनानी साने गुरुजींचे विचार जनमानसात दृढपणे रुजवू! त्यांच्या क्रांतिकारी विचार आणि आचारातून प्रेरणा घेत, देशाचे समतावादी संविधान आणि त्यातील लोकशाही समाजवादी मूल्यांचा प्रचार – प्रसार व जतन – संवर्धन करू! संविधानवादी, समंजस भारतीय नागरिक घडवण्याचे काम संयुक्तरित्या प्राधान्याने उभे करू!

लेखक ‘जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वया’चे राष्ट्रीय समन्वयक आहेत.

logo
marathi.freepressjournal.in