मत आमचेही
केशव उपाध्ये
सत्याच्या मोर्चामध्येच सत्याचा अपलाप करण्यात आला. दुबार, बोगस मतदार असे म्हणत पुन्हा एकदा असत्य सांगण्यात आले. मतदारयाद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत, त्यासाठी हरकती घेण्याच्या कायदेशीर सुविधेचा वापर केला पाहिजे. प्रत्यक्ष कृती केली पाहिजे.
गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी ज्यांना त्यांची जागा दाखवून दिली त्या महाविकास आघाडीला आणि त्यांच्यासोबत आता आपले अस्तित्व दाखवू पाहणाऱ्या मनसेला आगामी महापालिका निवडणुकीत आपली अवस्था काय होईल, याचा अंदाज येत नक्कीच धडकी भरली आहे. म्हणूनच पुराव्यांनिशी न्यायालयात जाणार, असे म्हणण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा कोणताही तरणोपाय शिल्लक राहिलेला दिसत नाही.
राज्यातील मतदारयाद्यांमधील कथित घोळाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसेतर्फे काढण्यात आलेल्या परवाच्या मोर्चात या नेत्यांनी आणखी एकदा दुबार मतदारांच्या यादीची कॅसेट ऐकवल्याने ‘खोटे सांग, पण रेटून सांग’ असे या नेत्यांचे धोरण असल्याचे दिसून आले. मतदारयाद्या दुरुस्त झाल्याच पाहिजेत, अशी मागणी करत एकमेकांना धीर देण्याचेच काम ही नेतेमंडळी करत असल्याचे जाणवत होते. या नेत्यांची भाषणे ऐकून जनतेची बरीच करमणूक झाली आणि सत्याचा अपलाप म्हणजे नेमके काय याचीही प्रचिती आली.
राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का, असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. ‘सत्याचा मोर्चा’ म्हणत जमलेल्या गर्दीसमोर बोलताना मात्र ते दुसऱ्यांदा ढळढळीत असत्य बोलले. सहा महिन्यांपूर्वीच वरळीतील डोममध्ये त्यांनी लोणकढी थाप ठोकली होती की, विधानसभा निवडणुकीत त्यांच्या राजू पाटील या उमेदवाराला त्यांच्या चौदाशे मतदाराच्या गावात जिथे कायम मताधिक्य मिळायचे तिथे शून्य मते मिळाली. प्रत्यक्षात ही माहिती धादांत खोटी होती. कारण तिथे राजू पाटील यांनाच मताधिक्य होते.
परवा त्यांनी दुसरा खोटा सूर आळवत नवी मुंबई आयुक्तांच्या पत्त्यावर १३० मतदार नोंदवल्याचे सांगत त्यांनी सत्याच्या मोर्चात खोटेपणाची कमाल केली. कारण प्रत्यक्षात असे काही घडलेलेच नाही, तर पत्ता देताना लँडमार्क म्हणून ही माहिती नोंदवण्यात आली आहे. तसा स्पष्ट खुलासा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्या घराचा पत्ता ‘शिवाजी पार्क’ आहे, म्हणजे ते प्रत्यक्षात मैदानात रहातात का? बेधडक असत्य पुढे दामटताना काहीतरी विधिनिषेध बाळगायला हवा ना? असे उपद्व्याप केल्याने यश पदरी पडले तर पडले, असा समज करून घेत सुरू असलेली पराभूतांची आणि राज ठाकरे यांची धडपड समजण्यासारखी आहे. पण त्यासाठी फेक नॅरेटीव्हचा आधार घेणाऱ्यांना जनताच फेक ठरवेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
वास्तविक ‘सत्याचा मोर्चा’ असा मुखवटा चढवून महाविकास आघाडीने आपल्या अपयशाचीच कबुली देणारा मोर्चा काढला आहे. सत्याचा मोर्चा, असे आवर्जून सांगावे लागते, यातच सारे काही आले. आम्ही अपयशी आहोत, बेजबाबदार आहोत, नाकर्ते आहोत असा जाहीर कबुलीजबाबच त्यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या मतदार यादीने विजयाचा अनपेक्षित धक्का दिला, ती यादी आता महापालिका निवडणुकीसाठी मात्र अजिबात नको आहे. कारण काय, तर विधानसभेला पराभव झाला. हा दुटप्पीपणाचा कळसच म्हटला पाहिजे.
आता प्रत्यक्षात मतदानादिवशी मतदान केंद्रावर काय घडते ते पाहूया. यातूनच त्यांची पोलखोल होईल. मतदान केंद्रावर सकाळी सहा वाजल्यापासून मतदार प्रतिनिधी उपस्थित असतात. मतदार येत असताना मतदार प्रतिनिधींसमोर मतदाराची नोंद होऊन त्यांचे मतदान पार पडते. विधानसभा निवडणुकीत राज्यात एक लाख बूथ होते. मोर्चा काढणाऱ्या पक्षांच्या पोलिंग एजंटांपैकी किमान एक टक्का बुथवर म्हणजे एक हजार बुथवर तरी मतदानाच्या वेळी आक्षेप घेतले गेले होते का? बरे, त्या आधी मतदारयादी प्रारूप प्रकाशित होत असते. त्या मतदारयादी प्रारूपावर परवा मोर्चा काढणाऱ्या किती जणांनी आक्षेप नोंदविले होते? दुबार मतदार, बोगस मतदार दूर केलेच पाहिजेत, यात कोणतीही शंका नाही. पण मोर्चा काढणाऱ्या किती जणांनी लोकसभा निवडणुकीनंतर याबदद्ल आवाज उठविला होता? ‘आपले अपयश ठेवायचे झाकून आणि यादीत बघायचे वाकून’ हा पोरखेळ मतदार पुरता ओळखून आहेत.
लोकसभा निवडणुकीत याच मतदारयाद्यांच्या आधारे झालेल्या मतदानातून महाराष्ट्रात विजय मिळविणाऱ्या विरोधी पक्षाला आता मात्र पराभवाच्या भीतीने महापालिकांच्या निवडणुका नकोशा झाल्या आहेत. आता ते म्हणतात की, मतदारयाद्यांची स्वच्छता झाल्याशिवाय निवडणुका नकोत. मतदार याद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत, असे केवळ म्हणून भागणार नाही, तर त्यासाठी कृती करावी लागेल आणि त्यासाठी सहकार्यही करावे लागेल. ते कधी करणार?
महापालिकांच्या मतदारयाद्यांचा मसुदा ६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर त्यावर हरकती घेता येतील आणि सूचना करता येतील. तशी कायदेशीर सुविधा आहे. पण कायदेशीर उपाय करायचे नाहीत, संविधानाने निर्माण केलेल्या व्यवस्था मानायच्या नाहीत आणि केवळ दुबार, दुबार, बोगस, बोगस म्हणत मोर्चे काढायचे, असा पोरखेळ चालू आहे.
सत्य हे नेहमी शांत, स्थिर असते. पण असत्याचा बोलबाला फार असतो. जे सत्यवादी असतात, ते जनतेचे खरे नेतृत्व करतात. त्यांचे कार्य जनतेला माहीत असते आणि म्हणूनच जनता त्यांच्या पाठीशी सदैव उभी असते. पण जे असत्यवादी असतात, त्यांना आपला खोटेपणा लपवण्यासाठी आक्रोश करावा लागतो. म्हणूनच वारंवार जनतेला ‘सत्याचा मोर्चा, सत्याचा मोर्चा’ असे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणाऱ्यांचा खोटारडेपणा मुंबईकर जनता चांगलाच ओळखून आहे. त्याचे परिणाम कोण भोगणार, हे मुंबईकर जनता येणाऱ्या काळात ठरवेल एव्हढे मात्र निश्चित.
मुख्य प्रवक्ता, प्रदेश भाजप