सत्यशोधक की सत्ताशोधक ?

‘Truth is God’ ‘सत्य हाच परमेश्वर’असे आचरण महात्मा गांधीजीनी केले.
सत्यशोधक की सत्ताशोधक ?

महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत व आम्हा सर्वांचे मार्गदर्शक प्राचार्य पी बी पाटील वारंवार म्हणायचे की, सत्याग्रही हे सत्याचा आग्रह धरायचे थांबवून सत्तेचा आग्रह धरायला लागले. ते सत्ताग्रही बनले. ही महात्मा गांधीच्या विचारांशी प्रतारणा आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल सत्यशोधकांनी ठेवले आणि ते सत्ताशोधक बनले. आज प्राचार्य पी बी पाटील सरांच्या या अभ्यासपूर्ण वक्तव्याची पावलो पावली प्रचिती येते आहे. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी निर्माण केलेले सत्यशोधक कालांतराने सत्ताशोधक बनले. ही महात्मा फुले यांच्याशी प्रतारणा आहे. महात्मा गांधी यांनी संपूर्ण हयातीत सत्याची पाठराखण केली. सत्य आणि अहिंसा ही दोन्ही गांधीजींची आयुधं होती. त्यांनी सदैव त्या दोन तत्वांची जीवापाड जोपासना केली.

‘Truth is God’ ‘सत्य हाच परमेश्वर’असे आचरण महात्मा गांधीजीनी केले. अहिंसा त्यांनी आयुष्यभर जोपासली. गांधीजींच्या अनुयायांनी मात्र त्या दोन्हीही तत्वांचे पालन केले नाही. त्यांना गांधीजी फक्त जयंती पुण्यतिथीला हार अर्पण करण्यासाठीच हवे आहेत. सध्या त्यांच्या खादीचाही विसर त्यांच्या अनुयायांना पडला आहे. हे आता नामधारी गांधीवादी म्हणून शिल्लक आहेत. सत्याचा वापर करून आपण समाजाला दिलासा देऊ शकतो हा त्या महात्म्याचा आग्रह होता. आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी सरकार दरबारी सत्याग्रह करणे हे गांधीजींचे मुख्य हत्यार होते. मात्र हे हत्यार आता त्यांचे अनुयायी वापरत नाहीत. ते सत्यापासून फार लांब गेले आहेत. सत्याऐवजी त्यांचा भरोसा सत्तेवर जास्त आहे. त्यांना सत्तासंपादन करावयाची आहे. त्यासाठी ते त्यांच्या आदर्शवादापासून दूर चाललेत. दुःख या गोष्टींचं आहे की याची त्यांना खंतही नाही अन खेदही नाही. सत्तेसाठी ते वाट्टेल ते करायला तयार आहेत. ते सत्याग्रही राहिलेले नाहीत तर पूर्णपणे सत्ताग्रही बनलेले आहेत. त्यांचे गांधी विचाराशी काहीही देणे घेणे नाही. ते सत्तेसाठी आसुसलेले आहेत. या उतावीळ गांधीवाद्यांना नथुराम गोडसेनी जर सत्तेची लालूच दाखविली तर हे थेट गोडसेंच्यासुद्धा गळ्यात पडतील. इतके ते सत्तेसाठी हापापलेले आहेत. गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेची जागा आता असत्य व हिंसा यांनी घेतली आहे. गांधीजींनी उपोषण हा आत्मक्लेशाचा मार्ग अवलंबिला त्यांचे अनुयायी मात्र जनतेला उपाशी ठेऊन त्यांना क्लेश देण्यात दंग आहेत. पारतंत्र्यात काही मतलबी दरोडेखोर दरोडा टाकताना महात्मा गांधी की जय आशा घोषणा देत होते. आजचे गांधीजीचे शिष्य तेच करत आहेत. ‘‘मुहंमे गांधी और बगलमे गोडसे’’ अशीच आजची परिस्थिती आहे. गांधीजींचं नाव घेऊन जगणारानी गांधी विचाराशी गद्दारी केली आहे. त्यांचे हे वर्तन क्लेषकारक आहे. सामाजिक परिस्थितीचे अवलोकन केले असता असे आढळून येते की, हे काय फक्त गांधीवादी मंडळींनीच केले आहे असे नाही तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अनुयायांनीसुद्धा हेच केलं आहे.

महात्मा फुले यांनी समाजाचे व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ती पूर्णतः सामाजिक चळवळ होती. शेटजी अन भटजींच्या अन्यायी पंज्यातून समाज मुक्त करण्यासाठी सत्यशोधक समाजाची निर्मिती झाली होती. तिचा राजकीय क्षेत्राशी व त्यापासून मिळणाऱ्या सत्तेशी काडीचाही संबध नव्हता. सत्यशोधक चळवळीमध्ये अनेक दिग्गज सहभागी झाले होते. ती चळवळ समाज परिवर्तनासाठी जोमाने काम करीत होती. चळवळीचा विस्तार वाढला होता. तिचा परीघ रुंदावत चालला होता. मात्र महात्मा फुले यांच्या अनुयायांनी त्यास बेरकी पणाने ब्राम्हण-ब्राम्हणेतर असा साज चढवला. तिचे रूपांतर ब्राम्हण द्वेषात केले. महात्मा फुले यांच्या मूळ हेतूला बाजूला ठेवून सत्ता शोधण्याचे काम त्या सत्यशोधकांनी केले. त्यामार्गाने ते सत्यशोधनाऐवजी सत्ता शोधू लागले. सत्यशोधकाचे ते सत्ता शोधकात परावर्तित झाले. तेही मग महात्मा फुले यांचे नाव जयंती-पुण्यतिथीलाच घेऊ लागले. त्यांनी त्यांच्या विचाराशी गद्दारी केली. यांच्यावरच फुल्यांचा आसूड उगारावा की काय असं वाटतंय. या दोन महात्म्यांच्या विचाराशी व कार्याशी त्यांच्या अनुयायांनीच प्रतारणा केली. त्यामुळे भारतीय समाजाचं अपरिमित नुकसान झालं आहे. हे विदारक सत्य आहे.

आपलं अंतिम ध्येय हे फक्त अन फक्त सत्ताच आहे. ती मिळविण्यासाठी काहीही करायची त्यांनी तयारी ठेवली होती व आहे. सत्याग्रहींचे सत्ताग्रहित रूपांतर होणे आणि सत्यशोधकांचे सत्ताशोधकात रूपांतर होणे ही या दोन महात्म्याच्या महान कार्याशी मोठी गद्दारी आहे. तो त्यांच्या विचारांचा पराभव आहे. तो पराभव त्यांच्या वैचारिक विरोधकांनी केलेला नाही तर त्यांचा समर्थकांनी केला असलेने तो क्लेशकारक आहे. महात्मा गांधीजी आणि महात्मा फुले यांच्याच तोडीचे सामाजिक कार्य करत असलेल्या प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या बाबतीतही नेमकं असंच झालं आहे. त्यांच्या अनुयायांनी अन त्यांच्या रक्ताच्या वारसांनी सुध्दा त्यांच्या विचारांशी फारकत घेऊन काम केलेले आहे.

प्रबोधनकार ठाकरे यांनी भट, भिक्षुक, पुरोहित, वैदिक, सनातनी, धर्म मार्तंड, कर्मकांड या विरोधात शड्डू ठोकून त्यांना सळो की पळो करून सोडले होते. पण, त्यांच्या वारसांनी याच सनातन्यांना मदत केली व त्यांना थेट राज सिंहासनावर बसविले. हा प्रबोधनकारांच्या विचारांचा पराभवच होता. गेल्या दोन अडीच वर्षाच्या कालावधीत उध्दव ठाकरे यांनी आपलं हिंदुत्व ‘शेंडी अन जनव्याचं’ नसल्याचे स्पष्ट करून प्रबोधनकारांच्या विचारांना न्याय मिळवून देण्याची सुरुवात केली होती. त्यांच्या सामना या दैनिकानेही कोविडच्या काळात देव लपून बसलेत असा अग्रलेख लिहून प्रबोधनकारांची झलक दाखविली होती. त्यांचे सरकार केवळ या त्यांच्या प्रबोधनकारांच्या विचारांच्या जागरामुळे हितसंबंधितांनी घालविले. ही प्रबोधनकारांच्या विचारांशी गद्दारी आहे. जे महात्मा गांधीजी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाट्याला आले तेच प्रबोधनकार ठाकरे यांच्याही वाट्याला आले आहे. याचा समाज हितचिंतकांनी गांभीर्याने विचार करणेची गरज आहे. त्यावर उपाय योजना करणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in