सावित्रीबाई : साहित्य आणि प्रेरणा

तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. सावित्रीबाईंना अभिवादन करताना त्यांची वैचारिक जडणघडण कशी झाली, हे समजून घ्यायला हवे. त्या काळात सावित्रीबाईंचा स्वत: ग्रंथसंग्रह होता. त्यांनी काव्यरचना केल्या, भाषणे केली, जोतिबांच्या निधनानंतर त्यांचे चरित्र लिहिले.
सावित्रीबाई : साहित्य आणि प्रेरणा
Published on

विशेष

सुरेखा खरे

तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. सावित्रीबाईंना अभिवादन करताना त्यांची वैचारिक जडणघडण कशी झाली, हे समजून घ्यायला हवे. त्या काळात सावित्रीबाईंचा स्वत: ग्रंथसंग्रह होता. त्यांनी काव्यरचना केल्या, भाषणे केली, जोतिबांच्या निधनानंतर त्यांचे चरित्र लिहिले.

भारतातील समस्त स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करणारे आणि स्त्रियांचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क मान्य करणारे महात्मा जोतिबा फुले हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीचे जनक आहेत. त्यांच्या मानवतावादी विचारांचा सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रभाव होता. लहानपणी सावित्रीबाई यांना एक येशू ख्रिस्ताचे पुस्तक मिळाले होते. आपल्याला या पुस्तकातील फक्त चित्रच पाहता येतात. त्या पुस्तकातील मजकूर वाचता येत नाही याची खंत त्यांना वाटली होती. परंतु १८४० ते १८४८ या काळात सावित्रीबाई यांना महात्मा फुले यांनी शिकविले. विविध ग्रंथांच्या वाचनाचा सावित्रीबाईंच्या वैचारिक जडणघडणीवर प्रभाव पडलेला दिसतो.

सावित्रीबाई यांच्या संग्रहात जी पुस्तके उपलब्ध झाली आहेत त्यावरून सावित्रीबाई फुले यांचे वाचन खगोल, इतिहास, भूगोल, गणित व चरित्र, म्हणी, इसापनीती, रामदासांचे श्लोक, नीतिशतक, ग्रहलाघव  असे बहुस्पर्शी असल्याचे दिसून येते. त्यांनी पुस्तकावर केलेल्या खुणांवरून त्यांना मोडी लिपी, कानडी व उर्दू भाषा यांचेही चांगले ज्ञान असावे, असा निष्कर्ष काढता येतो. त्यांच्या या संग्रहावरून त्यांच्या विद्याव्यासंगाची कल्पना येते. ‘ग्रहलाघव’ हा खगोल शास्त्रावरील दुर्मिळ ग्रंथ सावित्रीबाईंच्या संग्रहात होता. या पुस्तकात ‘सूर्यग्रहण’ व ‘चंद्रग्रहण’ या प्रकरणात मूळ लेखकाने गणिते मांडली आहेत. त्या गणितावरून सावित्रीबाई यांनी त्या त्या पानावर सूर्यग्रहण व चंद्रग्रहण यांच्या आकृत्या हाताने काढून त्या खाली आपली सही केली आहे. यावरून सावित्रीबाईंना खगोलशास्त्रासारख्या विषयातही रस असावा हे दिसून येतो. त्या काळी असलेला त्यांचा जगाकडे बघण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन यातून दिसतो.

‘शुकबहात्तरी’ (१८४९) या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सावित्रीबाई फुले यांची मोडीत सही आहे. ‘हिंदुस्थानचा इतिहास’ (१८६१) या पुस्तकावरही सावित्रीबाई फुले यांची इंग्रजीत आणि मोडीत सही आहे. ‘नीतिशतक’ (१८८२), ‘अथ सांगरुद्र प्रारंभ’ (१८८०), ‘भूगोल पत्रक’ (मुंबई इलाख्याचे)(१८८९), ‘शालापत्रक’, ‘सिंहासनबत्तीशी’ (१८९२), ‘गद्य रत्नमाला’ (१८८८), ‘इसापनीती’ (१८४८) तसेच कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी अनुवादित केलेले सॉक्रेटीसचे चरित्र (१८५२) इत्यादी पुस्तकांच्या मुखपृष्ठावर सावित्रीबाई फुले यांची सही आढळते, तर काही पुस्तकांवर वाचताना केलेल्या खुणा दिसतात, असे प्रा. हरी नरके आणि मा. गो. माळी यांनी संशोधन करून दाखवून दिले आहे. यावरून सावित्रीबाईंचा स्वत:चा ग्रंथसंग्रह असून ही पुस्तके त्यांच्या संग्रहात होती व त्याचा त्यांनी अभ्यास केला होता, असे दिसून येते.

महात्मा फुले यांनी सावित्रीबाई यांना मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षकी पेशाचे शिक्षण दिले. शिक्षणाने माणसातील पशुत्व जाऊन मनुष्यत्व विकसित होते असे सांगणाऱ्या सावित्रीबाई फुले या भारतातील प्रथम प्रशिक्षित शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत. सावित्रीबाई यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यात मोलाची मदत फातिमाबी शेख यांनी केली आहे. सावित्रीबाई यांचा सन १८५४ साली ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यामध्ये त्यांनी एकूण ४१ कविता लिहिल्या असून त्या निसर्ग, सामाजिक प्रश्न, प्रार्थना, आत्मपर, बोधपर, छत्रपती शिवाजी महाराज, राणी छत्रपती ताराबाई अशा विविध विषयांवर लिहिल्या आहेत. त्यावरून सावित्रीबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी छत्रपती ताराबाई यांच्याविषयी वाचन केले होते, असे दिसते.   सावित्रीबाईंनी ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ हे दीर्घकाव्य लिहिले असून त्यात एकूण ५२ रचना आहेत. इ.स. १८९१ साली जोतिरावांच्या मृत्यूनंतर त्यांनी ही रचना केली असून ती १८९२ मध्ये प्रसिद्ध झाली. ‘नेटिव्ह’ आणि ‘इंडियन’ हे शब्द त्यांच्या कवितेत आढळतात. त्यावरून त्यांचे इंग्रजी वाचनही झाले असावे.

सावित्रीबाई यांची वेगवेगळ्या प्रसंगी केलेली भाषणेही केली असून ती ‘मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे’ या नावाने प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यांच्या भाषणांचे विषय हे उद्योग, विद्यादान, सदाचरण, व्यसने आणि कर्ज असे होते. उद्योग या विषयावरील भाषणात त्या म्हणतात, ‘न थकता दिवसभर उद्योग करणे हा मनुष्याचा उत्तम धर्म असून तो त्याचा खरा कल्याण करणारा मित्र होय. या मित्राशिवाय कल्याण करणारा दुसरा कोणी मित्र जगाच्या पाठीवर नसतो. आपल्या देशात थोडेसे इंग्रज लोक व्यापाराला आले आणि त्यांनी एक प्रचंड राज्य स्थापन केले. हा दृढ उद्योगाचा व बुद्धिशक्तीचा चमत्कार आहे. त्यात दैवाचा संबंध नाही. दैव, प्रारब्ध यावर विश्वास ठेवणारे लोक आळशी व भिकारी असून त्यांचा देश नेहमीच दुसऱ्यांच्या गुलामगिरीत राहतो, याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे आपला हिंदुस्थान होय.’

तसेच विद्यादान या विषयावरील आपल्या भाषणात त्या म्हणतात, ‘आळस, परावलंबन वगैरे दुर्गुण न वाढविण्यास व मनुष्याच्या अंगचे सद्गुण वाढण्यास उपयुक्त असा कोणता धर्म असेल तर विद्यादान होय. विद्या देणारा व विद्या घेणारा असे दोघेही या धर्माच्या योगाने खरीखुरी माणसे बनतात. या धर्माच्या शक्तीमुळे मनुष्यातील पशुत्वाचा लोप होतो. विद्या देणारा धैर्यशील निर्भय बनून विद्या घेणारा सामर्थ्यशाली शहाणा बनतो. इंग्रज सरकारने ज्ञानदानासाठी शाळा काढल्या. पण त्या थोड्या असून त्या तेवढ्यावरच राहिल्या तर सारा हिंदुस्थान शिकलेला होण्यास आणखी दीडशे वर्षं लागतील.’ इथे त्या विद्येचे महत्त्व इंग्रज सरकारला देखील सांगत आहेत. तसेच ‘व्यसने’ या विषयावरील भाषणात त्या व्यसनामुळे माणूस अधिक दु:खी होतो, त्यापासून दूर राहावे, विद्या शिकावी, विद्या नसल्याने सत्य-असत्य ओळखता येत नाही, असे सांगून संत तुकाराम यांच्या अभंगाचा उल्लेख करतात.

“सत्यकर्मे आचरे आचरे, सत्यकर्मे आचरे रे |

सत्यकर्मे करीत हित, वारेल दु:ख असत्याचे |”

यावरून संत तुकाराम यांचे साहित्यही त्यांनी वाचले असावे, त्याचा अभ्यास केला असावा, असे दिसते.  सावित्रीबाईंनी १८९३ रोजी सासवड येथे झालेल्या ‘सत्यशोधक परिषदे’चे अध्यक्षपद भूषविले होते. आपल्या विचाराचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. महात्मा फुले यांच्या कार्यावर सावित्रीबाई यांची निष्ठा होती, त्यात त्या सहभागीही होत्या. म्हणूनच महात्मा फुले यांच्या निधनानंतर स्वस्थ न बसता त्यांनी सत्यशोधक समाजाचा प्रसार केला. जोतिबांनी आपल्याला घडवले याची जाणीवही त्यांना आहे. त्याविषयीची कृतज्ञता सावित्रीबाईंनी ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ या पुस्तकाच्या उपोद्घातात  व्यक्त केली आहे. त्या म्हणतात,

“जयाने दिली बुद्धी हि सावित्रीला |

प्रणाम करी मी यति जोतिबाला ||”

सावित्रीबाई कायम बुद्धीला महत्त्व देत होत्या, ज्ञानसंचिताला महत्त्व देत होत्या. म्हणूनच आजही त्यांचे स्मरण यथोचित ठरते.

शिक्षिका व शैक्षणिक चळवळीतील कार्यकर्त्या.

logo
marathi.freepressjournal.in