
भवताल
ॲड. वर्षा देशपांडे
शिक्षण, तंत्रज्ञान आणि आधुनिकता असूनही स्त्रिया अजूनही रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धांना बळी पडतात. त्यांच्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव दिसून येतो. पुरुषसत्ताक व्यवस्थेचे प्रतीकात्मक समर्थन करत समाज त्यांना मागे खेचतो. वैज्ञानिक विचारसरणी, संविधानाचे भान आणि समताधिष्ठित समाजासाठी स्त्रिया व पुरुषांनी मिळून बदल घडवायला हवा.
नुकतीच वटपौर्णिमा झाली. वर्किंग डेला आलेल्या वटपौर्णिमेला नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी सुट्ट्या काढून उपवास केला. वडाला जाऊन फेऱ्या मारल्या. त्या अतिशय सुंदर नटल्या होत्या. या सगळ्याजणींचे मोबाइल स्मार्टफोनवर सेल्फी काढणे किंवा एकमेकींचे फोटो काढणे सुरू होते. यामध्ये बऱ्याच बीएससी ग्रॅज्युएट, इंजिनिअर झालेल्या मुलीपण होत्या. हे सगळे पाहताना माझी प्रचंड चिडचिड होत होती.
“विद्याविना मती गेली,
मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली,
गतीविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले,
इतके अनर्थ एका अविद्येने केले,”
असे जोतिबा म्हणाले. सावित्रीमाईनेही जोतिबांप्रमाणेच सत्यशोधक समाजाचे काम आयुष्यभर केले होते. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे”, असे म्हणणारे बाबासाहेब देखील याच परंपरेतले. खरंच, शिक्षणाने माणूस परिस्थितीला प्रश्न विचारू शकतो का? वैज्ञानिक दृष्टिकोन माणसांमध्ये येतो का? विज्ञान शिकून त्या विज्ञानाचा वापर करून पैसे मिळवणाऱ्या विज्ञान शाखेतील विद्यार्थिनीही जर वटसावित्रीसारखी व्रतवैकल्यं करत असतील, तर शिक्षण निरुपयाेगी ठरले असे समजावे का?
महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर ते थेट नरेंद्र दाभोलकरांपर्यंत या समाजातल्या चुकीच्या रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या विचारवंतांच्या चळवळीची ताकद कमी पडते की विचारांची? या धर्माचे आणि जातीचे तुष्टीकरण करणाऱ्या रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, व्रतवैकल्ये अगदी सुशिक्षित स्त्रियांच्याही जीवनातून हद्दपार होत नाहीत, याला काय म्हणावे?
फॅशनेबल गोष्टी करायच्या, त्याचे सतत मार्केटिंग करायचे, त्या सगळ्यांमध्ये एन्जॉयमेंट बघायची. कुठल्याही प्रकारे या गोष्टी आपल्या आत्मसन्मानाच्या विरोधात नाहीत ना? आपल्या तत्त्वांना धरून आहेत का? यामुळे काही चुकीचा विचार आपण पुढे नेत नाही ना? याचा काही विचारच करायचा नाही, किंबहुना असा विचार करायला कोणी सांगत असेल, तर तीच मंडळी यांच्यासाठी ‘ऑड मॅन’ होऊन जातात.
स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर स्त्री सक्षमीकरणाचा जाणीवपूर्वक, वेगळा, सघन असा विचार आणि प्रक्रिया या देशात झाली आहे. म्हणूनच स्त्रियांना सुरक्षा देणारे विविध कायदे आणि धोरणे बनू शकली. परंतु आज धार्मिक उन्माद, झुंडशाही बोकाळते आहे आणि त्यामध्ये स्त्रियाही अतिशय आक्रमकपणे पुढाकार घेताना दिसतात.
“एक मराठा, लाख मराठा” म्हणत डोक्याला फेटे बांधून कोपर्डीमध्ये झालेल्या घटनेचा निषेध करायला गोषा घराण्यातील तथाकथित बायका मोटारसायकलवर बसून रस्त्यावर आल्या, तेव्हा मला बरे वाटले होते. वाटले, चला, किमान त्या कोपर्डीच्या घटनेनंतर तरी बायका आता मोकळेपणाने श्वास घेतील. पण नाही. पुन्हा यांची ‘वैष्णवी हगवणे’ होतेच आणि तिथेही परत विशिष्ट जातीचे पुरुष जातीची मीटिंग घेतात आणि फतवे काढतात. स्त्रियांना धार्मिक मूलतत्त्ववादाच्या वाहक बनवले जात आहे. त्याही विरोध न करता त्याच्या बळी ठरत आहेत आणि त्याचे भान स्त्रियांना नाही, हे आमच्या स्त्रीमुक्ती चळवळीचे अपयश मानायला हवे की शिक्षणाचे अपयश?
आधुनिक कपडे घालणाऱ्या, आधुनिक केशभूषा, वेशभूषा करणाऱ्या, स्मार्टफोन वापरणाऱ्या मुली तत्त्वांनी आणि विचारांनी मात्र आधुनिक होताना दिसत नाहीत. पुन्हा-पुन्हा त्या पुरुषसत्ताक व्यवस्थेला बळी पडतात आणि फॅशन म्हणून का होईना, वटसावित्रीसारखे उपवास करून वडाला फेऱ्या मारतात.
या पिढीच्या जगण्यात प्रचंड विरोधाभास दिसतो आहे. एका बाजूला विज्ञानयुगाने निर्माण केलेल्या विविध गोष्टी, एआय, समाजमाध्यमं, स्मार्टफोन्स, स्वयंपाकघरातील उपकरणं हे सारे वापरायचे तंत्रज्ञान म्हणून; परंतु जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायचा नाही.
ही सगळी पिढी तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेली दिसते. तंत्रज्ञानाबरोबर परिस्थितीला आणि अवतीभवतीच्या बुरसटलेल्या रूढी, परंपरा, सण-समारंभ यांना प्रश्न विचारून मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची त्यांना गरज वाटत नाही. त्यांच्या जीवनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाला थारा नाही. परंतु तंत्रज्ञानावाचून त्यांचे सगळे अडते आहे. म्हणूनच जेव्हा या मुली वडाला फेऱ्या घालतानाचा आपला फोटो समाजमाध्यमांवर शेअर करतात आणि त्याला लाइक्स किती आले हे पाहून आनंदित होतात, तेव्हा चिंता वाटते. काही मुली तर लाइक्स न आल्यामुळे आत्महत्या करतात. ‘इन्फ्लुएन्सर’ म्हणवून घेणाऱ्या अशा मुलींच्या आत्महत्याही अलीकडे घडल्या आहेत.
धर्म ही अफूची गोळी आहे. त्या तथाकथित धर्माचा समाजावर पगडा निर्माण करण्याचे प्रमुख माध्यम स्त्रिया असतात. मग त्या कोणत्याही धर्मातील असो. त्यांनाच त्या व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी पकडले जाते आणि मग त्या आधुनिक विचाराच्या, स्वातंत्र्याच्या, समतेच्या, बंधुभावाच्या तत्त्वांपासून कोसो दूर जातात. त्यांना फक्त पंधराशे रुपये योजनेचे आमिष दाखवून मतदार म्हणून वापरले जाते. ही फक्त स्त्रियांच्या सक्षमतेची बाब नाही. हा मुद्दा संविधानाच्या आणि देश बांधणीच्या प्रक्रियेतील कळीचा मुद्दा आहे.
अलीकडेच ‘विधवा सन्मान’ मिळावा म्हणून प्रतीकात्मक गोष्टी सांगण्यात आल्या. पण केवळ प्रतीक बदलण्याचा खेळ चालणार नाही. कपाळावरचे कुंकू न पुसणे, बांगड्या न फोडणे, मंगळसूत्र न काढणे, म्हणजे पुन्हा पुरुषसत्ताक प्रतीकांमध्येच विधवा अडकून राहणार का? या प्रतीकबदलांमागेही पुन्हा तीच व्यवस्था अधिक बळकट करण्याचे राज्यकारण आहे का? हे तपासणे गरजेचे आहे. नवरा मेल्यानंतर घरपोच मृत्यूचा दाखला मिळत नाही. मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था होत नाही. जमिनीच्या नावावर स्त्रीचे नाव लागत नाही. नवऱ्याकडे असलेल्या नोकरीवर अनुकंपातत्त्वावर कोणतीही सोय होत नाही. म्हणून अशा प्रतीकांच्या बदलांमध्ये काही फरक पडत नाही. मूळ दुखणे संविधानविरोधी पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये आहे.
त्यावर मात करण्यासाठी स्त्रियांच्या मालकीची जमीन, घर, आर्थिक साधने असणे गरजेचे आहे. शिक्षणामध्ये मूल्यशिक्षणाचा भाग म्हणून संविधानाचा, रूढी-परंपरांविरोधातील आंदोलनांचा अभ्यास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी कृती कार्यक्रमांचा समावेश गरजेचा आहे. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती याच्या विरुद्ध जात आहे. नवीन शैक्षणिक धोरणही या दिशेने काही करेल, अशी शक्यता दिसत नाही. म्हणूनच देशातील स्वयंसेवी संस्था, संघटना यांच्याद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन, लोकविज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळी अधिक बळकट कराव्या लागतील. वडाला फेऱ्या मारल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि आपल्याला जीवनाची सुरक्षा मिळते हा विचार जुना झाला आहे. त्यातला फोलपणा लक्षात आला तरी भीतीपोटी किंवा फॅशन म्हणून स्त्रिया हे करत राहतात.
आज जाणीवपूर्वक अशा रूढी-परंपरांच्या विरोधात कार्यक्रम व्हायरल करणे गरजेचे आहे. उलट सध्या या परंपरांचे मार्केटिंग जोरात सुरू आहे. कारण सध्याचे राज्यकारण अशाच अंधश्रद्धाळू, भोळसट स्त्रिया तयार करत आहेत. आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन जीवनात रुजवून या व्यवस्थेला सुरुंग लावायचा आहे. एरव्ही महिलांवर दादागिरी करणारे पुरुष अशा कार्यक्रमातला फोलपणा आपल्या घरातील स्त्रियांना सांगायला धजावत नाहीत. त्यांनाही वाटत असावे की, स्त्रिया दर महिन्याला हे सण-समारंभ खेळत राहिल्या, स्वयंपाक-पाणी-नैवेद्य करत राहिल्या, तर कटकटी कमी होतील. म्हणून जेवढी सावित्रीच्या लेकींची जबाबदारी आहे, तेवढीच समाजातील जोतिबा पुत्रांची ही आहे, त्यांनीही पुढे येऊन संवाद सुरू करावा आणि आपल्या घरातील स्त्रियांना या चुकीच्या रूढी-परंपरांतून बाहेर काढायला मदत करावी.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेक लाडकी अभियानच्या संस्थापक