
ग्राहक मंच
स्नेहल नाडकर्णी
बँकिंग क्षेत्रात वाढलेल्या सुविधा आणि साधनांनुसार सेवा-शुल्क आकारणे गरजेचे असले, तरी बँकांनी त्यांच्या ग्राहकांना मूलभूत सेवांसाठीच्या सर्व शुल्कांची माहिती देणे किंवा त्यामध्ये काही बदल झाल्यास त्याबाबतही माहिती देणे आवश्यक आहे. याशिवाय बँकांनी त्यांचे संपूर्ण तपशील त्यांच्या संकेतस्थळावर आणि मोबाइल ॲप्सवर सार्वजनिक करणे आवश्यक आहे.
आमच्या शेजारी ६५ वर्षांच्या काकूंची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायची होती. त्यासाठी पुरेसे पैसे त्यांच्याकडे नसल्याने त्यांच्या बंगलोरच्या भावाने स्वतःच्या बँक खात्यातून काकूंच्या खात्यात शस्त्रक्रियेसाठी पैसे जमा केले. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णालयात पैसे जमा करताना त्यांना बँक खात्यातून पुरेसे पैसे काढता आले नाहीत. याचे कारण म्हणजे अगोदर किमान रक्कम न राखल्याने, बचत खात्याच्या नियमानुसार बँकेने सेवाशुल्क कापून घेतले. परिणामी जेवढी रक्कम रुग्णालयाला भरायची होती, त्यापेक्षा कमी रक्कम खात्यामध्ये शिल्लक होती.
भाजीवाल्याची वेगळीच कथा होती. इकडचा धंदा बंद करून तो परत आपल्या गावी जाणार होता. त्यापूर्वी इथले बँक खाते बंद करण्यासाठी तो बँकेत गेला असता, त्याच्या बचत खात्यात पैसे शिल्लक नसल्यामुळे त्याला खाते बंद करण्यापूर्वी सेवाशुल्क भरावे लागेल, असे बँकेत सांगितले गेले. जास्तीचे पैसे कशाला भरा म्हणून पठ्ठ्याने खाते बंद न करताच तो गावाला निघून गेला. अशा खात्यांचा वापर गैरव्यवहारासाठी होण्याची शक्यता बळावते.
माझ्या मैत्रिणीचे तिच्या मुलीबरोबर संयुक्त बचत बँक खाते होते. चार महिन्यांपूर्वी मुलीचे लग्न झाले. एकदा कधीतरी तिने खात्यात किती शिल्लक आहे हे ऑनलाईन बघितले असता, त्या खात्यात निगेटीव्ह बॅलन्स दिसून आला. बरीच वर्षं काही व्यवहार केला नसल्याचे तिच्या लक्षात आले. बँकेत चौकशी केली असता, खात्यात किमान शिल्लक नसल्यामुळे दंड आकारला गेला असल्याचे तिला सांगण्यात आले.
गेल्या काही वर्षात बँकिंग सेवांचा प्रचंड विस्तार झाला. २४ तास आणि सातही दिवस बँकांची सेवा उपलब्ध झाली. डिजिटल व्यवहाराच्या सुविधेने व्यापक बदल झाला. जागतिकीकरण आणि आर्थिक सुधारणांच्या वेगामुळे बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा झपाट्याने वाढली.
नवनवीन साधने अस्तित्वात आली. खर्चिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित स्टाफ आणि संपूर्ण यंत्रणा निर्माण करणे शिवाय सायबर सुरक्षा तयार करणे आवश्यक झाले. तत्परता, कार्यक्षमता व अद्ययावत सेवांसाठी वेगळे पैसे आकारण्याचे धोरण निर्माण झाले. आकर्षक सेवा-सुविधा मिळाल्यामुळे ग्राहकदेखील चार पैसे मोजू लागला. वाढलेल्या सुविधा आणि साधनांनुसार सेवा-शुल्क आकारणे गरजेचे असले तरी बँकांनी त्यांच्या ग्राहकांना मूलभूत सेवांसाठीच्या सर्व शुल्कांची माहिती देणे किंवा त्यामध्ये काही बदल झाल्यास त्याबाबतही माहिती देणे आवश्यक आहे. याशिवाय बँकांनी त्यांचे संपूर्ण तपशील त्यांच्या संकेतस्थळावर आणि मोबाइल ॲप्सवर सार्वजनिक करणे आवश्यक आहे. ही शुल्क रचना बँकेगणिक बदलू शकतात.
बँक आपल्या ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सेवा पुरवते. यापैकी काही सेवा विनामूल्य आहेत, तर काहींसाठी सेवाशुल्क आकारले जाते. काही मोफत सेवांवरदेखील एका मर्यादेनंतर शुल्क आकारले जाते. उदाहरणार्थ, एटीएममधून पैसे काढण्याची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. त्यापेक्षा जास्त वेळा एटीएममधून पैसे काढल्यास सेवा शुल्क आकारले जाते.
तसेच बचत खात्यात शिल्लक असलेली रक्कम बँकेने निश्चित केलेल्या किमान मर्यादेपेक्षा कमी असल्यास दंड आकारला जाऊ शकतो.
रिझर्व्ह बॅंकच्या विकासात्मक आणि नियामक धोरणानुसार ग्राहक हितार्थ एक एप्रिल २०१५पासून काही मार्गदर्शक तत्त्वे लागू झाली. त्यानुसार १. खात्यामध्ये किमान शिल्लक नसल्याचे खातेदाराला एसएमएस/ईमेल/पत्राद्वारे कळविण्यात आलेल्या तारखेपासून खातेदार विशिष्ट कालावधीत (एक महिन्यापेक्षा कमी नसावा) त्याची पूर्तता करू शकला नाही, तर त्याला सांगून बँक दंडाची रक्कम वसूल करू शकते.
दंडाची रक्कम सेवेच्या खर्चाच्या प्रमाणात बँकेच्या संचालक मंडळाच्या मंजुरीने ठरवलेली असावी.
तसेच खात्यातील शिल्लक आणि बँकेने ठरवलेली किमान शिल्लक यांच्या फरकाच्या प्रमाणात दंडाची रक्कम निर्धारित केलेली असावी.
खात्यात किमान शिल्लक नाही म्हणून केवळ दंड आकारण्यात आल्यामुळे खात्यात निगेटिव्ह बॅलन्स दाखवू नये.
काही बँका आपल्या नफ्यासाठी ह्या मार्गदर्शक तत्त्वांचा चुकीचा अर्थ लावून ग्राहकांचे शोषण करताना दिसतात. अशावेळी वेळी ग्राहकाने अनभिज्ञ न राहता नियमांबद्दल माहिती करून घेणे आवश्यक ठरते. बँक खात्यात निगेटिव्ह बॅलन्स होण्याच्या नियमांविषयी वेगवेगळ्या बँकांचे नियम वेगवेगळे असू शकतात. ग्राहक त्यांच्या बचत खात्यातील किमान शिल्लक रकमेचे विविध पद्धतींद्वारे निरीक्षण करू शकतात.
ऑनलाइन बँकिंग : बँकेच्या संकेतस्थळाद्वारे तुमच्या खात्याच्या तपशीलांमध्ये प्रवेश करून चालू शिल्लक आणि व्यवहार इतिहास पाहणे.
मोबाईल बँकिंग अॅप : तुमच्या स्मार्टफोनवर बॅलन्स आणि अलीकडील व्यवहार तपासण्यासाठी बँकेच्या मोबाईल अॅपचा वापर करणे.
एसएमएस अलर्ट : तुमचा बॅलन्स एका विशिष्ट पातळीपेक्षा कमी झाल्यावर तुम्हाला सूचित करण्यासाठी टेक्स्ट मेसेज अलर्ट सेट करणे.
ईमेल सूचना : खात्यातील व्यवहार आणि शिल्लक बदलांबाबत ईमेल अपडेट्स प्राप्त करणे.
बँक स्टेटमेंट : अलीकडील व्यवहार आणि चालू शिल्लक तपासण्यासाठी बँक स्टेटमेंट नियमितपणे तपासणे.
एटीएम बॅलन्स चौकशी : तुमच्या डेबिट कार्डचा वापर करून एटीएम मध्ये तुमचा बॅलन्स तपासणे.
फोन बँकिंग : तुमच्या खात्यातील शिल्लक माहिती घेण्यासाठी बँकेच्या ग्राहक सेवा लाईनवर कॉल करणे.
बँकेच्या शाखेला भेट देणे : बॅलन्स अपडेटची विनंती करण्यासाठी तुमच्या स्थानिक बँकेच्या शाखेला भेट देणे.
शुल्क टाळण्यासाठी तुमच्या विशिष्ट बचत खात्यासाठी आवश्यक असलेली किमान शिल्लक रक्कम जाणून घ्या. काही बँका फक्त एका दिवसाच्या क्लोजिंग बॅलन्सवर नव्हे तर सरासरी मासिक बॅलन्सवर आधारित आवश्यक किमान बॅलन्सची गणना करतात. म्हणून बँकेत खाते उघडताना, ते वापरताना किंवा कुठलेही आर्थिक व्यवहार करताना ग्राहकाने सजग आणि सतर्क राहणे आवश्यक असते.
मुंबई ग्राहक पंचायत
mgpshikshan@gmail.com