‘ग्रॅमी’ त ‘शक्ती’ची गाज

शंकर महादेवन, गणेश राजगोपालन, उस्ताद झाकीर हुसेन, व्ही. सेल्वागणेश आणि राकेश चौरसिया यांना मानाचा ‘ग्रॅमी’ पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद वाटतो.
‘ग्रॅमी’ त ‘शक्ती’ची गाज

सावनी शेंडे

विशेष

‘ग्रॅमी’सारख्या महत्त्वपूर्ण पुरस्कारांमध्ये भारतीय मुद्रा उमटणे ही अभिमानाची बाब आहे. यापूर्वी विश्वमोहन भटसारखी नावे आपण या पुरस्कारार्थींमध्ये बघितली. आता शंकर महादेवन, गणेश राजगोपालन, उस्ताद झाकीर हुसेन, व्ही. सेल्वागणेश आणि राकेश चौरसिया यांना मानाचा ‘ग्रॅमी’ पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद वाटतो. अशा पुरस्कारांमुळे आपल्या मातीतील संगीत जगामध्ये रुजत असल्याची भावना सुखावणारी आहे.

गीताला निसर्गाचे एक रूप मानले जाते. शास्त्रशुद्ध संगीत वा संगीताचे शास्त्र ही शिकून येणारी बाब असली तरी मुळात संगीत निसर्गातच आहे. त्यामुळेच त्या प्रतीची आवड, आकर्षण, प्रेम आणि ममत्व प्रत्येकालाच असते. धर्म, प्रांत, भाषा, जाती आदींच्या सीमा उल्लंघून समस्त मानवजातीला एकत्र आणण्याची शक्ती संगीतामध्ये आहे. सृष्टीने निर्माण केलेल्या प्रत्येक सजीव प्रजातीचे एक विशिष्ट संगीत आहे. किंबहुना, तीच त्यांची खरी ओळख आहे असेही म्हणता येईल. ‘शब्देवीण संवादू’ सुरांची ही किमया आजूबाजूला पाहतो तेव्हा थक्क व्हायला होते. काहीशी अशीच अवस्था विभिन्न प्रकारचे, ज्ञात-अज्ञात संगीत कानावर पडल्यानंतरही होते. भले त्यातील शास्त्राचे आकलन होत नसेल... पण सूर, ताल, मेलडी मनाला भिडल्याखेरीज राहत नाही. संगीतातून प्रगट होणारा भाव प्रत्येकाच्या भावनेला हात घालतोच. म्हणूनच संगीत कधीच ठरावीक चौकटीत बसेल इतके आखीव-रेखीव नसते. ते आकाशाप्रमाणे अथांग असते. त्याचा एक एक कोन जाणून घेण्यात, त्याला स्पर्श करण्यात अनेकांची उभी हयात खर्ची पडली आहे. म्हणूनच संगीतक्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांचा ‘ग्रॅमी’सारख्या जागतिक पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्काराने गौरव होतो तेव्हा स्वकियांबरोबर जगभरातील संगीतप्रेमींना होणारा आनंद काही वेगळाच असतो.

नुकतेच ‘ग्रॅमी’मध्ये भारताचे ‘शक्ती’ प्रदर्शन दिसून आले. पाच भारतीय कलाकारांनी यावर मोहर उमटवली. ‘ग्रॅमीसारख्या महत्त्वपूर्ण पुरस्कारांमध्ये भारतीय नावे येऊ लागणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. यापूर्वीही विश्वमोहन भट यासारखी नावे या पुरस्कारार्थींमध्ये आपण बघितली आहेत. तेव्हादेखील असाच आनंद झाला होता. आताही शंकर महादेवन, गणेश राजगोपालन, उस्ताद झाकीर हुसेन, व्ही. सेल्वागणेश आणि राकेश चौरसिया यांना ग्रॅमी मिळाल्याचा विशेष आनंद आहे. यामुळे त्यांच्या कारकीर्दीला नवी झळाळी प्राप्त होणार आहेच; खेरीज आपल्या मातीतील संगीत जगामध्ये रुजत असल्याची भावनाही प्रत्येक संगीतप्रेमीला सुखावणारी आहे. झाकीर हुसेनजींनी आधीच तबल्याचे नाव जगभर पोहोचवले आहे. मात्र या पुरस्काराने त्यावर मोहर उमटली असल्याची माझी भावना आहे. त्यांच्याबरोबरच शंकर महादेवन यांचीही ओळख व्हर्सटाईल कलाकार अशी आहे. ख्याल गात नसले तरी त्यांना शास्त्रीय संगीताची उत्तम जाण आहे. आपल्या रचनांमध्ये ते शास्त्रीय संगीतातील विविधांगाचा अत्यंत खुबीने वापरही करतात. त्यामुळेच असे ख्यातकीर्त कलाकार आंतरराष्ट्रीय मंचावर देशाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्या अभ्यासावर, आविष्कारावर शिक्कामोर्तब होते तेव्हा मिळालेली ही पोचपावती बहुमोल असते. त्यांचे काम स्वदेशातच नव्हे तर जगभर वाखाणले गेल्याची ही दाद असते. म्हणूनच असे पुरस्कार कोणा एका कलाकाराला नव्हे तर आपल्या मातीतील संगीताला एका उच्च पातळीवर नेऊन ठेवतात असे मला वाटते.’

‘ग्रॅमीसारखे पुरस्कार भारतीय कलाकारांना मिळतात तेव्हा जास्तीत जास्त लोकांना येथील संगीताकडे वळवण्याचे कामही आपसुक होते. पाश्चात्य देशांना जॅझ वा त्यासारख्या संगीताची ओळख असते. मात्र या पुरस्कारांच्या निमित्ताने आज लोक शंकर महादेवन किंवा झाकीरभाईंकडे बघतील तेव्हा त्यांनी संगीतक्षेत्रात आणखी काय काय केले आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. थोडक्यात, या पुरस्कारामुळे लोक त्यांच्या कारकीर्दीच्या मुळापर्यंत जातील. गुगल सर्च करून अनेकजण झाकीरभाईंबद्दल नक्कीच अधिक काही जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. यातूनच त्यांना भारतीय संगीताची ओळख होईल. ही बाबही नोंद घेण्याजोगी आहे.

अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे पार पडलेला हा सोहळा भारतीयांना सुखावून गेला. या सोहळ्याला जगभरातील मान्यवर संगीतकार, गायक, वादक उपस्थित होते. यंदाच्या ग्रॅमीमध्ये नामांकन असणाऱ्यांनी कलेचे सादरीकरणही केले. त्याला उपस्थितांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. आधी उल्लेख केलेल्या भारतीय कलाकारांच्या ‘शक्ती’ या अल्बममधून प्रेमाची उत्कट भावना व्यक्त करण्यात आली आहे. ‘शक्ती’चा प्रेरणास्त्रोतच संगीत आहे. तो कशा प्रकारे ही भावना प्रेरित करतो हे अल्बमच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले.

शंकर महादेवन, जॉन मॅक्लॉफलिन, झाकीर हुसेन, व्ही. सेल्वागणेश आणि गणेश राजगोपालन हे कलाकार या बँडमध्ये एकत्र काम करतात. ‘शक्ती’ या फ्यूजन बँडने ४५ वर्षांनंतर आपला पहिला अल्बम रिलीज केला. इंग्लिश गिटारवादक जॉन मॅक्लॉफलिनने भारतीय व्हायोलिन वादक एल. शंकर, तबलावादक झाकीर हुसेन आणि टी. एच. ‘विक्कू’ विनायकरामसोबत ‘शक्ती’ या फ्यूजन बँडची सुरुवात केली होती. पण १९७७ नंतर हा बँड फारसा सक्रिय नव्हता. १९९७ मध्ये जॉन मॅक्लॉफलिनने त्याच संकल्पनेवर पुन्हा ‘रिमेंबर शक्ती’ नावाचा बँड तयार केला. त्यात व्ही. सेल्वागणेश (टी. एच. ‘विक्कू’- विनायकरामचा मुलगा), मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास आणि शंकर महादेवन यांचा समावेश होता. २०२० मध्ये हा बँड पुन्हा एकत्र आला आणि ‘शक्ती’ म्हणून त्यांनी ४६ वर्षांनंतर ‘दिस मोमेंट’ हा पहिला अल्बम रिलीज केला. ५० वर्षांपासून संगीताच्या क्षेत्रातील ही वाटचाल आणि संघर्ष याचे प्रतिबिंब या अल्बममधून होते. संगीत क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये या वर्षी महिला कलाकारांनी सर्वाधिक बाजी मारल्याचे दिसून आले.

ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये यावर्षी जवळपास नव्वद श्रेणी होत्या. त्यामध्ये सर्वाधिक पुरस्कार महिला कलाकारांना मिळाले. त्यात मायली सायरस, टेलर स्विफ्ट, बिली एलिश, व्हिक्टोरिया मोन आदी कलाकारांनी चांगलीच बाजी मारली. मायली सायरसने आयुष्यातील पहिलेच ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड जिंकले. त्यामुळे एका अर्थी ती ‘सातवे आसमान पे’ होती. फॅन्सनेही तिचे मनापासून कौतुक केले. ‘मायली, तू हे डिझर्व्ह करतेस...’ अशा आशयाच्या कमेंट्स करून चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. मायली सायरसला ‘फ्लॉवर्स’ या गाण्यासाठी ‘रेकॉर्ड ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला. मायली सायरस गेली अनेक वर्षे मेहनतीने संगीतक्षेत्रात टिकून आहे. या पुरस्काराने तिच्या मेहनतीचे चीज झाले, असे म्हणायला हरकत नाही.

टेलर स्विफ्ट हे संगीतक्षेत्रातील जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवणारे नाव आहे. टेलर स्विफ्टच्या ‘मिडनाईट’ या अल्बमला ‘अल्बम ऑफ द इयर’ पुरस्कार देण्यात आला. टेलर स्विफ्ट ‘अल्बम ऑफ द इयर’ या पुरस्काराची चौथ्यांदा मानकरी ठरत आहे. ग्रॅमी अ‍ॅवॉर्डच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडत आहे. याआधी टेलर स्विफ्टला तीन अल्बम्ससाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. २०२३ मध्ये आलेल्या ‘मिडनाईट’ या अल्बमने आजपर्यंतचे सगळे विक्रम मोडले. त्यामुळे टेलरच्या या अल्बमला हा पुरस्कार मिळणार हे काहीसे गृहीतच होते. टेलरने हा पुरस्कार मिळवून इतिहास रचल्यामुळे चाहते प्रचंड खूश आहेत. तिच्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. बिली एलिश हेसुद्धा संगीतक्षेत्रातील आणखी एक प्रसिद्ध नाव. आजपर्यंत तिने अतिशय वेगळ्या चालीची गाणी दिली आहेत. गाण्यातील वेगळेपणासाठी ती प्रसिद्ध आहे. तिच्या ‘व्हॉट वॉज आय मेड फॉर?’ या गाण्याला ‘साँग ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला. हे गाणं ‘बार्बी’ या चित्रपटात वापरलं गेलं होतं. ते चाहत्यांच्या पसंतीस उतरलं होतं. सोशल मीडियावर रिल्समध्ये हे गाणं भरपूर लोकप्रिय झालं.

अलीकडेच संगीतक्षेत्रात पदार्पण करूनही वाखाणण्याजोगी कामगिरी करणाऱ्या कलाकारांना बेस्ट न्यू आर्टिस्ट हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा व्हिक्टोरिया मोनेट् या पुरस्काराची मानकरी ठरली. एकूणच संगीत क्षेत्रातील पुरस्कारांसाठी नॉमिनींमध्येसुद्धा महिलांची नावे जास्त होती. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यामध्ये महिलांचा करिष्मा दिसत होता. या सगळ्यात ‘लाना देल रे’ या गायिकेला एक तरी पुरस्कार मिळायला हवा होता, असं चाहत्यांचं मत दिसून आलं. अतिशय ताकदीची गायिका असूनही एकाही पुरस्काराची मानकरी न ठरल्यामुळे चाहत्यांना दुःख झालं. एकंदरीत मात्र पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या आणि न ठरलेल्यांच्या संख्येमध्ये यावर्षी वाढ झाली हे नक्की!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in