शामराव अष्टेकर : क्रीडाक्षेत्रातील निर्मळ व्यक्तिमत्व!

कराडचे आमदार व माजी क्रीडा मंत्री शामराव अष्टेकर यांनी खो-खो, कबड्डी आणि इतर खेळांच्या विकासासाठी आयुष्य वेचले. साधेपणा, पारदर्शकता आणि निष्ठा ही त्यांची ओळख होती. त्यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रात क्रीडा संघटनांची नवी परंपरा निर्माण झाली.
शामराव अष्टेकर : क्रीडाक्षेत्रातील निर्मळ व्यक्तिमत्व!
शामराव अष्टेकर : क्रीडाक्षेत्रातील निर्मळ व्यक्तिमत्व!
Published on

स्मरण

मनोहर साळवी

कराडचे आमदार व माजी क्रीडा मंत्री शामराव अष्टेकर यांनी खो-खो, कबड्डी आणि इतर खेळांच्या विकासासाठी आयुष्य वेचले. साधेपणा, पारदर्शकता आणि निष्ठा ही त्यांची ओळख होती. त्यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रात क्रीडा संघटनांची नवी परंपरा निर्माण झाली.

खो-खो व कबड्डी क्षेत्रात मागील साधारण तीन दशके या खेळांच्या प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विकासासाठी एकनिष्ठपणे योगदान देणारे कराडचे आमदार आणि माजी क्रीडा व उद्योगमंत्री शामराव बाळकृष्ण अष्टेकर यांचे नुकतेच वयाच्या ९२व्या वर्षी पुणे येथील त्यांच्या रणजीत मुलाच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.

अष्टेकर यांची क्रीडा क्षेत्रातील वाटचाल त्यांच्या मूळ कराड गावातूनच सुरू झाली. महाराष्ट्रात कराडची ओळख म्हणजे सर्वप्रथम शालेय स्तरावरील लिबर्टी क्रीडा मंडळाच्या आयोजनाखाली होणाऱ्या खो-खो, कबड्डी आणि इतर खेळांच्या स्पर्धा. त्या साधारण दिवाळीपूर्वी होत असत. या स्पर्धांत परळ येथील केएमएस हायस्कूल म्हणजेच डॉ. शिरोडकर हायस्कूलचा मुलांचा कबड्डी व खो-खो संघ दरवर्षी सहभागी होत असे. यामुळे भावी काळात महाराष्ट्रासाठी गुणी खेळाडू घडू लागले. पुढे राज्य व केंद्र शासनाच्या वतीने शालेय विविध गटांतील क्रीडा स्पर्धा जिल्हा व राष्ट्रीय स्तरावर आयोजित होऊ लागल्या.

सुरुवातीस मुंबई, पुणे, सोलापूर, ठाणे, नाशिक, नगर, सांगली आणि कराड (सातारा जिल्हा) या भागांतून प्रेरणा व ऊर्जा घेऊन पुढे विविध जिल्ह्यांत या खेळांचे संघ, क्लब, मंडळे, क्रीडा संस्था, व्यायामशाळा यांच्या माध्यमातून संघटनात्मक पातळीवर विकास होऊ लागला. या कार्यात शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांना अष्टेकर यांची साथ लाभली. पुढे या खेळांचा महासंघ स्थापन करण्यातही त्यांचा हातभार लागला.

अष्टेकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य जिल्हा, राज्य आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेसारख्या संस्थांमार्फत सर्वांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी समर्पित केले.

अष्टेकर यांनी क्रीडा क्षेत्रात आगळं-वेगळं आदर्श व्यक्तिमत्त्व घडवलं. ‘नाही’ म्हणणं हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता. वयाचा विचार न करता सर्वांना एकसंघ भावनेने आणि सकारात्मक दिशेने पुढे नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. रागावर संयम ठेवणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. खेळांच्या विकासाकडे भेदभाव न करता पाहणं, पारदर्शक कामकाज ठेवणं आणि सर्वांना न्याय देणं हेच त्यांचं ध्येय होतं. चुका पुन्हा होऊ नयेत याची ते काळजी घेत. तक्रारदाराची तांत्रिक बाजू योग्य आहे का हे तपासूनच ते न्याय देत असत. त्यामुळे अनेक दशकं कार्यरत राहूनही त्यांना कधी नव्या वादांना सामोरं जावं लागलं नाही. त्यांच्या कारकिर्दीत कोणत्याही क्रीडा संघटनेत त्यांनी एकाधिकारशाही निर्माण होऊ दिली नाही.

त्यांच्या पारदर्शक कार्यपद्धतीमुळे त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वावर कधी डाग लागू दिला नाही. त्यांची प्रतिमा त्यांच्या शुभ्र पोशाखासारखीच स्वच्छ राहिली. त्यांनी स्वतःसाठी आमदारपदाची इच्छा केली नव्हती, पण अशा व्यक्तिमत्त्वांची राजकारणात कमतरता असल्याने शरद पवार साहेबांनी त्यांना आमदारकीसाठी तिकिट दिले आणि विजयी करून क्रीडा व उद्योगमंत्रीपद दिले. हा क्रीडा सहकारी संघटकांचा गौरव होता आणि सगळ्यांनाच त्याचा अभिमान वाटला.

ते आमदार झाले, मंत्री झाले, पण ते नेहमी सर्वसाधारण नागरिकांसारखेच राहिले. फक्त शासकीय कामांसाठी लाल दिव्याच्या गाडीचा वापर करत. वैयक्तिक कामासाठी टॅक्सी किंवा खासगी गाडीचा वापर करत. शिवाजी मंदिर पदाधिकारी आणि विश्वस्त यांच्याशी निकटचे संबंध असूनही ते अनेकदा नाट्यरसिक म्हणून तिकीट काढून नाटक पाहायला जात. शासनाच्या तमाशा मंडळाच्या समितीत कार्यरत असताना त्यांनी कलावंत आणि संस्थांना सन्मान व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासनाला भाग पाडलं.

क्रीडा क्षेत्रात त्यांनी राज्याची आर्थिक तरतूद वाढवलीच, पण केंद्र सरकारकडूनही विविध स्पर्धांच्या माध्यमातून आर्थिक तरतूद वाढवली. शालेय राष्ट्रीय स्पर्धांतील विजेत्यांची स्कॉलरशिप रक्कमही त्यांनी वाढवली. काही राज्य क्रीडा संघटनांना राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या विजेतेपदांमुळे विशेष अनुदान मिळवून देण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला. मी राज्य खो-खो संघटनेत पदाधिकारी असताना आमच्या संघटनेलाही अशी अनुदानं त्यांनी मिळवून दिली.

राष्ट्रीय ज्येष्ठ खेळाडूंना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सरकारी कोट्यातून राष्ट्रीय खेळाडूंना सदनिका मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. अनेक क्रीडापटूंना केंद्र, राज्य शासन आणि खासगी क्षेत्रातून नोकऱ्या मिळवून देण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे क्रीडापटूंशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं. ते नेहमी म्हणायचे,“माझ्यामुळे दुसऱ्यावर अन्याय होता कामा नये. दुसऱ्याची संधी आपण हिरावून घेऊ नये.” इतकं मोठं त्यांचं मन होतं.

क्रीडा क्षेत्रातील कोणत्याही कामासाठी त्यांचं दार सर्वांसाठी सदैव उघडं असायचं. पुण्यातील त्यांच्या सरकारी निवासस्थानी देखील कोणीही कधीही गेले तरी ते मनापासून स्वागत करीत. मंत्री असताना मुंबईतील राज्य खो-खो संघटनेच्या अनेक शासकीय सभा त्यांनी तेथे आयोजित केल्या.

मंत्री असतानाही ते लाल दिव्याच्या गाडीचा वापर न करता आमच्या शिसा ऑप्टिशियन्स दुकानात मोतीबिंदूच्या तपासणीसाठी येत. बुवा, गोळे साहेब आणि राज्यातील इतर मंडळी येथे येऊन चर्चा करीत. डॉ. शिरीष ढगे यांच्याशी त्यांची मैत्री झाली. पुढे डॉ. ढगे यांनी कराड येथे नेत्ररुग्णालय सुरू केले आणि तेथेच अष्टेकर यांनी दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया केली. निवृत्तीनंतरही माझा त्यांच्याशी नियमित संपर्क होता.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक नियमावलीबद्दल ते नेहमीच चर्चा करीत. याबद्दल ते सुधीर खानोलकरांकडे वारंवार विचारणा करत. सध्याच्या क्रीडा संघटनांची कार्यपद्धती पाहता या नियमावलीत जिल्हा व राज्य संघटनांनी बदल करावेत, अशी त्यांची सकारात्मक भूमिका होती. पण त्यांच्या सल्ल्याला कोणी महत्त्व दिले नाही. शरद पवार साहेबांनी मात्र केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनमधून तत्काळ राजीनामा देऊन आदर्श ठेवला. पण इतर अनेक संघटनांनी या नियमावलीकडे दुर्लक्ष केलं.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्यांच्याच संघटनेतील उपाध्यक्ष आशिष शेलार यांना ते पद दिले आणि पुढे केंद्र सरकारकडून अधिकृत बदल करवून घेतले. परंतु इतर क्रीडा संघटनांचे पदाधिकारी फारच हुशार निघाले; त्यांनी नियमावलीकडे दुर्लक्ष करून संघटना बेकायदेशीररित्या चालू ठेवल्या. याबाबत कोणीही अष्टेकर यांचा सल्ला घेतला नाही. त्यांनी केंद्र सरकारची नियमावली घेऊन त्याबाबत माझ्याशी अनेकदा चर्चा केली होती. वर्तमानपत्रांमधील लेख आणि माहितीच्या आधारे त्यांनी विविध क्रीडा संघटनांनी त्वरित बदल करावेत, असे सुचवले होते. आज अनेक संघटना धर्मादाय आयुक्तांच्या माहितीनुसार तांत्रिक अडचणीत सापडल्या आहेत. ही स्थिती त्यांना मान्य नव्हती. मात्र आरोग्यामुळे पुढे त्याकडे लक्ष देणे त्यांना शक्य झाले नाही.

त्यांच्या आदर्श ठेऊन आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनावर चालत अनेक जिल्ह्यांमध्ये क्रीडा संघटक आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार झाली. अनेकांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत. जरी ती पिढी आता निवृत्त झाली असली तरी राज्य आणि देशातील खेळाडूंनी जागतिक स्तरावर यश मिळवले. महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्रात अग्रस्थानी नेण्यात अष्टेकर यांचीच प्रेरणा आणि ऊर्जा कारणीभूत ठरली, असं म्हणावं लागेल.

आता केंद्र सरकारच्या मार्गदर्शक नियमावलीचे पालन सर्व जिल्हा, राज्य आणि फेडरेशन स्तरावरील संघटनांनी केल्यास तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

ज्येष्ठ क्रीडा संघटक

logo
marathi.freepressjournal.in