शरद-पवार येचुरींचा सत्ताबदलाचा मास्टरप्लॅन !

भाजपनं देशातले सर्वच विरोधी पक्ष संपवण्याचा घाट घातलाय, तसं पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उघडपणे सांगितलंय
शरद-पवार येचुरींचा सत्ताबदलाचा मास्टरप्लॅन !

बिहारच्या राजकारणानं देशाच्या राजकारणाला एक वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झालीय; त्याचं सूतोवाच नितीशकुमार यांनी केलंय. मुख्यमंत्रिपदाची आठव्यांदा शपथ घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना जे काही म्हटलं, त्यानं स्पष्ट संकेत मिळताहेत. त्यांच्यामते ‘२०१४ मध्ये आम्ही आलो; पण २०२४ मध्ये आम्ही येऊ की नाही, हे माहीत नाही; पण ‘ते’ नक्की येणार नाहीत हे मात्र निश्चित!’ याचाच अर्थ एक नवी खेळी खेळली जाणार आहे. भाजपनं देशातले सर्वच विरोधी पक्ष संपवण्याचा घाट घातलाय, तसं पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उघडपणे सांगितलंय. आधीच देशातल्या गोदी मीडियानं ‘विरोधी पक्षांकडं मोदींना पर्यायच नाही!’ असं गृहितक उभं केलंय. त्यामुळं विरोधी पक्ष गर्भगळीत झालाय, बिहारच्या या सत्तांतरामुळं त्यांना हायसं वाटू लागलंय! जेडीयू आणि आरजेडी एकत्र आल्यानं बिहारमधल्या लोकसभेच्या ४० आणि झारखंडमधल्या १४ अशा ५४ जागांवर त्याचा प्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. याबाबत हेमंत सोरेन आणि नितीशकुमार यांच्याशी शरद पवार- सीताराम येचुरी यांची चर्चा सुरू होती. या त्याला यश आलेलं दिसतंय. नितीशकुमार हे मोदींच्या प्रभावातून बाहेर पडल्यानं आता देशात नवं समीकरण आकाराला येईल, असं दिसतंय!

संसदेच्या लोकसभेच्या ५४३ जागा आहेत. त्यातल्या ३०३ जागा या आज भाजपकडं आहेत. २०१९ मध्ये त्यांना मिळालेली मतं आहेत ३७.३६ टक्के; पण जी मतं भाजपला मिळाली नाहीत, त्याची टक्केवारी ६२.७४ इतकी आहे. म्हणजे जवळपास दुप्पट मतं भाजपच्या विरोधातली आहेत. यूपीएकडं ११० तर इतरांकडे ९५ जागा आहेत. म्हणजे २०५ जागा या भाजप विरोधातल्या आहेत. नितीशकुमार यांना पुढं करून जर आणखी ७०-८० जागा मिळवता आल्या तर भाजपच्या तेवढ्याच जागा घटतील आणि भाजपच्या जागा ह्या २५०च्या आसपास राहतील. असं घडलं तर येचुरी-पवारांचा गेम इथं सुरू होईल. झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यावर येचुरी-पवारांची नजर आहे. लोकसभेच्या झारखंड १४, बिहार ४०, उत्तर प्रदेश ८० आणि महाराष्ट्र ४८ अशा मिळून १८२ जागा आहेत. महाराष्ट्राला जरी वगळले तरी बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण जागापैकी २५ टक्के जागा या पट्ट्यात आहेत. जो काही खेळ होईल तो इथंच होईल, असा होरा असल्यानं येचुरी-पवार सतत नितीशकुमार, हेमंत सोरेन आणि अखिलेश यादव यांच्या संपर्कात आहेत. आज देशातल्या निवडणुकांसाठी मोदी-शहांच्या नंतर पवारच विरोधकांना संसाधन उपलब्ध करून देऊ शकतात. कारण देशातल्या सर्वच उद्योगपतींशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. देशातल्या विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी पवारांशिवाय दुसरं व्यक्तिमत्त्व आजतरी नाही. कारण सर्व पक्षांशी पवारांचे व्यक्तिगत संबंध आहेत.

येचुरी-पवार यांच्या साथीनं नितीशकुमार २०२४ ला दिल्लीकरांना आव्हान देऊ शकतात. त्यांची रणनीती काय असेल, त्याची भूमिका काय असेल, ते कशाप्रकारे वर्कआऊट करताहेत हे हळूहळू लक्षात येईलच. अनेक राज्यातल्या जवळपास १८०-२०० जागांवर काँग्रेसची भाजपशी थेट लढत होत असते. राजस्थान, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश असो, अशा अनेक राज्यांत ही थेट लढत आहे. तिथं काँग्रेसनं मजबुतीनं उभं राहावं, असं पवारांना वाटतं. अशाच प्रकारे नितीशकुमार यांच्याकडंही ते पाहतात. हिंदीपट्ट्यात त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड इथल्या हिंदी भाषिक मतदार स्वीकारतील, असा नितीशकुमार यांच्याव्यतिरिक्त इतर कोणताही नेता आजतरी दिसत नाही. आठ वेळा मुख्यमंत्रिपदाच्या शपथ घेणारे नितीशकुमार यांना केंद्रीय मंत्री म्हणून कामाचा अनुभव आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात ते होते. ‘पंतप्रधानपदाचे उमेदवार’ म्हणून भाजपनं मोदींना जाहीर केल्यानंतर मोदींवर टीका करत ते भाजपप्रणित सरकारमधून बाहेर पडले होते, हा इतिहास आहे. काँग्रेसचं हिंदी पट्ट्यातलं पुनरुज्जीवन आणि नितीशकुमार यांचं पुनरागमन कशाप्रकारे होतेय, यावरच पवारांचा हा मास्टरप्लॅन अवलंबून असेल; पण एवढं मात्र निश्चित की, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना याची जाणीव झाल्यानंतरच सध्या पवारांना आणि त्यांच्या बारामतीला टार्गेट केलं जातंय, जेणेकरून पवार तिथं अडकून राहतील! उत्तर भारतात आजतरी कोणताही मित्रपक्ष भाजपकडं राहिलेला नाही. त्यांनी तिथल्या मित्रपक्षांना संपवलंय. भाजपला नितीशकुमार यांचा हिंदुत्वाला विरोध आहे हे गृहितक आता चालविता येणार नाही. कारण आजवर बिहार आणि केंद्रात एनडीए सरकारमध्ये नितीशकुमार यांचा जेडीयू होता. सत्तेसाठी बिहारमध्ये नितीशकुमार चालले, त्यांच्या आमदारांची संख्या कमी असतानाही त्यांना मुख्यमंत्रिपद बहाल केलं होतं. त्यामुळं भाजपला नितीशकुमार यांना विरोध करण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. लोकसभेसाठी अद्यापि दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. विरोधकांची मोट बांधायला पुरेसा अवधी आहे. भाजपला नितीशकुमार यांचं आव्हान वाटत असल्यानं त्यांनी त्यांच्या विरोधात कंबर कसली आहे. ‘पलटूराम’ म्हणत त्यांच्यावर टीका केली जातेय. नितीशकुमार यांनी भाजपचा विश्वासघात केलाय, अशीही टीका ते करताहेत. इथं मुद्दा सत्तेचा नाही तर सत्ता मिळवण्याच्या अघोरी मार्गाचा आहे. विविधतेत एकता न पाहण्याच्या दृष्टिकोनाचा आहे, एकाधिकाराचा आहे, राक्षसी महत्त्वाकांक्षेचा आहे. नागरिकांमध्ये सजगता आणण्याऐवजी बधीर-अंधत्व आणण्याचा आहे.

काँग्रेसकडं पवारांच्या तोडीचा नेता नाही. पवारांचं राजकीय व्यक्तिमत्त्व मोदीही मानतात. कारण पन्नास वर्षांहून अधिक काळ ते सक्रिय राजकारणात आहेत. पंतप्रधानही त्यांना चाणक्य मानतात. ते मागे एकदा जाहीरपणे म्हणाले होते की, ‘राजकारणाची दिशा कोणत्या बाजूला झुकलीय वा हवा कोणत्या दिशेनं वाहतेय हे समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या शेजारी जाऊन काही काळ बसलं तर लक्षात येईल!’ पवारांच्या व्यक्तिमत्त्वातले काही पैलू पाहिले तर लक्षात येईल की, जे असाध्य ते साध्य करण्याचा ते प्रयत्न करतात. त्यांची पकड सहकारी चळवळी बरोबरच उद्योगपतींवरही आहे. ज्यांची कार्पोरेट कार्यालये इथं मुंबईतच आहेत. अदानी-अंबानीच नव्हे, तर इतर सारे उद्योगपती पवारांसमोर नतमस्तक होत असतात. त्यामुळं काही घडवायचं असेल तर लागणाऱ्या साधनसामग्रीची, संसाधनाची पवारांकडं कमतरता नाही. त्यामुळं एखादा निर्णय घेतला तर त्याची अंमलबजावणी मजबूतपणे ते करू शकतात. पवार कधी डगमगलेले दिसले नाहीत, मग त्यांना ईडीनं बोलावलं असेल, त्यांच्या नातेवाईकांवर, सहकाऱ्यांवर कारवाया होत असतानाही हे शांत दिसले. हाच आत्मविश्वास त्यांना राजकारणातली वाटचाल करण्याला ताकद देत असतो. संसाधन आणि अंमलबजावणीनंतर त्यांच्याकडं एक असा गुण आहे की, ते फोडाफोडीच्या राजकारणात माहीर आहेत. भाजपच्या मागे संघाची ताकद आहे. कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे, कार्पोरेट जगताचा मोठा पाठिंबा आहे. आता तर सर्व सत्ता हाती आहे. साऱ्या संस्था, यंत्रणा ताब्यात आहेत. असं असलं तरी देशातलं अंतर्गत संबंधातलं राजकारण मोदीहून पवार अधिक जाणतात. हे खुद्द मोदीही मानतात. ते शरद पवारांच्या पुस्तकाचं प्रकाशन करताना म्हणाले होते की, ‘पवारांमध्ये एक शेतकरी लपलेला आहे. शेतकऱ्याला हवामानाचा अंदाज सर्वात आधी येतो. शरदरावांनी त्यांच्या त्या गुणांचा राजकारणात पुरेपूर उपयोग केलाय! शरद पवारांसमोर दोन महत्त्वाची आव्हानं आहेत. एक काँग्रेसला वळवणं, त्यांच्यात पडलेली फूट सांधणं, अस्वस्थ असलेल्या, दूर गेलेल्या काँग्रेसजनांना एकत्र आणणं! काँग्रेसनं मजबुतीनं उभं राहावं, असं पवारांना वाटतं. हा सत्ताबदलाचा राष्ट्रीय खेळ खेळण्यासाठी पवारांनी हाताशी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांना घेतलंय. वयोपरत्वे त्यांना हालचाली करणं शक्य नसल्यानं येचुरीच्या मदतीनं मास्टरप्लॅन तयार केलाय. पाहू या पुढं काय होतं ते!

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in