जाणत्या राजाच्या कार्याचे विस्मरण शक्य आहे?

राज्याच्या आर्थिक विकासासाठी उद्योगांना चालना दिली. कारण त्यामुळे तरुणांच्या हाताला रोजगार मिळतो आणि करांच्या रूपाने सरकारी खजिन्यात भर पडते. त्यासाठी इमारती, रस्ते, बंदरं (इन्फ्रास्ट्रक्चर) या पायाभूत बाबी उभाराव्या लागतात. ही पायाभूत कामे शरद पवार यांनी केली.
जाणत्या राजाच्या कार्याचे विस्मरण शक्य आहे?
Published on

- रघुनाथदादा पाटील

मत आमचेही

राजकीय जीवनात काही सकारात्मक करायचं असेल तर मूल्याधारित संघर्षाला पर्याय नसतो. मागील जवळपास सहा दशकांपासून राजकारणात प्रदीर्घ लढा देत, आपल्या तेजस्वी ताकदीच्या जोरावर शरद पवार यांनी राजकीय पटलावर आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे. राज्याच्या विकासात अमूल्य योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना रोखणे कोणालाही आजवर शक्य झालेले नाही. त्यांच्या कृतीमागे नैतिक अधिष्ठान आणि विचारसरणीचा भरभक्कम आधार असल्याने त्यांचे नैमित्तिक पराभवही पुढच्या मोठ्या विजयाची नांदी ठरलेले आहेत. सर्वांच्या भल्याकरिता काम करणे, स्वतःची जबाबदारी स्वतः घेणे याबाबतीत शरद पवार यांचे वेगळेपण आजही सर्वांना मार्गदर्शक ठरते.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा पुढे चालवताना राज्याची वाटचाल आणि विकास या दृष्टीने शरद पवार यांचे योगदान किती आहे आणि कोणत्या स्वरूपाचे आहे, हे समजून घ्यायचे असेल, तर काही बाबी लक्षात घेणे अपरिहार्य आहे.

आपल्या राजकीय कारकीर्दीत शरद पवार यांनी नवं ज्ञान, तंत्रज्ञान, कला, साहित्य यांना कायम प्रोत्साहन दिले आहे. रस्ते, उद्योग, कृषी, क्रीडा, पतपुरवठा या क्षेत्रांकडे लक्ष देत अधिकारांचे विकेंद्रीकरण, स्थानिक स्वराज संस्थांचा विकास, सहकारातून स्थानिकांची आणि राज्याची समृद्धी कशी होईल, याकडे विशेष लक्ष दिले आहे. प्रशासन सक्षम करतानाच राज्य यादी आणि संयुक्त यादीतील अस्तित्वात असलेले कायदे आणि त्यात राज्याच्या दृष्टीने करावयाचे अनुरूप बदल, नगररचना, पाणीपुरवठ्याचं नव तंत्रज्ञान, हे सर्व उभे करण्याचा तो काळ होता. त्यासाठी धन गरजेचे असते. बुद्धिमत्ता, कौशल्य, कारागिरी यांना प्रोत्साहन देऊन हाताला रोजगार उपलब्ध करून देणे, हे महत्त्वाचे कामही शरद पवार यांनी केले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्व जाती आणि धार्मिक समूहांना प्रतिनिधित्व देत सामाजिक संतुलन साधण्यासाठी शरद पवार यांनी कायम आपले कसब पणाला लावले.

मराठवाडा विद्यापिठाचा नामविस्तार हे याचे एक उदाहरण आहे. नामविस्तार करताना सत्तेचे गणित चुकू शकते, याची जाणीव त्यांना होती. पण सामाजिक न्याय आणि बंधुभाव यांची रुजवण करण्यात शरद पवार यांनी पुढाकार घेतला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती आदर व्यक्त करत, राजकीय किंमत देत नामविस्तार केलाच.

राज्याच्या आर्थिक विकासासाठी उद्योगांना चालना दिली. कारण त्यामुळे तरुणांच्या हाताला रोजगार मिळतो आणि करांच्या रूपाने सरकारी खजिन्यात भर पडते. त्यासाठी इमारती, रस्ते, बंदरं (इन्फ्रास्ट्रक्चर) या पायाभूत बाबी उभाराव्या लागतात. ही पायाभूत कामे शरद पवार यांनी केली. राज्याचे उत्पन्न वाढवायचे असेल तर स्थानिक लोकांना दूर ठेवून, त्यांना विकासात वाटेकरी करून न घेता राज्य करता येत नाही. त्यासाठी स्थानिक व्यापारी, शेतकरी यांना सामावून घेत एक सर्वसमावेशक संस्कृती निर्माण करावी लागते. त्याकडे शरद पवार यांनी विशेष लक्ष दिले. देशाचे संरक्षण मंत्री पद भूषवताना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लष्करी तंत्रज्ञानाकडे त्यांनी अधिक लक्ष पुरवले. वायुदलात महिलांनाही प्रवेश देण्यात यावा, यासाठी संरक्षण मंत्री म्हणून शरद पवार यांनीच पुढाकार घेतला. महिलांच्या संदर्भातले त्यांचे सगळ्यात महत्त्वाचे योगदान म्हणजे देशातले पहिले महिला धोरण महाराष्ट्र राज्याने तयार केले. तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी यात स्वत: लक्ष घातले.

मराठी भाषेत साहित्य निर्मिती व्हावी यासाठी साहित्य क्षेत्रातील नामवंत साहित्यिकांना योग्य तो सन्मान देत सांस्कृतिक क्षेत्रात योगदान दिले. विज्ञान, तंत्रज्ञानात जे प्रगत असतात ते सत्ताधारी होतात. हे ओळखूनच शरद पवार यांनी कायम उत्पादन क्षेत्रं, शेती व कारखाने, हस्तकला व व्यापार यांना चालना दिली. कारण त्यांना राज्य कसे चालवायचे याचे पुरेपूर भान आहे. शिक्षण क्षेत्रात राज्याची प्रगती व्हावी, यासाठी केंद्राची मदत घेत, त्यात राज्य निधीचा वाटा घालत राज्यात शिक्षण क्षेत्रातील प्रगत मॉडेल उभे राहावे, यासाठी शरद पवार यांनी अतिशय महत्त्वाचे योगदान दिले आहे. अनुसूचित यादीतील समाजघटकांना असलेल्या आरक्षणासोबत बाकी समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी केवळ एक ‘ईबीसी फॉर्म’ भरून मोफत आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले. त्यातूनच शिकलेल्या पिढ्या आज काँग्रेस-राष्ट्रवादीने काय केले, असा कृतघ्न सवाल करतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. आज शिक्षण किती महाग झाले याचा किंचित जरी विचार केला तरी वास्तवाची प्रखरतेने जाणीव होऊ शकते.

खेळाच्या मैदानातील ‘तेल लावलेला हा पहिलवान’ भल्याभल्यांना अक्षरश: आस्मान दाखवतो. कबड्डी, कुस्ती, क्रिकेट अशा सर्व क्रीडा प्रकारात रमणाऱ्या पवार यांनी या क्षेत्राकडेही सातत्याने लक्ष दिलेले आहे. खेळाडूंना विविध सुविधा, निवृत्त क्रिकेटर मंडळींना भरीव निवृत्तीवेतन, मैदानांची उपलब्धता यासह कित्येक बाबी उपलब्ध करून दिल्या आहेत. क्रीडा विभागासाठी सुसज्ज कार्यालये, ग्रंथालये, पुरेसा निधी उपलब्ध करून महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्रात अग्रेसर बनवले.

छत्रपती शिवाजी महाराजांना जसा विरोध झाला, काहीसा तसाच विरोध शरद पवार यांनाही केला गेला. परंतु शरद पवार यांचे वैशिष्ट्य असे की, ते कधीही, कशाचाही खुलासा करत बसले नाहीत. त्यामुळे काही वेळा अशा द्वेषाने बरबटलेल्या लोकांचे फावले देखील. पण यथावकाश त्यांच्या आरोपातील खोटेपणा समोर आला आणि शरद पवार यांच्यावरचा एकही आरोप कधीही कुणी सिद्ध करू शकले नाहीत.

भारतीय राजकारणात सर्वाधिक काळ, जवळ जवळ ५७ वर्षे न हरता शरद पवार आपले स्थान टिकवून उभे आहेत. किंबहुना राज्याचे राजकारण कायम त्यांच्या ‘नावाभोवती’ फिरत असते, हेच त्यांच्या सह्याद्रीएवढ्या उत्तुंग प्रतिमेचे द्योतक आहे. यासाठी सत्य शोधण्याची तयारी हवी. प्रपोगंडा करणाऱ्या ‘ट्रोल्स’च्या विषारी प्रचाराला बळी पडता कामा नये. आपल्या महाराष्ट्राच्या या अशा अभ्यासू, धर्मनिरपेक्ष, सुसंस्कृत नेत्यासारखा नेता आज तरी देशपातळीवर दिसून येत नाही. तिरस्कार करणे ही फार सोपी गोष्ट आहे. अभ्यास करणे थोडे कठीण असले तरी अशक्य मुळीच नाही. तुमची राजकीय भूमिका काहीही असू शकते, पण आपल्या मातीतील माणसाबद्दलचा जिव्हाळा आणि अस्मिता सर्वतोपरी असायला हवी. कारण आपण याच महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवरायांचे अनुयायी आहोत. व्हॉट्सॲप विद्यापिठाच्या पलीकडे ‘पुस्तक’ नावाची एक दुनिया आहे. त्या दुनियेत माणसं खरोखर उलगडता येतील असे साहित्य आणि घटना कैद असतात. त्यावरून माणूस कळायला लागतो. आपण तटस्थपणे कुठल्याही राजकीय चष्म्याशिवाय पवार यांच्याविषयी, त्यांच्या कारकीर्दीविषयी वाचाल तर पवार साहेबांचे योगदान आणि कर्तृत्व याचा उलगडा नक्की होईल!

‘माणसं’ हे भारताचे सगळ्यात मोठे भांडवल आहे, याचाच दुर्दैवाने आपल्याला विसर पडला आहे. शरद पवार यांनी मात्र ते कायम लक्षात ठेवले. शेवटी महत्त्वाचं काय तर दुसऱ्यावर प्रेम करण्याचे धाडस आपल्यामध्ये असायला हवे. इतरांच्या आनंदात सहभागी होण्याइतका मनाचा मोठेपणा हवा. काही मूलभूत मूल्यांवर साहेबांची असलेली निष्ठाच त्यांच्या या योगदानाला कारणीभूत आहे. आयुष्य म्हणजे संचित आहे, ते वाया घालवणे म्हणजे गुन्हाच! स्वतःची जबाबदारी स्वतः घेणे, बुद्धीचा सर्वाधिक चांगल्या प्रकारे वापर करणे आणि सर्वांच्या भल्याकरिता काम करणे, ही त्रिसूत्री साहेबांनी आयुष्यभर जपली. अगदी आपला चालक असलेल्या ‘कामा’ या सहकाऱ्याच्या आठवणींना आपल्या आत्मचरित्रात स्थान देणे, ही शरद पवार यांच्या संवेदनशीलतेची पावती आहे. एक राजकारणी म्हणून हिमालयाएवढे असलेले सगळ्यांचे ‘साहेब’ माणूस म्हणूनही अत्यंत ग्रेट आहेत, ही जाणीव मनात घर करून बसते.

(लेखक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार महाराष्ट्र) या पक्षाचे नेते आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in