

सह्याद्रीचे वारे
अरविंद भानुशाली
शिवसेना उबाठाचे सहा खासदार बंड करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेले. दरम्यान उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘दिसेल तेथे तुडवा, हाणा, मारा एवढेच नव्हे तर राडा करा’ असे आदेश देऊनही फारसे कुठे तुडवायचे प्रकार झाल्याचे दिसत नाही.
शिवसेनेचा एकेकाळी खूप मोठा दरारा होता; परंतु आता ती परिस्थिती तेथे राहिली नाही. ठाणे महापालिका निवडणुकीत बंडखोरी झाली. श्रीधर खोपकर या नगरसेवकाची हत्या झाली. त्या खटल्यामध्ये आनंद दिघे यांना अटक झाली. या अटकेच्या निषेधार्थ संपूर्ण ठाणे, पालघर, नाशिक या जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले होते. खोपकर हत्याकांड बाजूलाच राहिले; परंतु आनंद दिघे हेच त्याचे हिरो ठरले. ती परिस्थिती आता कुठे दिसत नाही. यापूर्वी बंड करणाऱ्या नेत्याला तुडवा, हाणा, मारा असे आदेश देण्याची प्रथा कधी नव्हती. स्वयंस्फूर्तीने शिवसैनिक बंडखोरांच्या विरोधात रस्त्यावर उतरत असत. आता आदेश देऊनही त्याचा फारसा काही उपयोग होत नाही. छगन भुजबळ यांनी १९९१ मध्ये नागपूर येथे बंडखोरी केली होती. त्यावेळी ते तेथे नागपूर अधिवेशनापर्यंत पोहचू शकत नव्हते. पोलीस संरक्षणातच त्यांना विधान भवनामध्ये यावे लागले. त्यानंतर नारायण राणे यांच्याबाबतही तेच घडले. निवडणुकीत नारायण राणे यांचा पराभव व्हावा यासाठी दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कणकवली, सावंतवाडी येथे प्रचारसभेसाठी गेले होते. बंड करणाऱ्यांना भीती होती. आता ती राहिल्याचे या बंडानंतर दिसले नाही.
बाळासाहेबांच्या पश्चात हा धाक संपला आहे. याची कारणे बरीच आहेत. त्यावेळी बाळासाहेबांच्या समवेत निष्ठावंत नेते होते. मनोहर जोशी, दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे, सुधीरभाऊ जोशी, लीलाधर डाके, मधुकर सरपोतदार असे अनेक दिग्गज नेते होते. शिवसेनाप्रमुखांना अटक करण्याचे नाटक झाले, त्यावेळी उभा महाराष्ट्र पेटून उठला होता. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले विलासराव देशमुख यांनी तर कानावर हात ठेवले होते. आज ती परिस्थिती दिसत नाही. आज शिवसेनेकडे धाक राहिला नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मुंबईतील बॉम्बस्फोट, जातीय दंगली उभ्या महाराष्ट्राने पाहिल्या. त्यावेळी गुजराती व अन्य बांधवांचे रक्षण शिवसेनेने केले. आता मात्र मराठी मराठीत्तर, जातीपातीच्या भिंती उभ्या केल्या जात आहेत.
मराठवाड्यात शिवसेना पोहचली ती खऱ्या अर्थाने नामांतराच्या चळवळीच्या नंतर. बाळासाहेबांनी मराठवाड्याची अस्मिता हा प्रमुख मुद्दा हाती घेऊन नामांतराला विरोध केला होता. त्यानंतर मराठवाड्यात शिवसेना घरोघरी पोहचली. मोरेश्वर सावे हे पहिले शिवसेनेचे महापौर होते. या सहा बंडखोर खासदारांपैकी तीन खासदार हे मराठवाड्यातील आहेत. आहेत ते ओरिजिनल शिवसेना उबाठामधून २०२४ मध्ये निवडून आलेले. त्यांनी आता शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शनिवारी यवतमाळ येथे उद्धव ठाकरे यांची सभा झाली. प्रतिसाद चांगला मिळाला; परंतु तो उत्साह दिसत नव्हता. यापूर्वी बंडखोरांना पळताभुई थोडी व्हायची.
सन २०२२ मध्ये जून महिन्यात शिवसेनेच्या विरोधात मोठे बंड झाले. ४० आमदारांनी मूळ शिवसेना सोडली आणि ते शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. सत्ता नसल्याने अनेक पडझडी सुरू झाल्या. या पडझडीत मंत्रिपद सोडून शिंदे गटात सामील झाले हे पहिल्यांदा घडले. या पहिल्या बंडखोरीनंतर जे होणे आवश्यक होते ते उद्धव ठाकरे यांच्याकडून झाले नाही. गुवाहाटीवरून हे आमदार मंत्री मुंबईत येऊ शकणार नाहीत आणि आले तर त्यांना विधान भवनाची पायरी चढता येणार नाही अशी दमबाजी करण्यात आली, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यावेळी कुठल्याही प्रतिक्रिया उमटल्या नाहीत. गद्दार, ५० खोके इथपर्यंत झाले, पण त्याचा परिणाम मात्र कुठे झाला असे दिसून आले नाही. सर्वसाधारणपणे बंड करणारे आमदार हे शिवसेनेतून यापूर्वी कधी निवडून आले नाहीत. याची अनेक उदाहरणे देता येतील. भुजबळांच्या बरोबर तसेच नारायण राणे यांच्या सोबत गेलेले आमदार पुन्हा विधानसभेत दिसले नाहीत. मात्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे बंड झाले त्यामध्ये बंडखोर आमदार निवडून आले. याशिवाय शिंदे समर्थकांचा आकडाही ४० चा ५३ वर गेला. तेथूनच मूळ शिवसेना ही गलितगात्र होऊ लागली, ती आजतागायत.
राज्यात महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत व १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या. या सर्व निवडणुकीत महायुती ही उजवी ठरली. उबाठा शिवसेना, शप राष्ट्रवादी व काँग्रेस यांचा पालापाचोळा झाला. एवढेच कशाला, नुकत्याच झालेल्या १७ विधान परिषद निवडणुकांत महाविकास आघाडीचे उमेदवार पळून गेले. अमरावतीमध्ये तर फॉर्म भरलेला काँग्रेसचा कार्यकर्ता हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखल झाला. अनेक ठिकाणी उमेदवार जे दिले होते त्यांनी माघार घेतली. दुसऱ्या बाजूला महायुतीकडे उमेदवारी मिळविण्यासाठी रांगा लागल्या होत्या. ६ ठिकाणी विधान परिषदेच्या जागा बिनविरोध झाल्या. महाराष्ट्रात असे यापूर्वी कधी घडले नव्हते. विरोधक निष्प्रभ झाल्याने सत्ताधारी आघाडीवर राहिले आहेत. खरं पाहू गेल्यास विरोधक हे प्रबळ असणे आवश्यक आहे; परंतु सध्यातरी तशी परिस्थिती नाही. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार कोसळले. तेथे भाजपला बहुमत मिळाले. आता २०-२२ खासदार भाजपचा दरवाजा ठोठावत आहेत. तमिळनाडूमध्ये डीएमके सुद्धा इंडिया आघाडीतून बाहेर पडला आहे. याचबरोबर उत्तर प्रदेशमध्येही घमासान सुरू झाले आहे. आता पुढील वर्षात ६ राज्यांत निवडणुका होत आहेत. अशावेळी प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व हे जवळजवळ संपुष्टात येत आहे.
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे पॉवरफुल होत आहेत. ते २०२९ च्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवू पाहात आहेत. तशी तयारी त्यांनी सुरू केली आहे. दुसऱ्या बाजूला उबाठा शिवसेना ही खाचखळग्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या कारकीर्दीत शिवसेना ही धगधगती आग होती, आता मात्र ही आग विझून केवळ धूर राहिला आहे ही शोचनीय परिस्थिती महाराष्ट्रासाठी घातक आहे. मराठी माणसांसाठी शिवसेना जिवंत राहिली पाहिजे यात वाद नाही; परंतु नेतृत्व जेव्हा दिशाहीन होते तेव्हा परिस्थिती वाईट होते हे उबाठाच्या आत्ताच्या स्थितीवरून दिसून येते.
यापूर्वी शिवसेना हा मोठा भाऊ व भाजप हा लहान भाऊ अशी परिस्थिती होती. आता मात्र भाजप हा एक नंबरवर असून उबाठाची परिस्थिती अत्यंत दारुण आहे. सध्या उबाठाच्या मांडवामध्ये मुस्लिम व इतर मंडळी मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहेत व हेच कडवट शिवसैनिकांना मान्य नाही. खऱ्या अर्थाने शिवसेनेचा ऱ्हास सुरू झाला तो २०१९ मध्ये काँग्रेसबरोबर सत्ता मिळविण्यासाठी ज्या तडजोडी केल्या गेल्या त्यामुळे. २२ जून २०२२ रोजी मोठे बंड झाले. निवडणूक आयोगाने शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे असे जाहीर केले. धनुष्यबाण निशाणी व ओरिजिनल शिवसेनेचे नावही शिंदे गटाला देण्यात आले. तेथेच खऱ्या अर्थाने शिवसेनेला घरघर लागली. शिवसेनेची अवस्था ६० वर्षांनंतर एवढी दारुण होईल अशी अपेक्षा कोणालाही नव्हती. उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले होते. सोन्याचे अंडे देणारी मुंबई जिंकण्याकरिता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत असलेले मतभेद मिटवून हातमिळवणी केली. मात्र तरीही त्यांना मुंबई जिंकता आली नाही.
एक मात्र निश्चित की मुंबई मराठी माणसाचे नाव हे राहिले पाहिजे म्हणून सगळे मतभेद विसरून अनेक मंडळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिली; परंतु ते सत्तास्थानी पोहचू शकले नाहीत. आता तिसरा व चौथा टप्पा बंडखोरीचा राहिला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकताच उबाठा शिवसेना आमदारांची बैठक बोलावली होती. त्यातही चार आमदार गैरहजर होते. आता आमदारांच्या बंडाची भाषा सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचा प्रश्नही सध्या ऐरणीवर आहे. एकूण या पुढच्या काळामध्ये काय काय घटना घडणार आहेत हे लवकरच कळेल. एकनाथ शिंदे यांनी आत्तापर्यंतचे दोन्ही बंड यशस्वी केले. आता तिसऱ्या आणि चौथ्या बंडाकडे लक्ष लागले आहे. एक मात्र निश्चित की ती शिवसेना आता राहिली नाही.