- अभय जोशी
फोकस
छत्रपती शिवरायांची जयंती आणि राज्याभिषेक दिन हे दोन्ही दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत. मराठवाड्यातील योगेश्वरी शिक्षण संस्थेत हे दोन्ही दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरे होत आहेत. वृक्षारोपणाच्या माध्यमातून शिवरायांना वृक्षांचा अभिषेक केला जात आहे. त्यासाठी विविध ठिकाणांहून माती व जल आणण्यात आले आहे. २१ मार्च हा आंतरराष्ट्रीय वन दिन. त्यानिमित्ताने आपल्या महामानवांना वंदन करताना पर्यावरणीय भान कसे ठेवावे, याचे हे उदाहरण महत्त्वाचे आहे.
गेल्या काही वर्षांत जागतिक तापमानात वाढ, जमिनीतील पाणी पातळीत घट आणि लहरी पाऊसमान अशा तिहेरी संकटाचा सामना जगभरात केला जात आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यात अपुरा पाऊस पडला तर दुष्काळाच्या संकटाला तोंड द्यावे लागते. तर गेल्या काही वर्षांत पाऊस हिवाळ्याच्या सुरुवातीपर्यंत काही दिवस लांबतो म्हणून ‘हिवसाळा’ असा नवा शब्दप्रयोग केला जात आहे. पावसाळा सोडून अन्य ऋतुमध्ये पाऊस पडणे म्हणजे हाती आलेल्या पिकांचे नुकसान ठरलेले. त्यामुळे या संकटांचा मुकाबला करण्यासाठी, तापमानवाढीला आटोक्यात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तसेच भारतातही वन क्षेत्रात वाढ करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सरकारी पातळीवरील प्रयत्न हे कासवगतीने सुरु असतात. परंतु त्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन या प्रयत्नांचे रुपांतर लोकचळवळीत करायला हवे. त्यासाठी स्वयंसेवी संस्था, खासगी संस्था आणि पर्यावरणप्रेमींच्या मदतीने वन, जल संपत्तीचा ऱ्हास थांबवून मानवी जीवन सुसह्य करायला हवे.
२१ मार्च या आंतरराष्ट्रीय वनदिनाच्या निमित्ताने वन आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या मराठवाड्यातील एका संस्थेच्या प्रयत्नांचा आढावा इथे घेत आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात वकील मंडळींनी एकत्रित येऊन १९१७ मध्ये स्थापन केलेली ‘योगेश्वरी शिक्षण संस्था’ पर्यारवरणरक्षक म्हणून उदयास आली आहे. शतकाहून अधिक काळ शिक्षणासारखे पवित्र व्रत घेऊन संस्थेने गेल्या ३० वर्षांपासून वन आणि जल संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. आता डॉक्टर सुरेश खुरसाळे यांच्या गेल्या २० वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत संस्थेच्या २५ एकरांहून अधिक क्षेत्र असलेल्या आवारात वनीकरण आणि भूजल संवर्धनासाठी मोठी चालना मिळाली आहे. डॉ. खुरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या आवारात मेजर प्रा. एस.पी. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हिरवाई बहरली आहे. वृक्षारोपणात विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग वाढवण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करुन मेजर कुलकर्णी यांनी नुकतीच छात्र सेनेतून निवृत्ती घेतली आहे. कुलकर्णी यांनी गेल्या २० वर्षांत वनीकरणासाठी अनेक प्रयोग केले.
यावर्षी ते छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती व ३५० वा राज्याभिषेक अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत आहेत. योगेश्वरी ग्रीन आर्मीच्या वतीने १९ फेब्रुवारीला शिवजयंती निमित्ताने ‘शिववृक्षाभिषेक’ करण्यात आला. वृक्षारोपणाने महाराजांना मानवंदना देण्याचा निर्धार मेजर एस. पी. कुलकर्णी यांनी केला. भक्ती आणि शक्तीचा संगम करून, वृक्षाभिषेक करून शिवजयंती साजरी करायची असा निर्धार त्यांनी केला. एरवी शिवजयंतीच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, मिरवणूका अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांनी साजरी केली जाते. पण शिववृक्षाभिषेक हा आगळावेगळा कार्यक्रम होता. महाराजांना राज्याभिषेक करण्यासाठी विविध ठिकाणांहून जल आणण्यात आले होते तसेच वृक्षाभिषेकासाठी ऐतिहासिक स्थळावरून माती आणि पाणी आणण्यात आले.
त्यासाठी गंगा, गोदावरी, चंद्रभागा, महाड, हिमाचल प्रदेश या ठिकाणचे पाणी व सिंहगड, सेवाग्राम, कोल्हापूर, पंढरपूर, पैठण या तीर्थ क्षेत्रावरील माती आणून शिववृक्षाभिषेक करण्यात आला. शिवजयंती ते राज्याभिषेक दिन या कालावधीत ३५० वृक्षारोपण करुन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रामुख्याने वड, पिंपळ, लिंब,आंबा अशा देशी वाणांच्या वृक्षारोपणासाठी प्रेम, सागर,सायली, पियुष यांनी ही माती व पाणी आणले व महाराजांना वृक्षाभिषेक केला. वृक्षारोपणाने महाराजांना अभिवादन करून जल-जमीन-जंगल याविषयी प्रेम निर्माण करणे हा हेतू यामागे आहे.
वृक्षरोपण करून शिवराई निर्माण करणे, हा एक आगळावेगळा पर्यावरणीय उपक्रम महाराजांच्या नावाने सुरु असून १९ फेब्रुवारी ते ६ जून म्हणजे तीन महिने सोळा दिवस हा उपक्रम सुरु राहणार आहे. याआधी झालेल्या कारगील युद्धात शहीद झालेल्या प्रत्येक जवानांच्या नावाने संस्थेच्या २५ एकरच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यामुळे संस्थेचा परिसरात हरित झाला आहे. आता शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने वृक्षारोपण करुन या २५ एकराच्या परिसरात शिवराई निर्माण करणाऱ्या वनयोद्धयाला सलाम.